Tuesday, 16 May 2017
अंजलीची गोष्ट – पुन्हा तिघी
ऑपरेशन थिएटरची लिस्ट संपवून अंजली बाहेर आली.
दुपारचे तीन वाजत आले होते. ऑपरेशन्स झालेल्या पेशंट्सना रिकव्हरी रूममध्ये हलवलं
जात होतं. त्यांना दोन तासांनंतर बघून मगच घरी जावं की रजिस्ट्रारला कळवायला सांगावं,
अशा विचारांत अंजली तिच्या केबीनकडे वळली. नर्सने चहा मागवून ठेवला होता. चहाचा
घोट घेत तिने पर्समधून मोबाईल काढला. मोहना आणि शालिनी दोघींचेही मिस्ड कॉल्स दिसत
होते. शालिनीचा कॉल आधी आलेला असला तरीही ती मोहनालाच आधी फोन करणार होती.
त्यांच्या मैत्रीला तडा जाऊन आता एक वर्ष होत आलं होतं. त्यांच्या मागच्या
भेटीनंतर, शालिनीचं, श्रीकांत, मोहन्याच्या नवर्याबरोबरचं अफेअर संपलं होतं पण
मैत्री तुटली ती तुटलीच. शालिनीने अंजलीला दोन-तीनदा फोन करून बोलण्याचा प्रयत्न
केला. पण अंजलीच्या मनातून ती इतकी उतरली होती की अंजली एकदाही शालिनीशी धड बोलली
नाही. आणि बरोबरच होतं म्हणा. असेल पंधरा वर्षांची मैत्री पण दोघीनाही सख्ख्या
बहिणीसारखी असणारी तिसरी मैत्रीण मोहना, तिच्याच नवर्याबरोबर म्हणजे.... डिसगास्टिंग
! शालिनीचा
विचार झटकून तिने मोहनाला फोन करायला घेतला. “हाय, तू फोन केला होतास? सॉरी माझं
ओटी (ऑपरेशन थिएटर) जरा लांबलं.” “हो, श्रुतीचे वडील गेले” मोहनाने एक सुस्कारा
सोडून म्हटलं. “किती पटकन गेले! गेल्या महिन्यातच त्यांच्या आजाराचं कळलं होतं,”
अंजली आश्चर्याने उद्गारली. “श्रुतीला कळवलं का? ती येतेय? कधी नेणारेत माहितीये?”
अंजलीने एकामागे एक प्रश्न विचारले. “तिच्या भावाशी बोलणं झालं माझं. तो म्हणाला श्रुती
आधीच निघालीये अमेरिकेहून. रात्री पोहोचेल. तोपर्यंत थांबतील.” मोहनाने उत्तर
दिलं. “ओके. मी रियाला आईकडे सोडते आणि पोहोचते. चल भेटू.” “अंजू.....” मोहना अडखळत
म्हणाली, “श्रुतीसाठी जायला हवं पण मला नको वाटतंय ग, तिथे शालिनी सुद्धा असणार.”
“साहाजिक आहे मोहना पण आता जास्त महत्वाचं काय आहे सांग? शिवाय श्रीकांत तर नाहीच
आहे ना मुंबईत!” अंजलीने मोहनाची समजूत काढली. शालिनीने संबंध तोडून टाकल्यावर
श्रीकांत आता दुसर्या कोणाबरोबर तरी फिरतो असं अंजलीच्या कानावर आलं होतं आणि
शालिनी पुन्हा पूर्वीसारखी एकटीच असते असंही.
Tuesday, 2 May 2017
तोड पिंजरा, उड पाखरा
गेला एक तास या
आडरस्त्यावर त्यांची गाडी चालली होती. "साहेब पत्ता बरोबर आहे ना ?" ड्रायव्हर हरिहरने
विचारलं. "हो रे, हाच रस्ता
सांगितलाय." आदित्य म्हणाला खरा पण मनातून त्यालाही खात्री नव्हती. आपल्या
अक्ख्या आयुष्याचाच रस्ता चुकलाय असं त्याला वाटून गेलं आणि तेवढ्यातच समोर सायोची
स्कूटी रस्त्याच्या कडेला त्याला दिसली.
"हो, मी फक्त तुला भेटायला
आलोय, सायो. दोन दिवसांनी
पुन्हा महिनाभर बाहेर जातोय शूटसाठी." आदित्य ओशाळलेल्या सुरात म्हणाला.
"बरं चल" म्हणत सायो आदित्यबरोबर बाहेर पडली. हरिहरला थांबण्याचा इशारा
करून ते दोघे पायीच निघाले. ते आदिवासी लोकांचं छोटंसं खेडं होतं. चालत चालत ते
दोघे वस्तीपासून थोडे लांब एका डोंगराजवळ आले. समोर एक छोटासा ओढा वहात होता. एका
मोठ्या खडकावर सायो बसली. आदित्य तिच्या बाजूला जाऊन बसला. तिचा हात हातात घेत
त्याने विचारलं, "तुझं नाव संयुक्ता
आहे? आज मी सायो विचारलं
तर त्यांना कळलंच नाही".
सायोने मान हलवली.
"हो, माझं नाव संयुक्ताच
आहे ... होतं" शून्यात बघत तिने उत्तर दिलं. "इथे नेहेमी येतेस? हे तुझं गाव आहे?"
"अंहं, नाही.... इथे अनाथालय
आहे. या भागात बरीच बाळं, जास्त करून मुली
टाकून दिल्या जातात. या अनाथालयात त्यांना सांभाळतात. त्यांना आपल्या पायावर उभं
करण्याचा प्रयत्न करतात."
"तू काय करतेस इथे येऊन?" आदित्य चकित झाला
होता. सायोसारखी मुलगी असं काही करत असेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
"मी त्यांना होईल ती मदत
करते. शहरातून मी त्यांच्यासाठी पुस्तकं, कॉम्प्युटर , कपडे मला जे परवडेल
ते घेऊन येते. त्यांना इंग्लिश शिकवते. कॉम्प्युटर वापरायला शिकवते, त्यांच्याबरोबर गप्पा
मारते. काय जमेल ते करते. इथे मी त्यांच्यासाठी येत नाही. इथे मला सायो सोडून
संयुक्ता होता येतं. म्हणून मी येते"
"तू करत्येस हे सगळं चांगलंच
आहे पण तरीही शेवटी आपलं स्वतःचं दुःख आपल्यापाशी रहातंच ना?" आदित्यने अगतिक होऊन
विचारलं.
"आदि, माझं पूर्ण नाव
संयुक्ता पुंडलिक पाध्ये आहे. पुजार्याची मुलगी. घरच्यांबरोबर शहर बघायला आले, हात सुटला आणि मी
चुकले. भलत्या लोकांच्या हातात सापडले आणि संयुक्ताची सायो झाले. माझे वडील
मंदिरात कीर्तन करायचे. तेव्हा अर्थ कळत नव्हता, फक्त शब्द लक्षात राहिले. ते
सांगायचे घटाकाश आणि मठाकाश, घड्यातलं आकाश म्हणजे
पोकळी आणि मठातलं आकाश म्हणजे बाहेरचं अवकाश, आपल्याला वाटतं हे वेगळं आणि
ते वेगळं, पण दोन्ही पोकळीच, दोन्ही एकच. दोन्ही
एकमेकांशी जुळलेलंच आहे. मीसुद्धा या मुलांशी त्यांच्या सुखदुःखांशी जुळलेलीच आहे.
ह्यांच्यासाठी काही करताना मी माझ्याच जखमेवर फुंकर घालत्येय असं वाटतं."
"तूसुद्धा तुझा मार्ग शोध ना
आदि..... तुला स्वतःची ओळख आहे. ब्रँड इमेज आहे, पैसा आहे. एक साक्षी मनाच्या
रोगाने गेली पण अश्या कित्ती साक्षी अजून जिवंत आहेत. त्यांच्यासाठी काही कर
ना" सायोने त्याचा हात घट्ट धरून
सांगितलं.
अंधार पडू लागला तसे
ते दोघे परत उठून अनाथालयाकडे आले. "गाडी आणि हरिहरला तुझ्यासाठी ठेऊन जाऊ?" आदित्यने विचारलं.
"तू स्कूटी वरून गेलास तर उद्या पेपरमध्ये न्यूज येईल, मी येईन आपली
आपण." सायोने हसत सांगितलं.
दुसर्या दिवशी
ठरल्याप्रमाणे आदित्य शूटसाठी निघून गेला. पण जेव्हा महिन्याभराने तो सायोला परत
भेटला तोपर्यंत त्याने बरंच काही केलं होतं. त्याच्या हातात एक एन्व्हलप होतं. ते
त्यांने संयुक्ताला दिलं. तिने उघडून बघितलं तर आत एक बँकेचं कार्ड, पासबुक, पासपोर्ट अश्या
गोष्टी आणि काही पैसे होते.
"तुझ्या एजन्सीशी बोललोय मी.
त्यांचा अकाउंट सेटल झालाय. तू हवं तिथे जाऊ शकतेस. हवं ते करू शकतेस. यू आर फ्री.
या बँक अकाउंटमधे तुला वर्ष दोन वर्ष सहज पुरतील इतके पैसे आहेत" संयुक्ता थक्क झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, "हे सगळं मी कसं घेऊ? मी परतफेड कशी करणार?" तिने हुंदके देत विचारलं.
आदि हळुवारपणे म्हणाला, "फुकट नाहीये हे, पहिल्यांदी कोणी मला दिशा दाखवली आहे, फक्त सांगून नाही, कृतीतून! गुरुदक्षिणा आहे ही".
"तुला मी तुझ्याकडे राहायला हवंय?" संयुक्ताने विचारलं. तिच्या सध्याच्या आयुष्यापेक्षा तेही बरंच होतं पण शेवटी ती एक प्रकारची लाचारी , गुलामगिरी झालीच असती.
"मला खूप आवडेल तू
माझ्याबरोबर राहिलीस तर. पण मला माहितीये तुझा आनंद त्यात नाहीये. इथे राहिलीस तर 'सायो'च होऊन अडकशील. तू
संयुक्ता आहेस, तुझ्या आकाशात भरारी
घे. अगदी मोकळेपणाने. मागे वळूनसुद्धा पाहू नकोस आणि थांबू तर जराही नकोस कारण
थांबलीस तर मी तुला धरूनच ठेवीन आणि कधीच जाऊ देणार नाही....." आपल्या
हातांनी संयुक्ताने त्याचे डोळे पुसले आणि त्याचा निरोप घेऊन ती निघाली.
डॉ. माधुरी ठाकुर
https://drmadhurithakur.blogspot.co.uk/
Subscribe to:
Posts (Atom)