Wednesday, 29 March 2017

अंजलीची गोष्ट - आनंदयात्री

 

"हाय" त्या ओळखीच्या आवाजाने चमकून तिने दरवाज्याकडे पाहिलं. अपूर्वाला पाहून ती चकितच झाली. "अपूर्वा, तू इथे? सगळं ठीक आहे ना?" तिने काळजीने विचारलं.
"खरं म्हणजे ठीक नाहीये. ठीक असताना कोणी डॉक्टरकडे कशाला येईल?" अपूर्वाने हसत हसत म्हटलं.
"ते ही खरंच. अगं पण घरी यायचस, बोल काय म्हणतेस?" अंजलीने विचारलं. 

"आमची न्यूज तुझ्या कानावर आली की नाही?"क्षणभर विचार करून अंजली म्हणाली, "हो, आई म्हणाली की तुझं आणि तुषारचं पटत नाहीये म्हणून" 

"हो त्याचबद्दल बोलायचं होतं" अपूर्वाने समोरचा पाण्याचा ग्लास उचलला, एक घोट पाणी पिऊन मग तिने सांगायला सुरुवात केली, "आमच्या लग्नाला आता नऊ वर्ष झाली. सुरुवातीपासूनच आमचं पटत नव्हतं, पण आधी आई वडलांना काय वाटेल आणि मग मुलांचं कसं होईल या कात्रीत सापडून निर्णय घेता येत नव्हता. पण शेवटी असं वाटतं की आईवडील, मुलं वगैरे सगळं ठीक आहे पण शेवटी माझं स्वतःचं सुद्धा आयुष्य आहेच ना? मग मी किती कॉम्प्रमाइज करू आणि का? ज्या माणसावर माझं प्रेमचं नाही त्याच्याशी हा खोटा खोटा संसार किती करायचा....."
"प्रेमचं नाही म्हणजे?" अंजलीच्या तोंडून आपसूकच प्रश्न आला. 

"आमचं लग्न अरेन्ज मॅरेज होतं. मी मुंबईची, तुझी मावशी , तुषार सगळे सुरतचे. पण खूप मोठा बिझनेस, चागलं स्थळ म्हणून माझ्या आईबाबांनी घाई केली. दोनचार भेटींत स्वभाव काय कळतो! मी इथे मुंबईत मित्रमैत्रिणींच्या ग्रूपमधे वाढलेय. तुषार नुसता एकलकोंडा! पैसे आहेत पण कसल्या आवडी निवडीच नाहीत. शनिवार रविवार जरा मजा करावी , बाहेर पिक्चरला जावं तर तेव्हा तर शोरूम आणखीनच बिझी असतं. हा घरीच नसतो. फिरायला काय जाणार! शिवाय ही ..... एवढी मोठी फॅमिली. प्रत्येकाला वेगवेगळा फ्लॅट आहे पण जेवण सगळ्यांचं एकत्र. त्यामुळे सासू सासऱयांचा सतत वाॅच. बाहेर जाताना सुद्धा सांगून जावं लागतं का तर म्हणे त्याप्रमाणे जेवण करायला."

"तूसुद्धा जॉब करतेस ना?" अंजलीने विचारलं.
"हो, नशीब! आठवडाभर सतत सकाळ संध्याकाळ मला यांना बघावं नाही लागत. म्हणून मी अजून वेडी नाही झालेय"
"पण मग मुलं?"
"मुलं तर काय दिवसभर आजी आजोबांकडे असतात. झोपण्यापुरती येतात. आमची मुलं, दीराची मुलं, सगळी तिकडेच असतात. त्यामुळे त्यांची मजा चालते" 

"आणि एकत्र जेवण म्हणजे तुम्ही दोघी सुना आळीपाळीने करता का?"
"नाही ग! सगळा स्वयंपाक सासू सासर्यांच्या कॉमन किचनमधे होतो. स्वयंपाकाला बायका आहेत. पण मला वाटतं कशाला रोज सगळ्यांनी खाली एकत्र जाऊन जेवायला पाहिजे? जेवण म्हटलं की एकत्र, हॉलिडे म्हटला की एकत्र! गेल्या नऊ वर्षांत नऊ वेळीसुद्धा आम्ही दोघेच असे बाहेर गेलो नाहीये. जिथे जातो तिथे अक्ख्या खानदानाबरोबर जावं लागतं."

"पण तुषारचा स्वभाव शांत आहे ना गं ?" तुषार जरी अन्जलीचा मावसभाऊ असला तरी अंजलीची मावशी सुरतला राहात असल्याने त्यांच्या गाठीभेटी फार कमी होत्या.
"असल्या शांतपणाचा काय उपयोग!" अपूर्वा वैतागून सांगू लागली, "याने ठणकावून सांगायला काय हरकत आहे की आम्हाला सगळं एकत्र नाही आवडत म्हणून. मी सांगायला म्हटलं तर मलाच म्हणतो की मी का सांगू, मला तर एकत्र आवडतं!"

"सासरचे लोक सासुरवास करतात का तुला?" अंजलीने विचारलं. "सासुरवास असा नाही पण त्यांच्या सतत जवळ असण्याने मला घुसमटायला होतं"

"पण तुझी मुलंसुद्धा सांभाळतात ना ते?"
"हो ते एक आहे. खरं सांगायचं तर त्यांचा असा विशेष त्रास नाहीये. प्रॉब्लेम तुषारचाच आहे. या सगळ्या लोकांच्या गराड्यात आमच्या दोघान्मधलं प्रेम कधी उमललच नाही. प्रेमात जसं क्लिक होतं ना तसं कधी झालंच नाही आमच्यात. लग्ना आधी मी किती रोमँटिक होते. काय काय कल्पना होत्या माझ्या ! पण प्रत्यक्षात फक्त या मोठ्ठ्या फॅमिलीशी आणि बँक बॅलन्स शी लग्न लागल्यासारखं वाटतं मला. वरवर पैसा छान दिसतो. पण आत माझ्या मनाला समाधान जराही नाही. गेली नऊ वर्ष आम्ही असेच ढकलतोय. संसार टिकायला मुळात प्रेम असायला नको का?"

"आणि तुला तुषारबद्दल प्रेम वाटतच नाही?"
"सॉरी टू से पण मला वाटतच नाही. त्याच्या प्रत्येक गोष्टीची चीड येते मला. सारखं सारखं घरच्यांचच ऐकणं, दिवसरात्र बिझनेस, ना हौसमौज, ना आवडीनिवडी..... अगदी विरुद्ध आहोत आम्ही एकमेकांच्या"

"खरंतर तुला काय सांगावं ते मला कळतच नाहीये. हे असं आहे ह्याची कल्पना तुला लग्नाआधीच होती. लग्नाच्या वेळी मोठा बिझनेस, मोठं घर हे जे तुषारचे प्लस पॉईंट्स होते तेच आता निगेटिव्ह पॉईंट्स वाटतायत. आणि प्रेम वाटत नाही हे तर माझ्या समजण्या पलीकडे आहे. लग्नाला नऊ वर्ष झाली. दोन मुलं आहेत. प्रेम नाही हे कळायला इतका वेळ
लागला? त्या दोन मुलांचं आयुष्य आता खराब होणार ते? तुझी बाजू मला समजते पण पूर्ण पटत नाही. सासू सासर्यांच्या सतत सोबतीचा तुला त्रास वाटतो, कबूल आहे पण त्यांच्याच कडे मुलं ठेऊन तू नोकरी करतेस हेसुद्धा तेवढंच खरंय. आणि तुषारचीही काहीतरी बाजू असेलच. कदाचित त्याचं चुकतही असेल पण त्याच्याकडून काही न ऐकता मी जर या गोष्टीबद्दल माझं मत बनवलं तर ते चुकीचं असण्याची शक्यताच अधिक नाही का!"
अपूर्वाला अंजलीचं बोलणं जराही आवडलं नाही. तिची नाराजी तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. "तू बोल त्याच्याशी. माझी काही हरकत नाहीये" तिने म्हटलं.
"पण तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे? नेमकं काय ठरवून तू माझ्याशी बोलायला आली होतीस?" अंजलीने रोखठोक प्रश्न केला.

क्षणभर घुटमळून अपूर्वाने विचारलं, "तू त्याला मुंबईला बोलावून घेशील का? मी गेला महिनाभर मुंबईला आलेय आईबाबांकडे. पण तो काही येत नाही. आला तर आम्ही मॅरेज काउन्सेलिंग किंवा डिवोर्स काहीतरी प्रोसिजर सुरु करू शकतो."

"तू एक महिना मुंबईत आहेस तर मग मुलं कुठे आहेत?" अंजलीने जरा आश्चर्याने विचारलं.
"मुलं तिकडेच. त्यांना सुरतलाच आवडतं" अपूर्वाने नाईलाजाने उत्तर दिलं, "मी मुंबईला हेड ऑफिसला ट्रान्स्फर घेतेय. ती एकदा झाली की मुलांना इकडेच बोलवून घेईन"
"मी फोन करते तुषारला. बोलते मी त्याच्याशी." अंजलीने अपूर्वाला म्हटलं. 

अपूर्वा निघाली. पुढे चार पाच पेशंट्स येऊन गेले. दुपारी मधल्या वेळात अंजली घरी आली. पण तिच्या डोक्यातून हे जात नव्हतं. सगळ्या दुःखाची सुरुवात अपेक्षाभंगात आहे ना, ती विचार करत होती. प्रेमाबद्दल, जोडीदाराबद्दल प्रत्येकाने मनात एक चित्र रंगवलेलं असतं. कधी आयुष्यात येणारी व्यक्ती तशी असते तर कधी अपेक्षेच्या अगदी विपरीत. मग अश्या वेळी अपेक्षाभंगाचं दुःख पचवावं, तडजोड करावी की सगळं सोडून पुन्हा नवी सुरुवात.... आणि पुन्हा तेच झालं तर.... पर्फेक्शनच्या शोधात किती धावणार? आणि अशी परफेक्ट व्यक्ती सापडलीही तरी जर त्यांचासुद्धा असाच पर्फेक्शनचा शोध चालला असेल तर आपण त्यात फिट होणार का? शिवाय आपल्या निर्णयांमुळे आणखी लहानग्यानचं आयुष्य बदलणार असेल तर किती काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवा. केवढी ही गुंतागुंत नात्यांची....

"अंजू , सुशीलाच्या हाताला बरीच सूज आलीये. बघतेस का तिला जरा?" आईच्या प्रश्नाने अंजलीची तंद्री भंगली. "हो चल ना" म्हणत ती उठली आणि स्वयंपाकघरात गेली. सुशीला अंजलीच्या घरी धुणीभांडी करायला येत असे. "बघू" म्हणत अंजलीने सुशीलाचा हात तपासला. चाफेकळीला बरीच सूज आली होती. "बराच सुजलाय की हात! कसं काय लागलं ?" अंजलीने विचारलं. "काल रातच्याला शिडीवरून पडली मी". "दुखतंय का खूप? गोळी देते ती घे दुखलं तर"
"दुखतंय तर खरं"
"कुठची शिडी चढत होतीस रात्री?" अंजलीने विचारलं. बायकांच्या इजा होण्याच्या केसमध्ये छळ होत नाहीये ना याची खात्री करण्यासाठी ती नेहमी बरेच प्रश्न विचारीत असे.
"आम्ही पोटमाळ्यावर झोपतो ना, शिडीवरून चढावं लागतंय"
"मी क्लिनिकला निघतेच आहे. चल माझ्याबरोबर. एक्सरे काढून घेऊया. फ्रॅक्चर वगैरे नाहीना बोटाचं ते बघून घेऊ." सुशीलाला घेऊन अंजली निघाली. सुशीला गाडीत अंग चोरून बसली होती. तिला मोकळं वाटावं म्हणून अंजलीने गप्पा मारायला सुरुवात केली. "कोण कोण आहे तुझ्या घरी?" "माझा नवरा, दोन मुली, एक मुलगा, सासू, सासरे, दीर, भावजय, दिराची पोर आणि मी. सगळे मावत न्हाईत म्हणून तर आमी माळ्यावर झोपतोय"
"तू तर नेहेमी छान खूष दिसतेस, मला वाटलं तुमचं आपलं आपलं घर आहे." अंजलीने म्हटलं.
"न्हाई ताई, सगळे हायेत म्हणून तर खुशी. ते पोरान्ला बगतात तवा तर मी कामाला जाते, चार पैसं मिळतात. हां थोडी गर्दी हुते. अधनं मधनं भाण्डनबी हुतं पन कोन दोन लोक भांडत न्हाईत सांगा!"
"भांडण कोणाशी? नवर्याशी?"
"न्हाई बा... त्याच्या तर तोंडातून शबुद्च येत न्हाई. कामाशिवाय जराबी बोलत न्हाई त्यो. इचारलं की हो न्हाई एवढंच. त्याच्यापुढं काई न्हाई" सुशीलाने म्हटलं.
"हो? तू तर बडबडी आहेस.... तुला आवडतं असं शांत शांत?" अंजलीने न राहावून विचारलं. सुशीला थोडीशी लाजली आणि हसून म्हणाली, "आवडतं मला. त्यानला मी आवडते की न्हाई ते न्हाई ठावं पन मला आवडतं. माझं लगीन व्हायच्या वख्ताला माज्या मायने मला सांगितलेलं मी पक्कं ध्यानात ठेवलं , माय बोलली 'जे हाये ते बघत जा नि जे न्हाई ते सोडून दे, हाये ते बगशील तर हसत र्हाशील, न्हाई ते  शोधशील तर रडत बसशील.' मी पक्की गाठ बांधून टाकली की जे मिळंल तेच ग्वाड मानून घिईन आनी हळूहळू खरंच तसंच आवडायलाबी लागलं...."

अंजलीने  सुशीलाकडे हसून बघितलं, तिला पाडगावकरांचं गाणं आठवलं

'प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री'

तिच्या विचारांचा सगळा गुंता एका क्षणात सुटला. कोण म्हणतं हवं असलेलं मिळ्वण्यातच फक्त आनंद आहे? मिळालेलं गोड मानून घेण्यात सुद्धा सुख आहे.


डॉ. माधुरी ठाकुर

Monday, 20 March 2017

या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी


नेहेमीप्रमाणे आज कट्टयावर सगळे जमले होते खरे पण आज रोजच्या सारखं बिलकुल वाटत नव्हतं. खामकरांची उणीव सर्वांनाच जाणवत होती. शेवटी रेगे म्हणाले, "खामकर नाही तर एकदम चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय" "हो ना, बिचाऱ्यांची मुलाशी शेवटची भेट झाली असती तर बरं झालं असतं." एक निश्वास सोडून कर्वे म्हणाले. "हे  तुम्हाला वाटतंय हो. त्यांच्या मुलाला काही आहे का त्याचं! म्हातार्या आईवडलांना सोडून खुशाल अमेरिकेला जाऊन बसायचं. इकडे म्हातारा म्हातारी असले काय आणि नसले काय, यांचे राजाराणीचे संसार चालू!" देशपांडे संतापून म्हणाले.

"पण तसे खामकर मुलाबद्दल नेहेमी चांगलंच बोलायचे हो! सुनेबद्दलही कधी काही वाकडं ऐकलं नाही. मुलगा नेहेमी फोन करायचा, पैसे पाठवायचा" सौम्य स्वभावाच्या मिरीकरांनी म्हटलं.
देशपांड्यांना ते जराही पटलं नाही. उपरोधाने ते म्हणाले, "पैसे पाठवून दिले की झालं नाही का! संपलं आपलं कर्तव्य असंच या पिढीला वाटतं. हे लहान असताना आम्हीपण यांची काळजी घेण्याऐवजी नुसते हातात पैसे टेकवले असते आणि म्हटलं असतं जा करा हवं ते तर हे आज एवढे शिकले सवरले असते का!". "तर काय! नुसत्या पैशाने काय होतंय. पैसा काय हो... थोडा कमीसुद्धा चालतो. पण वेळेला आपली माणसं जवळ नकोत का" प्रधानांनी देशपांडेंच्या सुरात सूर मिळवला.

"अहो पण खामकर अचानक सिव्हिअर हार्ट अटॅकने गेले. त्यांच्या मुलाला आधी कसं कळेल असं होणार आहे ते." मिरीकरांनी पुन्हा एकदा बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.

"का हो मिरीकर तुम्ही खामकरांच्या मुलाचं वकीलपत्र घेतलंय का कट्टयाच्या विरुद्ध?" देशपांड्यांनी वैतागून म्हटलं. "तसं नाही..... आपल्यापैकी एक दोघे सोडले तर बहुतेकांची मुलं जगभरात कुठे कुठे आहेत... कधी ना कधी आपली सुद्धा हीच वेळ येणार आहे. म्हणून खरं तर आपल्याच मुलांची बाजू घेतोय मी." मिरीकर हसून म्हणाले. "चला नऊ वाजले. घरी वाट बघत असतील"असं म्हणून त्यांनी पेपरची घडी घालून घेतली आणि ते निघाले.

"अहो मिरीकर , कसली घाई आहे! तुम्हाला त्या इन्शुरन्स एजंटचा नंबर हवा होता ना? चला घरी, चहा घेऊ आणि नंबरसुद्धा देतो." देशपांड्यांनी मिरीकरांना अडवलं. "असं म्हणता.... बरं चला" कट्टयाचा निरोप घेऊन मिरीकर आणि देशपांडे, दोघे देशपांड्यांच्या घराच्या दिशेने निघाले.

"अहो..... मिरीकर आले आहेत. चहा ठेवा बरं" देशपांडेंनी कुटुंबाला फर्मान सोडलं. देशपांडे वहिनी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. पाठोपाठ त्यांच्याकडे काम करणारी बाई, हातात चहा पोह्यांचा ट्रे घेऊन आली. वहिनींनी आग्रहाने मिरीकरांना चहा पोहे दिले. "कशाला उगाच" मिरीकरांना अवघडल्यासारखं झालं. "घ्या हो" देशपांडेसुद्धा मनापासून आग्रह करत म्हणाले. "उगीच तसदी घेतलीत. तुम्हाला उशीर नको व्हायला" देशपांडे वहिनी एका शाळेच्या मुक्ख्याध्यापिका होत्या. त्यांना रिटायर व्हायला अजून दोन वर्ष होती.

"उशीर कसला! दुपारची शाळा असते माझी." देशपान्डे वहिनी म्हणाल्या. "काय म्हणतोय कट्टा?" त्यांनी सहज चौकशी केली. "खामकरांबद्दलच चाललं होतं. त्यांच्या मुलाला जमलं नाही...." मिरीकरांचं बोलणं ऐकून देशपांडे वहिनी चटकन म्हणाल्या, "हो ना , किती वाईट वाटलं असेल त्याला! तिथून एवढा तो आला लगेच पण शेवटची भेट नाहीच झाली. पण ते असताना मात्र तिथून शक्य तेवढं सगळं करायचा. सुलभा वहिनी म्हणतात ना की मुलगा आणि सून खूप आग्रह करतात त्यांना अमेरिकेला येण्यासाठी ," देशपांडे वहिनी पुढे बोलत राहिल्या , "पण हेच जात नव्हते. तेही बरोबर आहे म्हणा. तिकडे कोणाशी ओळख नाही. कंटाळा येत असेल ना. वाढलेलं झाड कापून दुसरीकडे नेऊन लावलं तर ते तिथे रुजत नाही." "बरोबर आहे, फक्त शेवटची भेट राहिली" मिरीकर म्हणाले.

"शेवटच्या भेटीचं काय हो! आम्ही एवढे भारतातच असूनसुद्धा आमची आमच्या आईवडलांशी कुठे शेवटची भेट झाली!" देशपांडे वहिनी सांगू लागल्या. "यांचे वडील कोकणात, तब्बेत जास्तच खराब झालीये म्हणून आम्हाला तार आली पण आम्ही पोहोचण्याआधीच गेले होते ते. माझ्या आईच्या वेळीही तसंच . आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत या. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा!" मिरीकरांनी डोळ्याच्या कोपर्यातून देशपांड्यांकडे पाहिलं. 

"पण मी म्हणतो, या आजकालच्या मुलांना एवढं इंग्लंड अमेरिकेला जाऊनच का राहायचं असतं ? भारतात काही मिळत नाही का?" देशपांडे चिडक्या सुरात म्हणाले.

"मामंजीसुद्धा अगदी अस्संच म्हणायचे, विसरलात की काय?" वहिनी हसून देशपांड्यांना म्हणाल्या, "भातशेती, काजू, आंबे, चिकू.... कित्ती लालूच दाखवली होती पण आपल्याला दोघांनाही मुंबईच प्यारी होती"

"पण आपल्या नवीन संसाराला त्यावेळी पैशांची गरज होती. आपण मुंबईला आलो, दोघांनी नोकरी केली म्हणून तर विनायक आणि वृंदाला चांगलं शिक्षण देता आलं, थाटामाटाने लग्न करून देता आलं. माईलासुद्धा काशीपासून सगळीकडे यात्रा करवून आणल्या की! कोकणात शेती करत बसलो असतो तर हे सगळं झालं असतं का?" देशपांडे मुद्दा सोडत नव्हते.

"अहो पण मग तशीच कारणं खामकरांच्या मुलाचीही असतील की! आपलं ते 'कारण', दुसर्याची ती 'सबब' हे बरं आहे" वहिनी जराही हार मानणार्यातल्या नव्हत्या. वातावरण तापतं आहे हे पाहून मिरीकर आता कसं काय निघावं असा विचार करू लागले आणि तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला. पडत्या फळाची आज्ञा घेऊन त्यांनी काढता पाय घेतला. देशपांडे पतिपत्नींचा वाद पुढे चालूच राहिला.

"पण मग तुला काय म्हणायचंय? आपण गावातून आलो. एवढ्या खास्ता खाल्ल्या, मुलांना वाढवलं, शिकवलं, स्वतःच्या पायांवर उभं केलं .... आता उतारवयात त्यांनी आपली काळजी घ्यावी अशी अपेक्षा रास्तच नाही का?" देशपांडे शेवटी हतबल होऊन म्हणाले.

वहिनी सोफ्यावरून उठून त्यांच्या बाजूला येऊन बसल्या. त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन त्या म्हणाल्या, "अपेक्षा ठेवणं चूक आहे की बरोबर ते मला नाही ठाऊक. पण पाखरंसुद्धा पिल्लांना दाणे भरवतात, उडायला शिकवतात. नुकतंच वाचलं ना चित्तेसुद्धा पिल्लाना शिकार करायला शिकवतात. त्याबदल्यात काहीच परतफेडीची अपेक्षा नसते त्यांच्यात. मग आपण तर मनुष्य आहोत. आपण जुनी घरटी मागे सोडून आलो. आता आपली पिल्लंसुद्धा आपल्या घरट्यातून उडून गेली. जगरहाटी आहे ही"

देशपांडे गप्प राहिले. आपले वडील जसे कोकणात एकटेच गेले तसंच आपल्याला हा प्रवास संपवताना आपली मुलं कदाचित डोळ्यासमोर दिसणार नाहीत या विचाराने ते सुन्न झाले. अशाच उद्विग्न अवस्थेत ते बसले होते एवढ्यात बेल वाजली. खालच्या मजल्यावरचे कामत आले होते. त्यांचा चेहरा आनंदाने फुलला होता. त्यांच्या मुलाला अमेरिकेतल्या नावाजलेल्या युनिव्हर्सिटीमधे एडमिशन मिळाली होती म्हणून कामत पेढे घेऊन आले होते .

 डॉ. माधुरी ठाकुर 


Tuesday, 14 March 2017

अंजलीची गोष्ट - सेकंड चान्स

 ऑपरेशन थिएटरची लिस्ट संपवून अंजली बाहेर आली. अनास्थेटिस्ट बरोबर तिचं केसबद्दल बोलून झालं होतं. आता दोन तास निवांत वेळ होता. पण सकाळपासून उभं राहून ती थकली होती. दुपारचे तीन वाजले होते आणि आत्ता कुठे तिला बसायला फुरसत मिळाली होती. जेवायला जावं की चहाच मागवावा असा विचार करत ती हॉस्पिटल मधल्या तिच्या छोट्याश्या रूम मधे शांत बसली होती. इतक्यात नर्स आत डोकावली. "डॉक्टर एक पेशंट सकाळपासून थांबून आहे. तुम्हालाच भेटायचंय म्हणतोय" "काय मनीषा! आत्ता कुठे मी फ्री झाले आणि लगेच.... कोण आहे?" अंजलीने तक्रारीच्या सुरात विचारलं. "शिर्के, त्याची बायको नाही का गेल्या वर्षी आपल्या वॉर्डला एडमिट होती." नर्सने माहिती पुरवली. 

"शिर्के" म्हटल्याबरोबर अंजलीच्या डोळ्यासमोर तो दिवस उभा राहिला. सात आठ महिन्यांपूर्वीची गोष्ट... शिर्के पतीपत्नी अंजलीच्या ओपीडी मधे आले होते.(ओपीडी म्हणजे हॉस्पिटलमध्ये जिथे पहिल्याप्रथम पेशंटला तपासलं जातं). सावित्री शिर्के. वय ४९. हिरडीवर पांढर्या रंगाची पुळी. सतत थोडी थोडी दुख. मामुली उपचारांनी फरक पडेना म्हणून पतीपत्नी हॉस्पिटलला आले होते. सावित्री लोकांकडे धुणीभांडी करत असे. शिर्के पन्नाशीच्या थोडे पुढे . एका घरी ड्रायव्हर म्हणून कामाला होते. अंजलीने सावित्रीची प्राथमिक तपासणी केली. तंबाखूची सवय आणि हल्ली वजन कमी झालंय का ला तिचं हो असं उत्तर! अंजलीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.

काही तपासण्या करून घ्यायला सांगून तिने त्यांना एका आठवड्याने रिपोर्ट्स घेऊन बोलावलं. त्यांचे पेपर्स अंजलीने सावित्रीच्या हातात परत दिले . ते नेमके सावित्रीच्या हातातून पडले आणि जमिनीवर पसरले. "नीट धरनबी जमंना. एक गोष्टं हिच्याच्याने नीट हुईल तर!" शिर्के रागावून फटकन बायकोला बोलले. खालच्या वर्गातल्या लोकांचं चारचौघांत बायकोचा अपमान करणं अंजलीला नवीन नव्हतं तरी तिने शिर्केंकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. ते वरमले आणि नवरा बायको रूम मधून बाहेर पडले.

 एका आठवड्याने रिपोर्ट्स घेऊन दोघे पुन्हा आले. अंजलीची शंका खरी ठरली होती. सावित्रीला हिरडीचा कॅन्सर झाला होता. सुरुवातीची स्टेज होती पण कॅन्सर नक्की होता. अंजलीच्या घशाशी आवंढा आला. असले डायग्नोसिस पेशंट्सना आणि नातेवाईकांना सांगणं तिला नको वाटत असे. तिने नर्सला मिस्टर शिर्केना आत पाठवायला आणि सावित्रीला बाहेर थांबवून घ्यायला सांगितलं. शिर्के आत आले. समोरच्या खुर्चीत अंग चोरून बसले. त्यांच्या मनावरचं दडपण त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होतं. "काय झालं डाक्टर? रिपोर्टमदी काय लिवलंय?" त्यांनी अधीर होऊन विचारलं. "रिपोर्ट्स फारसे चांगले नाहीयेत, शिर्के. तुमच्या मिसेसना हिरडीचा कॅन्सर झालाय. सुरुवातीची स्टेज आहे. बरं झालं लवकर कळलं. ताबडतोब ट्रीटमेंट सुरु करूया. हे सरकारी हॉस्पिटल आहे त्यामुळे खर्च असा काही फार होणार नाही पण जर तुम्हाला वाटत असेल तर टाटा हॉस्पिटलला नेऊ शकता. मी चिट्ठी लिहून देईन...." अंजली पुढे अजून बोलणार होती. पण तिने बघितलं शिर्केंचे डोळे भरून यायला लागले होते. ती टाटा बद्दल सांगेपर्यंत स्वतःच्या हातांच्या तळव्यांमध्ये चेहरा झाकून शिर्के हमसून हमसून रडत होते. अंजलीचं मन सुन्न झालं. पतीच्या वियोगाचं दुःख तिला ठाऊक होतं. त्यामुळे शिर्केना कसं वाटत असेल याची तिला कल्पना होती. त्यांच्या खांद्यावर हलकंसं थोपटून ती म्हणाली, "तुम्हाला वाटतंय तेवढं वाईट नाही आहे. सुरुवातीची स्टेज आहे. कुठे पुढे पसरल्याचं आत्ता तरी दिसत नाहीये. त्या बर्या होतील" जोरजोरात मान हलवत शिर्के उद्गारले "समदी माझीच चुकी हाए डाक्टर ! माज्याच चुकीमुळे समदं झालंया " धक्कादायक किंवा वाईट डायग्नोसिस ऐकल्यावर लोक इतरांना असंबद्ध वाटेल असं बोलतात हे अंजलीने याआधीसुद्धा पाहिलं होतं. त्यांच्या डोक्यातून असले भलते सलते विचार काढण्यासाठी ती म्हणाली, "हा हिरडीचा कॅन्सर आहे. दुसर्या कोणामुळे होणारा रोग नाही" "मग माझ्याच बायकोला कसा झाला" शिर्केंचा प्रश्न ऐकून अन्जलीच्या मनात विचार आला की दुःखात प्रत्येक माणसाला पडणारा "मलाच हे का?" हा प्रश्न सुखात मात्र कोणालाच पडत नाही.... यांना काय सांगावं ...,"त्या तंबाखू घेतात. तंबाखू हे हिरडीच्या कॅन्सरचं सगळ्यात कॉमन कारण आहे." आता शिर्केंचे हुंदके थांबले होते. "तंबाखू तर मी पन घेतुया. शिवाय बिडी, झालाच तर अधीमधी दारूसुद्धा घेतु म्या. तरी मला न्हाई झालं . तिला झालं. मी सांगतु तिला का झालं. गेल्या साली मला गावाला जायाचं हुतं. पन सुट्टी भेटंना मग म्या सायबाला सांगितलं बायकू बिमार हाये. त्यांनी इचारलं काय झालंया, माज्या तोंडून निघालं क्यान्सर. मालक पार गपगार. लागल तेव्हा सुट्टी घेत जा, नीट दवापानी कर म्हनला. मग काय कधी मधी मी सुट्ट्या मारायचो, जादा पैसे मागायचो. तिच्या क्यान्सरच्या नावानं पैसं घेऊन म्या दारू पिली , तीनपत्ती खेळलू.... काय न्हाई केलं इचारा... !" शिर्केंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं. "माजी म्हातारी सांगायची वंगाळ बोलू नगस. 'तो' वरून बघत असतुया. आणि मी तिलाच वरडायचो , गप बस्स म्हातारे म्हनून. न   म्हातारी व्हती तेव्हा तिच्याशी, ना ही आहे तर हिच्याशी, कंदी सरळ तोंडाने बातच न्हाई केली. सदा हाडतूड केलं. हिच्या बापानं लग्नात फार पैसं न्हाई दिलं . आता माजी पोरं लग्नाची झाली तरी हिच्या मायबापाशी कधी धड न्हाई बोललो मी. कुठचंच सुख न्हाई दिलं हिला आनि आता तर असं वंगाळ बोलून हिचा जीवच घेतला म्या!" 

अंजली स्तब्ध झाली. हा निव्वळ योगायोगच होता हे तिला ठाऊक होतं. पण तिची आईसुद्धा तिला सांगत असे, नेहेमी चांगलं बोलावं , 'वास्तू करी तथास्तु!'. तिने  तो विचार थांबवला. शांत , स्थिर आवाजात ती शिर्केना म्हणाली, "शिर्के , तुम्हाला तुमची चूक कळली ही चांगली गोष्ट आहे. असं समजा की देवाने तुम्हाला एक संधी दिली आहे सुधरायची. सावित्रीचा कॅन्सर अगदी सुरुवातीच्या स्टेजचा आहे. कॅन्सर स्पेशालिस्ट तुम्हाला सगळं समजावून सांगतीलच. रेडिओथेरपी घ्यावी लागेल. कदाचित ऑपरेशन. बोलणं थोडं अफेक्ट होऊ शकतं पण जीव नक्की वाचेल. या गेल्या पाच मिनिटांत ज्या ज्या गोष्टींचा पश्चात्ताप झाला ना तुम्हाला तसा तो परत करावा लागणार नाही एवढीच काळजी घ्या. त्या बर्या होतील." "नक्की ना डाक्टर?" शिर्केनी डोळे पुसून विचारलं. "हो नक्की. १०८ टक्के. अंजलीने म्हटलं. शिर्केनी हात जोडून ते कपाळापर्यंत वर नेऊन देवाला करावा तसा तिला नमस्कार केला. पुढे अंजलीकडून चिठ्ठी  घेऊन ते टाटा हॉस्पिटलला गेले. तिथून त्यांनी सावित्रीची ट्रीटमेंट पूर्ण करून घेतली. 

आज बर्याच महिन्यांनी शिर्के पतीपत्नी पुन्हा आले होते. दोघांचेही चेहरे आनंदी होते. सावित्रीचा कॅन्सर पूर्ण बरा झाला होता. ते खोलीत आल्यावर शिर्केनी सावित्रीला खुर्चीत बसू दिलं. ते स्वतः उभे राहिले. टाटा मधून मिळालेले डिस्चार्ज पेपर्स त्यांनी अंजलीला दाखवले. अंजलीला मनापासून आनंद झाला. "काय मग सावित्री, बरं वाटतंय ना आता? त्रास गेला ना पूर्ण?" "व्हय डाक्टर तुम्ही ह्यास्नी ग्यारंटी दिलेली !! हे नेहेमी मला सांगायचे, डाक्टरणीने सांगितलंय तू बरी व्हशील. १०८ टक्क्याची ग्यारंटी दिलेली हाये. तसंच झालं बगा . तुम्ही ह्यास्नीपन काई दवा दिली कांय? अक्षी बदलून गेले जनू...." सावित्रीने हसून विचारलं. अंजलीने फक्त हसून त्या दोघांकडे पाहिलं . त्या दोघांसाठी तिला मनोमन आनंद झाला. तिचा निरोप घेऊ शिर्के पतीपत्नी हॉस्पिटल मधून निघाले. आजार एकाचा होता आणि ट्रीटमेंट दोघांची झाली होती. 


डाॅ. माधुरी ठाकुर

Wednesday, 8 March 2017

Women's Day

I woke up this morning and as usual checked some messages on the mobile. Whatsapp was flooded with women's day messages. I smiled and thought what difference does it really make...... I still have to get out of my bed, give boys their breakfast, go to work, cook, clean so what exactly is going to happen differently..... what good thing is going to come my way because it is women's day.... then why do we even have these days.... these celebrations.... even Indian culture has it, guru-poornima, deep amavasya, polaa so what is the purpose???

And then suddenly I realised that I was looking at women's day from the wrong angle. Rather than thinking what will I GET, I should have thought what can I GIVE. It is a day to remind myself of all those women who have influenced my life. Being grateful to them. Telling them that they have influenced my life in such a positive way, that they have done a fantastic job and I am so lucky to have them as a part of my life. May this be my mother, my Gurumata Nandai, my teachers, inspirational personalities such as Sudha Moorthy, Mother Teresa from whom I am learning so much.... and of course all of you lovely friends!!

So here I am telling you that YOU are very important to me. I may not say this often but I really love you, adore you. You are in my thoughts and prayers.... on this women's day and always.....

Your
Madhuri

Dr Madhuri Thakur

Monday, 6 March 2017

अंजलीची गोष्ट - थेरपी


दादरसारख्या बिझी ठिकाणी त्या क्लीनिकचा पत्ता शोधणं थोडं अवघडच होतं पण शेवटी ती तिथे पोहोचली. 
"पण ते सायकियाट्रिस्ट आहेत की सायकॉलॉजिस्ट ?" अंजली नाना सबबी शोधत होती. "तुझ्या बाबांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे हीच त्यांची डिग्री समज" बाबांच्या या बोलण्यावर आता काही उत्तरच नव्हतं. "प्लासिबो इफेक्ट (मनाच्या समाधानासाठी केल्या जाणार्या, खरंतर औषध नसलेल्या, अश्या गोष्टी) मेडिसिनसुद्धा मान्य करतंच ना!" अशी अंजलीने स्वतःच्या मनाची समजूत घातली आणि हो ना करत ती डॉक्टर दीक्षितांना भेटायला तयार झाली.

आशिषला जाऊन वर्ष झालं होतं. अंजली आता तशी सावरली होती. खरं तर रिया असल्यामुळे तिला सावरण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. ती थकून जाईपर्यंत स्वतःला कामात बुडवून घेत असे पण कितीही थकली तरीही रात्री आडवं पडल्यावर तिला झोप येत नसे. खूपदा पहाटेच जाग येई. भूक लागत नसे. एक विचित्र एकटेपण, रिकामपण तिला खायला उठत असे. आपल्यात डिप्रेशनची लक्षणं दिसताहेत हे तिला कळत होतं आणि तिच्या आईवडलांच्या नजरेतूनही ते सुटलं नव्हतं. त्यामुळेच शेवटी त्यांच्या हट्टामुळे तिने डॉक्टर दीक्षितांना भेटायला हो म्हटलं. "पण मी एकटीच जाईन. एकटी असेन तर मला जास्त मोकळं वाटेल" असं तिने अगदी निग्रहाने सांगितलं. शेवटी हो ना करत आज अंजली त्या क्लिनिकपर्यंत आली.

नेहेमीप्रमाणे ती वेळेआधी दहा मिनिटं पोहोचली होती.  रिसेप्शनिस्टकडे नाव देऊन ती वेटिंग रूममधे सोफ्यावर जाऊन बसली. नेहेमी वेटिंग रूमच्या 'त्या' बाजूला बसणार्या तिला आज 'या पेशंट्सच्या' बाजूला बसताना थोडं विचित्रच वाटत होतं. "माझ्या परिस्थितीतल्या कोणत्याही बाईला असंच वाटेल. त्यासाठी काउन्सेलिंगची काय गरज! बाबा म्हणजे.." तिच्या विचारांची तंद्री अचानक भंगली. तिने कान देऊन परत ऐकलं तर खरंच धीम्या आवाजात 'रामरक्षा' ऐकू येत होती.

 'रामरक्षाम् पठेत् प्राज्ञः पापघ्नीम सर्व कामदाम्
शिरो मे राघवः पातु भालम् दशरथात्मजः '

तिच्या नकळत रेकॉर्डबरोबर तीसुद्धा मनात ते श्लोक म्हणू लागली.... ही पूर्ण होईपर्यंत आपल्याला आत बोलावू नये असा विचार तिच्या मनात एकदा आला. "आत न जायला काहीही कारणं !!" तिचं दुसरं मन तिलाच हसलं. खरंच किती वर्ष झाली ना रामरक्षा ऐकल्याला, म्हटल्याला. लहानपणी बाबा म्हणत असत, माझ्याकडून सुद्धा पाठ करून घेतली होती. जुने फोटो बघताना जसा आनंद होतो तसा अनामिक आनंद अंजलीला झाला. रामरक्षा संपली आणि तेवढ्यातच तिला आतून बोलावणं आलं.

 थोडी नर्वस होऊन ती आत गेली. "हे डॉक्टर तर फार वयस्कर दिसतायत! यांच्याशी मी कशी बरं मोकळेपणाने बोलणार? माझ्या मनाचे प्रॉब्लेम यांना कसे समजणार! अश्या विचारांत ती डॉक्टर दीक्षितांसमोर खुर्चीत बसली. सुरुवातीच्या औपचारिक बोलण्यानंतर अंजलीनेच मुद्द्याला हात घातला. "मला स्वतःला दिसतंय की मला डिप्रेशन आलय आणि त्यात काही विचित्र नाहीये ना! यातून बाहेर पडायला थोडा वेळ लागणारच ना ?" अंजलीने होकारच्या अपेक्षेने डॉक्टर दीक्षितांकडे पाहिलं. ते लक्षपूर्वक सगळं ऐकत होते. क्षणभर विचार करून ते म्हणाले, "तुला डिप्रेशन येतंय हे तुलाही माहितीये आणि मलाही. आणि तुला अँटिडिप्रेसंट्स् मी लगेच प्रिस्क्राईब करू शकतो. पण तुझ्या बाबतीत तसं करू नये असं मला वाटतं. तुला पुढचा एखाद तास वेळ असेल तर तू इथे थांब. तू काही केसेस बघाव्यास असं मला वाटतं. but I can understand if you have other commitments."

 "ठीक आहे. थांबते मी." अंजलीने आपल्या सेक्रेटरीला फोन केला. दिवसाच्या वेळापत्रकात फेरफार केला आणि ती परत क्लिनिकमधे आली. डॉक्टर दीक्षितांच्या सेक्रेटरीने अंजलीकडून कॉन्फिडेन्शिअॅलीटी क्लॉजवर सही, पेशंट्सना डॉक्टरांबरोबर अजून एक ओब्जर्वर असणार आहे याची कल्पना देणां वगैरे सोपस्कार पूर्ण केले. दीक्षितांनी सांगितल्याप्रमाणे अंजलीला शांतपि्, काहीही न बोलता रूममधे राहून फक्त ओब्जर्व करायचं होतं. दीक्षितांनी तिला केसची पार्श्वभूमी सांगितली. अतिशय गरिबीत वाढलेला मनोहर, कसंबसं शिक्षण, साधीशी नोकरी, झोपडपट्टी ते चाळीची खोली या आयुष्याच्या प्रवासात कधीतरी मनोहर एका मित्राच्या घरी गेला. त्याचा एक करोडचा फ्लॅट बघून मनोहरच्या मनावर काय परिणाम झाला ते त्यालाच ठाऊक पण आपण अस्साच फ्लॅट घ्यायचा असा त्याने निश्चय केला. नोकरी करणारी बायको मिळाली तेव्हा आपल्या गाडीला डबल इंजिन आल्यासारखं त्याला वाटलं. पण त्याची मिळकत, खर्च आणि एक करोड ह्यांचं गणित काही मिळत नव्हतं. ह्याला पै न पै वाचवायची होती. बायकोला हौसमौज करायची होती. पाळणा हलला आणि गणित पारच बिनसलं. पैसे पुरेनात, शिल्लक दूरच राहिली. गावची जमीन विकू, तुझे दागिने विकू, लोन काढू आणि तो फ्लॅट घेऊ..... बायकोसकट सगळ्यांना मनोहर वेडा वाटायला लागला होता. आणि आपलं स्वप्न कोणालाच समजत नाही म्हणून मनोहर अधिकाधिक फ्रस्ट्रेट होऊन अजूनच विचित्र वागू लागला होता. कुटुंब दुभंगलं होतं.

मनोहर आत आला. चाळीशीचा असेल पण खांदे पडलेले, चेहरा उतरलेला त्यामुळे वयापेक्षा मोठा वाटत होता. डॉक्टर दीक्षितांसमोर त्याने तीच कहाणी उगाळली.

"मनोहर, वेगवेगळ्या स्टेजमधे कुटुंबाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. तुमचं तुमच्या रहात्या घरात भागतंय. मुलगी वयाने लहान आहे. तिच्या शिक्षणासाठी वगैरे पैसे हवेत ना? शिवाय तुमच्या मिसेसना तुम्हाला पटवून देता येत नाहीये की हा फ्लॅट घेणं का आवश्यक आहे मग त्या तुम्हाला कॉऑपरेट कशा करणार "दीक्षितांनी मनोहरला प्रश्न केला.

"सगळं पटत असेल तर कोणीही कॉऑपरेट करेल. त्यासाठी बायकोच कशाला हवी! नवरा बायकोनी एकमेकांचं नाही पटलं तरीही कॉऑपरेट करायला हवं ना?"
"पण असा विचार तुम्ही तुमच्या मिसेस साठी करता का?"
"मीसुद्धा करेन ना. पण तिच्याकडे निश्चित असा काही प्लॅन नाहीये. आज हे हवं , उद्या ते हवं. माझं कसं, गेली आठ वर्षं नक्की आहे. तिथे फ्लॅट घ्यायचा मग मी पूर्ण आयुष्य आनंदात काढणार आहे."
मनोहरचं बोलणं ऐकून अंजली हतबुद्ध झाली. मनोहर गेल्यावर डॉक्टर दीक्षितांनी तिच्याकडे वळून विचारलं , "सो डॉक्टर, तो फ्लॅट जर कधी याने घेतलाच तर त्यानंतर हा आनंदी होईल असं वाटत का तुला?" "ऑफकोर्स नॉट !" अंजलीने क्षणभरही वेळ ना लावता उत्तर दिलं.
"बरोबर बोललीस. या फ्लॅटच्या वेडापायी त्याने आधीच कुटुंब गमावलंय . अमूक एका गोष्टीवर आपलं सुख अवलंबून आहे असा माणसांचा ठाम विश्वास असतो. असलं लॉलीपॉप दाखवून आपलं मन आपल्याला पळवत असतं. असा फ्लॅट घेतला की, अशी नोकरी मिळाली की, अशी छोकरी मिळाली की, फॉरेन ट्रिप केली की, मुलाला मुलगा झाला की.... न संपणारी लिस्ट आहे ही. डेस्टिनेशनचा हेका धरून प्रवासाचा सगळा आनंद नासवून टाकतो आपण. आणि हेच अंजली उलट, दुःखाच्या बाबतीतही लागू आहे. नोकरी नाही म्हणून दुःख आहे, आजार आहे म्हणून दुःख आहे, आशिष गेला म्हणून दुःख आहे.... नाही.... तू धरून ठेवलंयस म्हणून दुःख आहे! हे दुःखाचं गाठोडं तू तुझ्या इच्छेने तुझ्या डोक्यावर ठेवलंयस"

"मी माझ्या इच्छेने?" अंजलीने आश्चर्याने विचारलं. तिचे डोळे भरून आले.

"हो..." तितक्याच स्थिर आवाजात डॉक्टर दीक्षितांनी म्हटलं, "जाणारा गेला. तिथे तुझ्या इच्छेचा प्रश्नच नव्हता. पण आता ते दुःख धरून बसायचं की उठून पुढे चालू लागायचं हे तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे."

"पण मी परत जगायला लागलेच आहे. हॉस्पिटलला जाते. क्लिनिक करते" अंजलीचा आवाज रडवेला झाला होता.

"जगते आहेस की ढकलते आहेस? त्याला जाऊन एक वर्ष झालं. आता तू थोडी सावरलीस. दहा वर्षांनी पूर्ण सावरशील. पण मग ही दहा वर्ष अशीच वाया का घालवायची? तुझी, तुझ्या मुलीची, आईवडलांची प्रत्येकाची दहा वर्ष! जे दुःख दहा वर्षांनी हळूहळू फिकं होणारच आहे ते आताच टाकून दे. आठवणी टाकायला नाही म्हणत मी. त्या ठेव पण त्यांना दुःखाचं निमित्त नको करुस. तुझ्या मनाचा रथ तुझ्या विचारांच्या ताब्यात घे अंजली. त्याला भरकटू नको देऊस . स्वतःच्या मनाला शक्ती दे मग त्या शक्तीला राम म्हण , सद्गुरू म्हण किंवा काही निर्गुण निराकार शक्ती म्हण . मेडिटेट करतेस का? That will help you . तुला कशात आनंद मिळतो ते स्वतःच्या आत शोध. मुलीबरोबर, आईवडलांबरोबर वेळ घालव.  गाणी ऐक, पुस्तकं वाच. लोकांना भेट. ज्या ज्या गोष्टीनी तुला बरं वाटतं ते कर. क्लिनिक नि पेशंट्सचं कारण अजिबात देऊ नकोस. आता भरपूर काम करूनसुद्धा खुश नाहीयेस ना तू? मग स्वतःसाठी वेळ देताना थोडं कमी काम केलंस तरी काही आभाळ कोसळणार नाही. आणि लक्षात ठेव जगात डॉक्टर खूप आहेत पण तुझ्या मुलीला एकच आई आहे.... त्या आईला आनंदात ठेवण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. अंजली, तुला गोळ्याबिळ्या प्रिस्क्राइब करत नाहीये मी. एकच बिहेविअरल थेरपी सांगतो, दिवसभरात अधून मधून डाव्या हाताची चाफेकळी उजव्या हाताच्या बोटांमधे पकडायची , लहान मुलं आईचं बोट पकडतात तशी , आणि मनात म्हणायचं - आजचा दिवस किती छान आहे !" अंजलीने होकारार्थी मान डोलावली .

 रिसेप्शनिस्टला थँक्यू म्हणून अंजली बाहेर पडत होती. तिने पुन्हा ऐकलं . आताही बारीक आवाजात रेकॉर्ड चालू होती.
'आनंदाचे कोटी । साठविल्या आम्हा पोटी ।
आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग, आनंदाचे ।।
आधी रामरक्षा आणि आता तुकोबांचे अभंग ! हे क्लिनिक आहे की मंदिर या विचाराने तिच्या चेहऱ्यावर छोटंसं हसू उमटलं आणि सहजच तिच्या मनात विचार आला "आजचा दिवस खरंच छान आहे'.

 डॉ. माधुरी ठाकुर