"हाय" त्या ओळखीच्या आवाजाने चमकून तिने दरवाज्याकडे पाहिलं. अपूर्वाला पाहून ती चकितच झाली. "अपूर्वा, तू इथे? सगळं ठीक आहे ना?" तिने काळजीने विचारलं.
"खरं म्हणजे ठीक नाहीये. ठीक असताना कोणी डॉक्टरकडे कशाला येईल?" अपूर्वाने हसत हसत म्हटलं.
"ते ही खरंच. अगं पण घरी यायचस, बोल काय म्हणतेस?" अंजलीने विचारलं.
"आमची न्यूज तुझ्या कानावर आली की नाही?"क्षणभर विचार करून अंजली म्हणाली, "हो, आई म्हणाली की तुझं आणि तुषारचं पटत नाहीये म्हणून"
"हो त्याचबद्दल बोलायचं होतं" अपूर्वाने समोरचा पाण्याचा ग्लास उचलला, एक घोट पाणी पिऊन मग तिने सांगायला सुरुवात केली, "आमच्या लग्नाला आता नऊ वर्ष झाली. सुरुवातीपासूनच आमचं पटत नव्हतं, पण आधी आई वडलांना काय वाटेल आणि मग मुलांचं कसं होईल या कात्रीत सापडून निर्णय घेता येत नव्हता. पण शेवटी असं वाटतं की आईवडील, मुलं वगैरे सगळं ठीक आहे पण शेवटी माझं स्वतःचं सुद्धा आयुष्य आहेच ना? मग मी किती कॉम्प्रमाइज करू आणि का? ज्या माणसावर माझं प्रेमचं नाही त्याच्याशी हा खोटा खोटा संसार किती करायचा....."
"प्रेमचं नाही म्हणजे?" अंजलीच्या तोंडून आपसूकच प्रश्न आला.
"आमचं लग्न अरेन्ज मॅरेज होतं. मी मुंबईची, तुझी मावशी , तुषार सगळे सुरतचे. पण खूप मोठा बिझनेस, चागलं स्थळ म्हणून माझ्या आईबाबांनी घाई केली. दोनचार भेटींत स्वभाव काय कळतो! मी इथे मुंबईत मित्रमैत्रिणींच्या ग्रूपमधे वाढलेय. तुषार नुसता एकलकोंडा! पैसे आहेत पण कसल्या आवडी निवडीच नाहीत. शनिवार रविवार जरा मजा करावी , बाहेर पिक्चरला जावं तर तेव्हा तर शोरूम आणखीनच बिझी असतं. हा घरीच नसतो. फिरायला काय जाणार! शिवाय ही ..... एवढी मोठी फॅमिली. प्रत्येकाला वेगवेगळा फ्लॅट आहे पण जेवण सगळ्यांचं एकत्र. त्यामुळे सासू सासऱयांचा सतत वाॅच. बाहेर जाताना सुद्धा सांगून जावं लागतं का तर म्हणे त्याप्रमाणे जेवण करायला."
"तूसुद्धा जॉब करतेस ना?" अंजलीने विचारलं.
"हो, नशीब! आठवडाभर सतत सकाळ संध्याकाळ मला यांना बघावं नाही लागत. म्हणून मी अजून वेडी नाही झालेय"
"पण मग मुलं?"
"मुलं तर काय दिवसभर आजी आजोबांकडे असतात. झोपण्यापुरती येतात. आमची मुलं, दीराची मुलं, सगळी तिकडेच असतात. त्यामुळे त्यांची मजा चालते"
"आणि एकत्र जेवण म्हणजे तुम्ही दोघी सुना आळीपाळीने करता का?"
"नाही ग! सगळा स्वयंपाक सासू सासर्यांच्या कॉमन किचनमधे होतो. स्वयंपाकाला बायका आहेत. पण मला वाटतं कशाला रोज सगळ्यांनी खाली एकत्र जाऊन जेवायला पाहिजे? जेवण म्हटलं की एकत्र, हॉलिडे म्हटला की एकत्र! गेल्या नऊ वर्षांत नऊ वेळीसुद्धा आम्ही दोघेच असे बाहेर गेलो नाहीये. जिथे जातो तिथे अक्ख्या खानदानाबरोबर जावं लागतं."
"पण तुषारचा स्वभाव शांत आहे ना गं ?" तुषार जरी अन्जलीचा मावसभाऊ असला तरी अंजलीची मावशी सुरतला राहात असल्याने त्यांच्या गाठीभेटी फार कमी होत्या.
"असल्या शांतपणाचा काय उपयोग!" अपूर्वा वैतागून सांगू लागली, "याने ठणकावून सांगायला काय हरकत आहे की आम्हाला सगळं एकत्र नाही आवडत म्हणून. मी सांगायला म्हटलं तर मलाच म्हणतो की मी का सांगू, मला तर एकत्र आवडतं!"
"सासरचे लोक सासुरवास करतात का तुला?" अंजलीने विचारलं. "सासुरवास असा नाही पण त्यांच्या सतत जवळ असण्याने मला घुसमटायला होतं"
"पण तुझी मुलंसुद्धा सांभाळतात ना ते?"
"हो ते एक आहे. खरं सांगायचं तर त्यांचा असा विशेष त्रास नाहीये. प्रॉब्लेम तुषारचाच आहे. या सगळ्या लोकांच्या गराड्यात आमच्या दोघान्मधलं प्रेम कधी उमललच नाही. प्रेमात जसं क्लिक होतं ना तसं कधी झालंच नाही आमच्यात. लग्ना आधी मी किती रोमँटिक होते. काय काय कल्पना होत्या माझ्या ! पण प्रत्यक्षात फक्त या मोठ्ठ्या फॅमिलीशी आणि बँक बॅलन्स शी लग्न लागल्यासारखं वाटतं मला. वरवर पैसा छान दिसतो. पण आत माझ्या मनाला समाधान जराही नाही. गेली नऊ वर्ष आम्ही असेच ढकलतोय. संसार टिकायला मुळात प्रेम असायला नको का?"
"आणि तुला तुषारबद्दल प्रेम वाटतच नाही?"
"सॉरी टू से पण मला वाटतच नाही. त्याच्या प्रत्येक गोष्टीची चीड येते मला. सारखं सारखं घरच्यांचच ऐकणं, दिवसरात्र बिझनेस, ना हौसमौज, ना आवडीनिवडी..... अगदी विरुद्ध आहोत आम्ही एकमेकांच्या"
"खरंतर तुला काय सांगावं ते मला कळतच नाहीये. हे असं आहे ह्याची कल्पना तुला लग्नाआधीच होती. लग्नाच्या वेळी मोठा बिझनेस, मोठं घर हे जे तुषारचे प्लस पॉईंट्स होते तेच आता निगेटिव्ह पॉईंट्स वाटतायत. आणि प्रेम वाटत नाही हे तर माझ्या समजण्या पलीकडे आहे. लग्नाला नऊ वर्ष झाली. दोन मुलं आहेत. प्रेम नाही हे कळायला इतका वेळ
लागला? त्या दोन मुलांचं आयुष्य आता खराब होणार ते? तुझी बाजू मला समजते पण पूर्ण पटत नाही. सासू सासर्यांच्या सतत सोबतीचा तुला त्रास वाटतो, कबूल आहे पण त्यांच्याच कडे मुलं ठेऊन तू नोकरी करतेस हेसुद्धा तेवढंच खरंय. आणि तुषारचीही काहीतरी बाजू असेलच. कदाचित त्याचं चुकतही असेल पण त्याच्याकडून काही न ऐकता मी जर या गोष्टीबद्दल माझं मत बनवलं तर ते चुकीचं असण्याची शक्यताच अधिक नाही का!"
अपूर्वाला अंजलीचं बोलणं जराही आवडलं नाही. तिची नाराजी तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. "तू बोल त्याच्याशी. माझी काही हरकत नाहीये" तिने म्हटलं.
"पण तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे? नेमकं काय ठरवून तू माझ्याशी बोलायला आली होतीस?" अंजलीने रोखठोक प्रश्न केला.
क्षणभर घुटमळून अपूर्वाने विचारलं, "तू त्याला मुंबईला बोलावून घेशील का? मी गेला महिनाभर मुंबईला आलेय आईबाबांकडे. पण तो काही येत नाही. आला तर आम्ही मॅरेज काउन्सेलिंग किंवा डिवोर्स काहीतरी प्रोसिजर सुरु करू शकतो."
"तू एक महिना मुंबईत आहेस तर मग मुलं कुठे आहेत?" अंजलीने जरा आश्चर्याने विचारलं.
"मुलं तिकडेच. त्यांना सुरतलाच आवडतं" अपूर्वाने नाईलाजाने उत्तर दिलं, "मी मुंबईला हेड ऑफिसला ट्रान्स्फर घेतेय. ती एकदा झाली की मुलांना इकडेच बोलवून घेईन"
"मी फोन करते तुषारला. बोलते मी त्याच्याशी." अंजलीने अपूर्वाला म्हटलं.
अपूर्वा निघाली. पुढे चार पाच पेशंट्स येऊन गेले. दुपारी मधल्या वेळात अंजली घरी आली. पण तिच्या डोक्यातून हे जात नव्हतं. सगळ्या दुःखाची सुरुवात अपेक्षाभंगात आहे ना, ती विचार करत होती. प्रेमाबद्दल, जोडीदाराबद्दल प्रत्येकाने मनात एक चित्र रंगवलेलं असतं. कधी आयुष्यात येणारी व्यक्ती तशी असते तर कधी अपेक्षेच्या अगदी विपरीत. मग अश्या वेळी अपेक्षाभंगाचं दुःख पचवावं, तडजोड करावी की सगळं सोडून पुन्हा नवी सुरुवात.... आणि पुन्हा तेच झालं तर.... पर्फेक्शनच्या शोधात किती धावणार? आणि अशी परफेक्ट व्यक्ती सापडलीही तरी जर त्यांचासुद्धा असाच पर्फेक्शनचा शोध चालला असेल तर आपण त्यात फिट होणार का? शिवाय आपल्या निर्णयांमुळे आणखी लहानग्यानचं आयुष्य बदलणार असेल तर किती काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवा. केवढी ही गुंतागुंत नात्यांची....
"अंजू , सुशीलाच्या हाताला बरीच सूज आलीये. बघतेस का तिला जरा?" आईच्या प्रश्नाने अंजलीची तंद्री भंगली. "हो चल ना" म्हणत ती उठली आणि स्वयंपाकघरात गेली. सुशीला अंजलीच्या घरी धुणीभांडी करायला येत असे. "बघू" म्हणत अंजलीने सुशीलाचा हात तपासला. चाफेकळीला बरीच सूज आली होती. "बराच सुजलाय की हात! कसं काय लागलं ?" अंजलीने विचारलं. "काल रातच्याला शिडीवरून पडली मी". "दुखतंय का खूप? गोळी देते ती घे दुखलं तर"
"दुखतंय तर खरं"
"कुठची शिडी चढत होतीस रात्री?" अंजलीने विचारलं. बायकांच्या इजा होण्याच्या केसमध्ये छळ होत नाहीये ना याची खात्री करण्यासाठी ती नेहमी बरेच प्रश्न विचारीत असे.
"आम्ही पोटमाळ्यावर झोपतो ना, शिडीवरून चढावं लागतंय"
"मी क्लिनिकला निघतेच आहे. चल माझ्याबरोबर. एक्सरे काढून घेऊया. फ्रॅक्चर वगैरे नाहीना बोटाचं ते बघून घेऊ." सुशीलाला घेऊन अंजली निघाली. सुशीला गाडीत अंग चोरून बसली होती. तिला मोकळं वाटावं म्हणून अंजलीने गप्पा मारायला सुरुवात केली. "कोण कोण आहे तुझ्या घरी?" "माझा नवरा, दोन मुली, एक मुलगा, सासू, सासरे, दीर, भावजय, दिराची पोर आणि मी. सगळे मावत न्हाईत म्हणून तर आमी माळ्यावर झोपतोय"
"तू तर नेहेमी छान खूष दिसतेस, मला वाटलं तुमचं आपलं आपलं घर आहे." अंजलीने म्हटलं.
"न्हाई ताई, सगळे हायेत म्हणून तर खुशी. ते पोरान्ला बगतात तवा तर मी कामाला जाते, चार पैसं मिळतात. हां थोडी गर्दी हुते. अधनं मधनं भाण्डनबी हुतं पन कोन दोन लोक भांडत न्हाईत सांगा!"
"भांडण कोणाशी? नवर्याशी?"
"न्हाई बा... त्याच्या तर तोंडातून शबुद्च येत न्हाई. कामाशिवाय जराबी बोलत न्हाई त्यो. इचारलं की हो न्हाई एवढंच. त्याच्यापुढं काई न्हाई" सुशीलाने म्हटलं.
"हो? तू तर बडबडी आहेस.... तुला आवडतं असं शांत शांत?" अंजलीने न राहावून विचारलं. सुशीला थोडीशी लाजली आणि हसून म्हणाली, "आवडतं मला. त्यानला मी आवडते की न्हाई ते न्हाई ठावं पन मला आवडतं. माझं लगीन व्हायच्या वख्ताला माज्या मायने मला सांगितलेलं मी पक्कं ध्यानात ठेवलं , माय बोलली 'जे हाये ते बघत जा नि जे न्हाई ते सोडून दे, हाये ते बगशील तर हसत र्हाशील, न्हाई ते शोधशील तर रडत बसशील.' मी पक्की गाठ बांधून टाकली की जे मिळंल तेच ग्वाड मानून घिईन आनी हळूहळू खरंच तसंच आवडायलाबी लागलं...."
अंजलीने सुशीलाकडे हसून बघितलं, तिला पाडगावकरांचं गाणं आठवलं
'प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री'
तिच्या विचारांचा सगळा गुंता एका क्षणात सुटला. कोण म्हणतं हवं असलेलं मिळ्वण्यातच फक्त आनंद आहे? मिळालेलं गोड मानून घेण्यात सुद्धा सुख आहे.
डॉ. माधुरी ठाकुर
सुशिलेच्या आईने दिलेला सल्ला मानला तर कोणतीच स्त्री दुःखी होणार नाही . मस्त सल्ला .
ReplyDeleteखरंच आहे आत्या. कोणीच दुःखी होणार नाही. मिळालेलं गोड मानून घेणं ...... म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर किती कठीण
Deleteएकाच परिस्थितितुंन दोन वेगवेगळ्या बायका जात आहेत,
ReplyDeleteएक सुशिक्षित पण मुर्ख
आणि दूसरी अशिक्षित पण शहणी - हाच तो फरक दोघीन मधला.
असो , छान मांडणी केलि आहेस .
तू लिहित जा, तुझ्या या कथा बोधपर सुद्धा आहेत.
गॉड ब्लेस यु माधुरी 🙏
थँक्यू बाबा🙏. नुसता IQ किंवा शिक्षण नाही तर इमोशनल इंटेलिजन्स हाय असणं महत्वाचं .
DeleteSunder lihili aahe
ReplyDeleteआई 🙏
DeleteMadhuri kuup छान. अस प्रत्येक जण विचार करू लागला तर कोणी दुखी होणारच नाही.
ReplyDeleteखरं आहे. काहींना ठाऊकच नसतं आणि बाकीच्यांचं कळतं पण वळत नाही अशी अवस्था असते.
Deleteवा, सुंदर आहे जीवनाचे मर्म
ReplyDeleteथँक्यू अपर्णा. आवर्जून प्रतिक्रिया देतेस बरं वाटतं
Deleteवा, सुंदर आहे जीवनाचे मर्म
ReplyDeleteथँक्यू अपर्णा. आवर्जून प्रतिक्रिया देतेस. बरं वाटतं
Deleteडाॕ माधुरी खूप छान लीहीले आहेस. तुझे लिखाण खरोखर महिलाना विचार करायला लावणारे आहे. Keep it up.May God bless you.
ReplyDeleteथँक्यू सर
DeleteEye opener story for everyone !! Chaan !!
ReplyDeleteथँक्यू सारिका ☺🤗
Deleteफार छान
ReplyDeleteसुशिक्षित मुलींना त्यांच्या आया असं वागायला केव्हा शिकवतील
Very Nice and inspiring too.
ReplyDeleteKeep writing best wishes