Wednesday, 2 August 2017

चॅलेंज भाग २



पुन्हा महिन्याचा शेवटचा शनिवार. सहाला अजून पाच मिनिटं होती. पण शौनक आणि दिगंत वेळेआधीच पोहोचले होते. “कधी वेळेवर येणार रे या मुली?” शौनकने म्हटलं. “अजून सहा वाजायचे आहेत. त्या बघ त्या दोघी रिक्षातून उतरतायत.” दिगंतने कॅफेच्या मोठ्या काचेच्या खिडकीकडे हात करत शौनकला दाखवलं. अवनी आणि मीरा रस्त्याच्या दुसर्या बाजूला रिक्षातून उतरत होत्या. बोलत बोलत रस्ता ओलांडून दोघी कॅफेच्या दिशेने चालत होत्या. त्यांचे चेहरे बघून त्या काहीतरी महत्त्वाचं बोलतायत असं वाटत होतं. मीराचा चेहरा तर फारच ओढलेला दिसत होता. त्या दोघी कॅफेच्या आत शिरल्या. हे दोघे गेली दोन मिनिटं त्यांना बघत होते ह्याचा त्यांना पत्ताच नव्हता. टेबलपाशी पोहोचेपर्यंत दोघींचे चेहरे पुन्हा नॉर्मल दिसत होते.

“मीरा, अवनी, all ok?” त्या बसायाच्याही आधी दिगंतने  विचारलं. “का, काय झालं?” अवनीने उलट त्यालाच विचारलं. “नाही.... तुम्ही दोघी जरा स्ट्रेस्ड दिसताय” दिगंत म्हणाला. “च् जाऊदेना. तुम्ही ऑर्डर नाही केली अजून?” असं म्हणून मीराने विषय बदलला. दिगंत आणि शौनक दोघांनाही ते जाणवलं. बसून स्थिर स्थावर झाल्यावर मीराने दिगंतला विचारलं, “दिगंत, आजोबांना जाऊन किती दिवस झाले? घरी सगळे ठीक आहेत ना?” “पंधरा दिवस झाले. हो, ठीक आहेत सगळे. वाईट वाटतंच पण त्यांचं वय झालंच होतं.” त्याचं बोलणं होईपर्यंत चौघांचे कप टेबलवर आले.

कॉफीचा घोट घेत दिगंतने त्याची डायरी बाहेर काढली. मी दिलेलं चॅलेंज ‘ऋतम् वच्मि, सत्यम् वच्मि’

“झालं सुरू” शौनकने निषेधाने मान हलवत म्हटलं.

“अरे म्हणजे मी खरं तेच बोलतो, तर सत्य बोलण्याचं चॅलेंज. माझा अनुभव मी वाचून दाखवतो.” नकळत उरलेले तिघे टेबलवर पुढे सरकले आणि लक्षपूर्वक ऐकू लागले. “ज्या दिवशी खर्या खोट्याचं द्वंद्व व्हायचे प्रसंग झाले त्याच दिवसांच्या नोंदी केल्या आहेत.”

“हो रे, वाच ना आता” शौनकला जराही धीर म्हणून नव्हता.

दिवसाची सुरुवात बेकार झाली. मी आजोबांकडे हॉस्पिटलमधे चाललो होतो. तर वाटेत माझा जुना बडोद्याचा मित्र, शशी भेटला. भेटला कसला, आडवा आला म्हणायला पाहिजे. आम्ही सगळे त्याला टाळतो. एक नम्बरचा बोलबच्चन आहे. सगळ्यांना टोप्या लावत फिरतो. दर वेळी मला भेटला की दोन चार हजारांचा चुना लावतो. काही ना काही कारणं सांगून पैसे घेतो ते कधीच परत देत नाही. शाळेत चांगला होता. स्वभावानेही तसा बरा आहे पण दर वेळी काय थापा मारायच्या आणि पैसे मागायचे. तर हा भेटला आणि मला विचारलं कुठे निघालायस? मी युनिव्हर्सिटी सांगितलं असतं तर सटकता आलं असतं पण सत्यवचन म्हणून मी म्हटलं ‘हॉस्पिटल’. तर हा पण माझ्याबरोबर आला. एक तास बसला. आजोबांशीसुद्धा गप्पा मारल्या. त्याही काही ओळख पाळख नसताना! मग चहा प्यायला खाली गेलो तशी आली गाडी रुळावर. यावेळी तर कहरच. डायरेक्ट पंचवीस हजार! मी म्हटलं ‘अरे कशाला’ तर म्हणे कोणीतरी दूरची मावशी आत्ता फार अडचणीत आहे. माझ्यासाठी मागितले नसते (!!) पण तिच्यासाठी मागतोय. दहा दिवसांत परत देईन. हद्द म्हणजे वर सांगतो, आपल्या बाकी कोणा मित्रांकडे याबद्दल जरापण वाच्यता करू नकोस, फार खाजगी गोष्ट आहे. मी असेही एवढे पैसे दिले नसतेच. पण एरवी मी काहीतरी सबब सांगितली असती. या वेळी मात्र मी सरळ खरं तेच सांगितलं की “शशी, कोणाला बोलू नको काय, तू हे असे पैसे मागत टोप्या लावतोस हे आम्हांला सर्वांना चांगलं माहितीये आता. आज काय हे, उद्या काय ते.... दहा दिवसांत असं कुठलं झाड हलवून पैसे पाडणार आहेस आणि मला परत आणून देणार आहेस! आत्तापर्यंत दोनचार दोनचार करत बारा झाले. कधी दिलेयस परत? मी भिडस्त आहे, मूर्ख नाही. तेव्हा आता पुरे” मी असं म्हटल्यावर तो चिडून “मला वाटलं तू माझा मित्र आहेस. पण हीच किंमत केलीस मैत्रीची. चार दिवसांत तुझे बारा हजार तुझ्या तोंडावर नाही मारले तर नाव बदलेन” असं मलाच सुनावून तरातरा निघून गेला. चार दिवस काय, एक महिना झाला तरी अर्थातच त्याने मला एक पैसाही परत केला नाहीये. मी विचार करत होतो की सबबी न देता खरं बोललो तर मैत्री पूर्ण तुटलीच. मग वाटलं मैत्री खरोखरीच उरली तरी होती का? मी त्याला टाळत होतो, तो मैत्रीच्या आठवणींचा फायदा घेत होता. मैत्री तर केव्हाच संपली होती. आता फक्त दिखावा संपला.

काल एका मध्यस्थांचा फोन आला. एक स्थळ बघण्याचा कार्यक्रम ठरला होता पण त्या मुलीचं आधीच लग्न ठरल्यामुळे तो कॅन्सल झाला. मला तर मनातून आनंदच झाला. आईने माझा चेहरा बघितला आणि म्हणाली “तुला तर बरंच वाटलं असेल? दिसतंय चेहर्यावर” तेव्हा मी तिला म्हटलं “आई, तुमचा आग्रह आहे म्हणून मी होय म्हटलंय पण खरं आहे की मला काही अशी घाई नाहीये लग्नाची.” यानंतर मग मी एक तास आईचं ‘सगळ्या गोष्टी कश्या वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत. ज्यांची ट्रेन सुटली ते कसे स्टेशनवरच मागे राहिले’ अश्या अर्थाचं एक लेक्चर पुन्हा एकदा ऐकलं.

गेला महिनाभर आजोबा गावाहून आमच्याकडे आले आहेत. त्यांची तब्बेत फारच खालावली आहे. गेल्या आठवड्यात त्यांना हॉस्पिटलला अॅडमिट केलं. दोन अॅटॅक आधीच येऊन गेलेत. आता त्यांचं हृदय पंधरा टक्केच काम करतय असं डॉक्टरांनी सांगितलय. मला त्यांना असं बघवत नाही. ते काही नेहमी आमच्या सोबत रहात नव्हते. आईचे आई वडील अगदी बाजूलाच रहात असल्याने आमचं कधी अडत नव्हतं आणि त्यांनाही कदाचित थोडं पाहुण्यासारखं, उपरं वाटत असावं. पण दर वर्षी एक दोन महिने यायचे तेव्हा आमचं चांगलं जमायचं. तर त्या रात्री मी त्यांच्याबरोबर थांबणार होतो. संध्याकाळची मोठ्या डॉक्टरांची फेरी झाली. नंतर त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आणि सांगितलं की त्यांना उद्या घरी घेऊन जा, फार फार तर आठवडा उरलाय त्यांचा. त्यांना घरी शांतीने राहूदेत. मी जड मनाने पुन्हा आजोबांच्या खोलीत आलो. ते माझी वाटच बघत होते. त्यांनी मला जवळ बोलावलं. बाजूला बसायची खूण केली. “काही दुखतंय का?” मी काळजीने विचारलं. तर ते म्हणाले, “दुखण्याचं काही नाही रे. तुला एक सांगायचंय. माझ्या मनावर खूप ओझं आहे. आता सांगितल्याशिवाय गत्यंतरच नाही.” एक दीर्घ श्वास घेऊन ते बोलू लागले. “तुला माहितीये ना मी आधी मुंबईला नोकरी करत होतो. पण तेव्हा तुम्ही बडोद्याला होतात. नंतर तुझी आजी गेली. दोन वर्षानी निवृत्त झाल्यावर मी गावी गेलो. आठवतं का?”

“हो, तुम्ही नेहेमी बागाईतीचं काम बघत होता ना?”

“हो, ही गेल्यावर मला फार एकटेपण आलं, निराश वाटू लागलं होतं. तुम्ही बडोद्याला, अल्का अमेरिकेत. मग मी मन रमवायला म्हणून गावी आंबे, फणस, चिक्कू लावले. त्यांच्या देखभालीत माझा वेळ जाऊ लागला. तुझी चुलत आजी, माझ्या धाकट्या भावाची गजाननाची बायको, शांतला, मला मदत करू लागली. हळू हळू आम्हा दोघांना एकमेकांची सोबत होऊ लागली, सवय होऊ लागली. हिच्या जाण्याने जी पोकळी झाली होती ती शांतलाने भरून काढली. त्याच दरम्यान मला पहिला अॅटॅक आला. तुम्ही नेमके अल्काच्या बाळंतपणासाठी अमेरिकेला गेला होतात. शांतलाने त्यावेळी मला खूप सांभाळलं. गजानन खूप लवकर गेला. तिच्या पोटी मूलबाळही नाही. ती तर माझ्याहूनही एकटी होती. आयुष्याच्या संध्याकाळी आम्ही दोघांनी एकमेकांमधे सोबत शोधली. तिची काहीच अपेक्षा नव्हती. पण मला असं बिननावाचं नातं नको होतं. देवघरासमोर तिला उभं करून मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. काहीही सोपस्कार नाहीत, कागदपत्र नाहीत पण मी तिच्याशी लग्न केलं. मला पश्चात्ताप नाहीये त्याचा. गेली अठरा वर्षं आम्ही एकमेकांना साथ दिली. तारुण्यात जशी साथ हवी असते तशीच या म्हातारपणातसुद्धा अश्या सोबत्याची गरज असतेच. कुणालातरी आपण हवे आहोत, आपली कमी त्यांना जाणवेल ही जाणीव मनुष्याला रोज जागं करते, आशा देते. शांतलाने मला ती जगण्याची इच्छा दिली. आधी वाटलं की तुझ्या बाबाला सांगावं पण कोण काय म्हणेल, अल्काच्या सासरचे, तुझ्या आजोळचे सगळे काय म्हणतील असे विचार करून हिम्मतच झाली नाही. तुमचे कोणाचे गावाशी तसे काही संबध राहिलेच नव्हते. आणि शांतलालासुद्धा फार संकोच वाटत होता. मग सांगणं टाळलं ते कायमचंच. ती काही प्रॉपर्टी वगैरे मागणार नाही. पण मला तिची सोय करून जायला हवं. माझं चेकबुक घेऊन येशील उद्या? अजून एक होतं, माझे फार दिवस राहिले नाहीयेत हे कळतंय मला. जाण्याआधी तिला शेवटचं भेटायची इच्छा आहे. तिचीसुद्धा असणारच. तिची मुंबईला यायची सोय करशील? पण तुझ्या बाबाच्या नकळत हे  कसं होणार? ती मुंबईत कुठे रहाणार?”

त्यांचं ते बोलणं ऐकून मला एवढा धक्का बसला होता की मी काही न बोलता तसाच आ वासून राहिलो होतो. “दिगंत.....” आजोबांनी मला पुन्हा हाक मारली.

“म्हणजे काकीआजी तुमची......” मी अडखळत म्हटलं.

“हो.... बायको आहे ती माझी” ते बोलताना माझ्या नजरेला नजरसुद्धा देत नव्हते. शेवटच्या दिवसांत आजोबा मला असं काही सांगतील असं मला कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. शेवटी मी त्या धक्क्यातून सावरलो. त्यांचा तो हडकुळा झालेला हात मी हातात घेतला आणि म्हटलं, “आजोबा हे सगळं आधी का नाही सांगितलत. तुम्ही आम्हांला हवेच आहात. अगदी काकीआजीसकट.”

सकाळी घरी परत आलो तेव्हाही माझ्या मनात तेच विचार होते. आजोबांनी बाबांना काही न सांगायला म्हटलं होतं. सहाजिकच त्यांच्या मनात hesitation असणार. पण मी बाबांना पूर्ण ओळखतो. मुन्गीलासुद्धा न दुखवणार्यांपैकी आहेत ते. आजोबांच्या छातीवरचं हे मणभराचं ओझं हलकं व्ह्यायला हवं असं मला वाटलं. मी बाबांना सांगायचं ठरवलं. आणि खरोखरीच हे चॅलेंज आहे म्हणून नाही तर because I felt that was the right thing to do!

नंतर बाबा आणि मी दोघेही आजोबांना घरी घेऊन जायला हॉस्पिटलमधे आलो. बाबा आजोबांच्या बाजूला बसले. आजोबांचा हात त्यांनी हातात घेतला आणि म्हणाले, “बाबा हीच परीक्षा केलीत माझी? आधी सांगितलं असतंत तर केव्हाच काकीला इथे बोलावून घेतलं असतं. गाडी पाठवलीये तिला घेऊन यायला. मीच गेलो असतो पण तुम्हाला असं सोडून कसा जाऊ! हा घ्या चेक, तुमच्या एकटेपणात तिने तुम्हांला सोबत दिलीये. तिची सगळी काळजी मी घेईन. अगदी नक्की घेईन.” दुसर्या दिवशी काकीआजी आली. त्यानंतर एका आठवड्याने आजोबांनी कायमचे डोळे मिटले. पण ते जाताना खूप समाधानाने गेले. त्यांना तसं समाधानी पाहून माझे बाबा, ते मुलगा आणि मी बाबा असल्यासारखे माझ्या गळ्यात पडून रडत होते. रूमीने किती बरोबर सांगितलय ‘That which is false troubles the heart, but the truth brings joyous tranquillity’*”

दिगन्तचं वाचून झालं. क्षणभर कोणालाच काही सुचेना. सगळे गप्प! शेवटी अवनी उद्गारली, “so proud of you Digant!!” बाजूला बसलेल्या मीराने काही न बोलता हलकेच त्याच्या हातावर थोपटलं. शौनकनेही त्याच्या पाठीवर थाप दिली.

“तर हा झाला माझा अनुभव,” दिगंत म्हणाला, “who’s next?”

क्रमशः

डॉ. माधुरी ठाकुर

https://drmadhurithakur.blogspot.co.uk/




* रूमी नावाच्या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याचा quote – मनाला खरी शांतता हे सत्यानेच मिळते.  

                                                                           


17 comments:

  1. माधुरी खरोखरच खूपच छान लिहीली आहे गोष्ट। आता पुढच्या भागाची वाट पाहायची..

    ReplyDelete
  2. वा छान माधुरी. पुढच्या भागाची अधिरतेने वाट बघते आहे

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you :) आज टाकलाय पुढचा भाग

      Delete
  3. वा, सुंदर , एका वास्तवाची सुंदर मांडणी
    छान लिहिली आहेस गोष्ट

    ReplyDelete
  4. वा: 'चॅलेंज'... एक सुरेख कल्पनाविस्तार....
    उत्कंठावर्धक....

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्याला कथा आवडली हे वाचून आनंद झाला. आवर्जून प्रतिक्रिया देण्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

      Delete
  5. मस्त गोष्ट ताऊ....

    ReplyDelete
  6. Wah! Madhuri Kiti chaan fulavali aahes gosht. Sagale Mazya dolya samor ghadatay asach vatale vachatana. Veg vegalya natya n madhale barakave pan mast mandate aahes. Farach chhaan. Aata next part chi vaat baghate... Eka navin goshtichi.

    ReplyDelete
    Replies
    1. स्वाती गोष्ट आवडते आहे, चांगली फुलते आहे हे वाचून खरंच बरं वाटलं. आवर्जून प्रतिक्रिया देण्याबद्दल thank you so much

      Delete
  7. आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

    ReplyDelete