Sunday, 29 January 2017
नाही म्हणजे नाही (लेख)
"आम्हाला तिची खूप काळजी वाटते" नुकतीच युनिव्हर्सिटी जॉईन केलेल्या एका मुलीचे आईवडील मला कळवळून सांगत होते. मुलीला मेडिकल स्कूलला अॅडमिशन मिळाली होती. मुलगी पहिल्यांदीच घरापासून, फॅमिलीपासून दूर होस्टेलला रहायला गेली होती. नवीन जागा, नवीन मित्रमैत्रिणी, नवा अभ्यास आणि अगदी नव्यानेच मिळालेलं पूर्ण स्वातंत्र्य..... या सार्या गोंधळात आईवडलांशी बोलायला तिला पुरेसा वेळ मिळत नव्हता त्यामुळे सहाजिकच आईवडिलांचा जीव काळजीने अर्धा होत होता. मम्मी मम्मी म्हणून सध्या मला भंडावून सोडणारी माझी पिल्लंसुद्धा अशीच माझ्या घरट्यातून एक दिवस भुर्रकन उडून जाणार आहेत या विचाराने क्षणभर माझं मन सुन्न झालं.
Thursday, 26 January 2017
जराही घाबरू नकोस (अनुभव)
हा लेख किंवा कथा नाहीच, हा माझा अनुभव आहे जो इथे share करतेय. नोव्हेंबर २०१६ मध्ये आमच्यावर एक संकटच आलं होतं , साधारण अडीच महिन्यांपूर्वी, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात माझ्या छातीत एक गाठ आली. मी स्वतः डॉक्टर आहे पण स्वतःची गाठ हाताला लागल्यावर माझ्या पोटात गोळाच आला. मी राकेश- माझ्या मिस्टरांना म्हटलं की मला गाठ लागतेय. लगेच आम्ही डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. योगायोग म्हणजे ९ तारखेला माझा वाढदिवस असतो, त्याच दिवसाची अपॉइंटमेंट मिळाली.
माझे आईवडील आणि भाऊ मुंबईला असतात. माझ्या गाठीचं कळल्यावर आठवड्याच्या आत माझे बाबा भारतातून अॅबरडीनला आमच्याकडे आले. ते आले असल्यामुळे मुलांना त्यांच्याकडे ठेऊन मी आणि राकेश हॉस्पिटलला गेलो. संध्याकाळी ६:३० ला ब्रेस्ट सर्जनने मला तपासलं . टेस्ट्स होईपर्यंत काहीच सांगता येणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मग त्याच हॉस्पिटलमध्ये एक्सरे आणि मॅमोग्राफी झाली. नंतर बायाॅप्सी आणि सायटॉलॉजी, बायाॅप्सी म्हणजे गाठीच्या आत बारीक सुई घालून सॅम्पल घेतात आणि सायटॉलॉजी म्हणजे सॅम्पल च्या सेल्समध्ये कॅन्सरच्या प्रकारचे बदल झाल्येत का ते बघतात. बायाॅप्सी आणि सायटॉलॉजी करताना रूममध्ये एक रेडिआॅलॉजिस्ट, एक सायटॉलॉजिस्ट, एक नर्स, राकेश आणि मी इतके जण होतो. त्या तिघी जरी मला धीर देत असल्या तरी त्यांचं आपापसातलं बोलणं ऐकून मला टेन्शन येत होतं . त्यात इथे UK मध्ये पेशंटपासून काहीही न लपवण्याची पॉलिसी असल्यामुळे रेडिऑलॉजिस्टने मला समोरची काॅम्पुटर स्क्रीन दाखवून सांगितलं की तुझ्या स्किनच्या खालच्या लेयर्समध्ये हे चेंजेस झालेले दिसून येत आहेत. हे नॉर्मल नाहीये. माझ्या पोटात खड्डा पडला. डोळ्यात पाणी आलं . डोळयांसमोर ७ आणि ४ वर्षांची माझी दोन्ही मुलं आली. राकेशचं कसं होईल, इथे परदेशात आम्ही दोघे दोन मुलांना सांभाळताना आमची वाट लागते, मला काही झालं तर हा एकटा कसं करेल..... माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं . राकेश माझ्यासोबत हात धरून उभा होता. त्याला कुठून एवढा धीर आला होता कोण जाणे !!! तो वाकून माझ्या कानात म्हणाला "बापूना हाक मार, चिंता नको, चिंतन कर" तो स्वतःसुद्धा अखंड जप करत होता. त्याच्या त्या एका वाक्याने मला धीर आला. दुसया हाताने मी माझ्या गळ्यातलं बापूंचं लॉकेट घट्ट पकडलं आणि मनात मी जोरजोरात बापूंना हाका मारू लागले. आणि तुम्ही विश्वास ठेवा आगर नका ठेऊ पण मला असं वाटू लागलं की बापू तिथेच उभे आहेत आणि मला म्हणतायत "कशाला घाबरतेयस , मी इथे उभा आहे". दोन अडीच तास सगळ्या तपासण्या होऊन आम्ही रात्री ८:३० ला परत ब्रेस्ट सर्जनच्या क्लीनिकमध्ये गेलो. आम्ही खुर्चीवर बसायच्याही आत डॉक्टरने मला म्हटलं "माधुरी I don't like the feel of it. या टेस्ट्समध्ये दिसत नाहीये पण lobular कॅन्सर खूपदा mamo किंवा सोनोग्राफीमध्ये दिसत नाही. एक आठवड्याने सायटॉलॉजीचा रिझल्ट येईल तेव्हाच काय ते नक्की कळेल." म्हणजे एक आठवडा असं लटकलेल्या अवस्थेत राहायचं !! पण दुसरा काहीच इलाज नव्हता.
घरी परत येताना मी राकेशला म्हटलं ,"मी बाबाना सांगते की आईला आत्ताच्या आत्ता बोलावून घ्या. मला आत्ता आईची खूप गरज आहे". घरी पोहोचल्यावर एकमेकांना उसना दिलासा देत सगळे झोपलो. इतक्या टेन्शनमुळे राकेशने स्पेशल ऑर्डर देऊन बनवून घेतलेला केकसुद्धा आम्ही कापला नाही . तसेच झोपलो .
मुलांचे हाल बघून मानवी आईवडीलसुद्धा कळवळतात. बापू , नंदाई तर साक्षात परमेश्वर. ते आपल्या लेकराला किती वेळ दुःखात राहू देतील. रात्री मी झोपले आणि स्वप्नात बापू आणि नंदाई !! स्वप्नातही हे गाठीचं संकट मी विसरले नव्हते. मी नेहमी बापू बापू करत असते. पण त्या दिवशी स्वप्नात मात्र मी जाऊन नंदाईच्या पायांना घट्ट मिठी मारली. मी जागेपणी जे म्हटलं होतं की "मला आई इथे हवी आहे" त्यामुळेच असावं असं मला वाटतं . तर मी आईचे पाय घट्ट धरून विचारलं "आई मी घाबरू नको ना?" आणि नंदाईने अगदी firmly सांगितलं "जराही घाबरू नकोस"
सकाळी उठल्यावर मला इतकं बरं वाटलं ..... आईने सांगितलंय ना घाबरू नको, मग ठीक आहे. खरंच आम्ही सगळे खूप रिलॅक्स झालो. जगातली कोणती गोष्ट बापू, आई आणि दादा यांच्या शब्दाबाहेर जाणार आहे! As expected एका आठवड्याने रिपोर्ट व्यवस्थित आला. कँसर दिसत नव्हता. डॉक्टर मात्र अजूनही convinced नव्हते. अजून MRI आणि मोठी बायाॅप्सी करायचं ठरलं. इथे मुद्दाम हे सांगायला हवं की हे सगळं NHS मध्ये म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटल मध्ये, म्हणजे डॉक्टर चा वेस्टेड इंटरेस्ट असण्याची शक्यता नाही. तर MRI केला. अजून मोठी बायोप्सी केली. या सगळ्या इन्वेस्टीगेशन्स होऊन रिपोर्ट्स यायला दोन महिने लागले. कॅन्सर नाहीये, फक्त इन्फेकशन आहे, (जे अँटिबायोटिक्सनी कमी होतंय) आता १३ जानेवारीला फायनल रिपोर्ट आला. पण नंदाईने टेस्टच्या रात्रीच रिपोर्ट दिला होता. त्यामुळेच हे सगळे दिवस आम्ही नीट काढू शकलो. त्याबद्दल अंबज्ञ (कृतज्ञ) राहू तेवढं कमीच !!
या साऱ्या गोष्टीत मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की या कठीण काळात राकेश solid as a rock सतत माझ्याबरोबर होता, बाबा भारतातून तडक आले, आई आणि नणंद गुरुक्षेत्रमला चंडिकाहवन करत होत्या, रोज माझ्याशी बोलून मला धीर देत होत्या, माझे दीर जाऊ जे डॉक्टर्स आहेत ते माझ्या डॉक्टरशी वेळोवेळी बोलत होते. रात्री २-३ ला सुद्धा माझा रिपोर्ट आल्या आल्या माझ्याशी बोलत होते, धाकटी नणंद गुरुचरित्राचा १४वा अध्याय वाचत होती. सुमेधावीरा आणि इतर मित्रमंडळी फ़ोन करून चौकशी करत होती. ह्या सगळ्या लोकांना आपापली बिझी लाईफ आहे पण आमच्या संकटात हे सगळे खंबीरपणे आमच्याबरोबर उभे राहिले. यात निर्विवादपणे या सगळ्यांचा चांगुलपणा, संस्कार आहेतच पण त्याचबरोबर मला श्रीमद्पुरुषार्थामधली बापूंची वाक्यं आठवतात, "आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपण अनेकांचं लाडकं व्हावं. या संपूर्ण विश्वाचा चालक परमेश्वर आहे. तो माझ्या आवडीचा झाला तर मी त्याच्या आवडीचा होईन आणि मग एकदा का माझ्या मनात परमेश्वराचं प्रेम आणि त्याची आवड स्थिरावली की मग त्याच्या शक्तीमुळे अनेक जण माझ्यावर प्रेम करू लागतात." मी हे खरंच अनुभवलं. काय होऊ शकलं असतं आणि बापूनी कसं अलगद बाहेर काढलं हा विचार केला की माझं मन भरून येतं. "तुमचा मी भार वाहीन सर्वथा , नव्हे हे अन्यथा वचन माझे " बापू सर्वार्थाने त्यांच्या वचनाला जागले. त्यांनी रोगापासून तर मला वाचवलच, पण diagnosis च्या स्ट्रेसपासून सुद्धा त्यांनी आमच्या कुटुंबाला वाचवलं. मनःसामर्थ्यदाता बापूराया !
बापू सगळं भरभरून देतात आणि तरीही मनुष्यस्वभावानुसार मी मागतच रहाते पण आता इतर सगळं मागताना मी बापूंच्या आरतीत म्हटल्याप्रमाणे मागते
"हरो त्रिताप हमारे , दो सुखकी छाया
तुझेही तुझसे मांगने तेरी शरण आया
ॐ जय अनिरुद्ध प्रभो"
हरिः ॐ 🙏 श्रीराम अंबज्ञ
Declutter (लेख)
Declutter
नवीन वर्षाचा पहिला महिना जवळजवळ संपत आला. नवीन वर्षाचे नवे संकल्प या पहिल्या महिन्याच्या शेवटापर्यंत हळूहळू विरघळत जातात.
काही दिवसांपूर्वी मीसुद्धा विचार करत होते की या वर्षाचं काय resolution करावं !! रोज ट्रेडमिलवर पळेन, meditate करेन.... काही नक्की होत नव्हतं आणि मग एकदम सुचलं किंवा खूप दिवसांपासून जे मनात होतं ते अचानक उसळून वर आलं की येस्स या वर्षी मी declutter करेन! लगेच डोळ्यांसमोर भरलेली कपाटं , अस्ताव्यस्त माळा, गॅरेज अडगळीचा कोपरा आला ना? पण मी म्हणतेय ते clutter घरातलं नाहीच. ते आहे माझ्या मनातलं .
मला जमेल का? मी करू शकेन का ? खरंच करायची काही गरज आहे का? माझ्या करण्याची कोणी दखल तरी घेणार आहे का ? त्याचा काही उपयोग तरी आहे का? आज नको, उद्यापासून.... हे आणि असले सगळे जे विचार माझ्या मनात येतात ना हेच माझं clutter !
मी आजूबाजूला बघते तेव्हा सगळ्यांना घाई असते. सगळे पळत असतात. सगळे अशा अजब रेसमध्ये पळत असतात ज्याची कुठे फिनिशिंग लाईनच नसते. तर या वर्षी मी ठरवलंय की at least या वर्षी आणि जमलं तर फॉरेव्हर या जगाच्या रेसकडे पाठ फिरवून माझ्या मनाला आवडेल त्या दिशेने जायचं. माझी दिशाच वेगळी असल्यामुळे स्टॅन्डर्ड रेसमध्ये धावल्यावर टप्याटप्यांवर जे incentive मिळतात जसं पैसा, प्रतिष्ठा etc ते कदाचित नाही मिळणार पण स्वतःला शोधल्याचा आनंद तर मिळेल. माझ्या मनाचं जर मीच ऐकत नसेन, तर दुसरं कोणी ऐकेल अशी अपेक्षा तरी कशी करावी!
"म्हणजे काय मनमानी करायची ठरवलीये वाटतं!" असा खोचक प्रश्न नाही ना आला तुमच्या मनात?
तर तसं नव्हे. ज्या नात्यांच्या परीघात मी आहे, ती कर्म करणं तर माझं कर्तव्यच आहे , ती करायलाच हवीत पण त्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आपण आपण उगाचच वाढवतो त्यात आपली खूप एनर्जी वाया जातेय असं वाटतंय. जसं कोणत्याही घड्याळात बघितलं तरी वेळ समजते तरीही ब्रँडेड घड्याळ हवंसं वाटतं , मग त्यासाठी जास्त पैसा कमवावा लागतो, वर ते घड्याळ लोकांनी नोटीस करावं , कॉम्पलिमेन्ट्स द्यावी असं वाटायला लागतं . ह्या ज्या सगळ्या वाढीव गरजा आहेत ना त्या सुद्धा clutter च !!
So to summarise, the plan is to find my true self....स्वतःचा शोध घेणार आहे, स्वतःहाची नीट ओळख करून घेणार आहे आणि स्वतःमध्ये उचित असे बदल घडवून आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे. मनात काही ढोबळ आराखडा आहे पण तो पुढच्या वेळेसाठी ठेऊया . माझ्याकडे तर हे एकच आयुष्य आहे. तुमचा काय प्लॅन?
Wednesday, 25 January 2017
👣 माझ्या पाऊलखुणा 👣 (कविता)
👣 माझ्या पाऊलखुणा 👣
इथवर कधी आले कळलंच नाही
मागे वळून पाहिलं तर माझ्या पाऊलखुणा
रस्त्यावर पसरल्या होत्या
काही स्पष्ट , काही धूसर ,
मातीवर विखुरल्या होत्या
उद्या यांचा माग घेत कोणी इथे येईल
मी कशी होते हे डोकावून पाहील
सगेसोयरे, गणगोत आणि असेच कुणीही
आणि अवचित कधीतरी तूसुद्धा येशील
सहजच घेतल्यासारखी माझी वही हातात घेशील
पण खरं तर माझ्या वहीत तुझं नाव शोधशील
ओळींवरून जेव्हा बोटं फिरवशील
तेव्हा ओळींच्या मध्येसुद्धा बघशील ना
ओळींच्या मध्ये दडलेलं
माझ्या मनाच्या आरशामागे लपलेलं तुझं नाव
तुला तेव्हा तरी दिसेल ना
Subscribe to:
Posts (Atom)