नाही म्हणजे नाही (लेख)
"आम्हाला तिची खूप काळजी वाटते" नुकतीच युनिव्हर्सिटी जॉईन केलेल्या एका मुलीचे आईवडील मला कळवळून सांगत होते. मुलीला मेडिकल स्कूलला अॅडमिशन मिळाली होती. मुलगी पहिल्यांदीच घरापासून, फॅमिलीपासून दूर होस्टेलला रहायला गेली होती. नवीन जागा, नवीन मित्रमैत्रिणी, नवा अभ्यास आणि अगदी नव्यानेच मिळालेलं पूर्ण स्वातंत्र्य..... या सार्या गोंधळात आईवडलांशी बोलायला तिला पुरेसा वेळ मिळत नव्हता त्यामुळे सहाजिकच आईवडिलांचा जीव काळजीने अर्धा होत होता. मम्मी मम्मी म्हणून सध्या मला भंडावून सोडणारी माझी पिल्लंसुद्धा अशीच माझ्या घरट्यातून एक दिवस भुर्रकन उडून जाणार आहेत या विचाराने क्षणभर माझं मन सुन्न झालं.
मग मला जाणवलं की या पालकांना भीती होती की आपण आत्तापर्यंत फुलासारखी जपलेली आपली लेक या नव्या वातावरणात स्वतःला कशी सांभाळणार आहे! नव्यानेच ओळख झालेली मित्रमंडळी, त्यात UK सारख्या देशांत असलेली मोकळीक, ड्रिंक्स, ड्रग्स आणि नाईट आऊट्सचं कल्चर, आणि तरुणाईच्या अखंड चालू असलेल्या पार्ट्या आणि सोशलायझेशन!! स्वतःची लक्ष्मणरेषा कुठे आखायची हे आपल्या पिल्लाला कळेल का? अयोग्य गोष्टीना ठामपणे नाही म्हणायला तिला जमेल का? मित्रमैत्रिणींमध्ये फिट इन होण्यासाठी अनिच्छेने का होईना पण ती चुकीच्या गोष्टींमध्ये खेचली तर जाणार नाही ना ......
माझ्या मनात विचार आला या एवढ्याश्या मुलीकडून आम्ही अपेक्षा करतोय की पिअर प्रेशरची पर्वा ना करता तिने assertively सगळ्या चुकीच्या किंवा तिला न पटणाऱ्या गोष्टीना 'नाही' म्हणावं पण अजूनही आपल्याला ते कितीसं जमतंय?
कित्येक वेळा केवळ 'नाही' म्हणून लोकांची मनं दुखावता येत नाहीत म्हणून आमंत्रणं स्वीकारली जातात. अश्या जबरदस्तीच्या पार्टिज अटेंड केल्याने मनाला फ्रेश वाटण्याऐवजी उलट अजून थकवा येतो.
कामाच्या ठिकाणीसुद्धा वरिष्ठ किंवा सहकार्यांना 'नाही' न म्हणता आल्यामुळे कधी कधी उगाचच नसती कामं गळ्यात पडतात. मग ते न झेपणारं काम करताना दमछाक होते. एखाद वेळी कामाचा दर्जा घसरतो. शिवाय स्ट्रेस येतो, फॅमिली लाईफ अफेक्ट होतं ते वेगळच!
मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी बरेच विकृत पुरुष बायकांना धक्के मारत, हात लावत असतात. किती वेळा अशा पुरुषांना "नाही, स्टॉप" म्हणून खडसावलं जातं ?
Assertive राहणं , जे नाही पटत त्याला 'नाही' म्हणणं आपल्याला एवढं कठीण का जातं ? कमी पडतं ते आपलं मानसिक बळ . आपल्याला इतरांमध्ये फिट व्हायचं असतं. 'when in Rome, do as the Romans do' हाच आपला फंडा असतो. जळात राहून आपल्याला माशांशी वैर नको असतं. "लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, मी सगळ्यांचं लाडकं असावं " ही जी दुर्दम्य इच्छा प्रत्येक माणसाच्या मनात असते ना तीच आपल्याला कुठे "नाही" म्हणू देत नाही.
स्वतःतील एखादी त्रुटी घालवण्यासाठी स्वतःला प्रयत्नपूर्वक बदलणं ही चांगली गोष्ट आहे . परंतु केवळ 'फिट इन' साठी, सगळ्यांचं लाडकं होण्यासाठी, स्वतःच्या इच्छेविरुद्ध किंवा चुकीच्या गोष्टीमध्ये वाहात जाणं म्हणजे स्वतःच स्वतःला disrespect करणं , अपमान करणं आहे.
मग उपाय काय? उपाय हाच की आपण हे समजून घेणं किंवा मुलांना समजावणं की जेव्हा आपण इतरांना इंप्रेस करायला काही करत असतो तेव्हा तेवढ्यापुरती मंडळी इंप्रेस होतातही. पण ही इम्प्रेशनची पुंजी तुटपुंजी असते. आयुष्यभर पुरत नाही. उलट त्यात आपला बहुमूल्य वेळ आणि एनर्जी वाया जाते. त्याऐवजी जसे आपण आहोत, अगदी 'true self ' तसंच रहावं आणि तसच जगाला दाखवावं. आपण अगदी जसे आहोत तस्सेच्या तस्सेसुद्धा बर्याच लोकांना आवडतो आणि मग ते आयुष्यभर पुरतं. तेव्हा फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, लोकांना प्लीज करण्याचा आटापिटा थांबवा आणि मोकळा श्वास घ्या, खूप हलकं वाटेल. पटतंय का? "नाही" नका म्हणू 😊
Very true!!
ReplyDeletehello madhuri i am waiting for your next story pls right..........
ReplyDelete