Friday, 18 August 2017
Thursday, 17 August 2017
चॅलेंज भाग ४
“आता तू वाचतेस का, मीरा?” दिगंतने मीराला विचारलं. नेमकं त्याच वेळी कॅफेचं दार कोणीतरी उघडलं आणि वार्याची एक झुळूक आत आली. त्या झुळकेने शौनकच्या डायरीचं पान उडालं, ते नेमकं दिगंतने पाहिलं.
“अरे तू अजून लिहिलयंस, मग हे का नाही वाचलंस?”
“जाऊदे रे, झालंय माझं” शौनकने ते लिहिलेलं पान हाताने झाकून म्हटलं.
“अरे असं कसं, पूर्ण सत्य नको का?” दिगंत पिच्छा सोडणार्यातला नव्हता. मीरा आणि अवनीलासुद्धा आता काय लिहिलं आहे, आणि झाकलं आहे याची उत्सुकता होती. किती विचित्र आहे ना मनुष्य स्वभाव. काही समोर ठेवा, वाचायला सांगा, कोणी ढुंकून बघणार नाही. पण तेच झाकून ठेवा, लपवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला ते काय आहे ते बघायला उत्साह असेल. शेवटी वैतागून शौनकने “घे तूच वाच” म्हणून डायरी दिगंतकडे ढकलली. दिगंत मोठ्याने वाचू लागला.
दोन आठवड्यांपूर्वी ती बाई नवर्याबरोबर क्लिनिकला आली. पस्तिशीची, साधारण सुखवस्तू कुटुंबातली. ते मूळचे नागपूरचे होते. नवर्याच्या नोकरीनिमित्त गेली दहा वर्ष मुंबईत. तिला पित्ताशयाचा त्रास होता. लक्षणांवरून खडे झाले असावेत असं वाटत होतं. मीच तिला तपासलं. आणखी काही टेस्ट्स करून लिहून दिल्या. एका आठवड्याने जेव्हा ते आले तेव्हा शाळेला सुट्टी होती म्हणून त्यांची मुलंसुद्धा सोबत आली होती. सात आठ वर्षांची असावीत दोघंही. रिपोर्टमधे अपेक्षेप्रमाणेच पित्ताशयात खडे आहेत असं दिसत होतं. पिताशय काढून टाकणं हाच खात्रीलायक उपाय असतो. एक नॉर्मल ऑपरेशन असतं. आम्ही अगदी नेहमी करतो. मी त्यांना ऑपरेशन करून घ्यावं लागेल असं सांगितलं.
“उद्या संध्याकाळी अॅडमिट झालात तर परवा, बुधवारी सकाळी करून टाकू. गुरुवारी घरी जाता येईल.” मी सांगितलं. पण नेमका बुधवारी तिच्या मुलाचा स्कॉलरशिपचा क्लास होता, गुरुवारी मुलीची पेरंट मीटिंग होती. शेवटी बुधवार ऐवजी शुक्रवारच्या लिस्टला तिला घ्यायचं ठरलं.
गुरुवारी संध्याकाळी ती अॅडमिट झाली. शुक्रवारी दुपारी शेवटची केस, तिचं ऑपरेशन सुरु झालं. डॉ. धिंग्रा ऑपरेटिंग सर्जन होते. मी असिस्ट करत होतो. डॉ. धिंग्रा हे एक नामवंत सर्जन आहेत. त्यांनी हे ऑपरेशन आधी पन्नासेक वेळा केलेलं मीच पाहिलं आहे. सगळं सुरळीत चालू होतं आणि अगदी अचानक, ऑपरेशन टेबलवर ती बाई शॉकमधे गेली. शॉक म्हणजे शरीराच्या सिस्टीम्स अचानक बंद पडणं. हृदय काम करायचं थांबलं. पल्स ड्रॉप झाला. रक्तातलं इलेक्ट्रोलाईट्सचं प्रमाण बिघडलं. केसची पार्श्वभूमी पाहता असं होण्याचं काहीच कारण नव्हतं. डॉ. धिंग्रानी ताबडतोब पेशंटला रिसासिटेट करायला घेतलं. अनास्थेटिस्टने त्यांच्या बाजूने सारे प्रयत्न केले. पण सगळं व्यर्थ! कोणाचीही काहीही चूक नव्हती. सगळं बिनचूक असताना, काहीही कारणाशिवाय एक आयुष्य माझ्या डोळ्यासमोर संपून गेलं होतं ! मुलाचा क्लास बुडू नये, मुलीची पेरंट मीटिंग बुडू नये म्हणून हॉस्पिटललाही न जाणारी ती, अचानक सगळा खेळ उधळून निघून गेली होती. ऑपरेशन टेबलवर कधीतरी अचानक पेशंट असा शॉकमधे जाऊ शकतो हे मी पुस्तकात वाचलं होतं पण ते अनुभवताना त्याचं इतकं दुःख होईल हे पुस्तकात लिहिलं नव्हतं! डॉ. धिंग्राही नक्कीच अपसेट झाले होते. मला पेशंटला क्लोज करायला सांगून ते निघून गेले. ते बहुतेक डॉक्टर्स रूम मधे जाऊन एकटेच बसले असावेत. कोणीच कोणाशी काही बोलत नव्हतं. मी त्या बॉडीचं अॅबडोमेन (पोट) पुन्हा शिवलं. अंगावरचा हिरवा सर्जिकल गाऊन काढून बिनमधे टाकला आणि ऑपरेशन थीएटरचं दार उघडून बाहेर आलो.
समोरच तिची वाट पाहणारे ते तिघे मला दिसले. नवरा आणि दोन मुलं. तिचा नवरा मुलीला पुस्तकातून काहीतरी वाचून दाखवत होता. मुलगा मोबाईलवर खेळत होता. हे असं काही होईल याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती. मला बघताच तो चटकन उठून माझ्याकडे आला. “झालं ऑपरेशन डॉक्टर? कधी बाहेर आणणार?” त्याने अधीर होऊन मला विचारलं. माझे शब्द थिजले होते. मी हॉस्पिटलमधे मृत्यू बघितले आहेत. पण हे असं अचानक बेसावध क्षणी मृत्यूने गाठलं की आपण हरलो असं वाटतं. त्याच्या प्रश्नाला मी काय उत्तर देणार होतो! हॉस्पिटलच्या प्रोटोकॉल प्रमाणे ऑपरेशन करणारा मेन सर्जन अश्या वाईट बातम्या पेशंट्सच्या नातेवाईकांना देतो. “डॉ. धिंग्रा तुमच्याशी येऊन बोलतील. तुम्ही मदतीसाठी कोणा नातेवाईकांना बोलावून घ्या” असं सांगून मी निघालो.
शौनकचा अनुभव संपला होता. ते सगळं पुन्हा आठवून त्याचा चेहरा दुःखाने पिळवटला होता. काही क्षण सगळे शांतच राहिले. शेवटी “सगळं किती uncertain आहे ना” असं म्हणून अवनीने शांततेचा भंग केला. दिगंत आणि मीराने मान हलवून तिच्या म्हणण्याला मूक अनुमोदन दिलं.
“मीरा तुला सांगायचाय का तुझा अनुभव?” दिगंतने मीराला विचारलं.
“मी वाचते पण माझी गोष्ट तुमच्या सारखी intense नाही. माझं आयुष्य एकदम साधं सरळ आहे. मी कधी थापाही मारत नव्हते त्यामुळे मला काही विशेष फरक पडला नाही. मीराने आधीच सांगून टाकलं.
“वाच तू. आपण आपले अनुभव शेअर करतोय. ही काही स्पर्धा नाहीये. आपल्या दैनंदिन आयुष्यात, लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत सत्याचं स्थान काय आहे हेच बघायचंय आपल्याला” दिगंतने तिला समजावलं.
अबोली फुलांची वही उघडून मीरा बोलू लागली.
“आज ताई आणि आमचं छोटूसं बाळ ताईच्या सासरी परत गेले. दोन आठवडे तिथे आणि मग अमेरिकेला ताईच्या घरी. गेले काही महिने ताईच्या आणि बाळाच्या घरी असण्याची इतकी सवय झालीये. आता घर खायला उठेल. आज दुपारीच प्रशांतजीजू अमेरिकेहून आले. संध्याकाळी ते घरी येणार म्हणून ताई किती खूष होती. नटून थटून तयार झाली होती. इतक्यात बाळ रडू लागलं म्हणून तिने त्याला पदराखाली घेतलं. नटून तयार झालेल्या तिने मला विचारलं, “कशी दिसतेय मी?”. “कळायच्याही आत मी उत्तर दिलं “खूप खूप गोड!” बाळंतपणाआधी ताई चवळीच्या शेंगेसारखी होती. आता तिचं वजन थोडं वाढलंय. बाळंतपणामुळे ती थकली आहे, चेहरा उतरला आहे, बाळामुळे जागरणं करून तिचे डोळे थकले आहेत. पण ती जेव्हा बाळाला जवळ घेते, त्याला आंजारते, गोंजारते, त्याचे लाड करते, तेव्हा ती पिकासोच्या चित्रासारखी मला वाटते. Flawless, परिपूर्ण! सौंदर्याची नेमकी व्याख्या काय? जे डोळ्याला आनंद देतं ते की जे मनाला आनंद देतं ते?
आम्हांला दोघींनाही तयार झाल्यावर एकमेकींना “कशी दिसतेय मी?” म्हणून विचारायची सवय आहे. समोर आरसा असताना, त्यात आपल्याला दिसत असतानाही समोरच्याला विचारण्याचा हा वेडेपणा कसला! आपल्याला माहीत असलेली गोष्टसुद्धा समोरच्याच्या तोंडून ऐकणं किती सुखाचं असतं ना!”
एवढं म्हणून मीराने शौनककडे एक चोरटा कटाक्ष टाकला, दिगंत आणि अवनीच्याही नजरेतून ते सुटलं नाही. मीरा पुढे वाचू लागली.
“काल शाळेच्या स्टाफ रूम मधे बसले होते. मिसेस गुप्ते आठवीचा गणिताचा तास घेऊन आल्या होत्या. त्या वर्गात एक मुलगा गणितात कच्चा आहे. त्या सारख्या अश्या मठ्ठ मुलांना शिकवून काय उपयोग असं म्हणत होत्या. मी थोडा वेळ ऐकून घेतलं. शेवटी त्यांनी मलाच विचारलं, “अश्या मठ्ठ मुलांना शिकवण्यात आपला वेळ घालवायचा म्हणजे आपला वेळ वायाच की नाही?” आधीच मला त्यांच्या सारखं त्या मुलाला मठ्ठ म्हणण्याचा राग येत होता. त्यात आपलं चॅलेंज. मग मी त्यांना म्हटलं, “मिसेस गुप्ते मला तुमचं म्हणणं बरोबर नाही वाटत. एखाद्याला गणितात गती नसेल म्हणून त्याला सरसकट मठ्ठ असं लेबल लावणं मला चुकीचं वाटतं. आणि अश्यांना शिकवण्यातच तर शिक्षकांचा कस लागतो ना. बाकीचे तर काय, एरवीही शिकणारच आहेत.” मिसेस गुप्तेंचं तोंड इतकं उतरलं. मग मलाच वाईट वाटलं. मी त्याना म्हणाले की तुम्हांलासुद्धा इतक्या वेळात इतका पोर्शन करून घ्यावा लागतो हे समजतं मला. तुम्ही प्रिन्सिपल मॅडमशी याबद्दल बोलत का नाही? त्या आणि इतर अश्या मुलांसाठी काही वेगळी पद्धत किंवा वेगळा काही वेळ काढणं शक्य आहे का ते एकदा प्रिन्सिपल मॅडमशबरोबर बोलून पहा. एव्हाना बाकी शिक्षकही आमच्या संभाषणात सहभागी झाले होते. काहींनी नाकं मुरडली पण काहींना मात्र पटलेलं दिसलं.”
“मीरा, Don’t mind पण हे उदाहरण सत्य असत्य पेक्षा assertiveness, आपलं म्हणणं ठामपणे मांडण्याबद्दल आहे, नाही का?” शौनकने शंका काढली.
“असेलही” गोंधळलेल्या मीराने उत्तर दिलं.
“नाही शौनक, आपलं मत समोरच्याच्या विरुद्ध असताना, हो ला हो न करता, आपलं मत मांडणं हेसुद्धा ‘आपल्या’ सत्याशी प्रामाणिक रहाणंच आहे” दिगंतने मीराची बाजू उचलून धरली.
“Totally!! And on that note, शौनक, आपल्या मनात वेगळं फीलिंग असताना, गरज पडल्यावरसुद्धा त्याचा उच्चार न करणं म्हणजे असत्य वागणं आहे.” अवनीने शौनकला सुनावलं.
“ओके, ओके. point taken. सॉरी मीरा. सगळे तुझीच बाजू घेणारे आहेत इथे! वाच तू पुढे”
ताई गेल्यापासून आई बाबांनी पुन्हा माझ्यावर लक्ष फोकस केलं आहे. घरात माझ्या लग्नावरून पुन्हा वाद चालू झालेयत. मालती मावशीने तिच्या नात्यातला कुणीतरी अमेरिकेचा मुलगा पाहिलाय. ताईच्या घराच्या जवळच रहातो तो. त्याचा नंबरही तिने आईला दिलाय. आई माझ्या मागे लागलीये त्याच्याशी बोलायला. माझ्या मोबाईलवर दोन तीनदा त्याचा फोन येऊन गेला. मी उचललाच नाही. मावशीने ते आईला सांगितलं असावं. मी नाहीच म्हणत्येय म्हणून शेवटी चिडून आईने मला विचारलं, “तुला काय प्रेमबीम झालंय का कोणाशी? सगळ्यांनाच नाही म्हणत्येस ती!” मी काय सांगणार! मौनम् सर्वार्थ साधनम्. पुढचे तीन तास मी दाराला कडी लावून माझ्या खोलीतच बसून राहिले.”
आता तरी शौनक काही बोलेल या अपेक्षेने अवनी आणि दिगंतने त्याच्याकडे पाहिलं. नजरा नजर टाळण्यासाठी शौनक खाली मान घालून राहिला होता. एक विचित्र शांतता टेबलवर पसरली होती. इतक्यात नेमका मीराचा फोन वाजला.
क्रमशः
डॉ. माधुरी ठाकुर
https://drmadhurithakur.blogspot.co.uk/
Monday, 7 August 2017
चॅलेंज भाग ३
दिगंत म्हणाला, “who’s next?”. शौनकने मीरा आणि
अवनीकडे बघितलं. त्यांपैकी कोणीच पुढे होत नाहीये असं पाहिल्यावर तो म्हणाला, “ठीक
आहे, मी वाचतो,” आणि त्याने वाचायला सुरुवात केली.
“लिहिणंबिहिणं मला कठीणच आहे. दिगंत, तुम्हा फिलॉसॉफर
लोकांना बरं जमतं असं लिहिणं. आम्ही डॉक्टर म्हणजे three times a day लासुद्धा TDS
लिहिणारे.... बघूया कसं जमतंय.
बुधावारचं ओ. टी. (ऑपरेशन थीएटर) चालू होतं. हर्नियाची
mesh लावताना मधेच श्रीखंडे सरांनी मला विचारलं, “काय मग, या महिन्यात काय?”. मी
या महिन्यातल्या केसेसची लिस्ट सांगायला सुरुवात केली. तर म्हणाले, “ते नाही रे,
तुमचं चॅलेंज काय या महिन्याचं?” मी उडालोच! म्हटलं यांना कुठून कळलं! गेल्या
महिन्यात मी सारखा स्टेप्स किती झाल्या म्हणून मोबाईल बघत होतो. त्यामुळे दोघा
चौघांना आपल्या चॅलेंजबद्दल कळलं. मग नर्सेसच्या एका ग्रूपनेसुद्धा ते सुरू केलं.
अशी त्याची थोडी पब्लिसिटी झाली. सरांच्यांही कानावर गेलं. सत्याच्या चॅलेंजमुळे
आता थाप मारायचीही सोय नाही!! मग सांगून टाकलं, ‘महिनाभर सतत खरं बोलण्याचं चॅलेंज
आहे’. “मग..... any difficulties so far?” सरांनी पुढचा गुगली टाकला. घ्या !!
म्हणजे मला खरं बोलताना काय प्रॉब्लेम येतोय हे मी सर, अनास्थेटिस्ट, मेडिकल स्टूडंट्स,
नर्सेस, वॉर्डबॉय्ज अश्या सगळ्यांसमोर सांगू!! त्यापेक्षा मी खरंच नाही का बोलणार !
नशीब पेशंटला G A (जनरल अनास्थेशिया – पूर्ण भूल) दिला होता. तो शुद्धीत असता तर ‘हा
डॉक्टर नेहेमी खोटं बोलतो की काय’ म्हणून टेन्शन आलं असतं बिचार्याला... सरांच्या
प्रश्नाला उत्तर द्यावंच लागणार होतं म्हणून मी नाईलाजाने म्हटलं “हो, येतात थोडेफार
प्रॉब्लेम्स.” मेडिकल स्टूडंट्सना समोरच्या ऑपरेशनपेक्षा जास्त इंटरेस्ट माझ्या खरं
बोलताना येणार्या प्रॉब्लेम्समधे होता हे त्यांच्या चेहर्यावर मला स्पष्ट दिसत
होतं.
“प्रत्येक ऑपरेशनच्या आधी पेशंट आणि त्यांचे
नातेवाईक कन्सेंट फॉर्मवर सही तर करतात पण विचारतात की काही धोका नाहीये ना?
adverse effect होणार नाही ना? आता काय सांगायचं त्यांना! adverse effect कशाचा
नाहीये सर! डोकं दुखतं म्हणून अॅस्प्रीन घेतली तरी रक्तस्रावाचा धोका आहे. पण
होण्याची शक्यता किती... पण प्रत्येक पेशंटला मी एवढं सगळं समजावत बसलो तर पेशंट्सची
एवढी मोठी रांग पूर्ण कशी होणार?” एपिडर्मिस (त्वचेचा आतला layer) शिवत शिवत मी म्हटलं.
मला वाटलं आता तरी विषय संपेल, पण नाही... सरांनी मला पुढे विचारलं, “मग तुला काय
वाटतं शौनक, काय करायला पाहिजे?”
“काय माहीत” म्हणून मी खांदे उडवले, मग म्हटलं, “May
be, गव्हर्नमेंटने काहीतरी केलं पाहिजे. जास्त डॉक्टर्स असले पाहिजेत. पेशंट्स
सुशिक्षित असले पाहिजेत”
“ते तर झालंच, पण आता हा आपला पेशंट सतीश कुमार,
याच्या बद्दल आपलं उद्दिष्ट काय आहे सांग?”
“याचा इन्ग्वाइनल हर्निया आपल्याला फिक्स करायचाय.”
मी लगेच उत्तर दिलं.
“नो....नो.... शौनक, आपलं उद्दिष्ट आहे की या
सतीश कुमारने परत ठणठणीत व्हावं, या हर्नियासाठी किंवा यातून उद्भवलेल्या अजून
कशासाठी परत हॉस्पिटलला यायची वेळ याच्यावर येऊ नये. आपण सगळे ‘रोगा’चा इलाज करत
असतो. आपल्याला ‘रोग्या’चा इलाज करायचाय. शरीराचा इलाज आपण करतोच. पण त्याच्या
मनाचा इलाज करण्यासाठी, मनाला ताकद द्यायला हवी. मनाला ताकद कशी येईल, जर डॉक्टरने
जुजबी का होईना पण तेव्हढी खरीखुरी माहिती त्याला दिली, त्याला समजावलं आणि ट्रीटमेंटचा
फायदा पटवून दिला तर त्याच ट्रीटमेंटला पेशंटचं शरीर जास्त चांगलं रिस्पॉंन्ड करतं
असं रिसर्च दाखवतो.”
“अगदी बरोबर आहे, म्हटलंच आहे, प्रज्ञापराधात्
रोगः मग जर रोग नेहमी सुरू मनाच्या, प्रज्ञेच्या अपराधाने होतो तर
इलाजामध्येसुद्धा मनाचा विचार करायलाच हवा ना.” आमच्या अनास्थेटिस्ट पंडित मॅडमसुद्धा
आता आमच्या संभाषणात सहभागी झाल्या. नंतर त्या आणि श्रीखंडे सर Hollistic approach
of health (आरोग्याचा समग्र दृष्टीकोन) वगैरे काय काय बोलू लागले. मी झाली तेव्हढी
शाळा पुरे म्हणून दिगंतचा मौनमवाला पवित्रा घेतला आणि चुपचाप समोरच्या पेशंटवर
फोकस केलं. सांगायची गोष्ट ही की सध्या पेशंट्सना ऑपरेशनच्या आधी थोडी जास्त
माहिती देणं सुरू केलाय. बघूया फरक पडतोय का.
मी नेहेमीप्रमाणे हॉस्टेलवरून घरी फोन केला. आईने
विचारलं “या रविवारी तू मोकळा आहेस का?” असा प्रश्न आला की मी सावध होतो. आणि नेहमी
बघून सांगतो, असं उत्तर देतो किंवा सरळ आधीच ऑन कॉल आहे म्हणून ठोकून देतो. पण आता
ते शक्य नव्हतं. मी दबकत “हो आहे” म्हटलं. “अरे चारूच्या मुलीचं, प्रीतीचं लग्नं
आहे. तिने खूप आग्रहाने आपल्याला सगळ्यांना बोलावलंय. तू ओळखतोस सुद्धा प्रीतीला.”
“आई मला खूप कंटाळा येतो या असल्या फॉरमॅलिटीजचा. दोन दिवस तर मी येतो घरी. मला
नको ना जबरदस्ती करू तिकडे यायची”. आईला बहुतेक वाईट वाटलं असावं, पण ती लगेच
म्हणाली, “बरं राहूदे. मी आणि बाबा जाऊन येऊ.” दुसर्या दिवशी मला बाबांचा फोन, “तुम्ही
फार मोठे झाला आहात आता”
“काय झालं बाबा?” मी विचारलं.
“जेव्हा जेव्हा आम्हांला तुला कुठे घेऊन जायचं
असतं, तेव्हा तू ऑन कॉल असतोस (!) मग आम्ही काही म्हणूच शकत नाही. पण आता तर मोकळा
आहेस तरीही तू यायला बघत नाहीस. कारण काय तर कंटाळा येतो. तुझी आई, तुला वाढवताना
तिला कंटाळा नसेल आला कधी? पण काही कमी केलं तिने कधी? तुझा अभ्यास चालायचा तेव्हा
पाण्यापासून सगळं हातात आणून द्यायची, अजूनही देते. तू वाचत जागणार आणि ती तुला
चहा करून द्यायला जागणार. तू तिकडे परीक्षा देणार आणि ही इकडे अथर्वशीर्षाची
आवर्तनं करत बसणार. बरं करते तेही सगळं शांतपणे. कधी त्याची टिमकी वाजवून तुला
सांगणार नाही. पण तुला समजायला नको आता? तिच्या आनंदासाठी एक लहानशी गोष्ट नाही
करू शकत! बरं वाटेल तिला तिचा मुलगा तिच्याबरोबर लग्नाला आला तर. कंटाळा म्हणे....”
माझी बोलती बंद. आपण सत्य बोलतो तेव्हा ते रिबाउंड येऊन आपल्याला स्वतःला सुद्धा
लागू शकतं हे माहीत नव्हतं. बाबांच्या बोलण्यात पॉइंट होता. त्यामुळे मी शनिवारी
घरी गेलो. आणि रविवारी लग्नालासुद्धा गेलो. दोन तासांचीच तर गोष्ट होती. आईला खूप
बरं वाटलं आणि म्हणून मलासुद्धा !
शनिवारी मी घरी गेलो तेव्हा अजून एक झोल झाला. मी
Game of Thrones चे भाग download करून ठेवले होते. दुपारी जेवणं झाल्यावर मी
माझ्या खोलीत कॉम्पुटरवर ते बघत बसलो होतो. नेमका एक ऑकवर्ड शॉट लागायला आणि बाबा खोलीत
यायला एकच गाठ. घाईत ती स्क्रीन मिनीमाईझही होईना.
“काय हे दिवसा ढवळ्या..... आई घरात आहे एव्हढी
तरी लाज बाळगा जरा....” बाबांनी माझा पार उद्धारच केला.
“बाबा, असं काही नाहीये, स्टोरीलाइनसुद्धा खूप
चांगली आहे त्याची.” माझा सफाई देण्याचा असफल प्रयत्न.
“स्टोरीलाईन ‘सुद्धा’ !!! हे केस आहेत ना माझे”
बाबांनी त्यांचे डोक्यावरचे पांढरे केस चिमटीत धरून मला दाखवले, आणि म्हणाले, “हे
उन्हात पांढरे नाही झालेयत. स्टोरीलाईन सांगतायत”
बाबा तणतणत खोलीतून निघून गेले. ते मला अहो जाहो
करू लागले म्हणजे त्यांचा फ्यूज उडलाय समजायचं. स्टोरीलाइनसुद्धा चांगली आहे हे
अर्धसत्य झालं का?”
शौनकच्या या प्रश्नाला मीराने “हद्द आहे” म्हणून
बायकांच्या ठेवणीतल्या eyeroll ने उत्तर दिलं. अवनी हसू लागली. दिगंत म्हणाला, “बॅट्समनला
बेनिफिट ऑफ डाउट दिलं जातं तसं शौनकलासुद्धा देऊया. पुढे वाच”
शौनक पुढे वाचू लागला.
“ही झाली दुपारची गोष्ट. संध्याकाळी आई खोलीत
आली. मी पुस्तक वाचत बसलो होतो. तिने विचारलं, “शौनक मी पार्लेश्वरला जातेय, येतोस?”
आईला बाईकवर यायचं नसतं. जाते तर रिक्षानेच. मग मी कशाला पाहिजे!”
“गाढवा, काकूना तुझ्याबरोबर वेळ घालवायचा असतो.
तू घरी जातोस दोन दिवस, त्यात अर्धा वेळ तुझ्या खोलीत, काय करणार त्या!” दिगंतने
शौनकला खडसावलं.
“ओके ओके, chill... मी गेलोच शेवटी. मी कां कू
करणार इतक्यात बाबा म्हणतात कसे, “त्याला कशाला विचारतेस सुधा. तो बिझी आहे.
त्याची सीरिअल बघायची असेल”
“कोणती रे?” आईने कुतूहलाने विचारलं.
“काही नाही गं, चल जाऊन येऊ आपण” म्हणून मी उठलो
आणि आईबरोबर गेलो. पार्लेश्वरच्या मंदिरात पोहोचलो. दर्शन घेतलं. नमस्कार करताना
मी आईकडे पाहिलं. एखाद्या जवळच्या कुणाला भेटल्यावर हळवं व्हावं तशी ती त्या
मूर्तीकडे पहात होती. खरं तर माझ्यासाठी ती ‘गणपतीची मूर्ती’ होती. तिच्यासाठी तो ‘गणपती’
होता. मला आठवलं मेडीकलच्या पहिल्या वर्षी दाभोळकर सर सांगायचे, डिसेक्शनच्या आधी वाचून
या, The eyes do not see
what mind doesn’t know. भक्तीमधेही तोच प्रकार
असावा.
त्यानंतर आम्ही बाजूला
शंकराच्या मंदिरात गेलो. तिथे थोडे बसलो. मग पुन्हा गणपती मंदिरात आलो तर इथे कुणा
जोशीबुवांचं कीर्तन चालू झालं होतं. “बसूया रे पाच मिनिटं” म्हणून आई जाऊन बसली.
मला ऑप्शनच नव्हता. मग मीसुद्धा बसलो. ‘सत्य, प्रेम आणि आनंद हेच परमेश्वराचे मूळ
नियम आहेत अश्या अर्थाचं काहीतरी बुवा सांगत होते. ‘अगदी आजच्या काळातसुद्धा लहान गोष्टींपासून
ते मोठ्या घडामोडींपर्यंत मानवाला खर्या प्रगतीसाठी सत्याचाच आधार असतो.
असत्य निरीक्षणांवर आधारलेले शोध कधी मानवाचा खरा विकास करू शकतील का?’ इथपर्यंत
मला समजलं. पुढे ते सांगू लागले, ‘सत्य म्हणजेच ईश्वर, प्रेम म्हणजेच ईश्वर, आनंद
म्हणजेच ईश्वर’ आता मला सगळं बंपर जायला लागलं. मग मी आईला “चल ना जाऊया” म्हणून
कुजबुजत सांगितलं. “चल, चल, बराच वेळ झाला, तुला उशीर झाला का रे?” बाहेर येता
येता आईने मला विचारलं. “उशीर नाही गं, पण मला काही समजत नव्हतं” मी खरं तेच
सांगितलं. आई खळखळून हसली. माझ्या बोलण्याने ती अशी हसते तेव्हा छान वाटतं.” शौनकची
ही बाजू सहसा समोर येतच नसे. तो वाचताना मीरा एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पहात होती.
दिगंत आणि अवनी शौनकचं वाचन ऐकत होतेच पण मीराची काय प्रतिक्रिया आहे ते बघायला ते
अधून मधून तिचा चेहराही न्याहाळत होते.
“नाही नाही म्हणत बरंच लिहिलयस की रे” दिगंत शौनकला
म्हणाला.
“आता शेवटचा भाग आहे” शौनक म्हणाला “हा काही
व्यक्तिशः माझा अनुभव नाही पण सत्याच्या विषयाला धरून आहे म्हणून.... आमच्या वॉर्डला
काही कॅन्सर पेशंट्सही असतात. Oncologist (कॅन्सरतज्ञ) त्यांची ट्रीटमेंट करत
असतात. त्यांत हा पन्नाशीचा माणूस आहे. आतड्यांचा कॅन्सर आहे. शरीरभर पसरलेला आहे.
तो खूप विव्हळत असतो. त्याची बायको दिवसभर त्याच्या सोबत असते. त्याला धीर देत
असते, की “डॉक्टर म्हणालेयत आता बरं वाटेल. दुखणं कमी होईल” कसं होईल दुखणं कमी!!
मेटामॉर्फिन पर्यंत सगळं देऊन झालंय. He is beyond that. ती कसल्या कसल्या पोथ्या
वाचत असते. त्याला दिलासा देत असते. काहीतरी चमत्कार होईल अशी आशा तिला वाटते की
सगळं माहीत असूनही ती हे करते आहे? माझ्याकडे कुठलंच उत्तर नाही. इतकी वर्षं इतके
रोग, इतके रोगी, आणि इतके मृत्यू पाहून माझं मन आता बधीर झालंय. पण नव्यानेच वॉर्डला
यायला लागलेले एकोणीस, वीस वर्षांचे मेडिकल स्टूडंट्स मृत्यूला असं आजूबाजूला
रेंगाळताना बघून दडपून जातात. राऊंड्स घेताना अश्याच एका मुलीने मला विचारलं, “अजून
किती दिवस सर...... कित्ती कळवळतोय तो.” मी म्हटलं, “The truth is, I don’t know!” त्यावर अगदी अनायास दुसर्या
एका स्टूडंटच्या तोंडून आलं, “They say, Life is a beautiful lie but death is the painful truth”
शौनकचं वाचून संपलं. “तुझी
ही सिरीयस बाजू बघितली नव्हती शौनक” अवनी म्हणाली. “तेच, तूसुद्धा फिलॉसॉफर झालास
की रे” दिगंतने हसून म्हटलं. अभिप्रायाच्या अपेक्षेने शौनकने मीराकडे पाहिलं पण ती
तिच्या कॉफीच्या कपच्या आतच पहात होती. मध्येच नजर उचलून तिने फक्त शौनककडे पाहिलं
पण बोलली काहीच नाही. ‘हिचं काहीतरी बिनसलंय नक्कीच’ शौनक आणि दिगंत दोघांच्याही
मनात एकाच वेळेस एकच विचार आला.
“आता तू वाचतेस का, मीरा?”
दिगंतने मीराला विचारलं.
क्रमशः
डॉ. माधुरी ठाकुर
Wednesday, 2 August 2017
चॅलेंज भाग २
पुन्हा महिन्याचा शेवटचा शनिवार. सहाला अजून पाच मिनिटं होती. पण शौनक आणि दिगंत वेळेआधीच पोहोचले होते. “कधी वेळेवर येणार रे या मुली?” शौनकने म्हटलं. “अजून सहा वाजायचे आहेत. त्या बघ त्या दोघी रिक्षातून उतरतायत.” दिगंतने कॅफेच्या मोठ्या काचेच्या खिडकीकडे हात करत शौनकला दाखवलं. अवनी आणि मीरा रस्त्याच्या दुसर्या बाजूला रिक्षातून उतरत होत्या. बोलत बोलत रस्ता ओलांडून दोघी कॅफेच्या दिशेने चालत होत्या. त्यांचे चेहरे बघून त्या काहीतरी महत्त्वाचं बोलतायत असं वाटत होतं. मीराचा चेहरा तर फारच ओढलेला दिसत होता. त्या दोघी कॅफेच्या आत शिरल्या. हे दोघे गेली दोन मिनिटं त्यांना बघत होते ह्याचा त्यांना पत्ताच नव्हता. टेबलपाशी पोहोचेपर्यंत दोघींचे चेहरे पुन्हा नॉर्मल दिसत होते.
“मीरा, अवनी, all ok?” त्या बसायाच्याही आधी दिगंतने विचारलं. “का, काय झालं?” अवनीने उलट त्यालाच विचारलं. “नाही.... तुम्ही दोघी जरा स्ट्रेस्ड दिसताय” दिगंत म्हणाला. “च् जाऊदेना. तुम्ही ऑर्डर नाही केली अजून?” असं म्हणून मीराने विषय बदलला. दिगंत आणि शौनक दोघांनाही ते जाणवलं. बसून स्थिर स्थावर झाल्यावर मीराने दिगंतला विचारलं, “दिगंत, आजोबांना जाऊन किती दिवस झाले? घरी सगळे ठीक आहेत ना?” “पंधरा दिवस झाले. हो, ठीक आहेत सगळे. वाईट वाटतंच पण त्यांचं वय झालंच होतं.” त्याचं बोलणं होईपर्यंत चौघांचे कप टेबलवर आले.
कॉफीचा घोट घेत दिगंतने त्याची डायरी बाहेर काढली. मी दिलेलं चॅलेंज ‘ऋतम् वच्मि, सत्यम् वच्मि’
“झालं सुरू” शौनकने निषेधाने मान हलवत म्हटलं.
“अरे म्हणजे मी खरं तेच बोलतो, तर सत्य बोलण्याचं चॅलेंज. माझा अनुभव मी वाचून दाखवतो.” नकळत उरलेले तिघे टेबलवर पुढे सरकले आणि लक्षपूर्वक ऐकू लागले. “ज्या दिवशी खर्या खोट्याचं द्वंद्व व्हायचे प्रसंग झाले त्याच दिवसांच्या नोंदी केल्या आहेत.”
“हो रे, वाच ना आता” शौनकला जराही धीर म्हणून नव्हता.
दिवसाची सुरुवात बेकार झाली. मी आजोबांकडे हॉस्पिटलमधे चाललो होतो. तर वाटेत माझा जुना बडोद्याचा मित्र, शशी भेटला. भेटला कसला, आडवा आला म्हणायला पाहिजे. आम्ही सगळे त्याला टाळतो. एक नम्बरचा बोलबच्चन आहे. सगळ्यांना टोप्या लावत फिरतो. दर वेळी मला भेटला की दोन चार हजारांचा चुना लावतो. काही ना काही कारणं सांगून पैसे घेतो ते कधीच परत देत नाही. शाळेत चांगला होता. स्वभावानेही तसा बरा आहे पण दर वेळी काय थापा मारायच्या आणि पैसे मागायचे. तर हा भेटला आणि मला विचारलं कुठे निघालायस? मी युनिव्हर्सिटी सांगितलं असतं तर सटकता आलं असतं पण सत्यवचन म्हणून मी म्हटलं ‘हॉस्पिटल’. तर हा पण माझ्याबरोबर आला. एक तास बसला. आजोबांशीसुद्धा गप्पा मारल्या. त्याही काही ओळख पाळख नसताना! मग चहा प्यायला खाली गेलो तशी आली गाडी रुळावर. यावेळी तर कहरच. डायरेक्ट पंचवीस हजार! मी म्हटलं ‘अरे कशाला’ तर म्हणे कोणीतरी दूरची मावशी आत्ता फार अडचणीत आहे. माझ्यासाठी मागितले नसते (!!) पण तिच्यासाठी मागतोय. दहा दिवसांत परत देईन. हद्द म्हणजे वर सांगतो, आपल्या बाकी कोणा मित्रांकडे याबद्दल जरापण वाच्यता करू नकोस, फार खाजगी गोष्ट आहे. मी असेही एवढे पैसे दिले नसतेच. पण एरवी मी काहीतरी सबब सांगितली असती. या वेळी मात्र मी सरळ खरं तेच सांगितलं की “शशी, कोणाला बोलू नको काय, तू हे असे पैसे मागत टोप्या लावतोस हे आम्हांला सर्वांना चांगलं माहितीये आता. आज काय हे, उद्या काय ते.... दहा दिवसांत असं कुठलं झाड हलवून पैसे पाडणार आहेस आणि मला परत आणून देणार आहेस! आत्तापर्यंत दोनचार दोनचार करत बारा झाले. कधी दिलेयस परत? मी भिडस्त आहे, मूर्ख नाही. तेव्हा आता पुरे” मी असं म्हटल्यावर तो चिडून “मला वाटलं तू माझा मित्र आहेस. पण हीच किंमत केलीस मैत्रीची. चार दिवसांत तुझे बारा हजार तुझ्या तोंडावर नाही मारले तर नाव बदलेन” असं मलाच सुनावून तरातरा निघून गेला. चार दिवस काय, एक महिना झाला तरी अर्थातच त्याने मला एक पैसाही परत केला नाहीये. मी विचार करत होतो की सबबी न देता खरं बोललो तर मैत्री पूर्ण तुटलीच. मग वाटलं मैत्री खरोखरीच उरली तरी होती का? मी त्याला टाळत होतो, तो मैत्रीच्या आठवणींचा फायदा घेत होता. मैत्री तर केव्हाच संपली होती. आता फक्त दिखावा संपला.
काल एका मध्यस्थांचा फोन आला. एक स्थळ बघण्याचा कार्यक्रम ठरला होता पण त्या मुलीचं आधीच लग्न ठरल्यामुळे तो कॅन्सल झाला. मला तर मनातून आनंदच झाला. आईने माझा चेहरा बघितला आणि म्हणाली “तुला तर बरंच वाटलं असेल? दिसतंय चेहर्यावर” तेव्हा मी तिला म्हटलं “आई, तुमचा आग्रह आहे म्हणून मी होय म्हटलंय पण खरं आहे की मला काही अशी घाई नाहीये लग्नाची.” यानंतर मग मी एक तास आईचं ‘सगळ्या गोष्टी कश्या वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत. ज्यांची ट्रेन सुटली ते कसे स्टेशनवरच मागे राहिले’ अश्या अर्थाचं एक लेक्चर पुन्हा एकदा ऐकलं.
गेला महिनाभर आजोबा गावाहून आमच्याकडे आले आहेत. त्यांची तब्बेत फारच खालावली आहे. गेल्या आठवड्यात त्यांना हॉस्पिटलला अॅडमिट केलं. दोन अॅटॅक आधीच येऊन गेलेत. आता त्यांचं हृदय पंधरा टक्केच काम करतय असं डॉक्टरांनी सांगितलय. मला त्यांना असं बघवत नाही. ते काही नेहमी आमच्या सोबत रहात नव्हते. आईचे आई वडील अगदी बाजूलाच रहात असल्याने आमचं कधी अडत नव्हतं आणि त्यांनाही कदाचित थोडं पाहुण्यासारखं, उपरं वाटत असावं. पण दर वर्षी एक दोन महिने यायचे तेव्हा आमचं चांगलं जमायचं. तर त्या रात्री मी त्यांच्याबरोबर थांबणार होतो. संध्याकाळची मोठ्या डॉक्टरांची फेरी झाली. नंतर त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आणि सांगितलं की त्यांना उद्या घरी घेऊन जा, फार फार तर आठवडा उरलाय त्यांचा. त्यांना घरी शांतीने राहूदेत. मी जड मनाने पुन्हा आजोबांच्या खोलीत आलो. ते माझी वाटच बघत होते. त्यांनी मला जवळ बोलावलं. बाजूला बसायची खूण केली. “काही दुखतंय का?” मी काळजीने विचारलं. तर ते म्हणाले, “दुखण्याचं काही नाही रे. तुला एक सांगायचंय. माझ्या मनावर खूप ओझं आहे. आता सांगितल्याशिवाय गत्यंतरच नाही.” एक दीर्घ श्वास घेऊन ते बोलू लागले. “तुला माहितीये ना मी आधी मुंबईला नोकरी करत होतो. पण तेव्हा तुम्ही बडोद्याला होतात. नंतर तुझी आजी गेली. दोन वर्षानी निवृत्त झाल्यावर मी गावी गेलो. आठवतं का?”
“हो, तुम्ही नेहेमी बागाईतीचं काम बघत होता ना?”
“हो, ही गेल्यावर मला फार एकटेपण आलं, निराश वाटू लागलं होतं. तुम्ही बडोद्याला, अल्का अमेरिकेत. मग मी मन रमवायला म्हणून गावी आंबे, फणस, चिक्कू लावले. त्यांच्या देखभालीत माझा वेळ जाऊ लागला. तुझी चुलत आजी, माझ्या धाकट्या भावाची गजाननाची बायको, शांतला, मला मदत करू लागली. हळू हळू आम्हा दोघांना एकमेकांची सोबत होऊ लागली, सवय होऊ लागली. हिच्या जाण्याने जी पोकळी झाली होती ती शांतलाने भरून काढली. त्याच दरम्यान मला पहिला अॅटॅक आला. तुम्ही नेमके अल्काच्या बाळंतपणासाठी अमेरिकेला गेला होतात. शांतलाने त्यावेळी मला खूप सांभाळलं. गजानन खूप लवकर गेला. तिच्या पोटी मूलबाळही नाही. ती तर माझ्याहूनही एकटी होती. आयुष्याच्या संध्याकाळी आम्ही दोघांनी एकमेकांमधे सोबत शोधली. तिची काहीच अपेक्षा नव्हती. पण मला असं बिननावाचं नातं नको होतं. देवघरासमोर तिला उभं करून मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. काहीही सोपस्कार नाहीत, कागदपत्र नाहीत पण मी तिच्याशी लग्न केलं. मला पश्चात्ताप नाहीये त्याचा. गेली अठरा वर्षं आम्ही एकमेकांना साथ दिली. तारुण्यात जशी साथ हवी असते तशीच या म्हातारपणातसुद्धा अश्या सोबत्याची गरज असतेच. कुणालातरी आपण हवे आहोत, आपली कमी त्यांना जाणवेल ही जाणीव मनुष्याला रोज जागं करते, आशा देते. शांतलाने मला ती जगण्याची इच्छा दिली. आधी वाटलं की तुझ्या बाबाला सांगावं पण कोण काय म्हणेल, अल्काच्या सासरचे, तुझ्या आजोळचे सगळे काय म्हणतील असे विचार करून हिम्मतच झाली नाही. तुमचे कोणाचे गावाशी तसे काही संबध राहिलेच नव्हते. आणि शांतलालासुद्धा फार संकोच वाटत होता. मग सांगणं टाळलं ते कायमचंच. ती काही प्रॉपर्टी वगैरे मागणार नाही. पण मला तिची सोय करून जायला हवं. माझं चेकबुक घेऊन येशील उद्या? अजून एक होतं, माझे फार दिवस राहिले नाहीयेत हे कळतंय मला. जाण्याआधी तिला शेवटचं भेटायची इच्छा आहे. तिचीसुद्धा असणारच. तिची मुंबईला यायची सोय करशील? पण तुझ्या बाबाच्या नकळत हे कसं होणार? ती मुंबईत कुठे रहाणार?”
त्यांचं ते बोलणं ऐकून मला एवढा धक्का बसला होता की मी काही न बोलता तसाच आ वासून राहिलो होतो. “दिगंत.....” आजोबांनी मला पुन्हा हाक मारली.
“म्हणजे काकीआजी तुमची......” मी अडखळत म्हटलं.
“हो.... बायको आहे ती माझी” ते बोलताना माझ्या नजरेला नजरसुद्धा देत नव्हते. शेवटच्या दिवसांत आजोबा मला असं काही सांगतील असं मला कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. शेवटी मी त्या धक्क्यातून सावरलो. त्यांचा तो हडकुळा झालेला हात मी हातात घेतला आणि म्हटलं, “आजोबा हे सगळं आधी का नाही सांगितलत. तुम्ही आम्हांला हवेच आहात. अगदी काकीआजीसकट.”
सकाळी घरी परत आलो तेव्हाही माझ्या मनात तेच विचार होते. आजोबांनी बाबांना काही न सांगायला म्हटलं होतं. सहाजिकच त्यांच्या मनात hesitation असणार. पण मी बाबांना पूर्ण ओळखतो. मुन्गीलासुद्धा न दुखवणार्यांपैकी आहेत ते. आजोबांच्या छातीवरचं हे मणभराचं ओझं हलकं व्ह्यायला हवं असं मला वाटलं. मी बाबांना सांगायचं ठरवलं. आणि खरोखरीच हे चॅलेंज आहे म्हणून नाही तर because I felt that was the right thing to do!
नंतर बाबा आणि मी दोघेही आजोबांना घरी घेऊन जायला हॉस्पिटलमधे आलो. बाबा आजोबांच्या बाजूला बसले. आजोबांचा हात त्यांनी हातात घेतला आणि म्हणाले, “बाबा हीच परीक्षा केलीत माझी? आधी सांगितलं असतंत तर केव्हाच काकीला इथे बोलावून घेतलं असतं. गाडी पाठवलीये तिला घेऊन यायला. मीच गेलो असतो पण तुम्हाला असं सोडून कसा जाऊ! हा घ्या चेक, तुमच्या एकटेपणात तिने तुम्हांला सोबत दिलीये. तिची सगळी काळजी मी घेईन. अगदी नक्की घेईन.” दुसर्या दिवशी काकीआजी आली. त्यानंतर एका आठवड्याने आजोबांनी कायमचे डोळे मिटले. पण ते जाताना खूप समाधानाने गेले. त्यांना तसं समाधानी पाहून माझे बाबा, ते मुलगा आणि मी बाबा असल्यासारखे माझ्या गळ्यात पडून रडत होते. रूमीने किती बरोबर सांगितलय ‘That which is false troubles the heart, but the truth brings joyous tranquillity’*”
दिगन्तचं वाचून झालं. क्षणभर कोणालाच काही सुचेना. सगळे गप्प! शेवटी अवनी उद्गारली, “so proud of you Digant!!” बाजूला बसलेल्या मीराने काही न बोलता हलकेच त्याच्या हातावर थोपटलं. शौनकनेही त्याच्या पाठीवर थाप दिली.
“तर हा झाला माझा अनुभव,” दिगंत म्हणाला, “who’s next?”
क्रमशः
डॉ. माधुरी ठाकुर
https://drmadhurithakur.blogspot.co.uk/
* रूमी नावाच्या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याचा quote – मनाला खरी शांतता हे
सत्यानेच मिळते.
Monday, 31 July 2017
चॅलेंज (भाग १)
तिघंही ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहाला कॅफेत पोहोचले. “ही अवनी तर कधीच वेळेवर येणार नाही. मीरा फोन कर तिला, बघ किती वेळ आहे” शौनकने वैतागून म्हटलं. हात खांद्यान्मागे ताणून आळस देत तो पुढे म्हणाला, “I am knackered. घरी जाऊन झोपायचं मला.”
“कोणाला कापत होतास?” दिगंतने हसून विचारलं.
“कापायला वेळ लागत नाही रे, जोडायला वेळ लागतो” शौनकने उत्तर दिलं.
“अवनी अर्ध्या तासात पोहोचतेय. ट्रॅफिकमधे अडकलीये म्हणाली.” मीराने मोबाईल खाली ठेवत या दोघांना सांगितलं.
“हो ट्रॅफिक, आम्ही हेलिकॉप्टरने आलोय ना, ट्रॅफिक काय आजच आहे का, ते असेल असं धरूनच तेवढा वेळ आधी निघायला पाहिजे ना! काहीही कारणं देत असते!” शौनकच्या बोलण्यात त्याचा वैताग अगदी स्पष्ट होता.
“तू आज जास्तच थकलायस का? मेसेज करायचा होतास, आपण पोस्पोन केलं असतं.” मीराने काळजीच्या सुरात त्याला म्हटलं.
“च्.... आपलं ठरलं आहे ना, महिन्याचा शेवटचा शनिवार, Rule is rule!” शौनक निग्रहाने म्हणाला. दिगंतकडे वळून त्याने पुढे विचारलं, “काय रे, या वेळी चलेंज तू देणार आहेस ना? ठरवलयस ना?”
“हो तर, अवनीला येऊ दे, मग सांगतो”
ज्युनिअर कॉलेजला भेटलेल्या या चौघांची मैत्री इतक्या वर्षांनीही टिकली होती. कॉलेजनंतर चौघांच्या वाटा पूर्ण वेगळ्या झाल्या. जात्याच सुंदर, चटपटीत, मोकळ्या स्वभावाची, मॉडर्न अशी अवनी, आयटी इन्जीनीअर म्हणून मल्टीनॅशनल कंपनीमधे लागली. तिच्या मानाने मीरा तशी साधी, पण आश्वासक हसरा चेहरा, मधाळ डोळे आणि शांत स्वभाव यामुळे कोणालाही चटकन आवडण्यासारखी. ती एका प्रायव्हेट शाळेत शिक्षिका होती. उंचपुरा, दणकट, आणि चेहर्यावर कुशाग्र बुद्धीमत्तेचं, आत्मविश्वासाचं तेज असा शौनक, MBBS होऊन आता सर्जरीचं प्रशिक्षण घेत होता. आणि दिगंत.... मध्यम बांधा, रेखीव चेहरा, भावूक डोळे, पाहणार्याला कवी वाटावा असा दिगंत फिलॉसॉफीमधे पी एच डी करत होता. स्वभाव आणि क्षेत्र पूर्ण वेगळी असली तरी कशी कोण जाणे यांची मैत्री घट्ट टिकून होती. दोन जणांमध्ये नक्की काय क्लिक होतं तेव्हा सूर जुळतात हे सांगणं तसं कठीणच ना! एकाच शहरात असल्याने भेटीगाठी होणं कठीण नव्हतं.
त्यात गेल्या दोन वर्षांपासून या चौघांनी एक नवीन पद्धत सुरू केली होती. ‘4 वीक्स चॅलेंज’. दर महिन्याला एकाने काहीतरी चॅलेंज द्यायचं आणि चौघांनीही ते चार आठवडे पाळायचं. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी भेटायचं, गप्पाटप्पा, कॉफी आणि चॅलेंज बद्दलचे आपले अनुभव शेअर करायचे. कधी तोंडी, कधी लिहून. आणि त्याच दिवशी पुढच्याने नवीन चॅलेंज द्यायचं. चौघानांही हा खेळ आता चांगलाच आवडू लागला होता.
अवनी आली तेव्हा त्या तिघांनीही आपापले गेल्या महिन्याच्या चॅलेंजचे पेपर्स काढले होते. “मी दिलेलं चॅलेंज, रोज दहा हजार स्टेप्स चालायचं. मी मोबाईलच्या अॅप वरून रेकॉर्ड ठेवत होतो. जेजेचं कॅम्पस इतकं मोठं आहे की क्लिनिक, वॉर्ड, आणि ओपरेशन थीएटरच्या चकरांमधेच सात आठ हजार स्टेप्स होऊन जात होत्या. अजून थोडसं चाललं की झालं.” म्हणत त्याने त्याचा कागद पुढे सरकवला. त्यावर तारखा आणि आकडे होते. एकाही दिवशी आकडा दहा हजारांच्या खाली नव्हता. मग मीरा, मीराची अबोली फुलांची डायरी एव्हाना सगळ्यांच्या ओळखीची झाली होती. तिनेसुद्धा दिवसवार नोंद केली होती पण आकड्यांबरोबर अजून छोट्या छोट्या नोंदी होत्या. डायरी पुढे सरकवून ती बोलू लागली, “मी रोज शाळेत चालत जायला आणि यायला सुरुवात केली. येताना कधी कधी फार थकायला व्हायचं पण सकाळी चालून खूप फ्रेश वाटायला लागलं. आता चॅलेंज संपलं तरी सकाळी चालत जाण्याचा नियम तसाच ठेवणार आहे. माझं वजनही दोन किलो कमी झालं” तिने हसत म्हटलं.
“See.......” शौनकने स्वतःची कॉलर टाईट केली.
दिगंतने त्याची वही उघडली आणि तो बोलू लागला. “मीसुद्धा रोज रात्री एक तास चालायला सुरुवात केली, पीडोमीटर घेऊन. म्हटलं मोबाईल घेऊन जायचं नाही नाहीतर पुन्हा तोच बघत बसणं होईल. I must say, मला खूप फायदा झाला. एक तास फक्त आपण आणि आपले विचार. साठलेला गुंता शांतपणे सोडवावा तसं या एक तासाच्या शांत विचारांमुळे माझ्या मनातला कितीतरी गुंता सुटल्यासारखा वाटतोय. खूप हलकं वाटतंय , शरीराने तर आहेच पण मनानेसुद्धा, थँक्स मित्रा” म्हणत त्याने शौनकच्या पाठीवर थाप दिली. शेवटचा मेंबर अवनी, ती बोलू लागली “मी तर रोज जिमला जातेच. धावलं तर स्टेप्स जास्त होतात म्हणून मी ट्रेडमिलवर रोज धावत होते. हिअर......” म्हणत तिने तिचा Excel sheet चा प्रिंट आउट पुढे सरकवला आणि विचारलं, “आज चॅलेंज कोण देतंय?”
“मी” दिगंत म्हणाला. “पण हे चॅलेंज वेगळं असणार आहे. Nothing physical. चॅलेंज हे आहे की पुढच्या चार आठवड्यांत आपण एकदाही खोटं बोलायचं नाहीये, अगदी अजिबात नाही. आणि जेव्हा जेव्हा खोटं बोलायची वेळ येईल आणि आपण ते न बोलता खरंच बोलू तो incident, त्याचा परिणाम, आपले विचार हे सगळं नोट करून ठेवायचं” उरलेले तिघेही गोंधळले होते. “पण दिगंत, आपण कुठे उठसूठ खोटं बोलत असतो?” मीराने विचारलं. “ते आता कळेलच” दिगंत हसून म्हणाला, “कबूल आहे की आपण काही हवाला घोटाळा करत नाही. पण येता जाता लहान सहान थापा मी तरी मारतो, जसं फोन उचलायचा नसला की मी मिटींगमधे होतो, कोणाकडे जायचं नसलं की नेमका मी मुंबईत नाहीये त्या दिवशी, किंवा लेटेस्ट म्हणजे मुलगी पसंत नसली की कळवायचं की पत्रिका जुळत नाहीये. किंवा आपल्या अवनीसारखं, निघायचं उशिरा आणि सांगायचं की ट्रॅफिक होतं....” अवनीसकट सगळेच हसू लागले. “हो रे, निघायलाच थोडा उशीर झाला पण खरंच थोडं ट्रॅफिकसुद्धा होतं” अवनीने हसत म्हटलं, “तुम्ही सगळे मस्त कॉफी घेऊन बसलायत. मी ऑर्डर देऊन येते” म्हणत ती टेबलकडून उठली.
“दिगंत, मग आता तू मुलगी बघायला गेलास आणि तुला नाही आवडली की तू सरळ सांगणार की तुमची मुलगी फोटोतल्यासारखी मस्त दिसत नाहीये. म्हणून माझा नकार आहे?” शौनकने दिगंतला चिडवायला विचारलं. “पहिलं म्हणजे मी फक्त दिसण्यावरून मुलीला नकार देईन असं होणारच नाही. मी नकाराचं खरं कारण सांगेन की माझ्यां बायकोबद्दलच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. तुमची मुलगी ही त्या अपेक्षांमध्ये बसत नाहीये एवढंच” मीराने मधेच त्याला थांबवत विचारलं, “पण अशा कटू सत्याने काय होणार दिगंत? म्हटलंच आहे ना, प्रियं ब्रूयात्, सत्यम् ब्रूयात्, न ब्रूयात् अप्रियम् सत्यम्”*. दिगंतने उत्तर द्यायच्या आधीच शौनकने मीराला विचारलं “कोणी म्हटलंय हे? कृष्णाने का? मीरा, तुझं फक्त नाव मीरा आहे, तू त्या कृष्णाची मीराबाई नाहीयेस”
“मग कोणाची मीरा आहे ती?” दिगंतने कोपरखळी मारली. मीरा गोरीमोरी झाली. इतक्यात अवनी तिचा कॉफीचा कप घेऊन टेबलकडे परतली. “काय अवनी, रोहन काय म्हणतो? कसं चाललंय तुमचं?” शौनकने सोयीस्करपणे विषय बदलला. रोहन हा अवनीचा boyfriend होता. वर्षभर ते एकमेकांना ओळखत होते. प्रकरण मैत्रीच्या पुढे होतं पण घरच्यांशी ओळख करून देण्याइतपत अजून नव्हतं. “रोहन बराय, इथून मी त्यालाच भेटायला जातेय. नंतर एका पार्टीला जायचंय” कॉफीचा घोट घेत तिने म्हटलं. “दर शनिवारी अश्या पार्ट्या आणि जागरणाचा तुला कंटाळा नाही येत?” दिगंतने उत्सुकतेने तिला विचारलं. “येतो ना, शनिवारी रात्री क्लबिंग, पार्टीज म्हणजे भरपूर जागरण. मग रविवारी सकाळी लवकर जाग येत नाही आणि रात्री वेळेवर झोप येत नाही. म्हणजे पुन्हा सोमवारी सकाळी उठायला उशीर. मग जॉबला लेट, मग थापा माराव्या लागतात.” अवनीने एका दमात सांगितलं. “अगं पण मग नाही म्हणायचं ना जायला. रोहनला खूप आवड आहे का या सगळ्याची?” मीराने विचारलं. “रोहनला सवय आहे पण फार काही आवड आहे असं नाही. थोडी फार आवड म्हटली तर मलाच. पण तीही आता कमी होतेय. पण न जावं तर आपल्या हातून काहीतरी निसटतंय असं वाटतं. आमचा बॉम्बे स्कॉटिशचा सगळा ग्रूप नेहेमी भेटत असतो. चार वेळा नाही म्हटलं तर पाचव्या वेळी आपल्याला बोलावणारच नाहीत अशी काहीतरी विचित्र इनसिक्युरिटी वाटते मला.” दिगंतकडे वळून तिने विचारलं, “दिगंत हे चॅलेंज खरं ‘बोलण्यापुरतं’च आहे की texting, facebook वगैरे सगळ्यालाच? म्हणजे फोटो आवडला नसेल तर like सुद्धा करायचा नाही का?” अवनीने काळजीने विचारलं. दिगंत खो खो हसू लागला आणि म्हणाला, “Ideally yes, सत्य किंवा honesty म्हणजे तोंडाने सत्य बोलणं ही पहिली पायरी आणि ‘ऋत’ किंवा authenticity म्हणजे प्रत्येक गोष्ट अंतर्मनाशी प्रामाणिक राहून करणं ही पुढची पायरी. आपल्याला किती जमतंय बघूया. आणि मी दिलेलं चॅलेंज आहे म्हणून मी एक टिप देतो. खरं बोलणं शक्य नसेल तेव्हा ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’”
शौनकने जोरजोरात मान हलवत अवनीला म्हटलं “या दोघांनी चोरून संस्कृतच्या ट्युशन्स लावल्यायत.” “No way.....” म्हणत अवनीने आश्चर्याने मीराकडे पाहिलं आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने “हो?” असं विचारलं. “चल् गं. त्याच्या बोलण्यावर काय जातेस! शौनक, नशीब चॅलेंज उद्यापासून सुरू होतंय नाहीतर तुझ्या या बोलण्यामुळे आजच हरला असतास तू!” मीराने शौनकला तंबी दिली. पुढे नेहेमीप्रमाणे गप्पा छान रंगल्या. निघायची वेळ झाली. “मीरा मी त्याच बाजूला चाललोय. तुला बाईकवर ड्रॉप करू?” शौनकने निघता निघता विचारलं. “काय रे तू नेहेमी बरोबर त्याच बाजूला कसा जात असतोस! कधी आमच्या बाजूला सुद्धा येत जा” दिगंत शौनकला चिडवायची एकही संधी सोडत नसे. “शौनक खरंच मला हायवे पर्यंत सोड ना. मला रोहनला भेटायला उशीर होतोय, if Meera doesn’t mind ofcourse...” अवनीने स्वतःचं घोडं पुढे दामटलं. शौनकने हसत हसत कपाळावर हात मारला. “तुम्ही निघा. मला बाजूच्या बुक स्टोअर मधे जायचय” मीराने त्यांचा निरोप घेतला. सगळे आपापल्या दिशांना निघाले पण प्रत्येकाच्या मनात चुटपूट होती की कसे होणार आहेत हे सत्याचे प्रयोग!
डॉ. माधुरी ठाकुर
* लोकाना आवडेल प्रिय वाटेल असं बोलावं, सत्य बोलावं, पण जे सत्य कटू असेल (अप्रिय) ते बोलणं टाळावं
Wednesday, 12 July 2017
लॉटरी
लिफ्टमधून बाहेर पडेपर्यंत तिच्या हातावरची
त्याची पकड घट्ट झाली होती. तिचं काळीज धडधडू लागलं. घरी गेल्यावर आपली धडगत नाही
हे तिला कळलं होतं. “मी खरच कधीच बोलले नाही तिच्याशी. लिफ्टमधे तिने hi
केलं तेव्हा मी फक्त हसले” घरात शिरल्या शिरल्या तिने घाबरून सांगितलं. “खरंच?”
संजयने उपहासाने विचारलं. “तू क्वीन एलिझाबेथ आहेस ना! की तू बोलत नाहीस आणि
लोकंच आपण होऊन तुझ्याशी बोलायला येतात.... इतकं, इतकं कठीण आहे एक सांगितलेली
गोष्ट पाळणं? लोकांशी बोलू नको, बोलू नको कित्ती वेळा सांगितलंय!” चिडून तिच्या
अंगावर ओरडत तो पुढे सरकला. तिच्या केसांना हिसका देऊन त्याने तिचं डोकं, केसांना
धरून घट्ट पकडलं. “परत कोणाशी बोलताना दिसलीस तर तुला सोडणार नाही मी.” हिस्र
श्वापदाच्या तावडीत सापडलेल्या हरणासारखी कांचन थरथरू लागली. तिचं ते घाबरण बघून
खुनशी हसत त्याने तिला जमिनीवर ढकलून दिलं. तिला तसं लोटून तो दार लावून एकटा
घराबाहेर निघून गेला.
या
महिन्यातली त्याच्या आक्रस्ताळेपणाची ही चवथी वेळ होती. तिच्या हातावरचे
सिगरेटच्या चटक्यांचे डाग अजून फिकेही झाले नव्हते. कांचन कपड्यांनी अंगावरचे
ठिकठिकाणचे वळ झाकत असे. झाकायचेही कोणापासून म्हणा! एकटीने बाहेर जायला तर तिला
मज्जावच होता. संजय कामाला जाताना बाहेरून दार लॉक करत असे. भाजीपाला, किराणामाल
आणायला तो तिच्या सोबत जात असे. कांचनच्या मनात विचार आला, लग्नाची बेडी
आपल्यासाठी खरोखरीची बेडीच आहे. कोणत्या चुकीची शिक्षा भोगतोय आपण? आईवडलांनी
ठरवलेल्या ठिकाणी लग्न करायला मुकाट्याने हो म्हटलं, लांब अनोळखी माणसाबरोबर लग्न नको
असा विरोध नाही केला या चुकीची की आपले आईवडील भोळे आहेत, संजयची काही चौकशी न
करताच त्यांनी विश्वास ठेवला या चुकीची! काय म्हणायचे बाबा नेहेमी “तो परमेश्वर
नेहेमी वरून आपल्याला बघत असतो. लक्ष ठेवत असतो, काळजी घेत असतो.....” तिने मान वर
करून बघितलं. वर घराच्या पांढर्या छताशिवाय काहीच दिसलं नाही. तिची नजर खिडकीकडे
गेली. पंधराव्या मजल्यावरून खालचा रस्ता, त्यावरच्या गाडया खेळण्यांसारख्या दिसत
होत्या. ‘नाही हो बाबा तो नाहीये वर. आणि असलाच तर त्याचं लक्षच नाहीये माझ्याकडे.
त्याचं आकाश फार दूर आहे माझ्यापासून आणि माझी जमीनही सुटली.’ तिच्या गालांवरून
आसवं वाहू लागली. पण पुसणारं कोणीच नव्हतं.
महाराष्ट्राच्या नकाशावरही नसलेल्या छोट्याश्या गावात कांचन लहानाची मोठी
झाली. वडिलोपार्जित जमिनीचा छोटासा तुकडा, त्यावर पिकवून त्यांचं कसंबसं चाले.
गरिबी तिच्या घराच्या पाचवीलाच पुजलेली होती. पण तिचे आईवडील आहे त्यात संतुष्ट
असत. चटणी भाकरी खाऊन आला दिवस साजरा करत. त्यांच्या गावात डांबरी रस्ता बांधण्याचं
काम सुरु झालं. कंत्राटदार गावात आला. त्याने संजयचं स्थळ तिच्या वडलांना सांगितलं.
‘फॉरेन’चा मुलगा ! नाते वाईक वगैरे काहीच
लटांबर नाही. तुमची मुलगी राणी होईल, त्याने तिच्या वडलांना स्वप्नं रंगवून
दाखवलं. आणि एरवी कदाचित ते इतक्या चटकन फसलेही नसते पण तो फकीर..... किती
वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ती.......
कडक
उन्हाळ्यातली ती दुपार होती. कांचन, आई, वडील आणि दोन बहिणींबरोबर जेवायला बसली
होती. इतक्यात दारातून आवाज आला. “क्या भूखे फकीर को थोडा खाना मिलेगा?” वडलांनी
त्यांच्या ताटातल्या एका भाकरीचे दोन तुकडे केले, एक तुकडा आणि त्यावर चटणी, हातांत
घेऊन ते दारापाशी आले. वडलांच्या मागे शेपटासारखी तीसुद्धा दाराकडे आली. तिच्या
वडलांनी फकिराला ती भाकरी दिली आणि विचारलं, “पानी चाहिये बाबा?” फकिराने मान
डोलावली. “कांचन, बाबांना पाणी आण” त्यांनी कांचनला सांगितलं. कांचन आत जायला वळणार
तोच त्या फकिराने तिच्याकडे बोट करून तिच्या वडलांना विचारलं, “आपकी बेटी है?”
वडलांनी हो म्हणून मान हलवली. तिच्या चेहर्याकडे निरखून बघत फकीर म्हणाला, “इसकी
तो लॉटरी आनेवाली है, बहुत पैसा आएगा, बहुत पैसा !!” कांचन तिथेच थबकली. तिच्या वडलांनाही
हे अगदीच अनपेक्षित होतं. “आप ज्योतिष जानते हो बाबा?” त्यांनी फकिराला विचारलं.
आणि लगेच तिला म्हणाले, “कांचन पाया पड त्यांच्या” आपण पाया पडलो तेव्हा काय बरं
म्हणाला तो फकीर, अर्थही नीटसा कळला नव्हता....
त्या दिवसापासून बाबांना मात्र खरंच वाटायला लागलं की लॉटरी लागणार आहे. दर
वेळी तालुक्याच्या गावी गेले की ते कांचनच्या हाताने एक लॉटरीचं तिकीट घेत. पण कधी
बक्षीस लागलं नाही. संजयचं हे फॉरेनचं स्थळ आलं तेव्हा ते खूष होऊन ज्याला त्याला
सांगायचे “बघा तो फकीर म्हणाला होता ती लॉटरी हीच. आमच्या सात पिढ्यांत कोणी मुंबईसुद्धा
बघितली नाही. आणि आता आमची कांचन फॉरेनला जाणार. लॉटरी नाहीतर काय म्हणायचं याला !
नक्की हीच ती लॉटरी होती आणि मी वेड्यासारखा तिकीटं घेत बसलो”
“ही
लॉटरी?” हातावरच्या वळांवरून अलगद दुसरा हात फिरवून तिने स्वतःला विचारलं. बाबा
कसे हो तुम्ही एवढे भोळे. तो फकीर वेडा, की मला एवढं लांब असं पाठवून देणारे
तुम्ही वेडे, की काहीही कारण नसताना माझा असा छळ करणारा हा माझा नवरा वेडा, की हे
सगळं चुपचाप सहन करणारी मी वेडी....
बर्याच उशिरापर्यंत संजय आला नाही तेव्हा कांचन झोपून गेली. रात्री बर्याच
वेळाने, चावीने दार उघडल्याचा आवाज आला. त्याचबरोबर दारूचा उग्र दर्प. संजय लडखडत
खोलीत आला. देवा, आज नको...... आज नको..... कांचनने मनात देवाचा धावा सुरु केला. ती
झोपल्याचं नाटक करून अंग चोरून तशीच पडून राहिली. तिच्या सुदैवाने तो बिछान्यात
पडला आणि पुढच्याच क्षणाला घोरू लागला. तिची झोप मात्र मोडली ती मोडलीच. जुन्या गोष्टी
तिला आठवू लागल्या. तिचं लग्नं ठरलं तेव्हा डॉक्टरकाका आणि प्रमिलाताई तिच्या घरी
आले होते. हे पतीपत्नी म्हणजे सीतारामाची जोडी होती. ते गावात धर्मदाय दवाखाना
चालवत. शिवाय गावात शिक्षणाबद्दल जागरूकता आणण्यासाठीही काहीनाकाही करत असत.
प्रमिलाताई घरोघरी जाऊन बायकांशी बोलायच्या. त्यांना आहार, आरोग्य, स्वच्छता,
कुटुंबनियोजन सगळ्याबद्दल नीट समजावून सांगायच्या. गावातली एक अनाथ मुलगी यांनी
दत्तक घेतली होती. तर डॉक्टरकाका बाबांना सांगत होते, “तुम्ही मुलाची अजून माहिती काढायला
हवी. त्याशिवायच कांचनला असं पाठवायचं म्हणजे..... त्यात तिला इंग्रजीही फारसं येत
नाही. देव न करो पण तिला मदत लागली तर परक्या देशात ती कसं काय करणार?” “आपले कॉन्ट्रॅक्टर
मिश्रा त्यांना ओळखतात ना. आणि आम्ही गरीब माणसं, परदेशात चौकशी करायला आमचं तिथे
आहे कोण ! आज कांचन गेली तर उद्या पुढच्या पिढीचं सोनं होईल.....” बाबांनी त्यांचं
ऐकलं असतं तर..... पण परदेशाच्या लॉटरीने त्यांना आंधळं केलं होतं.
अंधारात चकाकणारे घड्याळाचे काटे बारा वाजल्याच दाखवत होते पण कांचनला झोप
कशी ती नव्हती. कुठूनतरी विचित्र वास येत होता, ती उठून स्वयंपाकघरात गेली. तिथे
सगळं ठीक होतं. वास कुठून येतोय कळेना. तिने खिडकीतून खाली बघितलं. रस्त्यावर बरीच
गर्दी होती. लोक हातवारे करून काही सांगत होते पण काही ऐकू येत नव्हतं. घराचं दार
उघडून बघावं का काय झालंय. पण तिची हिम्मत होईना. घाबरत, दबकत तिने हॉलची खिडकी
थोडीशी उघडून ऐकण्याचा प्रयत्न केला. आता किंचाळ्याचे आवाज यायला लागले होते. फायर
फायर.... म्हणून लोकांच्या ओरडण्याचे आवाज येत होते. ती पुरी गोंधळली. काय करावं,
काय करावं, जळका वास वाढला होता. फार विचार करायला वेळ नव्हता. ती बेडरूम कडे
वळली. संजय अजूनही घोरत होता. आजूबाजूच्या गोंधळाचा त्याला पत्ताच नव्हता. त्याला
उठवायला तिने हात पुढे केला तशी तिच्या कुडत्याची बाही जराशी वर सरकली. त्याने
दिलेला सिगरेटचा चटका त्या मंद प्रकाशातही दिसत होता. तिने एक वार आपल्या हातावरच्या
वळांकडे पाहिलं, आणि मग झोपलेल्या संजयकडे. एक क्षण विचार करून ती उलट्या पावली
मागे फिरली. बेडरूमचं दार तिने लावून घेतलं, आणि निघणार इतक्यात ती पुन्हा वळली, नुसतं
आड असलेलं दार तिने घट्ट लावून घेतलं आणि त्याला बाहेरून कडी लावली. बंद दाराच्या
या बाजूला असण्याची तिची ही पहिलीच वेळ होती.
संजय
कामाची कागदपत्रं बाहेरच्या कपाटातल्या कप्प्यात ठेवायचा हे तिने पाहिलं होत, तिने
तो कप्पा उघडला, त्यात तिचा पासपोर्ट समोरच होता तो उचलला आणि ती घराबाहेर
जिन्याकडे धावत सुटली. किंचाळ्या, आरडाओरडा, रडणं, कुंथण कसकसले आवाज येत होते पण
ती पळत सुटली. आपण आगीपासून पळतोय की संजयपासून.... कुठे जायचं, कसं जायचं, पण
पहिल्यांदी या इमारतीतून बाहेर पडायला हवं. मग पुन्हा भारतात जाऊ. आई बाबांकडे. ते
कधीच आपल्याला टाकणार नाहीत. आपण निघतानाही ते आपल्याला म्हणाले होते “हे घर नेहेमी
तुझंच आहे. काही काळजी करू नकोस, ‘तो’ वरून बघतो आहे, ‘तो’ सगळी काळजी घेईल.”
एव्हाना ती तीन माजले खाली आली होती. ‘तो’ वरून बघतो आहे.... ‘तो’ वरून बघतो आहे....
म्हणजे मी आत्ता संजयला वर कोंडून आले तेसुद्धा त्याने बघितलं का? त्याला खरच सगळं
दिसतं का? मग माझे हाल होतात तेव्हा?.... तो काहीच कसा करत नाही.... धूर वाढत होता,
तिच्या नाकातोंडात धूर जात होता, तिला काही कळेनासं झालं..... फक्त वडलांचं “’तो’
बघतो आहे..... ‘तो’ बघतो आहे.....” वाक्य तिच्या डोक्यात ठाण ठाण वाजू लागलं.
असह्य हौऊन तिने दोन्ही हातानी कान दाबले आणि ती उलट पुन्हा वर तिच्या फ्लॅटच्या
दिशेने धावू लागली. पळत पळत ती घरात आली. बाहेरचा दरवाजा तिने उघडाच टाकला होता.
ती धावत बेडरूमकडे गेली. आतून संजय जोरजोरात ओरडत होता. “दार उघड हरामखोर......
दार उघड, मरेन मी......” तिने कडी काढली त्याबरोबर तो पिसाळलेल्या जनावरासारखा
बाहेर आला. बाहेर येऊन खाडकन त्याने तिच्या गालवर जोरदार थप्पड दिली आणि तो
दरवाज्याकडे धावला. ती त्याच्या मागे. आता धूर चांगलाच वाढला होता, ते जिन्याच्या
दिशेने निघाले एवढ्यात अग्निशमन दलाचा एक फायर फायटर वर आला. त्याने संजयला सांगितलं
की आगीने जिन्याचा रस्ता बंद झाला होता, फायर एस्केप (आपत्कालीन मार्ग) म्हणून बिल्डींगच्या
मागच्या बाजूला शिडीसारख्या पायर्या होत्या त्यावरून खाली जावं लागणार होतं. ते तिघे
बिल्डींगच्या मागच्या बाजूच्या शिड्यांवरून खाली जाऊ लागले. पुढे तो फायर फायटर ,
मधे ती आणि मागे संजय. आग आता चांगलीच पसरली होती. इमारतीत ठिकठिकाणी आगीने पेट
घेतला होता. इथल्या घरांच्या बांधकामात लाकूड खूप वापरतात त्यामुळे आगीचा धोका
असतो हे कांचनने ऐकलं होतं पण त्याचं एवढं रौद्र रूप बघायची वेळ येईल असं तिला स्वप्नातही
वाटलं नव्हतं. आता ते दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. संजय अजूनही खवळलेलाच
होता. “मला कोंडून काय पळून चालली होतीस, you...xxxxx” असं म्हणून त्याने पुढे
शिडी उतरणार्या कांचनला एक सणसणीत लाथ मारली. कांचन भेलकांडत पुढे असणार्या फायर
फायटर वर जाऊन आदळली. त्या दोघांनीही दचकून मागे पाहिलं. इतक्यात वरच्या
मजल्यावरून आगीने पेटलेला एक मोठा लाकडी खांब खाली कोसळला आणि त्यांच्या
डोळ्यांसमोरच संजयच्या अंगावर पडून त्याच्यासकट खाली गेला.
कांचन दवाखान्यात प्रमिलाताईच्या समोर बसली होती. तिच्या हातात एक लिफाफा होता
बाहेरून आलेला. तिने तो ताईपुढे केला. “हे काय आहे?” त्यांनी विचारलं. “लॉटरी....
संजयच्या कंपनीने त्यांच्या सगळ्या लोकांचा विमा काढला होता. एक लाख पौंडांचा चेक
आलाय माझ्या नावाने. आगीत खूप जणं गेली, सगळ्यांच्या बॉडी सापडल्या नाहीत, ओळखता
आल्या नाहीत. पण संजयची बॉडी सापडली आणि फायर फायटरने साक्ष दिली म्हणून माझा चेक
लवकर आला.” प्रमिलाताईनी कांचनच्या हातावर थोपटलं. “कांचन, तू खूप हिंमतीची आहेस.
ह्या पैशांसाठी तालुक्याच्या बँकेत खातं उघडून देऊ तुला?” “नाही ताई, एवढ्या पैशांची
आम्हांला गरजच नाही. आईबाबांना म्हातारपणासाठी पुरतील एवढे पैसे ठेवीन मी पण बाकी
सगळे पैसे चांगल्या कामाला वापरले जाऊदेत. बाबासुद्धा हो म्हणालेत. तुम्ही सांगा
कसं करायचं ते” प्रमिलाताई अवाक झाल्या. त्या म्हणाल्या, “हे बघ बाळा, आत्ता, तुला
धक्का बसलाय. अशा वेळी मोठे निर्णय न घेणं चांगलं. थोडा वेळ जाऊदे. मग शांत
चित्ताने ठरव.”
“शांत?.... शांत कधी वाटणार मला ताई? झोप लागत
नाही, लागली तरी कधी मला मारणारा, छळ करणारा संजय डोळ्यांसमोर येतो. कधी आग
डोळ्यांसमोर येते, ती जळकी प्रेतं, ते कळवळणारे, रडणारे लोक डोळ्यांसमोर येतात.
आगीने पेटलेला, दहाव्या मजल्यावरून खाली पडणारा संजय डोळ्यासमोर येतो आणि आठवतं की
मी त्याला तिथे जळून जायला कडी लावून जाणार होते” कांचन उद्रेकाने थरथरत होती. “पण
माझी चूक नाहीये, ‘तो’ वरून बघत होता, मी कडी काढली, मी कडी काढली.....” ती
हमसाहमशी रडू लागली. “तुझी चूक नाहीये बाळा, तुझी चूक नाहीये, उलट तू किती भोगलयस.”
प्रमिलाताई हळवं होऊन म्हणाल्या.
“मग आता संपूदे ताई. मला शांती मिळू दे. तुम्ही माणसांपासून
प्राण्यांपर्यंत सगळ्या गावाची काळजी घेता. तुमच्या कामात मला देव दिसतो. माहितीये
ताई, त्या फकिराला पाया पडले तेव्हा तो मला काय म्हणाला होता...”
“ते लॉटरीचं?”
“हो लॉटरीचं, पण नंतर अगदी हलक्या आवजात त्याने
मला सांगितलं लॉटरी तो लगेगी, बहोत पैसा मिलेगा, लेकीन बेटा सुकून पैसेसे नही,
इबादत से मिलेगा”
(* इबादत = उपासना)
डॉ. माधुरी ठाकुर
Monday, 3 July 2017
तळ्याकाठी
तळ्याकाठी
“तू तर नेहेमी त्याचीच बाजू घेणार. तुला
सांगण्याचाही काय उपयोग ! तरी तुला बजावतोय मी, माझ्या करीअरमधे तो ढवळाढवळ करतो
तेवढी पुरे, पण आता माझ्या पर्सनल लाईफमध्ये जर त्याने नाक खुपसलं तर मोठा भाऊबिऊ
सगळं मी विसरून जाईन.” त्याने आईला निक्षून सांगितलं.
“अरे पण चिंटू,” आई समजावणीच्या स्वरात सांगू
लागली. “चिंटू म्हणू नको मला, हजारदा सांगितलाय, राजस म्हण. ओजसला कसं बरोबर ओजस
म्हणतेस. मी काय आयुष्यभर चिंटूच रहायचं का?” राजसने चवताळून विचारलं.
“बरं, बरं, चुकलंच माझं! पण राजस, दादा नव्हता
गेला त्यांच्याकडे. तुझ्या मैत्रिणीचे वडीलच येऊन बोलले त्याच्याशी, तुझ्याबद्दल.
ते विचारत होते की तूसुद्धा दादाला जॉईन होणार आहेस का म्हणून. सगळे तुझ्या
चांगल्याचाच विचार करतायत. ओजस तुला मदतच करतोय. तुला कळत कसं नाही!”
“आई,
तुला कसं कळत नाही की मला सतत त्याच्या हाताखाली, त्याच्या छायेत नाही रहायचंय. मला
नकोय त्याची मदत. माहितीये तो खूप मोठाय आणि तुला केवढा अभिमान आहे त्याचा. आणि मी
हा असा. पण तरीही मला त्याची मदत नकोय, तो नकोय आणि तूही नकोयस” तिरमिरीत दार
धाडकन आपटून राजस घराबाहेर पडला. त्याने बाईक स्टार्ट केली. दोनतीनदा किक मारली पण
ती स्टार्ट होईना. वैतागून त्याने बाईकला एक लाथ मारली. “तूसुद्धा
त्यांच्यासारखीच! दादाने किक मारली की बरोबर स्टार्ट होशील” असं म्हणत चिडून
त्याने जोरात परत एक किक दिली. नशिबाने या वेळी ती स्टार्ट झाली. तो भन्नाट वेगाने
निघाला. दिशा नव्हती, कुठे जायचं ठरवलं नव्हतं. फक्त इथून लांब... खूप लांब... तो
जातच राहिला.
शहरापासून
तो बराच लांब आला होता. मधेच भलतच वळण घेतलं बहुतेक कारण डांबरी रस्ता संपून आता
कच्चा रस्ता लागला होता आणि आजूबाजूला गर्द झाडी. आपण कुठे आलो कुणास ठाऊक, एवढं
लांब असं जंगलात यायला नको होतं असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला. हः घाबरण्यासारखं
काय आहे, वाघ सिंह आजकाल असतात कुठे! खरी भीती तर माणसांचीच आहे. लोकांपासून दूर
असलं तर काय घाबरायचं. उलटसुलट विचार करत तो थकून थांबला. हेल्मेट काढलं. बाईक उभी
करून तो आसपास पाहू लागला. थोड्याच अंतरावर मोठमोठ्या वृक्षांनी लपवून
ठेवल्यासारखं एक छानसं तळ होतं. मस्त पिकनिक स्पॉट आहे की हा! मुग्धाला घेऊन इथे
यायला हवं. राजसच्या मनात विचार आला. पण लगेचच आपल्या भावाकडे गेलेले मुग्धाचे
बाबा त्याच्या डोळ्यासमोर आले. “म्हणे मी दादाला जॉईन करणार आहे का! नाही केलं तर
काय मुलगी देणार नाही का मला! मी काय कमी आहे का? वेळ तर द्या मला सेटल व्हायला.
घाई काय आहे एव्हढी... मुग्धाने त्यांना दादाकडे जाऊच कसं दिलं. सांगायचं ना नका
जाऊ म्हणून. घाबरट आहे नुसती!”
मुग्धाचे
विचार झटकून तो तळ्याकडे गेला. तळ्याच्या पाण्यात हातपाय धुऊन फ्रेश होऊन तो परत
बाईक कडे आला. हेल्मेट घालत त्याने बाईकला किक मारली. पुन्हा तेच. बाईक स्टार्ट
होईना. त्याने खिशातून मोबाईल काढला पण नेटवर्क नव्हतं. सगळ्या जगाने आपल्या
विरुद्ध कट केलाय असं त्याला वाटू लागलं. त्याने हेल्मेट भिरकावून दिलं, बाईकला एक
लाथ मारली, बाईक खाली पडली. वैतागून तणतणत तो तळ्याकाठी जाऊन बसला. बसल्याबसल्या
त्याने पाण्यात खडे टाकायला सुरुवात केली. पाण्यात असंख्य तरंग उठत होते तसेच
त्याच्या मनातही असंख्य विचार येत होते. “काय आयुष्य आहे हे. सक्सेसफुल मोठा भाऊ
असणं म्हणजे शापच आहे. आईचं त्याच्यावरच जास्त प्रेम आहे. त्याचाच तिला अभिमान
वाटतो. नेहेमी कशी म्हणते, ‘ओजस कसा वाढला मला कळलं सुद्धा नाही, राजसने मात्र खूप
त्रास दिला. जागरणं काय, आजारपणं काय....’ म्हणजे मी आजारी पडायचो हीसुद्धा माझीच
चूक आहे!! सारखं आपलं ओजस, ओजस, ओजस, ओजस.... आणि आता तर कहरच. माझ्या गर्ल फ्रेन्डचा
बाप सुद्धा ओजसला जाऊन विचारतो की मी त्याची लॉ फर्म जॉईन करणार का! अरे नाही करत
जा.... त्याच्याशीच लग्न लाऊन दे तुझ्या मुलीचं...” वैतागून त्याने एक खडा तणतणून
पाण्यात टाकला. तो पाण्यात पडतोय एवढ्यात अजून एक दगड पाण्यात खूप आत, दूरवर जाऊन
पडला. हा कोणी टाकला म्हणून राजसने चमकून मागे बघितलं. त्याच्या मागे काही अंतरावर
एक जण उभा होता. उंचपुरा, एखाद्या अॅथलीट सारख्या शारीर यष्टीचा, काळ्या सावळ्या
रंगाचा तो मनुष्य हसत हसत पुढे आला. एवढ्या दुरून याचा दगड पाण्यात एवढ्या लांबवर
कसा गेला असा आश्चर्याचा भाव राजसच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. “अरे मी रोजच
दगड फेकत असतो. प्रॅक्टिस आहे मला” राजसच्या चेहऱ्यावरचं प्रश्न चिन्ह पाहून तो
उत्तरला आणि येऊन राजसच्या बाजूला थोड्या अन्तरावर बसला.
“मी श्याम” त्याने हात मिळवण्यासाठी पुढे केला.
“मी राजस” राजासने हात मिळवला आणि खरं तर
अनिच्छेनेच उत्तर दिलं. त्याला इथे ओळख वाढवून गप्पा मारत बसायची जराही इच्छा
नव्हती.
“मग....” श्यामने प्रश्नार्थक नजरेने राजस कडे पाहात
विचारलं.
“मग काय?” राजसने वैतागून विचारलं.
“अरे प्रॉब्लेम काय आहे?”
ह्याच्या आगाऊ पणावर चिडावं की हसावं राजसला
कळेना. वरवर तो फक्त “कसला प्रॉब्लेम” एवढंच म्हणाला.
“तू तिथे हेल्मेट फेकलयस, बाईक पाडलीयेस आणि इथे एकटा
पाण्यात खडे टाकत बसलायस. तुझा रोजचा कार्यक्रम हाच असेल असं तर वाटत नाही.
काहीतरी बिनसलं असेल म्हणून इथे येऊन असा बसला असशील.” श्याम म्हणाला.
“असं काही नाहीये. रस्ता चुकलोय मी. आणि समजा
असताही काही प्रॉब्लेम तरी मी तुला कशाला सांगेन?” राजसने विचारलं.
“अरे, ओळखीच्यांपेक्षा अनोळखी माणसाला प्रॉब्लेम
सांगणं सोपं असतं. कारण ते आपल्याला judge करतील अशी धास्ती नसते. मन हलकं होतं आणि
कधी कधी तटस्थ भूमिकेतून परिस्थिती पाहिली की ती जास्त व्यवस्थित समजते, अॅनलाइज करता
येते, उपायही सापडतो.”
“तू काय सायकियाट्रिस्ट आहेस का?” राजसने
विचारलं.
“नाही रे. माझा दुधाचा बिझनेस आहे. जवळच फार्म
आहे माझं. माझं जाऊदे. तू बोल. मन मोकळं कर, तुला बरं वाटेल. मग मी तुला इथून
बाहेर पडायचा रस्ताही दाखवतो.”
भलताच
आगाऊ आहे हा पण रस्ता माहितीये याला, आणि काय हरकत आहे बोलायला, राजस विचार करू
लागला, साधारण ओजस च्याच वयाचा वाटतो. कदाचित थोडासा मोठा. आणि डोळे तर अगदी
आईच्या सारखेच आहेत. आश्वासक, हा चांगला माणूस आहे असं सांगणारे. छ्याः आई आणि
दादा कितीही दूर असले तरी आपल्या डोक्यातून जातच नाहीत. जाऊदे, बोलावं याच्याशी.
नाहीतरी दुसरं काय काम आहे. बाईक बंद पडलीये. मदत तर हवीच आहे आपल्याला असा विचार
करून राजसने बोलायला सुरुवात केली. “प्रॉब्लेम असा काही नाहीये. म्हणजे बाईक बंद
पडलीये ते आहेच पण खरा त्रास वेगळाच आहे. आमच्या घरी मी, आई आणि दादा. मी जुनिअर कॉलेजला
असताना बाबा गेले. मी लॉ करतोय. मोठा भाऊ ओजस माझ्यापेक्षा आठ वर्ष मोठा आहे.
त्याची मोठी एस्टॅब्लिश्ड लॉ फर्म आहे. तो सगळ्या दृष्टीने चांगला, अगदी सरस आहे.
लहानपणा पासूनच. शाळेत हुषार. कॉलेजमध्ये टॉपर आणि आतासुद्धा अगदी व्यवस्थित
सेटल्ड! आणि मी आपला साधारण. सहाजिकच आईला तोच जास्त आवडतो. ती त्याचच सगळं ऐकते, त्याचीच
बाजू घेते. मला हे असं सेकंड रहायचा अगदी कंटाळा येतो, वैताग येतो, संताप येतो....”
राजसचा आवाज चढत गेला होता.
“असं आहे तर” श्याम लक्षपूर्वक ऐकत होता.
“ओजस खरच चांगला आहे. तसा मला आवडतो. तो जास्त हुषार
आहे, मेहेनती आहे पण आईचं मुलांवरचं प्रेम हे irrespective ऑफ these things असलं
पाहिजे ना! सारखी काय त्याचीच बाजू घ्यायची? तो जास्तच लाडका आहे तिचा” राजस निराश
होऊन म्हणाला.
“बरेचदा काय होतं माहितीये राजस, आपण आईवडलांकडून
परफेक्ट वागण्याची अपेक्षा करतो. आई म्हटलं की तिला न बोलता समजलं पाहिजे वगैरे.
त्या घोळात आई, वडील हेसुद्धा हाडामासाची माणसंच आहेत हे आपण विसरतो. तू अजून लहान
आहेस म्हणून तुला कळायला थोडं कठीण आहे. पण स्वतःला मुलं झाली की आपण त्यांच्या
बाबतीत किती क्षमाशील असतो. त्यांच्या किती गोष्टी पोटात घालतो. वाईट वाटून घेत
नाही, राग धरत नाही. पण तेच आपण, आपल्याशी अश्याच वागणार्या आईवडलांशी मात्र तसे
वागत नाही. त्यांची प्रत्येक चूक, आपल्या दृष्टीने असलेली चूक आपण मनात धरून
ठेवतो. आता तुझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर दोन शक्यता आहेत. एक म्हणजे खरोखरीच तू
म्हणतोस तसं तुझा भाऊ तुझ्या आईचा जास्त लाडका आहे आणि दुसरी शक्यता म्हणजे खरं तर
असं नाहीये पण तुला असं वाटतंय”
“मला वाटतंय म्हणजे? मी काय वेडा आहे का उगीचच
काहीही वाटून घ्यायला?” राजसने वैतागून विचारलं.
“तसं नाही रे मित्रा. आता बघ, जेवताना आई मोठ्या
मुलाला दोन पोळ्या वाढते आणि छोट्याला एक. यात काही मोठ्यावर प्रेम जास्त आहे असं
काही नसतं. त्यांची भूक जेवढी आहे असं तिला वाटतं त्याप्रमाणे ती देत असते.
इक्वॅलिटी (सर्वांना सारखंच) आणि इक्विटी (सर्वांना पण प्रत्येकाला त्याच्या गरजेइतकं)
असं कॉलेजमधे शिकल्याचं आठवतं का?” श्याम हसून पुढे बोलत राहिला, “आणि शिवाय यात ‘तिला
वाटतं त्याप्रमाणे’ हेसुद्धा महत्वाचं आहे. ती तिच्या अंदाजाप्रमाणे हे आडाखे बांधत
असते की याला कशाची किती गरज आहे आणि त्याला किती. पण मनुष्य म्हटला की अंदाज
चुकण्याची शक्यता आहेच ना! पण या गोंधळात धाकट्याला असं वाटू शकतं की मला आई एकाच
पोळी देते आणि दादाला दोन, दादा जास्त लाडका आहे.”
“तसं नाहीये रे” राजस आता अगदी मोकळेपणाने बोलू
लागला होता, “आम्हाला दोघांनाही सर्व गोष्टी व्यवस्थित मिळतात. दादा तर स्वतःच
कमावतो पण मलाही सगळं भरभरून मिळतं. प्रॉब्लेम गोष्टी मिळण्याचा नाहीये. आई त्याचंच
सगळं ऐकते. तो म्हणेल ती पूर्व दिशा. आता बघ, त्याची लॉ फर्म आहे. तो कॉर्पोरेट
लॉयर आहे. मला क्रिमिनल लॉ मधे इंटरेस्ट आहे. पण हा सांगतोय मला जॉईन हो. आईसुद्धा
त्याचंच ऐकते आणि तेच सांगते. माझ्या म्हणण्याला कोणी भावच देत नाही. त्याच्या
प्रत्येक म्हणण्याला करते तसा सपोर्ट तिने मला करावा, तसा रिसपेक्ट तिने मलासुद्धा
द्यावा असं मला वाटतं आणि तो मला मिळत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे”
“हुषार आहेस तू. किमान आपला प्रॉब्लेम काय आहे हे
तरी तुला नीट समजलंय. अनेकांचं आयुष्य जातं पण त्यांना स्वतःला काय हवय नि काय
खुपतंय हेच त्यांचं त्यांना कळत नाही. पण मित्रा हे सपोर्ट आणि रिसपेक्ट जे
म्हणालास ना त्या फार कठीण गोष्टी आहेत. मागून मिळत नाहीत. कमवाव्या, अर्न कराव्या
लागतात.”
“कमवेनच रे मी. पंचविशीसुद्धा नाही झाली अजून
माझी. पण तोपर्यंत? असाच भांडत राहू का सगळ्यांशी?” राजसने विचारलं.
“तो ढग बघ” श्यामने वर आभाळाकडे बोट केलं. राजसही
वर बघू लागला. “समजा तू मुग्धाला भेटायला चालत निघालायस आणि असा मोठा काळा ढग
आकाशात आला तर तू काय करशील?”
“मी जॅकेट किंवा छत्री घेईन.”
“का तू छत्रीने ढगाशी मारामारी करणार का?”
श्यामने हसून विचारलं.
“काय रे तुला भेटलं नाही का कोणी सकाळपासून! ढगाशी
मारामारी म्हणे! माझं डोकं भिजू नये म्हणून माझ्या डोक्यावर धरायला छत्री”
“तेच तर राजस!! बाकीचे आपल्याशी कसे वागतात, काय
म्हणतात हे त्या काळ्या ढगासारखंच आहे. आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. तो ढग, त्याला
वाटलं तर बरसेल नाहीतर वार्याने दुसरीकडे कुठे जाईल आणि तिथे बरसेल. आपल्याकडे
आपली छत्री हवी. आपली छत्री म्हणजे काय सांग?”
“काय”
“आपली छत्री म्हणजे आपला स्वतःवरचा ठाम विश्वास.
तो असेल आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर अशा पावसाचा मारासुद्धा तुझं डोकं भिजवू
शकणार नाही. आईशी, भावाशी जरूर मोकळेपणाने बोल, तुला कसं वाटतं ते त्यांना
मोकळेपणाने सांग, त्यांची बाजूसुद्धा समजून घे. नात्यांमध्ये मोकळेपणा, संवाद, सुसंवाद
हवाच पण फक्त त्याने तुझा प्रश्न सुटेल अशी आशा मात्र ठेऊ नकोस. आपल्या बर्याच प्रश्नांचं
मूळ हे आपल्या मनाच्या आतच असतं. म्हणून खरा संवाद हा आपला स्वतःचा स्वतःशीच असला
पाहिजे. आईचा लाडका ही नंतरची गोष्ट झाली, तू स्वतः स्वतःचा लाडका आहेस का? असशील
तर इतरांचा लाडका आहेस की नाही याने फारसा फरक पडता कामा नये. इतरांच्या
बोलण्यामुळे तू स्वतः स्वतःवर शंका घेत नाहीयेस ना? सगळ्या कोलाहलात आपला आतला
आवाज हरवूनच जातो. आपण स्वतःशी संवाद करतच नाही. तसा केलास तर तुला कळेल की आईची, भावाची
पद्धत चुकीची असेलही, कदाचित त्यांचा सल्लाही चुकीचा असेल पण त्यांचा हेतू मात्र
चांगलाच आहे, तुझं हित हाच आहे. तुझ्या ध्येयासाठी भरपूर प्रयत्न कर, यशस्वी हो पण
त्यांना धडा शिकवण्यासाठी नाही तर तुझी तेव्हढी क्षमता आहे म्हणून. कारण राजस
चुकीच्या पद्धतीने का होईना ते तुला मदत करण्याचाच प्रयत्न करताहेत.”
“हे असं इथे जंगलात तळ्याकाठी बसून असं बोलणं
सोपं आहे. पण प्रत्यक्षात कोणी तुमच्या मनाविरुद्ध वागलं, राग येईल, वैताग येईल
असं बोललं की हे छत्रीवालं तत्वज्ञान सुचत नाही.” राजस सहजा सहजी बधणार्यांतला
नव्हता.
“सराव राजस, प्रॅक्टिस!! माझा खडा पाण्यात लांब
का गेला? सराव.... जाणीवपूर्वक मनाला ताब्यात ठेवण्याचा सराव कर. राग करण्यात
मनाची जी शक्ती वाया घालवतोस ती प्रयत्न करण्याकडे वळाव. Let your actions speak for you.”
राजसने हसून मान
डोलावली.
“चल रस्ता दाखवतो तुला”
दोघे चालत बाईक कडे आले.
“अरे यार..... ही तर बंद
पडली आहे” राजस आठवून म्हणाला.
“बघू, चावी दे”
राजसला आठवलं, वैतागून
सगळी फेकाफेक करताना चावीसुद्धा फेकली असणार. तो जमिनीवर पाल्यापाचोळ्यात चावी
पडलीये का बघू लागला.
“पुन्हा तेच, सगळा शोध
बाहेर! आत बघ!! सगळी फेकाफेक करण्या आधी तू सवयीने चावी जीन्सच्या खिशातच टाकली
होतीस ना?”
राजसने बघितलं तर खरच
चावी खिशातच टाकली होती की! हायसं वाटून त्याने चावी श्यामला दिली. श्यामने एक किक
मारली आणि बाईक चालूही झाली.
“भारीच टेम्परामेन्टल
झालीये ही” राजस उद्गारला.
“तुझीच बाईक!” श्यामने
हसून म्हटलं, “ऐक, ते समोर मोठ्ठं झाड दिसतंय ना तिथून डावीकडे वळलास की कच्चा
रस्ता लागेल. त्यावर साधारण पाच मिनिटं गेलास की पक्का रस्ता दिसेल. त्यावर
उजवीकडे वळ की तुझ्या शहराकडे जाशील.
“तुला सोडू तुझ्या
फार्मवर?”
“तू हो पुढे. मी थोडा
वेळ थांबणार आहे” म्हणून श्यामने राजसच्या खांद्यावर थाप दिली.
“थॅंक्स श्याम, बरं
वाटलं तुझ्याशी बोलून.”
“काळे ढग आले तर लक्षात
ठेवशील ना?” श्यामने हसून विचारलं.
“नक्की!!” राजस हसून
उत्तरला. दोघांनी हात मिळवले आणि राजस निघाला.
सकाळी चिडून निघून
गेलेला राजस संध्याकाळ झाली तरी आला नव्हता. त्याच्या आईच्या डोळ्यांना धार लागली
होती. देवघरासमोर बसून ती माऊली मनोमन आळवत होती, “कृष्णा, तुला देवकीचं प्रेम
कळलं आणि यशोदेचंही. माझ्या बाळाला मात्र माझं प्रेम कळत नाहीये रे. त्याची काळजी
घे. त्याला सुखरूप घरी आण”
राजस निघाला. त्याने वळण
घेतलं. समोर खरंच डांबरी रस्ता होता आणि त्याच्या शहराच्या दिशेने जाणारी पाटी.
श्यामने बरोबर रस्ता सांगितला होता तर... आईबद्दलही तो बरोबर म्हणाला. तिचं थोडसं
चुकत असलं तरी तिचं प्रेम सारखंच आहे दोघांवर. मी नेहेमी उलटं धरून चालतो म्हणून....
मुग्धासुद्धा तेच म्हणते. आणि काय म्हणाला तो, मुग्धाला भेटायला जायचं असेल आणि
काळा ढग आला तर..... wait a minute.... मुग्धाबद्दल तर मी त्याला काही म्हटलंच नाही.
मुग्धाचं नाव त्याला कसं कळलं! आणि चावी... चावी मी ठेवताना तर तो तिथे नव्हताच. त्याला
कसं कळलं! कसं कळलं !! राजस चांगलाच गोंधळला. श्यामला शोधायला त्याने बाईक मागे
वळवली. तो पुन्हा तळ्याकाठी आला. पण श्याम दिसला नाही. ते बसले होते त्या जागी एक
मोरपीस मात्र होतं.
डॉ. माधुरी ठाकुर
Subscribe to:
Posts (Atom)