पारिजात
सुन्न मनाने तिने फोन ठेवला. समोरच्या टेबलवर
ठेवलेला चहा केव्हाच थंड झाला होता, त्याखालचा सकाळचा पेपर फडफडत होता पण तिला
काही सुचत नव्हतं. हुंदकाही येत नव्हता. आतून थिजल्या सारखी ती गोठून गेली होती.
अण्णा जाणार हे निश्चितच होतं. त्यांचं वयही झालं होतं. होणार हे माहीत असलं तरी प्रत्यक्षात
झाल्यावर गोष्ट मनाला चटका लावून जाते. गायत्रीचही तसंच झालं. अण्णांच्या मागोमाग
तिच्या मनात विचार आला माईचा. माई कशी असेल? सावरली असेल का? तिने चटकन माईला फोन
लावला. पण कोणी फोन उचललाच नाही.
माईशी बोलल्यालासुद्धा आता बरेच महिने होऊन गेले होते. दिवाळीत केला होता
का शेवटचा फोन, आणि मध्ये एकदा अण्णांच्या तब्बेतीची चौकशी करायला केला होता ना?
ती आठवू लागली. गेल्या दीड वर्षात तिच्या स्वतःच्याच आयुष्याची घडी इतकी विस्कटली
होती की ती पुन्हा बसवताना या सार्या गोष्टी राहूनच गेल्या होत्या. त्यात माई,
अण्णा हे हक्क गाजावणार्यान्पैकीही नव्हते की रुसवे फुगवे धरणार्यान्पैकी. आणि मुंबईला
आईबाबांना फोन केला की त्यांची खुशाली कळतच होती की! आता मात्र नुसता फोन नाही तर
माईला भेटायलाच जायचं असा तिने निश्चय केला.
आज
रात्रीच अमितशी बोलून तिकिटं बुक करूया असा विचार पक्का केला केला तव्हा कुठे गायत्रीला
जरा बरं वाटलं. तिची नजर घडाळ्याकडे गेली. सौम्याला नर्सरीतून आणायची वेळ झाली
होती. म्हणजे आजसुद्धा योगा राहीलाच की. काल रात्रीच अमित हसत हसत तिला म्हणाला होता,
“योगाबिगा करत जा मॅडम, वजन वाढतंय तुमचं!” त्याच्या त्या हसत हसत मारलेल्या शेर्यामुळेसुद्धा
ती दुखावली गेली होती. मुंबईत योगा इन्स्ट्रक्टर म्हणून तिचा बिझनेस नावारूपाला
येत होता. रेग्युलर क्लासेस, ट्युशन्स, एखाद दोन सेलिब्रिटी क्लायन्ट्स असा तिचा
जम बसू लागला होता. तिचे आईवडील जवळच रहात असल्यामुळे सौम्याचीही व्यवस्थित काळजी
घेतली जात होती. पण दीड वर्षापूर्वी अचानक अमितला ही मोठी संधी चालून आली. त्याची
कंपनी कार्नाटक मध्ये बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करत होती. तिथल्या ऑफिसमधे त्याने
जावं आणि ते काम बघावं अशी त्याला वरून सूचना आली.
“बँगलोर वगैरे ठीक होतं रे, पण हे नल्लूर अगदी कुठच्या कुठे आडगाव आहे!” गायत्री
नाखुषीने म्हणाली, “सौम्याचं काय? तिची शाळा?”
“अगं आपल्याला काही तिकडे कायमचं नाही रहायचंय.
दोन वर्षांचाच प्रश्न आहे. सौम्या तर लहानच आहे अजून.”
“ते खरय रे पण मला माझे क्लासेस बंद करावे लागतील”
“आय नो..... पण तू तिथेसुद्धा पुन्हा सुरु करू
शकतेस ना? आणि बघ ना मी मिडल मॅनेजमेंटवरून हायर मॅनेजमेंटच्या ब्रॅकेटमधे जातोय.
फक्त माझ्या करीअरच्याच नाही तर पैशांच्या दृष्टीनेसुद्धा आपल्याला किती चांगलं
आहे!” अमितचं म्हणणं खरं होतं. पैशांच्या दृष्टीने चांगलं होतं यात काहीच वाद नव्हता.
“नाहीतर असं करायचं का? तू जा, मी आणि सौम्या दर
महिन्याला येऊन तुला भेटत जाऊ किंवा तू अधून मधून येत जा इथे” तिने सुचवून पाहिलं.
“चल्, तुला आणि सौम्याला सोडून नाही जाणार मी. जायचं तर एकत्र, नाहीतर मी नाही
म्हणून कळवून टाकतो.” अमितच्या या म्हणण्यावर गायत्री वरवर वैतागली तरी मनातून
खरतर ती सुखावली होती. नकार कळवणं शक्य असलं तरी प्रायव्हेट कंपन्यांमधे असे नकार
पचवले जात नाहीत याची अमित आणि गायत्रीलासुद्धा पूर्ण कल्पना होती.
हो
ना करत तिघे या नवीन गावी आले. गायत्रीला वाटलं होतं त्यापेक्षा सौम्या नल्लूरला
फारच चटकन रुळली. अमितसुद्धा कामामुळे बिझी झाला. राहिली गायत्री. घर शोधा, शाळा
शोधा, बाजारहाट, दुकानं शोधा यात सुरुवातीचे काही महिने पटकन गेले. त्यांच्या या
नव्या घराच्या आसपास रहाणारे सगळे लोक कन्नडच होते. स्थानिक भाषा समजावी, बोलता यावी
म्हणून गायत्रीने पुस्तकं आणून कन्नड भाषा शिकायला सुरुवात केली. कामापुरते शब्द
यायला लागले असले तरी संवाद करण्याएवढी कन्नड भाषा तिला अजून बोलता येत नव्हती.
सौम्या मात्र मित्र मैत्रिणींबरोबर कन्नडात सहज बोलत होती. लहान मुलांना ‘माझं
चुकलं तर’ अशी धास्ती फारशी नसते त्यामुळे बर्याच गोष्टी लहान मुलं मोठ्यांपेक्षा पटकन
शिकतात. सौम्याचही काहीसं तसच होतं. चटचट तयारी करून गायत्री सौम्याच्या नर्सरीत
गेली. मायलेकी चालत चालत घरी पोहचल्या. गायत्रीचं हे घर अगदी ऐसपैस, प्रशस्त होतं.
समोर मोठ्ठा व्हरांडा, अंगण. अंगणात गायत्रीने हौसेने दरवाज्याजवळ लावलेला फुलांचा
ताटवा छानच बहरला होता. एका बाजूला तिने भाज्यांचा छोटासा वाफाही केला होता. त्यात
कढीपत्ता, कोथिंबीर, मेथी असे तिचे प्रयोग चालत.
“आई,
मृणालिनीने आज वर्गात एक गाणं म्हणून दाखवलं. ती म्युझिक क्लासला जाते तिथे
शिकवलं. चारुकेशी सुद्धा जाते. मलासुद्धा त्या क्लासला जायचय” सौम्या सांगत होती.
“अगं, त्या कर्नाटकी म्युझिक शिकतात. आपण काही इथे कायम रहाणार नाही. मग तू पुढे
कसं कंटिन्यू करणार? काय उपयोग त्याचा?” आईचं म्हणणं सौम्याला काही फारसं पटलं
नाही. “पण आत्ता तर आपण इथे आहोत ना! मला जायच्चचे” तिने हट्टाने म्हटलं. “बरं
बघू. बाबाशी बोलूया मग ठरवू.” तिने तेवढ्यापुरता विषय टाळला पण ते विचार तिच्या
मनात रेंगाळत राहिले. सौम्यासारखं आपल्यालाही सगळे बदल पटपट स्वीकारता आले असते तर
किती बरं झालं असतं. आपणही मुंबई सारखा योगा क्लास इथे सुरु करायचा का.... पण
भाषेची केवढी अडचण आहे...... इतके चांगले क्लासेस चालू होते आपले.... कशाला आपण
अमितला हो म्हटलं इथे यायला. त्याचं ठीक आहे पण माझी ही दोन वर्षं वायाच आहेत ना!
नाही म्हणायला इतक्या वर्षानी थोडी उसंत मिळाली. थोडी पुस्तकं वाचली, थोडं पेंटिंग
केलं, हा बगीचा फुलवला ....... मग मी नक्की मिस काय करतेय? माझा योगा क्लास? पैसे?
स्वतःची ओळख? ...... नुसते प्रश्न, अनुत्तरित प्रश्न ...... मनातल्या या
द्वंद्वामुळे गायत्री कोमेजत चालली होती. अमितच्या नजरेतून हे सुटलं नव्हतं. पण
त्याचाही नाईलाज होता.
समोरच्या आय्यन्गारांची गाडी येताना दिसली म्हणजे सहा वाजले असणार. गायत्री
घाईघाईने स्वयपाकाला लागली. त्या रात्री तिने अमितला अण्णा, तिचे आजोबा गेल्याचं
सांगितलं, आणि माईला भेटण्याची तिची इच्छासुद्धा. कधी नव्हे ती अमितलाही सुट्टी
मिळाली आणि दोन दिवसांतच ते तिघेही निघाले, आधी मुंबई आणि मग ते थेट कसालला तिच्या
माहेरच्या गावी, माईला भेटायला गेले.
कसालचं ते कौलारू घर अजून अगदी तसंच होतं. अंगणात तुळशी वृन्दावन, ओसरी,
गप्पा मारत, गोष्टी ऐकत बसायला अंथरलेली ओसरीतली चटई, मोठी पडवी, पडवीतला लाकडी
झोपाळा. आतलं माजघर, तिथले दिवे ठेवण्यासाठी भिंतींत असलेले कोनाडे, माजघराच्या वरचं
ते काचेचं कौल आणि त्यातून थेट आत येणारा सूर्यप्रकाश. माजघराच्या एका बाजूला असलेली
मोठी देवाची खोली. त्या खोलीतला तो उदाबत्तीचा मंद सुगंध, समईचा मिणमिणता प्रकाश
आणि शारंगधराच्या मूर्तीपुढे शांतपणे डोळे मिटून समाधीसारखी बसलेली माई......
बाकी
सगळे बाहेरच थांबले आणि गायत्री एकटीच देवघरात माईजवळ गेली. माईच्या खांद्याला
तिने हलकासा स्पर्श केला. माईने डोळे उघडून पाहिलं. गायत्रीने तिने वाकून नमस्कार
केला आणि मग घट्ट मिठी मारली. तीही काही म्हणाली नाही आणि हिनेही सांत्वन केलं
नाही. अश्रूंच्या संवादात शब्द मुके झाले.
चार
दिवस माई बरोबर काढून आता परत जायची वेळ आली. आजची कासालची शेवटची रात्र. उद्या
मुंबई आणि दोन दिवसांत पुन्हा नल्लूर. अमित बाहेर पडवीत झोपला होता. सौम्या आणि
गायत्री आत खोलीत. रात्री सगळी निरवानिरव झाल्यावर माई गायत्रीच्या खोलीत आली. “ये,
आज तुझ्या डोक्याला तेल लाऊन देते.” तिने प्रेमाने म्हटलं. “अगं माई आता काही माझे
केस लांब नाहीयेत पूर्वीसारखे.” गायत्रीने म्हटलं. “नसूदे गं, डोक्याला थंड वाटतं”
म्हणत माईने बोटानी गायत्रीच्या डोक्यावर तेल चोळायला सुरुवात केली. ते ऊनऊन
खोबरेल तेल आणि माईचा तो प्रेमळ स्पर्श, आजीच्या कुशीत गायत्री पुन्हा लहान होऊन
गेली. “कसं चाललंय तुझे नव्या जागी? क्लासेस कसे चाल्लेयेत तुझे?” माईने विचारलं.
काही बोलायच्या ऐवजी गायत्री हुंदकेच देऊ लागली. “अगं काय झालं? जावईबापू नीट
वागतात ना?” माईने काळजीने विचारलं. “हो गं, अमितचं काही नाही. मलाच काही करता येत
नाहीये. मुंबईत व्यवस्थित क्लासेस होते माझे पण नल्लूरला काही नाही. तिथे सगळे
कानडी, मी कशी बोलणार, कशी शिकवणार आणि अशा गावी शिकायला येणार तरी कोण! काही न
करावं तर इतकं गिल्टी वाटतं की काय करत्येय मी आणि तिथे न जावं तर अमितच्या करीअरचं
नुकसान होतं. अगदी कात्रीत सापडल्यासारखं वाटतं. असं वाटतं शेवटी माझी ओळख तरी काय
आहे?” गायत्रीने एका दमात मनातलं सगळं सांगितलं. माईने प्रेमाने तिच्या डोक्यावर
थोपटलं. ती म्हणाली “अगं, संसार म्हटला की थोडंफार इकडे तिकडे होणारच. थोड्या
वर्षानी मागे वळून पहाशील तेव्हा तुला स्वतःलाच समाधान वाटेल की तू काही करायचं
ठेवलं नाहीस. आणि हे सगळं काही कायम असंच रहाणार नाही. ती गोष्ट आठवते तुला
गायत्री, चार आंधळे हातांनी हत्तीला चाचपून बघतात. सोंड धरणारा म्हणतो ही नळी आहे,
कानवाला म्हणतो हे सूप आहे, पाय धरणारा म्हणतो हा खांब आहे, आणि शेपूट धरणारा
म्हणतो ही तर दोरी आहे. माणसाच्या आयुष्याचंही तेच आहे ग. तू कोणाची मुलगी आहेस,
कोणाची बायको, कोणाची आई, एक योगाभ्यास शिकवणारी शिक्षिकाही आहेस. पण ही सारी तुझी
अंग आहेत. तू, तू अशी जी आहेस ती या सर्वांच्या पलीकडेसुद्धा आहेसच. खरी गोष्ट अशी
आहे की हत्तीला स्वतःला खात्री हवी की तो हत्ती आहे. आंधळे म्हणतात म्हणून जर
हत्ती स्वतःला नळी, खांब, सूप, दोरी असं काही समजू लागला तर काय होईल सांग! तू कोण
आहेस ते लोकांच्या पारड्यात तोलू नकोस बाळा.... तुझं तू शोध. स्वान्तः सुखाय,
स्वतःसाठी शोध. आणि असा शोध घेशील ना, तेव्हा खरच सांगते, तुला तुझी ओळख नक्की
सापडेल, अगदी १०८ टक्के.” माईच्या शब्दांनी गायत्रीचं मन शांत झालं. लहान
मुलीसारखं माईच्या मांडीत डोकं ठेऊन तिने माईचा हात पुन्हा आपल्या डोक्यावर ठेवला,
तिने थोपटावं म्हणून. माई हसून तिला थोपटू लागली. नकळत सवयीने माईने भग्वद्गीतेतले
श्लोक पुटपुटायला सुरुवात केली.
“निर्मान मोहा जितसङग दोषा, अध्यात्म नित्या विनिवृत्त
कामाः
द्वंद्वैर्विमुक्ताः सुखदुःख सज्ञैर्गच्छन्त
मूढाः पदम् अव्ययम् तत्”
झोप आणि जागृतीच्या सीमारेषेवर असलेल्या
गायत्रीला अण्णाच आपल्या धीरगंभीर आवाजात श्लोकाचा अर्थ सांगतायत असं वाटू लागलं,
“निराभिमानी, निर्मोही, कुसंगातीपासून मुक्त असा जो, ते शाश्वत तत्त्व जाणतो, जो इच्छांचा
त्याग करतो, आपपर द्वैताच्या, सुखदुःखाच्या पार आणि मोहरहित असा जो असतो, तोच ते
शाश्वत स्थान प्राप्त करतो”
दुसर्या दिवशी सकाळीच मंडळी मुंबईला परत निघणार होती. सामान गाडीत ठेवणं
वगैरे चालू होतं. अंगणात पारिजातकाचा सडा पडला होता. अंगणातल्या काळ्या मातीवर
केशरी देठाची ती नाजुक पांढरी फुलं, जणू चान्दण्यांचा सडा. “आई, किती छान आहेत ना!”
ती फुलं दाखवून सौम्याने गायत्रीला म्हटलं. “हो गं, आपल्या नल्लूरच्या घरीसुद्धा
आहे पारिजात. अजून लहान आहे, मोठा झाला की त्याचासुद्धा असा सडा पडेल” गायत्रीने
हसून म्हटलं. “पण आपण असणार का तिथे? आपण तर तिथून परत जाणार ना?” सौम्याने
क्लासची गोष्ट आठवून म्हटलं. “तुला आवडत असेल तर राहू की” गायत्रीने असं
म्हटल्याबरोबर गाडीत बॅग ठेवणार्या अमितने वळून तिच्याकडे पाहिलं. तिचा शांत,
समाधानी चेहरासुद्धा त्या बहरलेल्या पारिजातासारखाच त्याला वाटला.
डॉ. माधुरी ठाकुर
Chan khup chan. "तुझ तू शोध " आजीचा सल्ला अप्रतिम
ReplyDeleteथँक्यू विदुल . बहुतेक गोष्टींची उत्तरं आपली आपल्यालाच शोधायची असतात ना, कोणीतरी आठवण करून दिली की आत्मविश्वास येतो
DeleteKhupach chan!!! Sandesh khup chan dilay.
ReplyDeleteथँक्यू मोनिका. तुला कथा आवडली, संदेश आवडला हे कळलं की बरं वाटतं .
Deletekhup chan
ReplyDeleteआवर्जून प्रतिक्रिया देण्याबद्दल मनःपूर्वक आभार
DeleteKhoop Chaan lekh.. everyone goes through this phase.. I liked it and remembered my shifting to Bangalore.. I had also taken break for my daughter and after some days I started feeling frustrated... but now i realize that time didn't come back .. had nice time with family there.. now I just long for it...
ReplyDeleteThanks Madhuri for this story.. it's really nice.
So true Shweta. We can either look at such situation as beibg stuck with kids at home or as an opportunity to have time with them. Our approach makes such a difference! Thanks for sharing your experience
DeleteKhup chhan ajun havi Hoti goshta Gayatri ne te kas shodhala he pan sanga
ReplyDeleteमायाताई प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार. गायत्रीला समजलं की रस्ता बंद झाला नाहीये तर तिला शोध घ्यायचा आहे. हे समजणं हीच एक मोठी स्टेप असते नाही का? बाकी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ती काय काय करते हे लिहायला घेतलं तर कादंबरीचं होईल ना ? कारण रस्ता पटकन दिसलाही तरी निखळ यशाला शॉर्टकट नाहीच त्यामुळे मोठ्ठा प्रवास असणार 😊
DeleteI left a message on FB for you.
ReplyDeleteThanks
Aishwarya
Thank you Aishwarya,
DeleteI do aim to send you a write up before Mid August.
Kind Regards
Madhuri
Mast
ReplyDelete