Monday, 24 April 2017

चुकणारी  आई


"तुम्ही दोघांनी जर पटपट खाल्लं तरच पार्कमधे जायचंय, नाहीतर नाही" तिने नेहेमीप्रमाणे मुलांनी लवकर खावं म्हणून सांगितलं. आर्यन आणि विहान वय वर्ष पाच आणि तीन, दोघांनी आईची धमकी किती गंभीर आहे याचा अंदाज घेतला. आर्यनने पहिला घास तोंडात टाकला आणि " आय डोन्ट लाईक डोसा" म्हणून तोंड वाकडं केलं. विहानने तर भरवलेला घास तोंडातून फू फू करून बाहेर काढला. "त्यांना नकोय तर जाऊदे ना कॉर्नफ्लेक्स खाऊ दे त्यांना" नवर्याचा एक्स्पर्ट ओपिनियन! तोही मुलांसमोरच! तिला सुचेना की आता आधी मुलांना ओरडावं की नवर्यावर चिडावं ! "आपल्या पोटातल्या गुड बॅक्टरीयासाठी आंबवलेले पदार्थ चांगले असतात. आठवड्यात एक दिवस तरी शिजवलेला ब्रेकफास्ट खायला नको का त्यांनी! रोज कॉर्नफ्लेक्सचं खातात ना! आणि तू त्यांना खायला सांगायचं सोडून..." आता तिने आधी मोठ्या मुलाकडे, आर्यनकडे मोर्चा वळवला. तिने दामटून त्याला बसवलं आणि एक एक घास करत अक्खा डोसा भरवला . 
 "बॉल वगैरे काय घ्यायचं ते घे तोपर्यंत मी विहानला भरवते." विहानला भरवायला तिने घास घेतला खरा पण विहानने तोंड घट्ट मिटून घेतलं. शेवटी कंटाळून तिने तो नाद सोडून दिला. नाश्या ऐवजी विहानला एक ग्लास दूधच देण्यात आलं. 
"तू त्यांना नेतेयेस खरी पण आपल्याला दुपारी राजीवकडे जायचंय ना? उशीर नाही का होणार?" 
"हो रे, आम्ही येतो एक दीड तासात. तोपर्यंत तू आंघोळ वगैरे आटपून घे." तिने पटापट मुलांचे कपडे बदलले. बॉल, पाण्याच्या बाटल्या, सायकली गोळा केल्या आणि ती दोन्ही मुलांसोबत जवळच्या पार्ककडे निघाली. 
स्प्रिंग (वसंत) नुकताच सुरु होत होता. रस्त्याच्या कडांना पिवळी डॅफोडिल्स उमलली होती. इंग्लंडमधल्या त्या लहानश्या शहरातला उबदार उन्हाचा छानसा दिवस होता. 
छोटा विहान झूम.... झूम ..... करून त्याची तीन चाकी सायकल चालवत होता. आर्यन थोडा शांत वाटत होता. त्याने सायकल बाजूला टाकली होती. बॉल पायांनी ढकलत तो गवतावर फिरत होता. कोवळ्या उन्हात त्या दोघांना तसं खेळताना बघून तिला बरं वाटलं. लग्नानंतर तीन वर्ष थांबून त्यांनी चान्स घेतला होता. आर्यन झाला आणि राजाराणीचे एकदम मम्मी डॅडी झाले. मुलं वाढवताना काय काय करावं लागतं याचा शोध दोघांना नव्यानेच लागत होता. "म्हणजे आपल्या आईवडलांनीसुद्धा इतक्या खास्ता खाल्ल्या असणार" हेसुद्धा आत्ता जाणवू लागलं होतं. आर्यनला भावंडं असावं म्हणून पुन्हा मुलाचा विचार सुरू झाला आणि आर्यननंतर बरोबर दोन वर्षांनी विहान आला.
विहान होण्यापूर्वी त्यांना दोघांनाही आर्यांची इतकी काळजी वाटत होती! नवीन बाळामुळे आर्यनकडे दुर्लक्ष होता कामा नये हे त्या दोघांनी एकमेकांना आणि स्वतःला हजारेक वेळा बजावलं होतं. त्यात आर्यनचा स्वभावही शांत. मनातलं सगळं सांगतो की नाही असा तिला कधी कधी प्रश्न पडायचा. त्या मानाने विहान मात्र लहान असूनही बिनधास्त. पहिल्या मुलाला वाढवताना आईवडलांच्या मनात जी अतिरिक्त काळजी, भीती असते, ती मुलांच्या स्वभावातही दिसून येते असं तिने इंटरनेटवर एका लेखात वाचलं होतं. झालंच म्हणजे.... आपण फार काळजी करतो हीसुद्धा एक काळजी करण्याची गोष्ट आहे तर! असं तिला वाटलं होतं. पण पुढे त्यात असंही म्हटलं होतं की हेच आईवडील पुढची मुलं होईपर्यंत पालकत्वाला बर्यापैकी सरावलेले असतात त्यामुळे तेवढी काळजी केली जात नाही. परिणामी मुलंसुद्धा तशी रिलॅक्सड असतात...... असं बरंच काही सांगितलं होतं . बालसंगोपनाबद्दल ती बरंच वाचत असे. दोन आयुष्य आपल्याला घडवायची आहेत, केवढी मोठी जबाबदारी! आयटी मधली स्वतःची नोकरी, त्यात परदेशामधलं डू इट युअरसेल्फ (स्वतःची कामे स्वतः करा) कल्चर आणि मुलं ..... तारेवरची कसरतच होती खरी! 
तिच्या डोक्यात असे वेगवेगळे विचार चालू होते. परत तिची नजर मुलांकडे गेली. विहान मजेत सायकल चालवत होता. आर्यन मात्र नुसताच उभा होता. "सायकल नाही का चालवायची आज?" तिने त्याच्या जवळ जाऊन विचारलं.
"नाही" 
"बरं मग बॉलने खेळूया का आपण?"
"ओके" म्हणून मग ते दोघे बॉलने खेळू लागले. पण आर्यनचा काही खेळण्याचा मूड दिसत नव्हता. "काय झालंय? थकलायस का तू?" 
"आय अॅम बोअर्ड" 'बोअर्ड' ऐकल्यावर तिला इतका संताप आला. काय अर्थ आहे या वागण्याला. एवढा छान दिवस आहे. या थंड देशांमध्ये हिवाळ्यात महिनोन्महिने मुलांना थंडी पावसामुळे बाहेर खेळायला नेता येत नाही याचं तिला किती वाईट वाटायचं. मग काय आयपॅडस, कॉम्प्युटर्स आहेतच. जरा चांगला दिवस असेल तर मुलांना बाहेर खेळायला नेण्याचा त्यांचा आटापिटा असे. आतासुद्धा घरची आवराआवर, इस्त्री अशी कितीतरी कामं टाकून ती मुलांना पार्कमध्ये घेऊन आली होती आणि हे महाराज म्हणतायत "बोअर होतंय" त्याला ओरडायला ती तोंड उघडणार इतक्यात आर्यनचा एक मित्र आणि त्याची आई त्यांच्याच दिशेने येताना दिसले. मित्राची आई - तिची मैत्रीण, तिच्याशी बोलू लागली. आर्यनचा मित्र त्याला सोबत खेळायला बोलवू लागला. पण आर्यन अजिबातच खेळायच्या मूडमध्ये नव्हता.  "काय झालं ग? आज हा खेळत का नाही?" तिच्या मैत्रिणीने सहजच विचारलं. "काय माहीत! आत्ता घरी बरा होता. पार्कमध्ये जाऊया, जाऊया चाललं होतं. म्हणून सगळी कामं ठेऊन मी यांना खेळायला घेऊन आले तर बघ ना...... निघूच आम्ही आता. हा खेळतच नसेल तर काय उपयोग...." मैत्रिणीचा निरोप घेऊन ती निघाली. 
मुलांचे हात पकडून ती घरच्या दिशेने निघाली. आर्यनचा हात जरा घट्टच पकडून तिने विचारलं , "काय झालंय तुला? का नुसतं तोंड पाडून ठेवलंय ? घाईघाईने तयारी केली, सगळी कामं सोडून मी तुम्हाला खेळायला घेऊन आले, तो विहान बघ कसा खेळतो. तुझाच काय प्रॉब्लेम आहे! नंतर बाहेर जायचंय, तुम्हाला खेळायला वेळ मिळावा म्हणून मी ब्रेकफास्ट सुद्धा केला नाही, तशीच आले. मला थँक यू नकोय कोणाकडून पण तुम्ही तरी नीट खेळा. सगळं करून तुझं तोंड असं पडलेलंच रहाणार असेल  तर कशाला करायचं मग! आता परत कशाला आणेन मी तुला पार्कमध्ये!" आर्यनचे डोळे डबडबायला लागले होते. ती गुश्यात , तो रडवेला आणि मम्मी दादाला नेमकी का रागावतेय ते कळत नसल्याने गोंधळलेला, दादाकडे काळजीने बघणारा विहान, तिघे घरी पोहचले. 
त्यांचे चेहरे बघून काहीतरी बिनसलंय याची नवर्याला कल्पना आली. "तू डोसा खाल्लास का?" त्याने तिला विचारलं. "नाही. घेते आता" "मला वाटतं की ते...." त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच बाहेरच्या खोलीतून आर्यनचा आवाज आला. त्याने खाल्लेलं सगळं उलटलं होतं. डोसा पचला नव्हता.
"मी तुला तेच सांगणार होतो. डोश्याचं पीठ जास्तच आंबलंय बहुतेक. तू चव नव्हती पाहिलीस का?" 
"नाही रे!" तिने धावत जाऊन आर्यनला उराशी कवटाळलं. त्याचं तोंड धुतलं. कपडे बदलले. त्याला साखर दिली. तिच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. "सॉरी रे पिल्ला. मीच जबरदस्ती तुला डोसा खायला लावला. त्यामुळे तुला अन्ईझी वाटत होतं म्हणून तू शांत होतास आणि मी तुलाच ओरडले.....  आय अॅम सो सॉरी"
"इट्स ओके मम्मी" आर्यनने चिमुकल्या हातांनी तिचे डोळे पुसले आणि तिला मिठी मारली. उरलेला दिवस छान गेला. 
संध्याकाळी तिने आईला फोन केला. आईला तिने काय झालं ते सांगितलं. आपण किती वेड्यासारख्या वागलो या विचाराने तिची तिलाच लाज वाटली. एवढ्याश्या मुलाला अनाठायी एवढं ओरडलो म्हणून वाईट तर इतकं वाटलं ..... आईला सांगताना पुन्हा तिचे डोळे भरून आले, "माझ्याकडून इतक्या चुका होतात गं आई! मी खूप प्रयत्न करते सगळं नीट करायला, त्यांना सगळं बेस्ट द्यायला, जसं तू माझ्यासाठी केलंस, पण माझं सारखं सारखं चुकतं .... काय माहीत उद्या आर्यन आणि विहानला माझ्या काय आठवणी रहाणार आहेत, सारखी सारखी चुकणारी आई असं त्यांना माझ्याबद्दल वाटेल का गं!" 
"अगं वेडे किती विचार करतेस! आर्यनच्या जन्माआधी तू, तू होतीस, इंजिनिअर होतीस पण आई होतीस का? नाही ना? फक्त मूल जन्माला येत नाही. मुलाच्या जन्माबरोबर आईसुद्धा जन्मत असते. मूल शिकत असतं आणि आईसुद्धा शिकत असते, कधी मूल चुकतं आणि कधी आईसुद्धा चुकत असते. पण नंतर पुढे जाऊन काय लक्षात रहातं माहितीये , फक्त प्रेम! आणि मी चुका केल्या नाहीत म्हणून कोणी सांगितलं. पण चुकांहून अधिक तुझ्या लक्ष्यात काय राहिलं की मी 'कित्ती ' केलं . कारण बाळा, कोणत्याही केलेल्या गोष्टीपेक्षा त्या मागचा हेतू हा जास्त महत्वाचा असतो. हेतू चांगला असेल तर कृतीमधली लहान सहान चूक चालून जाते. आणि तू जे काही करत्येस ते प्रेमापोटीच ना. त्यांना प्रत्येक गोष्ट बेस्टच मिळावी म्हणून स्वतःची दमछाक होईल एवढा आटापिटा नको करत जाऊ. तुझ्या बाळांची काळजी घेतेसच, माझ्या बाळाचीसुद्धा काळजी घेत जा." आईशी बोलून तिच्या मनावरचं मळभ गेलं. आर्यन आणि विहानच्या पावलांचा दडा दडा धावल्याचा आवाज तिच्या खोलीच्या दिशेने यायला लागला. "मम्मी कॅच " म्हणून तिला कळायच्या आत, आर्यनने तिच्या दिशेने बॉल फेकला. एका हातात मोबाईल धरलेल्या तिने झपकन दुसर्या हाताने कॅच पकडला. "ये ऽऽऽऽ...." आर्यन आणि विहान खूष होऊन ओरडले आणि तिला येऊन बिलगले. चुकणार्या आईचे सगळेच कॅच काही सुटत नव्हते 😊

डॉ. माधुरी ठाकुर 

Monday, 10 April 2017

अंजलीची गोष्ट - संवेदना .... सहवेदना

"डॉक्टर, आत येऊ?" दरवाज्यातून आवाज आला. "हं, ये" अंजलीने पाहिलं काल रात्री डिलिव्हरी झालेली १२ नंबरची पेशंट आली होती. "अगं चालून का आलीस तू? काही होतंय का?" अंजलीने काळजीने विचारलं. "बस आधी". राधा समोरच्या खुर्चीवर बसली. राधा परवा डिलिव्हरी साठी बायकांच्या वॉर्डमध्ये ऍडमिट झाली होती. घरची परिस्थिती बरी होती म्हणून स्पेशल रूम घेतली होती. काल रात्री नॉर्मल डिलिव्हरी झाली. बाळ बाळंतीण दोघेही व्यवस्थित होते. पहिलंच बाळ, त्यामुळे घरच्यांमधे आनंदी आनंद होता. 

 

"बाळ कुठे आहे?" अंजलीने विचारलं. "सिस्टरने दिव्याखाली ठेवायला नेलंय"
"ओके, बोल..."
"मॅडम, मी ज्या खोलीत आहे त्याच्यासमोरच एका बाईचा बेड आहे. ती मुसलमान बाई....." राधाने चाचरत म्हटलं.
"रूही ...... तिचं काय?"
"तिला माझ्या रूम मध्ये हलवाल?"
"का आणि तू कुठे जाणार?" अंजलीने चक्रावून विचारलं.
"मला बाहेर जनरल वॉर्ड चालेल. खोलीचं भाडं आम्ही आधीसारखंच देऊ पण तिला सिंगल खोली वापरूदे."
"रूहीला सिंगल खोली? ती एकटीच आहे. तिचं बाळ गेलंय " अंजलीचा आवाज मऊ झाला होता.
"म्हणून तर.... इथे बाहेर प्रत्येक बाईकडे बाळ आहे किंवा होणार आहे. हीच एक एकटी आहे. नुकतंच तिचं बाळ गेलंय तिला कसं वाटत असेल ते मला माहितीये. माझंसुद्धा याआधी एकदा असं झालंय."
अंजलीने राधाच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाली, "तुझ्यासारखं कुणी भेटलं की बरं वाटतं, जे स्वतःच्या पलीकडेही बघतात. मी सांगते नर्सला तुमचे बेड बदलायला. तुझ्या घरच्यांना चालणार आहे ना?"
"हो मी विचारलंय त्यांना"

 

अंजली घरी आली. उद्या रविवार म्हणजे निवांत दिवस होता. रात्री जेवणं झाल्यावर रिया तिच्या जवळ येऊन म्हणाली, "मम्मी, आम्हाला प्रोजेक्ट करायचाय, सीझन्सवर (ऋतू) . टीचरने सांगितलंय इंटरनेटवरून माहिती घ्या, चित्र घ्या आणि चिकटवून पोस्टर बनवा. तू मला हेल्प करशील?"
"ऑफकोर्स सोनू. उद्या सकाळीच बनवूया. उद्या मी घरीच आहे." अंजलीने हसून म्हटलं.
दुसर्या दिवशी दोघीनी बसून पोस्टर पूर्ण केलं. अंजलीने पोस्टर गुंडाळून तो रोल रियाच्या बॅगमधे नीट भरला. "उद्या दे हं आठवणीने, नाहीतर बॅगमधे चेपेल "

 

दुसर्या दिवशी संध्याकाळी रिया पुन्हा अंजलीला म्हणाली, "मम्मी आपण अजून एक पोस्टर बनवायचं का?"
"आज पुन्हा बनवायला सांगितलंय? काय टॉपिक आहे?"
"नाही...... त्याच टॉपिकवर, पुन्हा"
"पुन्हा त्याच टॉपिकवर..... का?" अंजलीने आश्चर्याने विचारलं. रिया काहीच बोलली नाही. "खराब झालं का ते पोस्टर?" रियाने नाही म्हणून फक्त मान हलवली. "मग काय झालं सोनू? सांग मला. मी काही बोलणार नाही." रियाला जवळ ओढून मांडीवर बसवत अंजलीने विचारलं.
"मम्मी, गार्गी आहे ना .... तिला दिलं मी ते पोस्टर."
"गार्गीने बनवलं नव्हतं का?" अंजलीने उत्सुकतेने विचारलं.
"हो" आता सगळा प्रकार अंजलीच्या लक्षात यायला लागला.
"तुला तुझ्या मैत्रिणीला मदत करायची आहे हे चांगलं आहे सोनू पण तिने पोस्टर बनवलं नाही म्हणून तू तिला दिलंस तर तू तिला तिच्या चुकीमध्ये मदत करत्येस असं होतं. अशाने ती अजून मागे पडेल."
"पण ती कशी करणार, मम्मी? मला तू हेल्प केलीस. गार्गीने मला सांगितलं की तिचे मम्मी पप्पा सारखे खूप भांडतात. तिची मम्मी तिला घेऊन लांब जाणार आहे. गार्गी रडत होती .
तिचा होमवर्क तर कोणीच घेत नाही....." रिया पुढे सांगत होती. अंजली स्तब्ध झाली. आईवडलांच्या भांडणात होरपळणाऱ्या त्या एवढ्याश्या पिल्लासाठी तिचं मन कळवळलं .
"टीचरला नाही का सांगितलं गार्गीने?" तिने काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.
"ती कशी सांगेल मम्मी? आपल्याला वाईट वाटतं तेव्हा आपण कोणाला सांगतो का?"
अंजलीने रियाला मिठीत कवटाळलं. तिचा पापा घेऊन ती म्हणाली ,"बरोबर आहे. बरं झालं तू गार्गीला पोस्टर दिलंस . आपण दुसरं बनवू. आणि मी तुझ्या टीचरशी बोलून ठेवेन गार्गीबद्दल. त्यांना कल्पना असेल तर त्यांना तिला मदत करता येईल ना!". पुन्हा एकदा पोस्टर पूर्ण झालं. 

 

अंजली खिडकीत उभी होती. मनात विचारांची वावटळ. एवढीशी रिया, मैत्रिणीचं दुःख समजून घेत होती. मदतीच्या हाकेची वाट न बघता तिच्यासाठी जमेल ते सगळं करत होती. तिथे ती पेशंट राधा, बाळ झाल्याच्या आंनदात हरवून न जाता दुसर्या अनोळखी बाईचं दुःख समजून त्यावर फुंकर घालत होती. अंजलीला डॉक्टर दीक्षितांचं (सायकियाट्रिस्ट) बोलणं आठवलं, "कित्येकदा स्वतःच्या आनंदात मश्गूल असताना आपल्याला इतरांची दखलच नसते, किंवा कधी स्वतःच्या दुःखातच आपण इतके चूर असतो की आपल्यासारखंच, कधी त्याहूनही अधिक दुःख भोगणारे लोक आपल्या आजूबाजूलाच असूनही  आपल्याला ते दिसतंच नाहीत. फक्त आपली सुखं आणि आपली दुःख यांच्यापलीकडे, इतरांकडे आपली नजर गेली आणि त्यांच्यासाठी लहानशीही गोष्ट आपण केली तर ती आपल्याला शतपटीने सुख देऊन जाईल." किती बरोबर सांगितलं डॉक्टर दीक्षितांनी.
तिची नजर खिडकीच्या बाहेर गेली. सूर्य मावळत होता पण लुकलुकणार्या दिव्यांनी अंधार उजळून गेला होता.



 डॉ. माधुरी ठाकुर