Monday, 10 December 2018

नंदिनीची डायरी - तेव्हा आता पुढे


नंदिनीची  डायरी - तेव्हा आता पुढे 


           थोडं  वैतागून, थोडं निराशेने मी फोन ठेवला. एका एजन्सीची नवीन ब्रांच आमच्या शहरात उघडणार होती. वेगवेगळ्या मेंटल हेल्थ एजन्सीसबरोबर काम करणं मला सोयीचं वाटतं. एकाच ठिकाणी पाच दिवस काम करण्यापेक्षा ही विविधता मला आवडते. एकाच जागी बांधल्यासारखं वाटत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव मिळतात आणि flexibility ही राहते. या नवीन एजन्सीबरोबर काम करणंही  मला आवडलं असतं. पण ते होण्यातलं दिसत नव्हतं. या घोळात घरून निघायलाही उशीर झाला. पेशंट्सबरोबर सेशन सुरू करण्याआधी थोडा वेळ पोहोचलं तर मला स्वतःचं मन शांत करायलाही काही वेळ मिळतो. आपलंच मन भिरभिरत असेल तर दुसर्याचं समजून कसं घेणार! घाईघाईने मी गाडीचं दार उघडलं. गाडीवरचा तो dent रोजच्यासारखा पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांत खुपला. गाडी जुनी झाली आहे, बदलायला हवी.            
मी पोहचेपर्यंत ते चौघे आधीच रूममध्ये येऊन बसले होते. आज ग्रूप थेरपी होती. गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये चांगल्या पोस्ट वर असणारा तिशीचा जेम्स. किंचित स्थूल शरीरयष्टी, हसरा चेहरा. त्याच्या बाजूला एक सीट सोडून बसलेली अॅना. साधारण पस्तिशीची, आठ वर्षांच्या मुलीची आई, पूर्वेची शिक्षिका, आता ती नोकरी शक्य नसल्याने सद्धया घरी. तिच्या पासून थोड्या अंतरावर दुसर्या बाजूला बसलेला फिलिप - आमचा फिल. फिल वयाने पन्नाशीच्या पुढे आहे. तब्बेतीमुळे वेळेआधीच रिटायर व्हावं लागलंय म्हणून की काय पण त्याच्या स्वभावात थोडा कडवटपणा आहे, थोडी बंडखोर वृत्ती आहे. त्याच्या चेहर्यावर हसू फार क्वचित येतं. आणि या तिघांहीपासून बर्याच खुर्च्या सोडून दूर टेबलच्या समोरच्या बाजूला बसलेला ऑलिव्हिअर - ऑलि. गेल्या काही वर्षांत ईस्टर्न युरोपीयन देशांमधून बरेच लोक युकेमधे स्थलांतरित होत आहेत. ब्रेक्झिटनंतर कदाचित चित्र बदलेल. या लोकांना बघून मला आंध्रहून मुंबईत कामाला येणारे लोक आठवतात. तसेच मेहेनती, आणि मोडकी तोडकी भाषा  बोलणारे. ऑलिही असाच मेहेनती, पहाटे चार पासून शिफ्ट सुरु करणारा. फॅक्टरीमधे, बिल्डरकडे असे अनेक लो स्किल जॉब केलेला. आता मात्र घरीच. टेबलभोवती चौघांच्या बसण्याच्या जागाही नेहमी अगदी याच असतात. मी सहसा ऑलिच्या बाजूला बसते. आपण कोणती जागा निवडतो तेही आपल्याबद्दल काही सांगतं ना? मी त्याच्या शेजारी का बसते? तो सगळ्यांपासून दूर एकटा असतो, या सगळ्यां मध्ये तो सगळ्यात जास्त damaged आहे. त्याची बरीचशी मेमरी पुसली गेलीये. विचार करण्याची क्षमताही बरीच कमी झालीये. भाषेची अडचण तर आहेच. सर्वाधिक मदतीची गरज त्याला आहे असं मला वाटतं . मीसुद्धा या देशात त्याच्यासारखी बाहेरून आलेय, हा विचार कुठेतरी सूक्ष्मपणे माझ्या मनात नाही ना? स्वतःवर रेग्युलर चेक ठेवणं किती जरूरी आहे!                 
या चौघांना बांधणारा सामान धागा म्हणजे 'ब्रेन इंज्युरी'. या चौघांच्याही मेंदूला काहीनाकाही इजा झाली आहे. कोणाला कमी, कोणाला अधिक. कोणाला हार्ट अटॅकचा परिणाम म्हणून, कोणाला अॅक्सिडंटमुळे, तर कोणाला कोणी वार केल्यामुळे.  त्यांच्या केस हिस्टरी ऐकताना मी अवाक होते. पण आजचं हे सेशन त्याबद्दल नव्हतं. आजचं सेशन हे त्यांच्या self identity बद्दल होतं. self identity - स्वतःची ओळख ! त्यांच्या मेंदूला इजा होण्याआधी त्यांची ओळख काय होती, आता त्यांची आयडेंटिटी काय आहे, या दोन मध्ये काय फरक आहे आणि तो फरक कसा कमी केला जाऊ शकतो याचा आढावा घेण्यासाठी हे सेशन होतं. मी त्यांना self identity बद्दल प्राथमिक माहिती द्यायला सुरुवात केली. 'मी कोण आहे' या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळे लोक, किती वेगवेगळं देतात. कोणासाठी त्याचं काम हीच त्याची आयडेंटिटी असते, तर कोणासाठी एखादं नातं, जसं अमुकची आई, तमुकची बायको हीच त्यांची ओळख असते. ब्रेन इंज्युरीमुळे या पेशंट्सचं करिअर बरंच विस्कळीत होतं. त्याच्या आयडेंटिटीचा तो भाग नक्कीच हरवतो. माहिती दिल्यावर मी चौघांना काही प्रश्न लिहून दिले. डोक्यातला विचारांचा गुंता सोडवण्यासाठी एकेका प्रश्नाचं उत्तर लिहून काढणं ही चान्गली पद्धत आहे. प्रश्न असे होते की ब्रेन इंज्युरी आधी त्यांची ओळख काय होती, आता ती काय आहे, नेमका कुठे फरक पडला आहे, कशामुळे आणि तो फरक कमी केला जाऊ शकतो का आणि कसा? "माझी ओळख काय आहे? मी कोण आहे? हा तर अगदी फिलॉसॉफिकल प्रश्न आहे ना?" फिलने मला विचारलं. त्याचं म्हणणं खरं होतं. युगानुयुगं मनुष्य 'कोहम'चं  उत्तर शोधतोय ! "अगदी बरोबर आहे फिल. पण आत्ता आपण अगदी प्रॅक्टिकल दृष्टीने या प्रश्नाचा विचार करूया. की रोजच्या आयुष्यात काय फरक पडला आहे. पटतंय?" त्याचं समाधान झाल्यासारखं दिसलं.            
थोडा काळ रूम मध्ये शांतता होती. प्रत्येक जण आपापल्या प्रश्नांची उत्तरं लिहीत होता. ऑलिला काही शब्द अडत होते. तो मोबाईलवर गूगल ट्रान्सलेटवर ते शोधत होता. मी इतरांना त्रास होणार नाही अशा बेताने हलक्या आवाजात एकेक प्रश्न त्याला वाचून समजावू लागले. सर्वांचं लिहून झाल्यावर आम्ही प्रश्न उत्तरांबद्दल चर्चा करतो. जेम्सने सुरुवात केली. जेम्स तरुण आहे , आधीही तो सिंगल होता आणि आताही. पण त्याला ते फारसं बोचत नव्हतं.  त्याचे वडील काही महिन्यापूर्वी गेले तेव्हापासून तो आता त्याच्या आईबरोबर राहायला लागला होता. त्याची सिक लीव्ह चार महिन्यांनी संपणार होती. तो त्याच्या आयुष्यातला करिअरचा भाग मिस करत होता. त्याचा आत्मविश्वासही कमी झाला होता. ज्या गोष्टी करणं त्याला सद्ध्या शक्य होतं त्याही करण्याचा त्याला उत्साह वाटत नव्हता आणि त्या न केल्याने आत्मविश्वास अजूनच कमी होत होता. मोटिवेशनचा अभाव आणि mild depression (सौम्य नैराश्य)हे अश्या केसेसमध् अतिशय कॉमन असतं. मी मनातल्या मनात त्याच्या ट्रीटमेंटचा पुढचा आराखडा तयार केला. फिलने माझंही असंच आहे म्हणून त्याची उत्तरं वाचण्याचं टाळलं. त्याची इच्छा नसेल तर  मी सहसा त्याची उत्तरं share करायला त्याला भाग पाडत नाही. प्रश्नांचा हेतू उत्तरं जाहीर कारण हा नाही, तर विचार प्रक्रिया सुरू करणं हा असतो. अर्थात उत्तरांवर चर्चा करणं त्यांच्याच फायद्याचं असतं पण फिलसारख्या व्यक्तीला ग्रुप थेरपीमध्ये जास्त डिवचलं तर तो उखडण्याचीच शक्यता जास्त असते. अशाने सार्या ग्रुपची केमिस्ट्री बिघडते.           
  ऑलि, तू सांगतोस?” मी ऑलिला विचारलं. तो कधीच नाही म्हणत नाही. तो बोलू लागला, "मला आधी शेकडो मित्र होते. भरपूर काम करा, भरपूर धमाल करा हेच आमचं आयुष्य. पण मधेच हे झालं" स्वतःच्या डोक्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, "आता मला फार काही लक्षात राहात नाही. जुन्या आठवणीसुद्धा अर्ध्यामुर्ध्या आहेत. आधीही मी काही फार हुषार नव्हतो पण आता तर डोक्यात सतत कन्फ्युजन असतं. मित्र आता अगदी दोन तीनच राहिले आहेत. पण आहेत ते खरेच जीवाला जीव देणारे आहेत. मी बराच मोकळा वेळ त्यांच्या बरोबर घालवतो." 'सिव्हिअर लॉस ऑफ कॉग्निशन अँड मेमरी' म्हणजेच विचार करण्याची क्षमता आणि मेमरी यांच्या अभावामुळे ऑलिचं आयुष्य पूर्ण बदललंय. पण तो या बदलाचा किती चांगला सामना करतोय. आमच्या प्रत्येक सेशनसाठी तो मोबाईलचे रिमाइंडर वापरतो, महत्वाच्या गोष्टी डायरीत लिहून ठेवतो, भाषेसाठी गूगल ट्रान्सलेट वापरतो. त्याचं सोशल लाईफ नक्कीच खूप बदललयं . शेकडो मित्र जाऊन आता दोन तीन खरेखुरे मित्र आणि ही मेंटल हेल्थ एजन्सी हीच त्याची identity बनली आहे. पण त्यालाही तो सरावला आहे. Resilience, स्वभावातला लवचिकपणा म्हणावा की अल्पसंतुष्टता ? जे असेल ते, पण त्याच्यासाठी ते सोयीचं आहे.              
 अॅनाने तिची उत्तरं वाचायला सुरुवात केली. "इंज्युरी पूर्वीच्या माझं वर्णन मी एक शिक्षिका, एमिलीची आई, एक चांगली पत्नी आणि एक चांगली मैत्रीण असं केलं असतं. आता....... " पुढे वाचण्याआधी ती किंचित थांबली. तिचा आवाज कातर झाला होता. "आता पुन्हा शिक्षिका म्हणून काम करणं मला अशक्यच वाटतं. एमिलीची आई म्हणून मी रोज प्रयत्न करतेय पण तरीही खूप कमी आहे. आणि पत्नी म्हणून तर ........ " तिला पुढे वाचता येईना. तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येऊ लागलं. उरलेले आम्ही चौघे स्तब्ध होतो. कधी कधी असे कढ थोपवण्यापेक्षा त्यांना उतू जाऊ देणं हितकर असतं. भावनांचा जो कोंडमारा होत असतो त्याला वाट मिळते. स्वतःच निग्रह केल्यासारखं तिने पुढे वाचायला सुरुवात केली, "पत्नी म्हणून कमी भरून काढण्याचाही मी प्रयत्न करते. पण मी इतकी थकून जाते..... कालच तो मला त्याच्या कामाबद्दल, ऑफिस बद्दल, सांगत होता. तिथे कसा त्रास चालू आहे. आणि मला कळतच नव्हतं की मी काय म्हणायला पाहिजे, काय सल्ला द्यायला पाहिजे, मी चुप्पच होते. आणि तेव्हढंच  नाही ...... सगळ्याच, सगळ्याच गोष्टींमधे ........" पुढे तिला बोलवेना, हातांत चेहरा लपवून ती रडू लागली. मला कळायच्या आत माझे डोळे भरून आले होते. मी तिच्या हातावर थोपटलं. नेहमी थोडा cynical , कडवट वाटणारा फिल चटकन तिच्या जवळ सरकला आणि त्याने हलकेच तिच्या डोक्यावर थोपटलं. कधी नव्हे ते तो स्वतःहून बोलू लागला, "तुला कोणी सांगितलं की प्रत्येक जण काही सल्ला हवा म्हणून कोणाला काही सांगत असतो ! उलट बहुतेकदा आपण जे काही सांगतोय ते कोणीतरी शांतपणे ऐकून घ्यावं एवढंच आपल्याला हवं असतं. ते तर तू करतेच आहेस". नारळातल्या पाण्यासारखा फिलचा हा अवतार बघून मी सुखावले.          
मी अॅनाची फाईल उघडली. तिच्या अॅक्सिडन्ट आणि ऑपरेशनला आता चौदा महिने झाले होते. तिचा फिजिकल आणि मेंटल अससेसमेंटचा रेकॉर्ड मी समोर घेतला. मी तिला म्हटलं, "अॅना, हे तुझे रिपोर्ट बघून मी तुझा अॅक्सिडन्ट नुकताच झाला होता त्यावेळच्या गोष्टी वाचणार आहे 'तेव्हा' म्हणून. तू त्यांचा आताचा भाग पूर्ण करून सांगायचा, जसं 'तेव्हा मी अंथरुणाला खिळून होते.' 'आता मी एकटी हिंडू फिरू शकते. मी एकटी बसने इथपर्यंत येते ' ठीक आहे? " डोळे पुसून तिने मान हलवली.
“"तेव्हा माझी उजवी बाजू पूर्ण लुळी पडली होती. मला बेडपॅन, स्पंजिंग सगळ्यालाच मदत लागत होती." मी
"आता मी स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते" अॅना
"तेव्हा एमिलीला शाळेत सोडणं तिचे तयारी करणं सगळं माझी आई करत होती"
"आता मी एमिलीची सगळी तयारी करून देते. तिला शाळेत सोडते,  घरी आणते"
"तेव्हा एमिली किंवा इतर कोणी माझ्याशी बोलले तर मला दिसत होतं पण समजत नव्हतं."
"आता मला पुन्हा सगळं समजतंय, मी लोकांशी बोलू शकते, संवाद करू शकते, एमिलीचा अभ्यास घेते"
"माझ्या शरीराची उजवी बाजू काहीच काम करत नव्हती. टॉमने हात पुढे केला तर मला माझा उजवा हात उचलता येत नव्हता."
"अगदी १०० टक्के नसली तरी आता माझ्या शरीराची उजवी बाजू जवळ जवळ पूर्वी सारखी होते आहे. मी बहुतेक सगळ्या गोष्टी करू शकते."
"तेव्हा टॉम सतत हॉस्पिटल मध्ये रूम मध्ये असायचा पण तो दिसत असला तरी डोक्यातल्या गोंधळामुळे, बोलणं, समजणं, संवाद वगैरे नव्हताच."
"आता पुन्हा खूप गप्पा होतात फक्त अधून मधून हे मळभ आल्यासारखं वाटतं"
"साहजिक आहे अॅना. गेल्या चौदा महिन्यांमधली तुझी प्रगती तू आम्हांला सांगितलीस, तेव्हा झालं, आता झालं, आता पुढें काय अॅना?"
त्यांच्या स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी स्वतः शोधावीत असं मला वाटतं. "पुढे मी अजून बरी, अजून नीट होणार आहे" असं म्हणताना रडून लाल झालेल्या तिच्या चेहर्यावर हलकंसं हसू पसरलं. आम्हा पाचही जणांना तो आनंद आमच्या मनांत जाणवला. We were together in this.              
रात्री झोपताना मी देवाची प्रार्थना करते. मी आता तुझ्याकड़े काय मागू? माझ्या आयुष्यातली लहान लहान imperfections, ते निसटलेलं कॉन्ट्रॅक्ट , तो गाडीवरचा dent , त्यासाठी काही मागायला माझी जीभ उचलत नाही. आपली हरवलेली ओळख शोधणारे असे कित्येक जण माझ्या डोळ्यांसमोर येतात. मुसमुसून रडणार्या अॅनाचा, गर्दीत हरवलेल्या मुलासारखा अर्धिअधिक मेमरी गेलेल्या ऑलिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. माझ्या करण्याला मर्यादा आहे रे, पण तू सगळं करू शकतोस. तुझ्या शक्तीला आणि तुझ्या कृपेला काहीच मर्यादा नाही. तुझी थोडी शक्ती मला दे. Help me heal them. 'तुम्ही सूर्य, आम्हा दिला कवडसा' मला तुझा कवडसा दे, मला तुझा कवडसा दे......                    
डॉ. माधुरी ठाकुर