Monday, 10 December 2018

नंदिनीची डायरी - तेव्हा आता पुढे


नंदिनीची  डायरी - तेव्हा आता पुढे 


           थोडं  वैतागून, थोडं निराशेने मी फोन ठेवला. एका एजन्सीची नवीन ब्रांच आमच्या शहरात उघडणार होती. वेगवेगळ्या मेंटल हेल्थ एजन्सीसबरोबर काम करणं मला सोयीचं वाटतं. एकाच ठिकाणी पाच दिवस काम करण्यापेक्षा ही विविधता मला आवडते. एकाच जागी बांधल्यासारखं वाटत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव मिळतात आणि flexibility ही राहते. या नवीन एजन्सीबरोबर काम करणंही  मला आवडलं असतं. पण ते होण्यातलं दिसत नव्हतं. या घोळात घरून निघायलाही उशीर झाला. पेशंट्सबरोबर सेशन सुरू करण्याआधी थोडा वेळ पोहोचलं तर मला स्वतःचं मन शांत करायलाही काही वेळ मिळतो. आपलंच मन भिरभिरत असेल तर दुसर्याचं समजून कसं घेणार! घाईघाईने मी गाडीचं दार उघडलं. गाडीवरचा तो dent रोजच्यासारखा पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांत खुपला. गाडी जुनी झाली आहे, बदलायला हवी.            
मी पोहचेपर्यंत ते चौघे आधीच रूममध्ये येऊन बसले होते. आज ग्रूप थेरपी होती. गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये चांगल्या पोस्ट वर असणारा तिशीचा जेम्स. किंचित स्थूल शरीरयष्टी, हसरा चेहरा. त्याच्या बाजूला एक सीट सोडून बसलेली अॅना. साधारण पस्तिशीची, आठ वर्षांच्या मुलीची आई, पूर्वेची शिक्षिका, आता ती नोकरी शक्य नसल्याने सद्धया घरी. तिच्या पासून थोड्या अंतरावर दुसर्या बाजूला बसलेला फिलिप - आमचा फिल. फिल वयाने पन्नाशीच्या पुढे आहे. तब्बेतीमुळे वेळेआधीच रिटायर व्हावं लागलंय म्हणून की काय पण त्याच्या स्वभावात थोडा कडवटपणा आहे, थोडी बंडखोर वृत्ती आहे. त्याच्या चेहर्यावर हसू फार क्वचित येतं. आणि या तिघांहीपासून बर्याच खुर्च्या सोडून दूर टेबलच्या समोरच्या बाजूला बसलेला ऑलिव्हिअर - ऑलि. गेल्या काही वर्षांत ईस्टर्न युरोपीयन देशांमधून बरेच लोक युकेमधे स्थलांतरित होत आहेत. ब्रेक्झिटनंतर कदाचित चित्र बदलेल. या लोकांना बघून मला आंध्रहून मुंबईत कामाला येणारे लोक आठवतात. तसेच मेहेनती, आणि मोडकी तोडकी भाषा  बोलणारे. ऑलिही असाच मेहेनती, पहाटे चार पासून शिफ्ट सुरु करणारा. फॅक्टरीमधे, बिल्डरकडे असे अनेक लो स्किल जॉब केलेला. आता मात्र घरीच. टेबलभोवती चौघांच्या बसण्याच्या जागाही नेहमी अगदी याच असतात. मी सहसा ऑलिच्या बाजूला बसते. आपण कोणती जागा निवडतो तेही आपल्याबद्दल काही सांगतं ना? मी त्याच्या शेजारी का बसते? तो सगळ्यांपासून दूर एकटा असतो, या सगळ्यां मध्ये तो सगळ्यात जास्त damaged आहे. त्याची बरीचशी मेमरी पुसली गेलीये. विचार करण्याची क्षमताही बरीच कमी झालीये. भाषेची अडचण तर आहेच. सर्वाधिक मदतीची गरज त्याला आहे असं मला वाटतं . मीसुद्धा या देशात त्याच्यासारखी बाहेरून आलेय, हा विचार कुठेतरी सूक्ष्मपणे माझ्या मनात नाही ना? स्वतःवर रेग्युलर चेक ठेवणं किती जरूरी आहे!                 
या चौघांना बांधणारा सामान धागा म्हणजे 'ब्रेन इंज्युरी'. या चौघांच्याही मेंदूला काहीनाकाही इजा झाली आहे. कोणाला कमी, कोणाला अधिक. कोणाला हार्ट अटॅकचा परिणाम म्हणून, कोणाला अॅक्सिडंटमुळे, तर कोणाला कोणी वार केल्यामुळे.  त्यांच्या केस हिस्टरी ऐकताना मी अवाक होते. पण आजचं हे सेशन त्याबद्दल नव्हतं. आजचं सेशन हे त्यांच्या self identity बद्दल होतं. self identity - स्वतःची ओळख ! त्यांच्या मेंदूला इजा होण्याआधी त्यांची ओळख काय होती, आता त्यांची आयडेंटिटी काय आहे, या दोन मध्ये काय फरक आहे आणि तो फरक कसा कमी केला जाऊ शकतो याचा आढावा घेण्यासाठी हे सेशन होतं. मी त्यांना self identity बद्दल प्राथमिक माहिती द्यायला सुरुवात केली. 'मी कोण आहे' या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळे लोक, किती वेगवेगळं देतात. कोणासाठी त्याचं काम हीच त्याची आयडेंटिटी असते, तर कोणासाठी एखादं नातं, जसं अमुकची आई, तमुकची बायको हीच त्यांची ओळख असते. ब्रेन इंज्युरीमुळे या पेशंट्सचं करिअर बरंच विस्कळीत होतं. त्याच्या आयडेंटिटीचा तो भाग नक्कीच हरवतो. माहिती दिल्यावर मी चौघांना काही प्रश्न लिहून दिले. डोक्यातला विचारांचा गुंता सोडवण्यासाठी एकेका प्रश्नाचं उत्तर लिहून काढणं ही चान्गली पद्धत आहे. प्रश्न असे होते की ब्रेन इंज्युरी आधी त्यांची ओळख काय होती, आता ती काय आहे, नेमका कुठे फरक पडला आहे, कशामुळे आणि तो फरक कमी केला जाऊ शकतो का आणि कसा? "माझी ओळख काय आहे? मी कोण आहे? हा तर अगदी फिलॉसॉफिकल प्रश्न आहे ना?" फिलने मला विचारलं. त्याचं म्हणणं खरं होतं. युगानुयुगं मनुष्य 'कोहम'चं  उत्तर शोधतोय ! "अगदी बरोबर आहे फिल. पण आत्ता आपण अगदी प्रॅक्टिकल दृष्टीने या प्रश्नाचा विचार करूया. की रोजच्या आयुष्यात काय फरक पडला आहे. पटतंय?" त्याचं समाधान झाल्यासारखं दिसलं.            
थोडा काळ रूम मध्ये शांतता होती. प्रत्येक जण आपापल्या प्रश्नांची उत्तरं लिहीत होता. ऑलिला काही शब्द अडत होते. तो मोबाईलवर गूगल ट्रान्सलेटवर ते शोधत होता. मी इतरांना त्रास होणार नाही अशा बेताने हलक्या आवाजात एकेक प्रश्न त्याला वाचून समजावू लागले. सर्वांचं लिहून झाल्यावर आम्ही प्रश्न उत्तरांबद्दल चर्चा करतो. जेम्सने सुरुवात केली. जेम्स तरुण आहे , आधीही तो सिंगल होता आणि आताही. पण त्याला ते फारसं बोचत नव्हतं.  त्याचे वडील काही महिन्यापूर्वी गेले तेव्हापासून तो आता त्याच्या आईबरोबर राहायला लागला होता. त्याची सिक लीव्ह चार महिन्यांनी संपणार होती. तो त्याच्या आयुष्यातला करिअरचा भाग मिस करत होता. त्याचा आत्मविश्वासही कमी झाला होता. ज्या गोष्टी करणं त्याला सद्ध्या शक्य होतं त्याही करण्याचा त्याला उत्साह वाटत नव्हता आणि त्या न केल्याने आत्मविश्वास अजूनच कमी होत होता. मोटिवेशनचा अभाव आणि mild depression (सौम्य नैराश्य)हे अश्या केसेसमध् अतिशय कॉमन असतं. मी मनातल्या मनात त्याच्या ट्रीटमेंटचा पुढचा आराखडा तयार केला. फिलने माझंही असंच आहे म्हणून त्याची उत्तरं वाचण्याचं टाळलं. त्याची इच्छा नसेल तर  मी सहसा त्याची उत्तरं share करायला त्याला भाग पाडत नाही. प्रश्नांचा हेतू उत्तरं जाहीर कारण हा नाही, तर विचार प्रक्रिया सुरू करणं हा असतो. अर्थात उत्तरांवर चर्चा करणं त्यांच्याच फायद्याचं असतं पण फिलसारख्या व्यक्तीला ग्रुप थेरपीमध्ये जास्त डिवचलं तर तो उखडण्याचीच शक्यता जास्त असते. अशाने सार्या ग्रुपची केमिस्ट्री बिघडते.           
  ऑलि, तू सांगतोस?” मी ऑलिला विचारलं. तो कधीच नाही म्हणत नाही. तो बोलू लागला, "मला आधी शेकडो मित्र होते. भरपूर काम करा, भरपूर धमाल करा हेच आमचं आयुष्य. पण मधेच हे झालं" स्वतःच्या डोक्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, "आता मला फार काही लक्षात राहात नाही. जुन्या आठवणीसुद्धा अर्ध्यामुर्ध्या आहेत. आधीही मी काही फार हुषार नव्हतो पण आता तर डोक्यात सतत कन्फ्युजन असतं. मित्र आता अगदी दोन तीनच राहिले आहेत. पण आहेत ते खरेच जीवाला जीव देणारे आहेत. मी बराच मोकळा वेळ त्यांच्या बरोबर घालवतो." 'सिव्हिअर लॉस ऑफ कॉग्निशन अँड मेमरी' म्हणजेच विचार करण्याची क्षमता आणि मेमरी यांच्या अभावामुळे ऑलिचं आयुष्य पूर्ण बदललंय. पण तो या बदलाचा किती चांगला सामना करतोय. आमच्या प्रत्येक सेशनसाठी तो मोबाईलचे रिमाइंडर वापरतो, महत्वाच्या गोष्टी डायरीत लिहून ठेवतो, भाषेसाठी गूगल ट्रान्सलेट वापरतो. त्याचं सोशल लाईफ नक्कीच खूप बदललयं . शेकडो मित्र जाऊन आता दोन तीन खरेखुरे मित्र आणि ही मेंटल हेल्थ एजन्सी हीच त्याची identity बनली आहे. पण त्यालाही तो सरावला आहे. Resilience, स्वभावातला लवचिकपणा म्हणावा की अल्पसंतुष्टता ? जे असेल ते, पण त्याच्यासाठी ते सोयीचं आहे.              
 अॅनाने तिची उत्तरं वाचायला सुरुवात केली. "इंज्युरी पूर्वीच्या माझं वर्णन मी एक शिक्षिका, एमिलीची आई, एक चांगली पत्नी आणि एक चांगली मैत्रीण असं केलं असतं. आता....... " पुढे वाचण्याआधी ती किंचित थांबली. तिचा आवाज कातर झाला होता. "आता पुन्हा शिक्षिका म्हणून काम करणं मला अशक्यच वाटतं. एमिलीची आई म्हणून मी रोज प्रयत्न करतेय पण तरीही खूप कमी आहे. आणि पत्नी म्हणून तर ........ " तिला पुढे वाचता येईना. तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येऊ लागलं. उरलेले आम्ही चौघे स्तब्ध होतो. कधी कधी असे कढ थोपवण्यापेक्षा त्यांना उतू जाऊ देणं हितकर असतं. भावनांचा जो कोंडमारा होत असतो त्याला वाट मिळते. स्वतःच निग्रह केल्यासारखं तिने पुढे वाचायला सुरुवात केली, "पत्नी म्हणून कमी भरून काढण्याचाही मी प्रयत्न करते. पण मी इतकी थकून जाते..... कालच तो मला त्याच्या कामाबद्दल, ऑफिस बद्दल, सांगत होता. तिथे कसा त्रास चालू आहे. आणि मला कळतच नव्हतं की मी काय म्हणायला पाहिजे, काय सल्ला द्यायला पाहिजे, मी चुप्पच होते. आणि तेव्हढंच  नाही ...... सगळ्याच, सगळ्याच गोष्टींमधे ........" पुढे तिला बोलवेना, हातांत चेहरा लपवून ती रडू लागली. मला कळायच्या आत माझे डोळे भरून आले होते. मी तिच्या हातावर थोपटलं. नेहमी थोडा cynical , कडवट वाटणारा फिल चटकन तिच्या जवळ सरकला आणि त्याने हलकेच तिच्या डोक्यावर थोपटलं. कधी नव्हे ते तो स्वतःहून बोलू लागला, "तुला कोणी सांगितलं की प्रत्येक जण काही सल्ला हवा म्हणून कोणाला काही सांगत असतो ! उलट बहुतेकदा आपण जे काही सांगतोय ते कोणीतरी शांतपणे ऐकून घ्यावं एवढंच आपल्याला हवं असतं. ते तर तू करतेच आहेस". नारळातल्या पाण्यासारखा फिलचा हा अवतार बघून मी सुखावले.          
मी अॅनाची फाईल उघडली. तिच्या अॅक्सिडन्ट आणि ऑपरेशनला आता चौदा महिने झाले होते. तिचा फिजिकल आणि मेंटल अससेसमेंटचा रेकॉर्ड मी समोर घेतला. मी तिला म्हटलं, "अॅना, हे तुझे रिपोर्ट बघून मी तुझा अॅक्सिडन्ट नुकताच झाला होता त्यावेळच्या गोष्टी वाचणार आहे 'तेव्हा' म्हणून. तू त्यांचा आताचा भाग पूर्ण करून सांगायचा, जसं 'तेव्हा मी अंथरुणाला खिळून होते.' 'आता मी एकटी हिंडू फिरू शकते. मी एकटी बसने इथपर्यंत येते ' ठीक आहे? " डोळे पुसून तिने मान हलवली.
“"तेव्हा माझी उजवी बाजू पूर्ण लुळी पडली होती. मला बेडपॅन, स्पंजिंग सगळ्यालाच मदत लागत होती." मी
"आता मी स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते" अॅना
"तेव्हा एमिलीला शाळेत सोडणं तिचे तयारी करणं सगळं माझी आई करत होती"
"आता मी एमिलीची सगळी तयारी करून देते. तिला शाळेत सोडते,  घरी आणते"
"तेव्हा एमिली किंवा इतर कोणी माझ्याशी बोलले तर मला दिसत होतं पण समजत नव्हतं."
"आता मला पुन्हा सगळं समजतंय, मी लोकांशी बोलू शकते, संवाद करू शकते, एमिलीचा अभ्यास घेते"
"माझ्या शरीराची उजवी बाजू काहीच काम करत नव्हती. टॉमने हात पुढे केला तर मला माझा उजवा हात उचलता येत नव्हता."
"अगदी १०० टक्के नसली तरी आता माझ्या शरीराची उजवी बाजू जवळ जवळ पूर्वी सारखी होते आहे. मी बहुतेक सगळ्या गोष्टी करू शकते."
"तेव्हा टॉम सतत हॉस्पिटल मध्ये रूम मध्ये असायचा पण तो दिसत असला तरी डोक्यातल्या गोंधळामुळे, बोलणं, समजणं, संवाद वगैरे नव्हताच."
"आता पुन्हा खूप गप्पा होतात फक्त अधून मधून हे मळभ आल्यासारखं वाटतं"
"साहजिक आहे अॅना. गेल्या चौदा महिन्यांमधली तुझी प्रगती तू आम्हांला सांगितलीस, तेव्हा झालं, आता झालं, आता पुढें काय अॅना?"
त्यांच्या स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी स्वतः शोधावीत असं मला वाटतं. "पुढे मी अजून बरी, अजून नीट होणार आहे" असं म्हणताना रडून लाल झालेल्या तिच्या चेहर्यावर हलकंसं हसू पसरलं. आम्हा पाचही जणांना तो आनंद आमच्या मनांत जाणवला. We were together in this.              
रात्री झोपताना मी देवाची प्रार्थना करते. मी आता तुझ्याकड़े काय मागू? माझ्या आयुष्यातली लहान लहान imperfections, ते निसटलेलं कॉन्ट्रॅक्ट , तो गाडीवरचा dent , त्यासाठी काही मागायला माझी जीभ उचलत नाही. आपली हरवलेली ओळख शोधणारे असे कित्येक जण माझ्या डोळ्यांसमोर येतात. मुसमुसून रडणार्या अॅनाचा, गर्दीत हरवलेल्या मुलासारखा अर्धिअधिक मेमरी गेलेल्या ऑलिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. माझ्या करण्याला मर्यादा आहे रे, पण तू सगळं करू शकतोस. तुझ्या शक्तीला आणि तुझ्या कृपेला काहीच मर्यादा नाही. तुझी थोडी शक्ती मला दे. Help me heal them. 'तुम्ही सूर्य, आम्हा दिला कवडसा' मला तुझा कवडसा दे, मला तुझा कवडसा दे......                    
डॉ. माधुरी ठाकुर

Monday, 1 October 2018

Nandini's Diary

Nandini’s Diary


         किती महिने झाले असावेत? सात, आठ? ख्रिसमसची सुट्टी संपून नुकतंच क्लिनिक पुन्हा सुरु झालं होतं. स्कॉटलंडमधल्या या लहानश्या शहरात ख्रिसमसच्या काळात सगळं ठप्पच असतं. जानेवारीत आळोखे पिळोखे देत शहर पुन्हा जागं होतं. त्याच दरम्यान कधीतरी ती पहिल्यांदी आली. रोज घरी जाण्याआधी पुढच्या दिवसाच्या पेशंट्सच्या फाईल्स वरून नजर फिरवते तशी तिचीही फाईल बघितली. वय पन्नाशीच्या पुढे, एका फार्मास्युटिकल कंपनीत काम करणारी एलिझाबेथ - लिझ. तिच्या घराच्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं. तिथे येणारे बरेच लोक त्या रस्त्यावर आजूबाजूला गाड्या पार्क करत. आसपास राहणार्या लोकांना हा तसा त्रासच होता. अश्याच एका माणसाने लिझच्या घरासमोर गाडी पार्क केली. त्यावरून त्याच्याशी बाचाबाची झाली. तेव्हा रागाने हिने बाजूचा दगड उचलून त्याच्यावर फेकून मारला. तो वाचला पण दगड गाडीवर जाऊन आदळला. पोलीस कम्प्लेंट झाली. लिझला नुकसान भरपाई तर द्यावी लागलीच पण अजूनही शिक्षा झाली असती. फक्त आधी काहीही क्रिमिनल रेकॉर्ड नसल्याने एक चान्स म्हणून सायकोथेरपीच्या कंपल्सरी सेशन्सच्या अटीवर ती सुटली. बाकी सारे तपशील वाचताना एका ठिकाणी येऊन मी अडखळले. Gay (खरंतर स्त्री असल्यामुळे लेस्बियन, पण गे आणि लेस्बियन दोन्हींसाठी सरसकट वापरला जाणारा शब्द म्हणजे गे). युकेमधे येऊन आता पंधरा वर्ष झाली तरीही मी अजून या गोष्टीला कशी काय बिचकते!

       दुसर्या दिवशी लिझ आली. मध्यम उंची. सगळ्याच युरोपीय लोकांचा असतो तसा पांढराफटक रंग. अगदी लहान बॉयकट सारखे केस, निस्तेज ओढलेला चेहरा. पण हिरवे, घारे डोळे मात्र चमकदार, किंचित करारी धार असणारे. तिला इथे जबरदस्ती पाठवलंय हे तिच्या चेहर्यावरून स्पष्टच होतं. अश्या पेशंट्सना बोलतं करणं कठीण असतं. बरेचदा ज्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप असतं तेच लोक अशी चुप्पी घेऊन बसतात. पण मीही आता अश्या जबरदस्तीने आलेल्या लोकांना निर्ढावले आहे. पूर्वी जेव्हा पेशंट्स असे शांत राहत तेव्हा मला ते माझंच failure वाटत असे. पण हळूहळू अनुभव वाढू लागला तेव्हा कळलं की everything is not always about ‘me’. समोरच्याला समजून घ्यायला या ‘me’ ला मागे सोडावं लागतं. पुढे असंही वाचनात आलं की डॉ. प्रकाश आमटे जेव्हा हेमलकसाला गेले तेव्हा दोन वर्षं तिथले आदिवासी लोक त्यांच्याकडे फिरकलेच नाहीत, त्यांना मदत करूच देत नव्हते. एवढ्या थोर लोकांची ही तर्हा. मला तर एखाददोन सेशन ताटकळावं लागतं. कधीकधी गोष्टींना वेळ द्यावा लागतो. लिझ नेही बोलतं व्हायला वेळ घेतला. पहिल्या सेशनमधे नुसती ओळखपाळख, जुजबी बोलणं, आणि त्या दगड फेकण्याच्या घटनेचं अगदी त्रोटक वर्णन झालं. माझ्या प्रश्नांना तिची minimalistic तेवढ्यापुरती उत्तरं.... त्यातून निष्पन्न काहीच निघालं नाही.

      पुढच्या सेशनला सुद्धा सुरुवात तशीच. पहिली दहा मिनिटं ती नुसतीच घुम्यासारखी शांत बसून राहिली. गोगलगायीला जर काडीने टोचलं तर ती स्वतःला अधिकच आत ओढून घेते. कधी कधी पेशंट्सचंही तसंच होतं. म्हणून असे एकतर्फी संवाद सुरु करताना मी ते बोचरे होणार नाहीत याची काळजी घेते. शोभेच्या दगडांनी भरलेली एक डिश समोरच्या टेबलवर होती. लिझ शून्य नजरेने त्या डिशकडे बराच वेळ बघत होती. मी उचलून ती डिश आमच्या मधे ठेवली आणि तिला विचारलं, “यांतला कुठला stone तू आहेस?”. तिने सगळे गुळगुळीत, रंगीत खडे सोडून एका राखाडी रंगाच्या ओबडधोबड खड्याकडे बोट दाखवलं. चला, सुरुवात तर झाली......

“काय साम्य आहे तुझ्यात आणि याच्यात?” 
“हा वेगळा आहे, पण वेगळा आणि छान नाही, वेगळा आणि कसातरीच...” 
Low self esteem, possible loneliness मी मनातल्या मनात नोंद करत होते. पुढे हळूहळू ती बोलू लागली. होता होता मोकळेपणानेही बोलू लागली. एकदा तिची कहाणी सांगताना रागाने लालबुंद झालेला तिचा चेहरा आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. 
“राग राग राग..... नुसता संताप भरलाय माझ्या आत. असं वाटतं की बॉम्बसारखा माझा स्फोट होईल एक दिवस. आणि तसा झाला ना तर हे ... हे सगळे पहिले जळतील त्यात”
“हे....?” मी विचारलं.
“हे ... माझी फॅमिली, आई, भाऊ, बहीण. माझे वडील आधीच गेले. मी नऊ वर्षांची होते तेव्हा. ते ड्रग्स घ्यायचे. पण मला माहीतच नव्हतं. ते होते तेव्हाही घरात असून नसल्यासारखे स्वतःच्या धुंदीतच असत. खरं तर माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीच आठवणी अशा नाहीयेत. पण ते गेले तो दिवस मला लख्खं आठवतो. रविवार, शाळेच्या सुट्टीचा दिवस होता. बहीण, भाऊ आणि मी खाली हॉलमधे होतो. माझ्या आईच्या घरात वरती बेडरूम्स होत्या आणि खाली हॉल आणि किचन. अचानक आई एकदम वेड लागल्यासारखी जिन्यावरून किंचाळत धावत खाली आली. आज इतक्या वर्षांनीही ते आठवून माझ्या पोटात गोळा येतो. आईचा तो अवतार बघून आम्ही तिघंही पुरते भांबावलो. धाकटी बही जी चारएक वर्षांची होती ती भोकाड पसरून रडू लागली. मोठा भाऊ वर काय झालंय ते बघायला जिन्याकडे धावला. मीसुद्धा त्याच्या मागे धावले. जिन्याच्या समोरच आमच्या आईवडलांची खोली होती. अर्धा जिना चढला तरी खोलीचा काही भाग दिसत असे. आम्ही पाच सहा पायर्या वर चढलो असू, तर समोरच खोलीमध्ये छपराच्या आढ्याला लटकलेलं वडलांचं प्रेत दिसलं. पुढे असलेल्या माझ्या भावाने ते आधी पाहिलं आणि आपसूक तो दचकून मागे सरकला, तो जिन्यावरून पडला, त्याचं डोकं आपटलं, खोक पडली आणि त्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. आई काहीतरी करेल म्हणून मी तिच्याकडे बघितलं तर ती दगडी मूर्तीसारखी सुन्नं होती. छोटी बहीण रडत होती पण ते आईला ऐकूही येत नसावं. तसाही तिचा स्वभाव खूप तापट होता. त्यात आत्ताच आधी तिला किंचाळताना आणि नंतर असं फ्रीझ झालेलं बघून मी तिच्या जवळ जायची हिम्मतच केली नाही. मी पळत किचनमधे गेले, तिथला फोन उचलला, आणि ९९९ नंबर फिरवला. पुढे मी काय बोलले, काय सांगितलं यातलं काहीच मला आठवत नाही. पण लगेचच आमचं घर पोलीस, अँम्ब्युलंसचे लोक, डॉक्टर, फोटोग्राफर सगळ्यांनी भरून गेलं. पुढे त्या दिवसात काय झालं हे मला कधीच नीट आठवत नाही, माझ्या स्मरणशक्तीवर जणू पडदा ओढला आहे. पण हा एवढा भाग मात्र माझ्या मेंदूवर कोरल्यासारखा राहिला आहे.” हे सारं सांगतानाही लिझ थरथरत होती. तिच्या डोळे डबडबले होते. ती पुढे बोलतंच राहिली. “वडील जिवंत असतानाही आईवडलांची सतत भांडणं होत. पैशांच्या दृष्टीने आमचं ठीकठाक चाललं होतं पण घरात शांती सुख असं कधी नव्हतंच. एखाद्या एकसंघ सुखी कुटुंबासारखे आम्ही कधी असल्याचं मला आठवतच नाही. वडील अगदी अलिप्त आणि आई सदैव चिडलेली. वडील गेल्यावर तर ते अधिकच वाढलं. बेतास बात राहण्याइतके पैसे वडील मागे ठेऊन गेले होते. रोज केक खात नसलो तरी आम्ही कधी उपाशीही राहत नव्हतो. चणचण अशी नव्हती, पण तीन मुलांना एकटीने वाढवायला ज्या मनोबलाची गरज होती ते मनोबल आईकडे नक्कीच नव्हतं. आल्या गेल्या कोणाही समोर आणि आमच्या समोर तर सततच ती तिच्यावर तीन मुलांची जबाबदारी टाकून स्वतः खुशाल गळफास लावून निघून गेलेल्या नवर्याचा उद्धार करत असे. हे इतकं होतं की कित्येक वर्ष मला वाटायचं की आम्हां भावंडांचीच काहीतरी चूक असली पाहिजे. आम्हांला कंटाळून आमच्या वडलांनी आत्महत्या केली आणि म्हणूनच आई आमच्यावर सतत चिडत असते. वडलांच्या ड्रग्स अॅडीक्शनबद्दल मला खूप उशिरा कळलं. आईला आपल्या दुर्दैवाबद्दल नेमकं कोणाला दोषी ठरवावं हे न कळल्याने ती सर्वांचाच राग करत असे. ती इतकी संतापी होती की तिचं कोणाशीही पटत नसे. ना मित्रमंडळी, ना शेजारीपाजारी, ना नातेवाईक. दुःखाच्या गर्तेतले ते दिवस आम्ही कसे काढले कोण जाणे! मी युनिव्हर्सिटीत शिक्षणासाठी जायच्या निमित्ताने त्या घरातून बाहेर पडले, ती पुन्हा मागे वळून कधी गेलेच नाही.        
                अधून मधून सुट्ट्यांमध्ये जाणं व्हायचं पण ते पाहुण्यांसारखं, उपरं. दरम्यान भावाने तो लग्न करणार नाही म्हणून जाहीर करून टाकलं होतं. माझा कुणी बॉयफ्रेंड आहे का म्हणून चौकशी व्हायची पण मला माझा कल कळायला लागला होता. फार्मसीचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मला स्वतःची निश्चित कल्पना आली. मी आणि लिंडा आता एकत्र येऊनही एक वर्षं झालं होतं. मला नोकरी लागली होती, मी माझ्या भाड्याच्या घरात रहात होते. एका ख्रिसमसला घरी गेले. माझ्या गे असण्याबद्दल घरच्यांच्याही कानावर आलं असावं. आई, भाऊ आणि बहीण तिघांनीही माझ्यावर आगपाखड सुरु केली. मी तोंड काळं केलं होतं, त्यांचं नाक कापलं होतं वगैरे वगैरे. कधी ना कधी हे होणारच याची मला कल्पना होती. मीही तेव्हढ्याच रागात त्यांना सांगून टाकलं की जा... पाहिजे ते करा... इतक्या वर्षांत पहिल्यांदी मला प्रेम मिळालं आहे, मला acceptance मिळाला आहे, मी आणि लिंडा पुढच्या वर्षी लग्न करणार आहोत. त्यांच्यावर तो बॉम्ब टाकून मी निघून गेले. दोन वर्षं, पूर्ण दोन वर्षं त्यांनी माझ्याशी सारे संबंध तोडले. मी फोन केला तर माझा आवाज ऐकून फोन ठेऊन देत. भावंड तर राहूच दे पण माझ्या स्वतःच्या आईने मी जिवंत आहे की मेले हेसुद्धा त्या दोन वर्षांत कधी ढुंकून बघितलं नाही. बहीण, भाऊ तर अजूनही जेवढ्यास तेव्हढेच असतात. ख्रिसमस आणि ईस्टरला आईच्या घरी भेट होते तेव्हढीच. एकमेकांच्या करपलेल्या बालपणाचे मूक साक्षीदार! आम्ही तिघंही एकमेकांना टाळतो. माझं कमनशीब असं की पुढच्या वर्षी लग्न तर दूरच, लिंडाच्या घरून इतका विरोध झाला की शेवटी आमचं ब्रेकअप झालं. पुन्हा मी एकटीच होते. वर्षानुवर्ष. अगदी काही वर्षांपूर्वी डेब्राला भेटेपर्यंत. चाळीशीनंतर आम्ही लग्न केलं. अर्थातच माझ्या परिवारातलं कोणीच त्याला आलं नाही. बाकी सारं मी समजू शकते. समाज आमच्याकडे कश्या नजरेने बघतो हे मला ठाऊक आहे आणि मी ते स्वीकारलंय. पण माझ्या आईने कधीही मला समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही, हे मला पचवता येत नाही. अगदी इतका खडतर काळ आम्ही एकत्र काढला तरीही माझ्या आनंदासाठी तिची सगळी तत्त्व, मूल्य फक्त एक दिवस बाजूला ठेवावी आणि मला समजून घ्यावं असं कधी वाटलंच नाही तिला? माझ्या गे असण्याचा त्यांना अर्थाअर्थी काहीही त्रास नाही. आम्ही भेटतोच वर्षा काठी दोन वेळा. मग हा दुस्वास कशासाठी? या छोट्याश्या शहरात माझा माझेच आपले लोक माझा दुःस्वास करतात, ते कधीही रस्त्यात, इथे तिथे मला समोर दिसतील अशी सतत धास्ती वाटते मला. स्टेशन जवळ एक कॅफे आहे, माझी आई आणि बहीण बरेचदा तिथे जातात. कधी मला जर तिथे जायची वेळ आली तर मला पाल्पिटेशन्स होतात, काळजात धडधडतं, भर थंडीत घाम येतो. भाऊ कधी रस्त्यात समोर आला तर न बघितल्यासारखं करून पुढे निघून जातो. मी जशी आहे तसं त्यांनी मला कधीच स्वीकारलं नाही, ते एक वेळ ठीक आहे. पण मी त्यांचं काहीही बिघडवलं नसतानाही त्यांनी सदैव माझा तिरस्कार केला. तो बोलण्यातून आणि वागण्यातूनही वेळोवेळी दाखवला. भावाबहिणीकडून माझी तशी फारशी अपेक्षाही नव्हती म्हणा. पण आई, तिनेसुद्धा माझा तिरस्कार करावा? स्वतःच्या पोटच्या मुलीला समजून घेण्यात आई इतकी कमी कशी पडू शकते? मी तिला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही...” रागाने लाल झालेल्या लिझच्या डोळ्यांमधून घळाघळा पाणी येत होतं. “And you know what आता या माझ्या सार्या त्राग्याचा काहीच उपयोग नाही. गेल्या महिन्यात आई गेली. अख्ख्या आयुष्यात जर एकदा म्हणाली असती की it’s ok. मी आहे ना तुझ्याबरोबर......” बांध फुटल्यासारखी लिझ रडतच होती.
        माझं मन पिळवटलं. काय बरोबर आहे काय नाही मला खरंच ठाऊक नाही. पण unconditional love बिनाशर्त प्रेम, आपल्या सगळ्यांनाच याची आस असते ना! ते मिळंत नाही, अगदी जवळच्या लोकांकडूनही नाही, तेव्हा या भरलेल्या जगातही किती एकटं वाटत असेल! कित्येक रागावलेल्या चेहर्यामागे अशीच कुठलीतरी, कधी अनाठायीही पण भीती असते, दुःख असतं. त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये लिझ बरोबर anger management च्या काही exercises केल्या. हळूहळू फरक पडत होता. आई बद्दलचा राग, त्याचं आता फारसं काही करणं शक्य नव्हतं, तो मधून मधून वर येत होता. कदाचित रागापेक्षा आई गेल्याचं दुःखंही अश्या रूपात वर येत असेल. जवळची व्यक्ती गेल्यानंतर त्या दुःखाचे पडसाद वेगवेगळ्या रूपात उमटतात. तशीही शक्यता होती. 
         एका वेळी ती आली तीच तणतणत. आल्या आल्या तिने मला आपले बूट दाखवले. त्यांच्या लेस कुरतडलेल्या दिसत होत्या. लिझ तावातावाने सांगू लागली, “सगळं जग तर माझ्या विरुद्ध आहेच. किमान माझी जोडीदार डेब्रा तरी मला समजून घेणारी होती. पण आता तीसुद्धा माझं डोकं फिरवतेय. तिला कुठेतरी वाटेत एक कुत्र्याचं पिल्लू थंडीने कुडकुडताना दिसलं, तर ही बिचारं बिचारं म्हणून त्याला घरी घेऊन आली. आता ते सारखं भुंकतं, घरात घाण करतं, दिसेल ते कुरतडत सुटतं, त्याचे केस जिथे तिथे पडतात, शिवाय वारा पाऊस काहीही असलं तरी त्याला घेऊन बाहेर जावं लागतं ते वेगळंच. तरी बहुतेकदा डेब्राच त्याला बाहेर घेऊन जाते पण बाकी सारा त्रास तर मला आहेच ना.” लिझची तक्रारीची यादी संपल्यावर मी तिला एक कागद दिला आणि सांगितलं की “आता या कागदावर कुत्राच्या पिल्लाला सांभाळताना लिझ आणि डेब्राला होणारे त्रास असं heading दे आणि त्या खाली तुला जे काही सुचेल ते लिहून काढ.” पाचेक मिनिटात कागद पूर्ण भरून लिझने मला परत दिला.  
                  लिझची कंपल्सरी सेशन्स आता संपत आली होती. मी तिला विचारलं, “मला तुझ्यात फरक वाटतोय, पण तुला स्वतःला काय वाटतं?”
“माझ्यात इतका राग भरून राहिला होता, आईला रागीट, भांडखोर म्हणता म्हणता मीही अगदी तिच्यासारखीच झाले होते. पण तुझ्याशी बोलून माझ्या मनात दाबून ठेवलेल्या आणि सारख्या वर उसळणार्या रागाचा निचरा झाला. तू exactly काय करतेस, माहीत नाही पण डेब्राही म्हणते हल्ली, की गेले काही महिने मी हळूहळू निवळले आहे. असं कसं?” जॉन बॉवलबीने याचं उत्तर आधीच देऊन ठेवलंय. मनुष्याला empathy (समजून घेणं, दया किंवा सहानुभूती नव्हे), आणि unconditional positive regard मिळालं तर त्याचं आयुष्य बदलू शकतं. लिझ अख्खं आयुष्य acceptance साठी तडफडत राहिली, ज्याचं रूपांतर पुढे अनियंत्रित रागात झालं. तिच्या रागावरचं नियंत्रण आता पूर्वीपेक्षा चांगलंच होतं. तरीही तिला sign off करण्या आधी मला अजून एक गोष्ट करून पहायची होती. सेशनच्या शेवटी ती निघताना मी तिच्या हातात एक कोरी वही ठेवली. आणि तिला सांगितलं, “पुढच्या पंधरा दिवसांत तुला एक homework आहे. तू स्वतःला, तुझी आई (कै.) late मिसेस मॅकेंझी आहेस असं समजून या वहीत मिसेस मॅकेंझीना जे काही वाटेल (असं तुला वाटतं) ते लिहायचं आहे. जेव्हढं अधिक लिहिशील तेव्हढं उत्तम.” गोंधळून गेलेल्या तिने ती वही घेतली आणि ती गेली. पुढे ती वही भरून तिने लिहिलं, ती पुन्हा एक दोन वेळा आली. आणि मग मी तिला आता ती ठीक आहे म्हणून सर्टीफिकेट देऊन साईन ऑफ सुद्धा केलं. 
       त्यानंतर चार दिवसांनी आज तिने एक वाईनची बाटली, फुलांचा गुच्छ, एक आभारचं ग्रीटिंग कार्ड आणि एक पत्र पाठवलं होतं.

........... माझ्या कुटुंबाने, माझ्या आईने मला कधीच स्वीकारलं नाही. त्या रिजेक्शनमुळे मी सतत तिचा राग राग केला. तिचाच काय, सार्या जगाचा राग केला. तू दिलेल्या वहीत लिहायला घेतलं तेव्हा सुरुवातीला तिच्या नावानेसुद्धा मी, मी म्हणूनच लिहीत होते की मी लिझशी खूप चुकीची वागले. पण हळू हळू मी खरोखरीच तिच्या भूमिकेत शिरले. मी तिच्या लहानपणाबद्दल अजून माहिती गोळा केली. ती स्वतःच एका मोडलेल्या कुटुंबात वाढली होती. नवर्याचं ड्रग अॅडीक्शन नंतर आत्महत्या, तरुण वयातच एकटीवर तीन मुलांची जबाबदारी या सार्याने ती मोडून गेली होती. आमच्यावर रागावणं हा नक्कीच चुकीचा, पण तिचा coping mechanism होता. चार दिवस कुत्राच्या पिल्लाला तेही डेब्राच्या मदतीने सांभाळताना, मी पाच मिनिटांत पानभर तक्रारी लिहिल्या. ती तर आम्हा तिघांना एकटी सांभाळत होती. आम्ही दुःख भोगलं हे खरंच पण तिचा हेतू तसा नसावा. कदाचित ती तिच्या परीने प्रयत्न करतही असेल. भलेही आमच्यासाठी ते पुरत नव्हते. फुटक्या मडक्यासारखं तिचं आयुष्य होतं, त्यात काय भरणार आणि आम्हांला काय देणार! त्यात माझ्या गे असण्याने तर तिच्या मनस्तापात आणखीनच भर पडली. मला आहे तसं न स्वीकारणं या बाबतीत तिची थोडी चूकच झाली खरी पण तसंच तीसुद्धा उठून म्हणू शकते की मी हा चुकीचा मार्ग निवडला. पण ती आता उठून कधीच काहीच म्हणणार नाही..... मी तिला खूप मिस करते गं. राग करायला तरी ती असायला हवी होती.

आमच्या कुत्राच्या पिल्लाला आता नाव मिळालं आहे. स्टॅनली लेन वरती तो सापडला म्हणून स्टॅनली. त्याचं कुरतडणं थोडं कमी झालं आहे आणि भुंकण्याची आता मला सवय होते आहे.

तुझ्या टेबलवरच्या त्या खड्यांच्या डिशसाठी एक खडा पाठवला आहे. तो जवळ धरून बघ त्यातून निळा प्रकाश येतो असं वाटतं. तो खडा तू आहेस. Thank you so much

लिझ    


डॉ. माधुरी ठाकुर

Wednesday, 20 June 2018

साखळी

त्या दिवशी माझा मूड अगदी छान होता. काही विशेष कारण होतं असं नाही पण कधी कधी उगीचच छान वाटत असतं ना, तसा. आणि मग अचानक कुणाशीतरी बोलताना त्यांनी काहीतरी शेरा मारला, दुखावणारा, अगदीच अनावश्यक, झालं .... माझ्या छान मूडच्या फुग्याची सारी हवा गेली. त्यानंतर कामानिमित्त (professionally) मी ज्या कोणाला भेटले त्यांच्याबरोबर मी वेळ मारून नेली. पण घरी आल्यावर मात्र माझ्या मुलाच्या लहानश्या चुकीवर मी उखडले. इतर दिवशी कदाचित त्या लहानश्या गोष्टीवरून मी एवढी ओरडले नसते. मग त्या दिवशी का ओरडले? मी स्वतःशी विचार केला, माझी सबब तयार होती, “मी रागावले कारण दुसर्या कोणीतरी आधीच मला चिडवून ठेवलं होतं. भलेही माझ्या मुलाचा त्या सार्याशी संबंध नाही पण माझ्याकडेसुद्धा एक ठराविकच एनर्जी आहे ना. ती एकीकडे जास्त खर्च झाली तर दुसरीकडे त्याचा परिणाम होणारच.” तार्किक दृष्ट्या हे बरोबरसुद्धा आहे. आपल्या सर्वांचा एकमेकांबरोबरचा संवाद (किंवा Interaction) हा पासिंग द पार्सल खेळासारखाच असतो ना! आपल्याशी कोणी चिडून बोललं की आपण सुद्धा बहुतेकदा तिथल्या तिथे त्या व्यक्तीशी आणि त्या व्यक्तीशी शक्य नसेल तर शक्य असेल त्या पुढच्या व्यक्तीशी तसेच चिडून बोलतो. जेव्हा आपण ऑफिसमध्ये काहीतरी बिनसल्यावर त्याच तिरमिरीत घरी जातो आणि घरी जाऊन तो राग आपल्या घरातल्या व्यक्तींवर काढतो, तेव्हा आपण ऑफिसमधला कचर्याचा डब्बा स्वतः उचलून घरी नेऊन घरच्या लोकांच्या डोक्यावर ओतत असतो. हेच उलट सुद्धा लागू होतं, कामवाली आली नाही म्हणून किंवा मुलांनी उपद्व्याप केले म्हणून, सासूबाई बोलल्या म्हणून जेव्हा बाहेरून घरात नुकत्याच आलेल्या नवर्यावर आगपाखड केली जाते तेव्हाही स्थिती तीच. याची गरज आहे का? नाही .... हे तर आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. ही साखळी तोडायला तर हवी. पण जमणार कसं? कळतं पण वळत नाही. तर उत्तर आहे Mindfulness. चार पायर्यांच्या रूपात विचार करायचा झाला तर असा करता येईल.

  1.  कोणतीही गोष्ट बदलायची, सुधारायची असेल तर पहिल्या प्रथम गोष्ट समजून घ्यायला हवी. सध्या चालू आहे ते चुकीचं आहे हे किमान स्वतःच्या मनाशी तरी कबूल करायला हवं. 

  2. जे चुकतंय ते बदलायचं असेल तर तात्काळ भावनेच्या आवेगात (impulsively) प्रतिक्रिया देण्याच्या स्वभावाला हळू हळू मुरड घालायला हवी. जितकं आपलं वागणं हे impulsive कमी आणि विचारपूर्वक अधिक असेल तितकी आपल्याला माफी मागायची, पश्चात्ताप करण्याची वेळ कमी येईल. सत्याचे प्रयोगमध्ये महात्मा गांधीनी सांगितलंय की ते अतिशय लाजाळू होते, त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नसत. पण त्याचा एक मोठा फायदाही ते सांगतात की त्यांना कधी अविचारीपणे काही बोलल्याचा पश्चात्ताप करावा लागला नाही. अगदी तोंडातून शब्दच फुटत नाही एवढं नाही, तरी किंचित थांबून विचार करून बोलल्याने चुका टाळल्या जातात हे नक्कीच. मानसशास्त्रसुद्धा सांगतं की तात्काळ उत्तर देणार्यांपेक्षा किंचित थांबून उत्तर देणार्यांची अचूक उत्तरांची सरासरी (average) अधिक असते. 

  3. पुढची गोष्ट बोलण्याआधी, करण्याआधी आधीच्या चुकीच्या विचारांची साखळी तोडायची आहे हे एकदा लक्षात घेतलं की ही साखळी तोडण्यासाठी काय उपाय करायचा हे ज्याचं तो ठरवू शकतो. मी मनात रामरक्षा म्हणते किंवा ऐकते. कोणासाठी मोकळ्या हवेत एक छोटासा walk, एक कप चहा किंवा अगदी पाण्याचा घोटही ते काम करेल. आणि यापैकी काहीही शक्य नसेल तर फक्त एक दीर्घ श्वाससुद्धा मेंदूला अधिक ऑक्सिजन पुरवून खूप बदल घडवू शकतो. 

  4. शेवटची आणि तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे तपासणी. सिंह ज्याप्रमाणे चार पावलं पुढे गेल्यावर एक पाऊल मागे वळून पाहतो त्याप्रमाणे स्वतःमधील बदलांकडे वेळोवेळी लक्षपूर्वक पाहणारा मनुष्य स्वतःमध्ये अधिकाधिक उचित बदल घडवून आणू शकतो. 

क्रोध, लोभ, मद अशा कोणत्या षड्रिपूच्या साखळीत आपण अडकत नाही ना याचा विचार अवश्य करा. आणि एक संवाद (interaction) संपवून दुसरा सुरू करताना आधीच्या ठिकाणची केराची टोपली तर आपण पुढे नेत नाही ना ही काळजी घ्या. जर आधी आनंदाचा पुष्पगुच्छ मिळाला असेल तर तो पुढे न्यायला काहीच हरकत नाही 😊

 © डॉ. माधुरी ठाकुर


Friday, 9 February 2018

धोकेबाज





प्रिय आई,

      काय सांगू आणि कुठून सुरुवात करू? कशी आहेस? पाच सहा महिन्यांत एकदा तुझी खुशाली कळते. जग कुठल्या कुठे गेलं पण आपलं गाव अजून तसंच . मोबाईल नेटवर्कच नाही. माणसाने कॉन्टॅक्ट ठेवावा तरी कसा! आणि तू आणि तुझे विचार तर त्या गावापेक्षाही जुने. आठवतं, मी पहिल्यांदी गोव्याला आलो, मला नोकरी मिळाली, तुला गोव्याला घेऊन आलो. तूसुद्धा खूष होतीस पण जेव्हा तुला कळलं की मी बिअर बारमध्ये नोकरीला लागलोय तशी तू त्याच रात्रीच्या एसटीने निघून गेलीस. दारूच्या पैशाने चालणार्या घरात पाणीसुद्धा पिणार नाही म्हणालीस. किती दुखावलंस मला. आजकाल कुणी असं नसतं. या धंद्यात पैसे कमावून लोक करोडपती होतात, त्यांचं काय वाईट होतं? असंच मला वाटायचं. तू म्हणालीस त्यापेक्षा घराघरांत जाऊन दुधाच्या पिशव्या टाक. मला हसूच आलं. दूध देणार्याला कोणी टिप देतं का कधी! कशी गं वेडी तू? आज या वळणावर वाटतंय, वेडी तू, की वेडा मी?

      तू तर निघूनच गेलीस. त्यानंतर लग्न करून मंजू आली. पण तीही वर्षभरात मला कंटाळून निघून गेली. तिला रामासारख्या एकनिष्ठ नवर्याची अपेक्षा होती आणि मी तर असला छंदी! तुझ्या सात्विक गुणांपेक्षा बापाचं रक्त जास्त आलं माझ्यात. रक्तं उरलं तरी होतं का त्याच्यात शेवटी? किती प्यायचा, कसा वागायचा, तू कसं काय सहन केलंस त्याला? मी तर सतराव्या वर्षीच घर सोडलं. असं वाटलं आपलं आता कोणीच नाही. आणि अचानक एक दिवस बापाला कंटाळून बारक्यासुद्धा माझ्याकडे आला. त्याला आता बारक्या म्हटलेलं आवडत नाही. नीट नावाने रघू हाक मारावी लागते,

मोठा झालाय ना तो! किती वर्षांनी माझा एकटेपणा कमी झाला. गेल्या पंधरा वर्षांत किती नोकर्या बदलल्या. बारमधे वेटर वरून होत होत असिस्टंट  मॅनेजर झालो. किती जण भेटले पण एक रघू सोडून कोणावर जीव नाही लावला मी. अगदी गेल्या दीड वर्षापर्यंत, आणि मग मिनी आली, मिनी म्हणजे मीनाक्षी, लग्नानंतरची मिनी परेरा. आमच्या हॉटेलजवळच त्यांचा बंगला आहे. आमच्या क्लबचे रेग्युलर कस्टमर्स. ओळख वाढली. पैसेवाल्यांकडे जास्त लक्ष देणं तर आमचं कामच आहे. त्यात मिनी तरुण, सुन्दर आणि श्रीमंत नवर्याची इन्सिक्युअर ...म्हणजे कसं सांगू तुला, नवर्याचं लक्ष नाही म्हणून दुःखी अशी बायको. नकळत आम्ही एकमेकांकडे खेचले गेलो. जवळीक वाढू लागली. तिचा नवरा आम्हांला आता काट्यासाराखा बोचू लागला होता. मग मिनीनेच सुचवलं की काटा बाजूला काढूया. मी हबकलो. असं काही करणं माझ्या स्वप्नातही नव्हतं. पण मिनीची आणि परेराच्या पैशांची मला भुरळ पडली होती. त्यात मिनी मला तेच तेच सांगून रोज पढवत होती. परेराच्या खुनाचा एक फूल प्रूफ प्लानच तिने बनवून दिला. त्याप्रमाणे मी पुढचे सहा महिने मिनीशी लोकांदेखत बोलणं, भेटणं पूर्ण बंद केलं, परेराशी मात्र मैत्री वाढवली. दरम्यान मी शहरापासून दूर अशी एक एकांडी जागा शोधली, तिथे एक खड्डा सुद्धा खोदून ठेवला. तयारी पूर्ण झाली. सोमवारी दुपारी कट अमलात आणायचं ठरलं. मी मुद्दाम सोमवारी संध्याकाळी दोन मित्रांना घरी बोलावलं. सकाळी ११ ला मी रघूला मला रात्री जागरण झालंय, मी झोपतोय म्हणून सांगितलं. दार आड करून खोलीतल्या खिडकीतून मी गेलो. गाडी आधीच हायवे जवळ नेऊन ठेवली होती. परेराला घेऊन मी निघालो. त्या जागी आल्यावर मी गाडी बंद पडल्याचं नाटक केलं. काय झालंय बघायला परेरा गाडीतून उतरला. मी गाडी मागे घेऊन जोरात त्याच्या अंगावर गाडी घातली. तो रक्तबंबाळ होऊन खाली पडला. अजून जीव गेला नव्हता. भयचकित डोळ्यांनी तो माझ्याकडे बघत होता. मी चान्स घेऊ शकत नव्हतो. बाजूला पडलेला मोठा दगड मी त्याच्यावर टाकला. खड्डा तयार होताच. तीनचार तासांत सगळं आटपून मी परत खिडकीतून खोलीत येऊन झोपण्याचं नाटक केलं. मित्र आले तेव्हा रघू मला उठवायला आला. मित्रांच्या समोरच आळोखे पिळोखे देत मी खोलीतून बाहेर आलो. त्यामुळे पोलिसांसमोर माझ्याबद्दल फक्त भावानेच नाही तर माझ्या मित्रानीही साक्ष दिली की मी झोपलो होतो. शिवाय माझ्यावर संशय यायचं तसं काही कारणही नव्हतं. परेराच्या मरण्याने माझा काहीच फायदा होत असल्याचं कोणाला दिसत नव्हतं. कारण खरोखरीच माझा काही फायदा होतच नव्हता. काम झाल्यावर मिनीने माझं नावच टाकलं. भेटीगाठी दूर, ती मला ओळखही दाखवत नव्हती. दारू पिऊन रिकामी झालेली बाटली फेकून द्यावी तसं तिने तिच्या आयुष्यातून मला दूर फेकून दिलं होतं. संताप आणि निराशा दोन्हींनी मी होरपळून जात होतो. त्यात पोलिसांच्या नजरेत येईल असं काहीही वागणं महागात पडलं असतं. त्यामुळे माझा संतापसुद्धा मला मिनीला दाखवता येत नव्हता. मी आतल्या आत धुमसत होतो. परेराला ‘मिसिंग’ होऊन आता तीन महिने झाले होते. पण त्याची बॉडी सापडली नव्हती. त्यामुळे तो मेला आहे असं पोलीस गृहीत धरत नव्हते. मिनीकडचे पैसे संपत आले होते. परेराच्या अकाऊनट्स मधून तिला पैसे काढता येत नव्हते. त्याची बॉडी लवकर बाहेर येणं तिला जरूरी झालं होतं. आणि तो हुकमी पत्ता माझ्याकडे होता. परेराची बॉडी कुठे आहे हे माझ्याशिवाय कोणालाच माहीत नव्हतं. मिनीलासुद्धा. माझ्या अपेक्षेप्रमाणे काही दिवसांनी मिनी पुन्हा मला भेटायला आली. पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून माझ्याच काळजीने ती इतके दिवस मला भेटत, बोलत नव्हती अशी सबबही तिने दिली. पण आता मी मूर्ख बनणार नव्हतो. मी प्रेमाने बधत नाही म्हटल्यावर तिने धमक्यांची भाषा सुरू केली. मी त्यालाही काहीच भीक घातली नाही आणि निघून गेलो. एका आठवड्याने ती पुन्हा आली. पुन्हा प्रेमाचं अस्त्र चालवून मला भुलवण्याचा तिने प्रयत्न केला. मलाही तिच्या या खेळाची आता गंमत वाटू लागली होती. आत्ता पायात घोळणारी ही मांजर क्षणात पंजा मारायला कमी करणार नाही हे मी चांगलं ओळखून होतो. मधेच समोर ठेवलेला तिचा मोबाईल वाजला. RS असं नाव दिसलं. तिने झटक्यात फोन बंद केला. ‘मिनीचा नवा बकरा’ म्हणून मी मनात हसलो.

        आता या गोष्टीलाही तीन महिने होऊन गेले. मला एक नवीनच त्रास सुरु झाला होता. जरा डोळा लागला, की मी धोंडा मारतानाचा परेराचा भयचकित चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा. ‘धोकेबाज’ म्हणून त्याने मारलेली किंचाळी माझ्या कानात वाजत राहायची. झोप लागणं मुश्कील झालं होतं. माझं काहीतरी बिघडलंय हे रघूला कळत होतं. तो आता जरा जबाबदारीने वागू लागला. भावाभावापेक्षा आम्ही आता मित्र झालो. त्याने खूप काळजीने मला काय होतंय, डॉक्टरकडे जाऊया का, म्हणून विचारलं. तेव्हा शेवटी मी त्याला माझ्या या खुनाबद्दल, सगळं सांगितलं. बॉडी कुठेय तेसुद्धा. तो म्हणाला त्याच्या मित्राच्या ओळखीचा एक तांत्रिक बाबा आहे. तो अश्या सगळ्या गोष्टी नीट करतो. माझा फारसा विश्वास नव्हता पण करून बघायला काय हरकत आहे म्हणून मी हो म्हणालो. आज तो त्या बाबाकडून कसलंसं औषध घेऊन आला. झोपण्यापूर्वी घ्यायचं होतं. त्याच्या आग्रहाखातर मी घ्यायचं ठरवलं. आता संध्याकाळी रघू कुठे बाहेर गेला, मी एकटाच घरी, झोपून आढ्याकडे बघत माझ्या आयुष्याचा विचार करत होतो. असं कसं झालं? माझ्या आयुष्याची माती झाली. दारू विकून बर्यापैकी पैसा आला खरा पण समाधान? शांती? बाईच्या मोहाने, पैशाच्या मोहाने मी इतका घसरलो की मी एका माणसाचा जीव घेतला. तोही मैत्रीचं नाटक करून! इतका धोकेबाज कसा झालो मी! आतल्या खोलीत रघूचा मोबाईल वाजला त्या आवाजाने माझी विचारांची तंद्री भंगली. हा फोन विसरून गेला वाटतं म्हणून मी आत बघायला गेलो. टेबलवर पडलेला त्याचा मोबाईल वाजत होता. आणि स्क्रीन वर त्याच थेरडीचा फोटो होता!! ही मिनी माझ्या भावाला कशाला फोन करतेय! मी फोन कट होईपर्यंत थांबलो. नंतर मी रघूचे मेसेज उघडले. वरच त्या दोघांचे मेसेजेस होते.

“सगळी माहिती तर मिळाली. आता त्याला औषध कधी देतोयस?”

“आज रात्री. उद्या सकाळी तो उठणार नाही. उद्यापासून आपल्याला अशी लपवा छपवी करावी लागणार नाही.”

माझा भाऊ तिच्याच प्रेमाच्या जाळ्यात पडून मलाच मारायला निघाला होता. 

आई, तू म्हणायचीस पेरावं ते उगवतं, मला पटायचं नाही. मला वाटायचं, मग तुझं आयुष्य असं का? त्यालाही तुझं उत्तर तयार, की बाबारे हे माझे गेल्या जन्मीचे भोग आहेत. आधीचं काही माहीत नाही पण माझं य जन्माचं कर्म माझ्यापुढे याच जन्मात उभं राहिलंय खरं. असं वाटतंय सगळं जग माझ्याकडे बघून हसतंय. कसं मूर्ख बनवलं म्हणून मिनी हसतेय, धोकेबाजाला चांगला धडा मिळाला म्हणून परेरा हसतोय, दादाला कसं फसवलं म्हणून रघू हसतोय, सगळी दुनिया हसतेय आणि आई तूसुद्धा त्यांच्यातच उभी आहेस आणि म्हणतेयस, “मी सांगितलं होतं राजा तुला, तू पेरशील तेच उगवेल, पेरशील तेच उगवेल” माझं डोकं बधीर झालंय. रघूला सांग आई, त्या मिनीचा नाद सोडून दे. ती बाई नाही, चेटकीण आहे. मी स्वतःच खुनी, मी त्याला कुठल्या तोंडाने सांगू? तू तरी सांग. कुणीतरी सांगायला हवं ना त्याला आणि मी तर आता चाललो आहे. माझ्यासाठी रघूने आणलेलं औषध मी आता पितोय आई. हे आवाज थांबत नाहीत. मला सुटकेचा काहीच मार्ग दिसत नाही. मला चांगलं पेरायचंय. आता खूप उशीर झाला पण नवीन सुरुवात करायला हवी, म्हणून मी चाललो आई. तुला शेवटचा नमस्कार.

तुझा नंदू 


डॉ. माधुरी ठाकुर