Tuesday, 16 May 2017

अंजलीची गोष्ट – पुन्हा तिघी


ऑपरेशन थिएटरची लिस्ट संपवून अंजली बाहेर आली. दुपारचे तीन वाजत आले होते. ऑपरेशन्स झालेल्या पेशंट्सना रिकव्हरी रूममध्ये हलवलं जात होतं. त्यांना दोन तासांनंतर बघून मगच घरी जावं की रजिस्ट्रारला कळवायला सांगावं, अशा विचारांत अंजली तिच्या केबीनकडे वळली. नर्सने चहा मागवून ठेवला होता. चहाचा घोट घेत तिने पर्समधून मोबाईल काढला. मोहना आणि शालिनी दोघींचेही मिस्ड कॉल्स दिसत होते. शालिनीचा कॉल आधी आलेला असला तरीही ती मोहनालाच आधी फोन करणार होती. त्यांच्या मैत्रीला तडा जाऊन आता एक वर्ष होत आलं होतं. त्यांच्या मागच्या भेटीनंतर, शालिनीचं, श्रीकांत, मोहन्याच्या नवर्याबरोबरचं अफेअर संपलं होतं पण मैत्री तुटली ती तुटलीच. शालिनीने अंजलीला दोन-तीनदा फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला. पण अंजलीच्या मनातून ती इतकी उतरली होती की अंजली एकदाही शालिनीशी धड बोलली नाही. आणि बरोबरच होतं म्हणा. असेल पंधरा वर्षांची मैत्री पण दोघीनाही सख्ख्या बहिणीसारखी असणारी तिसरी मैत्रीण मोहना, तिच्याच नवर्याबरोबर म्हणजे.... डिसगास्टिंग !         शालिनीचा विचार झटकून तिने मोहनाला फोन करायला घेतला. “हाय, तू फोन केला होतास? सॉरी माझं ओटी (ऑपरेशन थिएटर) जरा लांबलं.” “हो, श्रुतीचे वडील गेले” मोहनाने एक सुस्कारा सोडून म्हटलं. “किती पटकन गेले! गेल्या महिन्यातच त्यांच्या आजाराचं कळलं होतं,” अंजली आश्चर्याने उद्गारली. “श्रुतीला कळवलं का? ती येतेय? कधी नेणारेत माहितीये?” अंजलीने एकामागे एक प्रश्न विचारले. “तिच्या भावाशी बोलणं झालं माझं. तो म्हणाला श्रुती आधीच निघालीये अमेरिकेहून. रात्री पोहोचेल. तोपर्यंत थांबतील.” मोहनाने उत्तर दिलं. “ओके. मी रियाला आईकडे सोडते आणि पोहोचते. चल भेटू.” “अंजू.....” मोहना अडखळत म्हणाली, “श्रुतीसाठी जायला हवं पण मला नको वाटतंय ग, तिथे शालिनी सुद्धा असणार.” “साहाजिक आहे मोहना पण आता जास्त महत्वाचं काय आहे सांग? शिवाय श्रीकांत तर नाहीच आहे ना मुंबईत!” अंजलीने मोहनाची समजूत काढली. शालिनीने संबंध तोडून टाकल्यावर श्रीकांत आता दुसर्या कोणाबरोबर तरी फिरतो असं अंजलीच्या कानावर आलं होतं आणि शालिनी पुन्हा पूर्वीसारखी एकटीच असते असंही.
        कर्टसी म्हणून अंजलीने शालिनीलासुद्धा कॉल केला. “अंजू..... कशी आहेस?..... कित्ती दिवसांनी.......” अंजलीने फोन केला याचा आनंद शालिनीच्या आवाजात लपत नव्हता. “श्रुतीच्या वडलांचं सांगायला फोन केला होतास का?” अंजलीने तुटकपणे विचारलं. “हो, मी निघतेच आहे. तू आणि मोहनासुद्धा याल ना? श्रुतीला सपोर्ट वाटेल. तसंही त्यांना फार नातेवाईकसुद्धा नाहीत.” शालिनीने म्हटलं. “हो, आम्ही दोघी येतोय. तू असणार म्हणून मोहनाला नको वाटत होतं पण मी सामाजावलय तिला” अंजलीने रुक्षपणे सांगितलं. “अंजू, मी चुकले गं.... किती वेळा सांगू मी चुकले, तू तुझ्या दुःखात होतीस, मोहना तिच्या संसारात बिझी, आई तिकडे गावी. मी खूप एकटी पडले, किती पोकळ वाटतं माहितीये.... तुमची मुलं तरी आहेत. मला तेही सुख नाही. त्या एकटेपणाच्या दुःखाच्या भरात चूक झाली माझ्याकडून. मला माझ्या चुकीचं खरच खूप वाईट वाटतं ग. तू मोहनाला सांग ना अंजू. ती माझ्याशी बोलतच नाही.” शालिनीचा रडवेला आवाज ऐकून क्षणभर अन्जलीचं मन कळवळलं. पण तरीही शालिनीच्या वागण्याला क्षमा होती का? शेवटी चूक ते चूकच ना! आपण तिला माफ केलं तर मोहनाला कसं वाटेल असाही विचार अंजलीच्या मनात येऊन गेला. “तुझा एकटेपणा मला समजतो. दुर्दैवाने आपल्या तिघीन्च्याही आयुष्यात हा एकटेपणा आहे शालिनी. पण मैत्रिणीच्या नवर्याबरोबर अफेअर करणं मला तरीही पटत नाही. जाऊदे, ही वेळ नाहीये हे सगळं बोलण्याची. चल घाईत आहे. ठेवते मी.” असं म्हणून अंजलीने फोन कट करून टाकला.
      घरी पोहोचल्यावर तिने आईला श्रुतीच्या वडलांची बातमी सांगितली. “आज शालिनीशीसुद्धा बोलले पाच मिनिटं” अंजली म्हणाली, “खूप सॉरी म्हणत होती.” तिने पुढे म्हटलं. “मग तू काय म्हणालीस?” आईने विचारलं. “मी काय म्हणणार! मी काही ठीक आहे, जाऊदे, असं नाही म्हटलं पण मला वाईट वाटलं खरं” अंजलीने खाली बघत म्हटलं. “अंजू, तुमची इतक्या वर्षांची मैत्री! अगदीच तोडून का टाकता एवढ्यासाठी?”
“एवढ्यासाठी म्हणजे? तूच म्हणत्येस ना एवढ्या वर्षांची मैत्री म्हणून मग अशा मैत्रिणीच्या नवर्याबरोबर असं?” अंजलीने चिडून विचारलं.
“अंजू, अगं चुका होतात कधीकधी, पण तिला पश्चात्ताप झालाय. इतके वेळा सॉरी म्हणतेय, बरं ती काही नेहेमी अशीच वागणार्यातली आहे असंही नाही. होतं गं एखाद वेळेस काही. आणि आपण कोण परफेक्ट आहोत सांग! आशिषच्या वेळी सावरायला तुला तिने किती मदत केली. आपल्या माणसाच्या दहा चांगल्या गोष्टी बघून, एखादी चूक, त्यातही पश्चात्ताप असेल तर माफ केली पाहिजे”
“मी माफ करेनही. पण मोहना? तिला काय वाटेल?”“मोहना खूप समजुतदार आहे. तिलासुद्धा नक्कीच कळेल.”        घरचं आटपून अंजली श्रुतीच्या घरी निघाली. आईचं बोलणं तिच्या मनात रेंगाळत होतं. नकळत तिचं मन भूतकाळात गेलं. या तिघी मेडीकलच्या पहिल्या वर्षाला होत्या, श्रुती त्यांना दोन वर्ष सीनिअर. शालिनीची होस्टेलवरची रूममेट म्हणून आधी शालिनीशी तिची मैत्री झाली आणि मग अंजली आणि मोहनाशीसुद्धा. श्रुतीचे वडील सरकारी ऑफिसमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते. श्रुती त्यांची अगदी लाडकी होती. घरी सगळे तिला चिऊ म्हणायचे. तिला एक मोठा भाऊ होता, शार्दूल. तो त्यावेळी इंजिनीअरिंगला होता. त्यांच्या घरचं वातावरण फार कडक शिस्तीचं होतं. श्रुती नेहेमी बाबांना हे चालत नाही, ते चालत नाही, असं सांगत असे. पण ती फायनल इअरला असताना सर्जरीच्या एका लेक्चररबरोबर तिचं नाव जोडलं जाऊ लागलं. आधी उडत उडत कानावर येत होतं. पण मग श्रुती उघड उघड डॉक्टर भूषण शर्माबरोबर फिरू लागली. आणि फायनल इअरची परीक्षा झाल्यावर तर ती होस्टेल वरून बॅग पॅक करून त्याच्याबरोबर पळून गेली. लग्न झाल्यावर घरचे ऐकतीलच या विचाराने दोघे लग्न करून आले पण श्रुतीच्या वडलांनी तिचं तोंड बघायलासुद्धा नकार दिला. दहा वर्षानी मोठा, युपीचा भैया आणि स्वतःचा शिक्षक अशा माणसा बरोबर लग्न करून त्यांच्या मुलीने त्यांचं नाक कापलं होतं. त्यांनी जे तिचं नाव टाकलं ते टाकलंच. ते तिला भेटले नाहीतच पण त्यांनी पुढच्या पंधरा वर्षांत तिला कधी त्या घरी पाऊलही टाकू दिलं नाही. काही वर्षानी श्रुती भूषणबरोबर अमेरिकेला गेली. त्यांना मुलं झाली पण श्रुतीचं माहेर तुटलं ते कायमचंच.... भावाशी आणि आईशी तिचं बोलणं होत असे पण वडलांच्या नजरेआड. भारतात आली की ती बाहेर कुठेतरी त्यांना भेटत असे. रडून आता तिचे अश्रूही सुकले होते.
       पंधरा वर्षांनी श्रुती आज पुन्हा तिच्या माहेरी आली होती. मोजकेच नातेवाईक होते. इतक्या वर्षांनी वडलांना पाहिलं ते असं! तिच्या अश्रूंचा बांध फुटला. मोहना खरं तर श्रुतीहून लहान पण जात्याच प्रेमळ स्वभावाच्या मोहनाने श्रुतीला सावरलं, मायेने तिने तिला थोपटलं. श्रुतीला रडताना बघून शालिनी सुद्धा मैत्रिणीला सावरायला पुढे झाली. ती श्रुतीजवळ आल्याबरोबर मात्र मोहना तिथून दूर सरकली आणि नकळत अंजलीही. घरी करण्याचे विधी आटपून पुरुष मंडळी बॉडी घेऊन गेली. आता खोलीत श्रुती आणि या तिघीच उरल्या. निघता निघता श्रुतीच्या दादाने तिच्या हातात एक मोबाईल ठेवला. “चिऊ, बाबांनी जायच्या आधी दोन दिवस मला जवळ बोलावलं आणि म्हणाले, की इतकी वर्ष मी चिऊला येऊ दिलं नाही. पण आता तिला बोलावून घे. ती नक्की येईल. भेट होईल असं वाटत नाही पण तिला माझा निरोप दे. तुझा फोन लागला नाही म्हणून त्यांना तुला सांगायचं होतं ते यात रेकॉर्ड केलं आहे. चिऊला लगेच ऐकव तोपर्यंत मला मुक्ती नाही म्हणाले होते.” रेकॉर्डिंग सुरु करून तो निघून गेला. श्रुतीला अवघडल्यासारखं व्हायला नको म्हणून तिघी जायला उठल्या पण श्रुतीने शालिनीचा हात धरून तिला थांबवलं. हो ना करत तिघीही थांबल्या.
        रेकॉर्डिंग सुरु झालं. श्रुतीच्या वडलांचा तोच परिचित धीरगंभीर आवाज. “चिऊ, काय सांगू आणि कुठून सुरु करू. काय तोंडाने सांगू! किती दुखः दिलं मी तुला. तुझ्या एका चुकीसाठी केव्हढी शिक्षा दिली मी. तुला, तुझ्या आईला, शार्दूलला, भूषणला आणि मला स्वतःलासुद्धा. तू माझी इतकी लाडकी मग इतका कठोर कसा झालो मी! फार आशा लावली होती मी तुझ्यावर. तुझ्या पळून जाण्याने, लग्नाने, झालेल्या अपेक्षाभंगाचं, अपमानाचं दुःख पचवलच नाही मी. सतत राग केला की रागाचं सोंग केलं.” एवढ्या बोलाण्यानेसुद्धा त्यांना धाप लागली होती. पण अजून उशीर करून चालण्यासारखं नव्हतं. ते नेटाने बोलत राहिले. “तू लहान होतीस पण मी तर मोठा होतो ना, मग मी मोठ्यांसारखा का नाही वागलो! लहान वयात आमचे आबा गेल्यावर कुटुंबात मोठा, भावंडांत मोठा म्हणून जबाबदारीची झूल लवकर अंगावर घेतली. हळूहळू यशही मिळत गेलं. तसतसा माझा अहंकार वाढतच गेला. मग मला हे चालत नाही, ते आवडत नाही असं स्वतः भोवती तारांचं कुंपणच तयार करून घेतलं. आणि तुम्हालाही बळजबरीने त्या कुंपणात डाम्बून ठेवलं. स्वतःला नेहेमी इतरांपेक्षा वरचढ मानत गेलो. माझ्या भोवतीच्या प्रत्येकाची प्रत्येक चूक मी दाखवली. चुकीला क्षमा असते हे माझ्या पुस्तकात कुठे नव्हतंच. तुझी बाजू घेऊन भांडताना तुझी आई म्हणाली होती, “तुम्ही क्षमा कराल तरच परमेश्वराची क्षमा तुमच्यापर्यंत येईल” तेव्हा मी ते धुकावूनच लावलं. पण आता मला कळतंय की एकदा तुला बघायला, एकदा तुला भेटायला, तुला सांगायला की तुझ्या आठवणी शिवाय एक दिवस नाही गेला, मी काहीही करेन. पण आता ते शक्यच नाहीये. मी खूप वेळ लावला चिऊ, मी खूप वेळ लावला. तुझी आई नेहेमी म्हणते चिऊसुद्धा तुमच्या सारखीच हट्टी आहे. थोडा हट्ट ठीक आहे पण माझ्यासारखे grudge मनात नको ठेऊ. आपलं आयुष्य जे विस्कटलं, त्याला कारण तुझी चूक नाही तर माझं हे सल, आकस धरून रहाणं होतं. रोग गेला तरी जसे देवीचे व्रण रहातात, चेहरा विद्रूप करून टाकतात, तसे हे सल आपलं आयुष्य कुस्करून गेले. मी कायम राग धरून ठेवला त्यामुळे मला मागायचा काही हक्क नाही तरीही हा बाबा तुझ्याकडे माफी मागतो आहे. चिऊ, या गेल्या पंधरा वर्षांबद्दल गिल्ट तर अजिबात वाटून घेऊ नकोस, मोकळ्या मनाने मला निरोप दे आणि जमलं तर आपल्या बाबाला क्षमा कर, करशील ना?”
      रेकॉर्डिंग संपलं होतं. श्रुती हुंदके देऊन रडत होती. शालिनीने तिला मिठी मारली. मोहना आणि अंजलीही तिला येऊन मिळाल्या. अंजलीने मोहनाकडे पाहिलं. श्रुतीबरोबर तिने शालिनीलासुद्धा कवेत घेतलं होतं. डोळ्यातल्या पाण्याने मनातले सारे सल धुऊन टाकले होते.
 डॉ. माधुरी ठाकुर  

Tuesday, 2 May 2017

तोड पिंजरा, उड पाखरा


गेला एक तास या आडरस्त्यावर त्यांची गाडी चालली होती. "साहेब पत्ता बरोबर आहे ना ?" ड्रायव्हर हरिहरने विचारलं. "हो रे, हाच रस्ता सांगितलाय." आदित्य म्हणाला खरा पण मनातून त्यालाही खात्री नव्हती. आपल्या अक्ख्या आयुष्याचाच रस्ता चुकलाय असं त्याला वाटून गेलं आणि तेवढ्यातच समोर सायोची स्कूटी रस्त्याच्या कडेला त्याला दिसली.

 आता पुढे रस्ता संपलाच होता. फक्त पायवाट होती. आदित्य आणि हरिहर पायवाटेवरून चालू लागले. पाच दहा मिनीटांत ते एका मोठ्ठया बैठ्या घरासमोर आले. ते ओसरीपर्यंत पोहोचतात तोच आतून एक  वयस्कर गृहस्थ बाहेर आले. "आम्ही सायो मॅडमना भेटायला आलोय" आदित्यने सांगितलं. "कोण सायो?" त्या माणसाने उलट विचारलं. "इथे सायो नाही का आलीये? मुंबईहून?" आदित्यने चक्रावून  विचारलं. आता त्याला आपण चुकलोच आहोत असं वाटू लागलं. पण मग तिथे सायोची स्कूटी दिसली ती! "ओह... संयुक्ताताई.... अच्छा अच्छा... या ना, या बसा," त्या गृहस्थांनी आदित्यला एक ऑफिससारख्या खोलीत नेलं "मी बोलावून आणतो त्यांना" म्हणून ते निघून गेले.

 आदित्य अवघडून बसून राहिला. सायोला आपण आलेलं मुळीच आवडणार नाहीये याची त्याला खात्रीच होती. पण आता सायो या आडजागी कशाला आली असेल ही त्याची उत्सुकताही चाळवली गेली होती. एका एस्कॉर्टला शहरापासून एवढ्या लांब या खेड्यात काय काम असेल! एस्कॉर्ट म्हणजे तरी काय, सायो ज्या एजन्सीमधून आली होती ती एस्कॉर्ट एजन्सी म्हणजे पॉश नावाखाली मुली पुरवण्याचा धंदाच होता आणि आदित्य सायोचा रेग्युलर कस्टमर झाला होता.

 'बावीस तारखेला पॅरिसचं शूट संपवून परत येईन सांगितलं होतं हिला तरी ही इकडे कुठे येऊन बसली' वैतागून त्याच्या मनात विचार आला. क्षणात स्वतःच्या विचाराचं त्यालाच हसू आलं. तो येणार म्हणून वाट बघत बसायला ती त्याची लग्नाची बायको थोडीच होती! आणि लग्नाची बायको जिला करणार होतो ती तरी कुठे थांबली! अचानक निघून गेली. झर्रकन साक्षीबरोबरचा त्याचा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर येऊन गेला. दोन वर्षांपूर्वीची त्यांची पहिली भेट, हळुवार फुलणारं प्रेम, तिचं त्याच्याबरोबर त्याच्या फ्लॅटमध्ये येऊन रहाणं, पंख लावून उडालेले दिवस आणि रातराणीसारख्या बहरलेल्या रात्री आणि मग अचानक पंख्याला लटकलेली साक्षी! ते दृश्य आठवूनही त्याच्या अंगाला कंप सुटला. त्याने खिशातून सिगारेट काढून पेटवली आणि एक झुरका घेतला. साक्षी मनोरुग्ण होती, तिला स्किझोफ्रेनिया होता. अश्या रोग्याला म्हणे वेगवेगळे आवाज ऐकू येत राहातात. अस्तित्वात नसलेले लोक त्यांच्याशी काही बोलतायत, काही सांगतायत असे भास होत रहातात. मग सहा महिन्यांत आपल्याला कळलं कसं नाही! नाही म्हणायला ती कधी कधी लोक तिच्याबद्दलच बोलतायत, कुजबुजतायत असं सांगायची पण माझ्यासारख्या प्रसिद्ध मॉडेलची गर्लफ्रेंड म्हटल्यावर अशी थोडी इन्सिक्युरिटी असणारच असं वाटून आपण ते कधी गंभीरपणे घेतलंच नाही.... साक्षीच्या मृत्यूला आपला हलगर्जीपणा जबाबदार आहे का हा प्रश्न त्याच्या मनात राहून राहून उठत असे. त्या धक्क्यातून, त्या दुःखातून सावरण्यासाठी आदित्यने काय नाही केलं. ड्रिंक्स, ड्रग्स आणि ड्रीमगर्ल. शेवटी ड्रीमगर्ल एस्कॉर्ट सर्व्हिसेसकडून सायो आली आणि तिच्या बरोबर आदित्यला थोडं बरं वाटू लागलं.

 "आदि ....." सायोच्या हाकेने आदित्यची तंद्री भंगली, "तू इथे!" तिच्या सुरात तिची नाराजी स्पष्ट होती. "इथे का आलास? मी सुट्टी घेऊन आलेय."

"हो, मी फक्त तुला भेटायला आलोय, सायो. दोन दिवसांनी पुन्हा महिनाभर बाहेर जातोय शूटसाठी." आदित्य ओशाळलेल्या सुरात म्हणाला. "बरं चल" म्हणत सायो आदित्यबरोबर बाहेर पडली. हरिहरला थांबण्याचा इशारा करून ते दोघे पायीच निघाले. ते आदिवासी लोकांचं छोटंसं खेडं होतं. चालत चालत ते दोघे वस्तीपासून थोडे लांब एका डोंगराजवळ आले. समोर एक छोटासा ओढा वहात होता. एका मोठ्या खडकावर सायो बसली. आदित्य तिच्या बाजूला जाऊन बसला. तिचा हात हातात घेत त्याने विचारलं, "तुझं नाव संयुक्ता आहे? आज मी सायो विचारलं तर त्यांना कळलंच नाही".
सायोने मान हलवली. "हो, माझं नाव संयुक्ताच आहे ... होतं" शून्यात बघत तिने उत्तर दिलं.

"इथे नेहेमी येतेस? हे तुझं गाव आहे?"

 "अंहं, नाही.... इथे अनाथालय आहे. या भागात बरीच बाळं, जास्त करून मुली टाकून दिल्या जातात. या अनाथालयात त्यांना सांभाळतात. त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करतात."

 "तू काय करतेस इथे येऊन?" आदित्य चकित झाला होता. सायोसारखी मुलगी असं काही करत असेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
"मी त्यांना होईल ती मदत करते. शहरातून मी त्यांच्यासाठी पुस्तकं, कॉम्प्युटर , कपडे मला जे परवडेल ते घेऊन येते. त्यांना इंग्लिश शिकवते. कॉम्प्युटर  वापरायला शिकवते, त्यांच्याबरोबर गप्पा मारते. काय जमेल ते करते. इथे मी त्यांच्यासाठी येत नाही. इथे मला सायो सोडून संयुक्ता होता येतं. म्हणून मी येते"

 "तू करत्येस हे सगळं चांगलंच आहे पण तरीही शेवटी आपलं स्वतःचं दुःख आपल्यापाशी रहातंच ना?" आदित्यने अगतिक होऊन विचारलं.

 "आदि, माझं पूर्ण नाव संयुक्ता पुंडलिक पाध्ये आहे. पुजार्याची मुलगी. घरच्यांबरोबर शहर बघायला आले, हात सुटला आणि मी चुकले. भलत्या लोकांच्या हातात सापडले आणि संयुक्ताची सायो झाले. माझे वडील मंदिरात कीर्तन करायचे. तेव्हा अर्थ कळत नव्हता, फक्त शब्द लक्षात राहिले. ते सांगायचे घटाकाश आणि मठाकाश, घड्यातलं आकाश म्हणजे पोकळी आणि मठातलं आकाश म्हणजे बाहेरचं अवकाश, आपल्याला वाटतं हे वेगळं आणि ते वेगळं, पण दोन्ही पोकळीच, दोन्ही एकच. दोन्ही एकमेकांशी जुळलेलंच आहे. मीसुद्धा या मुलांशी त्यांच्या सुखदुःखांशी जुळलेलीच आहे. ह्यांच्यासाठी काही करताना मी माझ्याच जखमेवर फुंकर घालत्येय असं वाटतं."

 "इतक्या कठीण परिस्थितीतही तू तुझा मार्ग शोधलास. मला मात्र अजूनही ते जमत नाहीये. पैसा प्रसिद्धी सगळं असूनही या निराशेच्या, दुःखाच्या पिंजर्यात अडकून गेलोय मी." आदित्य हताश होऊन उद्गारला.

 "तूसुद्धा तुझा मार्ग शोध ना आदि..... तुला स्वतःची ओळख आहे. ब्रँड इमेज आहे, पैसा आहे. एक साक्षी मनाच्या रोगाने गेली पण अश्या कित्ती साक्षी अजून जिवंत आहेत. त्यांच्यासाठी काही कर ना" सायोने  त्याचा हात घट्ट धरून सांगितलं.
अंधार पडू लागला तसे ते दोघे परत उठून अनाथालयाकडे आले. "गाडी आणि हरिहरला तुझ्यासाठी ठेऊन जाऊ?" आदित्यने विचारलं. "तू स्कूटी वरून गेलास तर उद्या पेपरमध्ये न्यूज येईल, मी येईन आपली आपण." सायोने हसत सांगितलं.

दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे आदित्य शूटसाठी निघून गेला. पण जेव्हा महिन्याभराने तो सायोला परत भेटला तोपर्यंत त्याने बरंच काही केलं होतं. त्याच्या हातात एक एन्व्हलप होतं. ते त्यांने संयुक्ताला दिलं. तिने उघडून बघितलं तर आत एक बँकेचं कार्ड, पासबुक, पासपोर्ट अश्या गोष्टी आणि काही पैसे होते. 
"तुझ्या एजन्सीशी बोललोय मी. त्यांचा अकाउंट सेटल झालाय. तू हवं तिथे जाऊ शकतेस. हवं ते करू शकतेस. यू आर फ्री. या बँक अकाउंटमधे तुला वर्ष दोन वर्ष सहज पुरतील इतके पैसे आहेत"
संयुक्ता थक्क झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, "हे सगळं मी कसं घेऊ? मी परतफेड कशी करणार?" तिने हुंदके देत विचारलं.
आदि हळुवारपणे म्हणाला, "फुकट नाहीये हे, पहिल्यांदी कोणी मला दिशा दाखवली आहे, फक्त सांगून नाही, कृतीतून! गुरुदक्षिणा आहे ही".
"तुला मी तुझ्याकडे राहायला हवंय?" संयुक्ताने विचारलं. तिच्या सध्याच्या आयुष्यापेक्षा तेही बरंच होतं पण शेवटी ती एक प्रकारची लाचारी , गुलामगिरी झालीच असती.

 "मला खूप आवडेल तू माझ्याबरोबर राहिलीस तर. पण मला माहितीये तुझा आनंद त्यात नाहीये. इथे राहिलीस तर 'सायो'च होऊन अडकशील. तू संयुक्ता आहेस, तुझ्या आकाशात भरारी घे. अगदी मोकळेपणाने. मागे वळूनसुद्धा पाहू नकोस आणि थांबू तर जराही नकोस कारण थांबलीस तर मी तुला धरूनच ठेवीन आणि कधीच जाऊ देणार नाही....." आपल्या हातांनी संयुक्ताने त्याचे डोळे पुसले आणि त्याचा निरोप घेऊन ती निघाली.

 सहा महिने झाले होते. संयुक्ताने आता स्वतःला त्या अनाथालयासाठी, तिथल्या मुलांसाठी वाहून घेतलं होतं. एक दिवस ती मुलांना जेवण वाढत होती तेवढ्यात तिथे काम करणारी मालती धावत तिला सांगायला आली. "ताई तुमचे ते शहरातले पाहुणे टीव्ही वर आहेत." संयुक्ता धावत टीव्ही असलेल्या खोलीत आली. ती जनहितार्थ पद्धतीची जाहिरात होती. संयुक्ता पोहोचेपर्यंत अर्धी जाहिरात आधीच झाली होती. आता आदित्यचा तोच देखणा चेहरा स्क्रीनवर होता. तो सांगत होता, "शरीरासारखंच मनही कधी आजारी पडतं. मनाचे रोग ओळखा , त्यांच्याबद्दल मोकळेपणाने बोला, उपचार घ्या. मनोविकारांबद्दलच्या मार्गदर्शनासाठी या नंबरवर विनामूल्य संपर्क करा - संयुक्ता फौंडेशन" डबडबलेल्या डोळ्यांनी संयुक्ता पहातच राहिली. दोघांनीही पिंजरे तोडले होते. पाखरांनी भरारी घेतली होती.

डॉ. माधुरी ठाकुर

https://drmadhurithakur.blogspot.co.uk/

Monday, 24 April 2017

चुकणारी  आई


"तुम्ही दोघांनी जर पटपट खाल्लं तरच पार्कमधे जायचंय, नाहीतर नाही" तिने नेहेमीप्रमाणे मुलांनी लवकर खावं म्हणून सांगितलं. आर्यन आणि विहान वय वर्ष पाच आणि तीन, दोघांनी आईची धमकी किती गंभीर आहे याचा अंदाज घेतला. आर्यनने पहिला घास तोंडात टाकला आणि " आय डोन्ट लाईक डोसा" म्हणून तोंड वाकडं केलं. विहानने तर भरवलेला घास तोंडातून फू फू करून बाहेर काढला. "त्यांना नकोय तर जाऊदे ना कॉर्नफ्लेक्स खाऊ दे त्यांना" नवर्याचा एक्स्पर्ट ओपिनियन! तोही मुलांसमोरच! तिला सुचेना की आता आधी मुलांना ओरडावं की नवर्यावर चिडावं ! "आपल्या पोटातल्या गुड बॅक्टरीयासाठी आंबवलेले पदार्थ चांगले असतात. आठवड्यात एक दिवस तरी शिजवलेला ब्रेकफास्ट खायला नको का त्यांनी! रोज कॉर्नफ्लेक्सचं खातात ना! आणि तू त्यांना खायला सांगायचं सोडून..." आता तिने आधी मोठ्या मुलाकडे, आर्यनकडे मोर्चा वळवला. तिने दामटून त्याला बसवलं आणि एक एक घास करत अक्खा डोसा भरवला . 
 "बॉल वगैरे काय घ्यायचं ते घे तोपर्यंत मी विहानला भरवते." विहानला भरवायला तिने घास घेतला खरा पण विहानने तोंड घट्ट मिटून घेतलं. शेवटी कंटाळून तिने तो नाद सोडून दिला. नाश्या ऐवजी विहानला एक ग्लास दूधच देण्यात आलं. 
"तू त्यांना नेतेयेस खरी पण आपल्याला दुपारी राजीवकडे जायचंय ना? उशीर नाही का होणार?" 
"हो रे, आम्ही येतो एक दीड तासात. तोपर्यंत तू आंघोळ वगैरे आटपून घे." तिने पटापट मुलांचे कपडे बदलले. बॉल, पाण्याच्या बाटल्या, सायकली गोळा केल्या आणि ती दोन्ही मुलांसोबत जवळच्या पार्ककडे निघाली. 
स्प्रिंग (वसंत) नुकताच सुरु होत होता. रस्त्याच्या कडांना पिवळी डॅफोडिल्स उमलली होती. इंग्लंडमधल्या त्या लहानश्या शहरातला उबदार उन्हाचा छानसा दिवस होता. 
छोटा विहान झूम.... झूम ..... करून त्याची तीन चाकी सायकल चालवत होता. आर्यन थोडा शांत वाटत होता. त्याने सायकल बाजूला टाकली होती. बॉल पायांनी ढकलत तो गवतावर फिरत होता. कोवळ्या उन्हात त्या दोघांना तसं खेळताना बघून तिला बरं वाटलं. लग्नानंतर तीन वर्ष थांबून त्यांनी चान्स घेतला होता. आर्यन झाला आणि राजाराणीचे एकदम मम्मी डॅडी झाले. मुलं वाढवताना काय काय करावं लागतं याचा शोध दोघांना नव्यानेच लागत होता. "म्हणजे आपल्या आईवडलांनीसुद्धा इतक्या खास्ता खाल्ल्या असणार" हेसुद्धा आत्ता जाणवू लागलं होतं. आर्यनला भावंडं असावं म्हणून पुन्हा मुलाचा विचार सुरू झाला आणि आर्यननंतर बरोबर दोन वर्षांनी विहान आला.
विहान होण्यापूर्वी त्यांना दोघांनाही आर्यांची इतकी काळजी वाटत होती! नवीन बाळामुळे आर्यनकडे दुर्लक्ष होता कामा नये हे त्या दोघांनी एकमेकांना आणि स्वतःला हजारेक वेळा बजावलं होतं. त्यात आर्यनचा स्वभावही शांत. मनातलं सगळं सांगतो की नाही असा तिला कधी कधी प्रश्न पडायचा. त्या मानाने विहान मात्र लहान असूनही बिनधास्त. पहिल्या मुलाला वाढवताना आईवडलांच्या मनात जी अतिरिक्त काळजी, भीती असते, ती मुलांच्या स्वभावातही दिसून येते असं तिने इंटरनेटवर एका लेखात वाचलं होतं. झालंच म्हणजे.... आपण फार काळजी करतो हीसुद्धा एक काळजी करण्याची गोष्ट आहे तर! असं तिला वाटलं होतं. पण पुढे त्यात असंही म्हटलं होतं की हेच आईवडील पुढची मुलं होईपर्यंत पालकत्वाला बर्यापैकी सरावलेले असतात त्यामुळे तेवढी काळजी केली जात नाही. परिणामी मुलंसुद्धा तशी रिलॅक्सड असतात...... असं बरंच काही सांगितलं होतं . बालसंगोपनाबद्दल ती बरंच वाचत असे. दोन आयुष्य आपल्याला घडवायची आहेत, केवढी मोठी जबाबदारी! आयटी मधली स्वतःची नोकरी, त्यात परदेशामधलं डू इट युअरसेल्फ (स्वतःची कामे स्वतः करा) कल्चर आणि मुलं ..... तारेवरची कसरतच होती खरी! 
तिच्या डोक्यात असे वेगवेगळे विचार चालू होते. परत तिची नजर मुलांकडे गेली. विहान मजेत सायकल चालवत होता. आर्यन मात्र नुसताच उभा होता. "सायकल नाही का चालवायची आज?" तिने त्याच्या जवळ जाऊन विचारलं.
"नाही" 
"बरं मग बॉलने खेळूया का आपण?"
"ओके" म्हणून मग ते दोघे बॉलने खेळू लागले. पण आर्यनचा काही खेळण्याचा मूड दिसत नव्हता. "काय झालंय? थकलायस का तू?" 
"आय अॅम बोअर्ड" 'बोअर्ड' ऐकल्यावर तिला इतका संताप आला. काय अर्थ आहे या वागण्याला. एवढा छान दिवस आहे. या थंड देशांमध्ये हिवाळ्यात महिनोन्महिने मुलांना थंडी पावसामुळे बाहेर खेळायला नेता येत नाही याचं तिला किती वाईट वाटायचं. मग काय आयपॅडस, कॉम्प्युटर्स आहेतच. जरा चांगला दिवस असेल तर मुलांना बाहेर खेळायला नेण्याचा त्यांचा आटापिटा असे. आतासुद्धा घरची आवराआवर, इस्त्री अशी कितीतरी कामं टाकून ती मुलांना पार्कमध्ये घेऊन आली होती आणि हे महाराज म्हणतायत "बोअर होतंय" त्याला ओरडायला ती तोंड उघडणार इतक्यात आर्यनचा एक मित्र आणि त्याची आई त्यांच्याच दिशेने येताना दिसले. मित्राची आई - तिची मैत्रीण, तिच्याशी बोलू लागली. आर्यनचा मित्र त्याला सोबत खेळायला बोलवू लागला. पण आर्यन अजिबातच खेळायच्या मूडमध्ये नव्हता.  "काय झालं ग? आज हा खेळत का नाही?" तिच्या मैत्रिणीने सहजच विचारलं. "काय माहीत! आत्ता घरी बरा होता. पार्कमध्ये जाऊया, जाऊया चाललं होतं. म्हणून सगळी कामं ठेऊन मी यांना खेळायला घेऊन आले तर बघ ना...... निघूच आम्ही आता. हा खेळतच नसेल तर काय उपयोग...." मैत्रिणीचा निरोप घेऊन ती निघाली. 
मुलांचे हात पकडून ती घरच्या दिशेने निघाली. आर्यनचा हात जरा घट्टच पकडून तिने विचारलं , "काय झालंय तुला? का नुसतं तोंड पाडून ठेवलंय ? घाईघाईने तयारी केली, सगळी कामं सोडून मी तुम्हाला खेळायला घेऊन आले, तो विहान बघ कसा खेळतो. तुझाच काय प्रॉब्लेम आहे! नंतर बाहेर जायचंय, तुम्हाला खेळायला वेळ मिळावा म्हणून मी ब्रेकफास्ट सुद्धा केला नाही, तशीच आले. मला थँक यू नकोय कोणाकडून पण तुम्ही तरी नीट खेळा. सगळं करून तुझं तोंड असं पडलेलंच रहाणार असेल  तर कशाला करायचं मग! आता परत कशाला आणेन मी तुला पार्कमध्ये!" आर्यनचे डोळे डबडबायला लागले होते. ती गुश्यात , तो रडवेला आणि मम्मी दादाला नेमकी का रागावतेय ते कळत नसल्याने गोंधळलेला, दादाकडे काळजीने बघणारा विहान, तिघे घरी पोहचले. 
त्यांचे चेहरे बघून काहीतरी बिनसलंय याची नवर्याला कल्पना आली. "तू डोसा खाल्लास का?" त्याने तिला विचारलं. "नाही. घेते आता" "मला वाटतं की ते...." त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच बाहेरच्या खोलीतून आर्यनचा आवाज आला. त्याने खाल्लेलं सगळं उलटलं होतं. डोसा पचला नव्हता.
"मी तुला तेच सांगणार होतो. डोश्याचं पीठ जास्तच आंबलंय बहुतेक. तू चव नव्हती पाहिलीस का?" 
"नाही रे!" तिने धावत जाऊन आर्यनला उराशी कवटाळलं. त्याचं तोंड धुतलं. कपडे बदलले. त्याला साखर दिली. तिच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. "सॉरी रे पिल्ला. मीच जबरदस्ती तुला डोसा खायला लावला. त्यामुळे तुला अन्ईझी वाटत होतं म्हणून तू शांत होतास आणि मी तुलाच ओरडले.....  आय अॅम सो सॉरी"
"इट्स ओके मम्मी" आर्यनने चिमुकल्या हातांनी तिचे डोळे पुसले आणि तिला मिठी मारली. उरलेला दिवस छान गेला. 
संध्याकाळी तिने आईला फोन केला. आईला तिने काय झालं ते सांगितलं. आपण किती वेड्यासारख्या वागलो या विचाराने तिची तिलाच लाज वाटली. एवढ्याश्या मुलाला अनाठायी एवढं ओरडलो म्हणून वाईट तर इतकं वाटलं ..... आईला सांगताना पुन्हा तिचे डोळे भरून आले, "माझ्याकडून इतक्या चुका होतात गं आई! मी खूप प्रयत्न करते सगळं नीट करायला, त्यांना सगळं बेस्ट द्यायला, जसं तू माझ्यासाठी केलंस, पण माझं सारखं सारखं चुकतं .... काय माहीत उद्या आर्यन आणि विहानला माझ्या काय आठवणी रहाणार आहेत, सारखी सारखी चुकणारी आई असं त्यांना माझ्याबद्दल वाटेल का गं!" 
"अगं वेडे किती विचार करतेस! आर्यनच्या जन्माआधी तू, तू होतीस, इंजिनिअर होतीस पण आई होतीस का? नाही ना? फक्त मूल जन्माला येत नाही. मुलाच्या जन्माबरोबर आईसुद्धा जन्मत असते. मूल शिकत असतं आणि आईसुद्धा शिकत असते, कधी मूल चुकतं आणि कधी आईसुद्धा चुकत असते. पण नंतर पुढे जाऊन काय लक्षात रहातं माहितीये , फक्त प्रेम! आणि मी चुका केल्या नाहीत म्हणून कोणी सांगितलं. पण चुकांहून अधिक तुझ्या लक्ष्यात काय राहिलं की मी 'कित्ती ' केलं . कारण बाळा, कोणत्याही केलेल्या गोष्टीपेक्षा त्या मागचा हेतू हा जास्त महत्वाचा असतो. हेतू चांगला असेल तर कृतीमधली लहान सहान चूक चालून जाते. आणि तू जे काही करत्येस ते प्रेमापोटीच ना. त्यांना प्रत्येक गोष्ट बेस्टच मिळावी म्हणून स्वतःची दमछाक होईल एवढा आटापिटा नको करत जाऊ. तुझ्या बाळांची काळजी घेतेसच, माझ्या बाळाचीसुद्धा काळजी घेत जा." आईशी बोलून तिच्या मनावरचं मळभ गेलं. आर्यन आणि विहानच्या पावलांचा दडा दडा धावल्याचा आवाज तिच्या खोलीच्या दिशेने यायला लागला. "मम्मी कॅच " म्हणून तिला कळायच्या आत, आर्यनने तिच्या दिशेने बॉल फेकला. एका हातात मोबाईल धरलेल्या तिने झपकन दुसर्या हाताने कॅच पकडला. "ये ऽऽऽऽ...." आर्यन आणि विहान खूष होऊन ओरडले आणि तिला येऊन बिलगले. चुकणार्या आईचे सगळेच कॅच काही सुटत नव्हते 😊

डॉ. माधुरी ठाकुर 

Monday, 10 April 2017

अंजलीची गोष्ट - संवेदना .... सहवेदना

"डॉक्टर, आत येऊ?" दरवाज्यातून आवाज आला. "हं, ये" अंजलीने पाहिलं काल रात्री डिलिव्हरी झालेली १२ नंबरची पेशंट आली होती. "अगं चालून का आलीस तू? काही होतंय का?" अंजलीने काळजीने विचारलं. "बस आधी". राधा समोरच्या खुर्चीवर बसली. राधा परवा डिलिव्हरी साठी बायकांच्या वॉर्डमध्ये ऍडमिट झाली होती. घरची परिस्थिती बरी होती म्हणून स्पेशल रूम घेतली होती. काल रात्री नॉर्मल डिलिव्हरी झाली. बाळ बाळंतीण दोघेही व्यवस्थित होते. पहिलंच बाळ, त्यामुळे घरच्यांमधे आनंदी आनंद होता. 

 

"बाळ कुठे आहे?" अंजलीने विचारलं. "सिस्टरने दिव्याखाली ठेवायला नेलंय"
"ओके, बोल..."
"मॅडम, मी ज्या खोलीत आहे त्याच्यासमोरच एका बाईचा बेड आहे. ती मुसलमान बाई....." राधाने चाचरत म्हटलं.
"रूही ...... तिचं काय?"
"तिला माझ्या रूम मध्ये हलवाल?"
"का आणि तू कुठे जाणार?" अंजलीने चक्रावून विचारलं.
"मला बाहेर जनरल वॉर्ड चालेल. खोलीचं भाडं आम्ही आधीसारखंच देऊ पण तिला सिंगल खोली वापरूदे."
"रूहीला सिंगल खोली? ती एकटीच आहे. तिचं बाळ गेलंय " अंजलीचा आवाज मऊ झाला होता.
"म्हणून तर.... इथे बाहेर प्रत्येक बाईकडे बाळ आहे किंवा होणार आहे. हीच एक एकटी आहे. नुकतंच तिचं बाळ गेलंय तिला कसं वाटत असेल ते मला माहितीये. माझंसुद्धा याआधी एकदा असं झालंय."
अंजलीने राधाच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाली, "तुझ्यासारखं कुणी भेटलं की बरं वाटतं, जे स्वतःच्या पलीकडेही बघतात. मी सांगते नर्सला तुमचे बेड बदलायला. तुझ्या घरच्यांना चालणार आहे ना?"
"हो मी विचारलंय त्यांना"

 

अंजली घरी आली. उद्या रविवार म्हणजे निवांत दिवस होता. रात्री जेवणं झाल्यावर रिया तिच्या जवळ येऊन म्हणाली, "मम्मी, आम्हाला प्रोजेक्ट करायचाय, सीझन्सवर (ऋतू) . टीचरने सांगितलंय इंटरनेटवरून माहिती घ्या, चित्र घ्या आणि चिकटवून पोस्टर बनवा. तू मला हेल्प करशील?"
"ऑफकोर्स सोनू. उद्या सकाळीच बनवूया. उद्या मी घरीच आहे." अंजलीने हसून म्हटलं.
दुसर्या दिवशी दोघीनी बसून पोस्टर पूर्ण केलं. अंजलीने पोस्टर गुंडाळून तो रोल रियाच्या बॅगमधे नीट भरला. "उद्या दे हं आठवणीने, नाहीतर बॅगमधे चेपेल "

 

दुसर्या दिवशी संध्याकाळी रिया पुन्हा अंजलीला म्हणाली, "मम्मी आपण अजून एक पोस्टर बनवायचं का?"
"आज पुन्हा बनवायला सांगितलंय? काय टॉपिक आहे?"
"नाही...... त्याच टॉपिकवर, पुन्हा"
"पुन्हा त्याच टॉपिकवर..... का?" अंजलीने आश्चर्याने विचारलं. रिया काहीच बोलली नाही. "खराब झालं का ते पोस्टर?" रियाने नाही म्हणून फक्त मान हलवली. "मग काय झालं सोनू? सांग मला. मी काही बोलणार नाही." रियाला जवळ ओढून मांडीवर बसवत अंजलीने विचारलं.
"मम्मी, गार्गी आहे ना .... तिला दिलं मी ते पोस्टर."
"गार्गीने बनवलं नव्हतं का?" अंजलीने उत्सुकतेने विचारलं.
"हो" आता सगळा प्रकार अंजलीच्या लक्षात यायला लागला.
"तुला तुझ्या मैत्रिणीला मदत करायची आहे हे चांगलं आहे सोनू पण तिने पोस्टर बनवलं नाही म्हणून तू तिला दिलंस तर तू तिला तिच्या चुकीमध्ये मदत करत्येस असं होतं. अशाने ती अजून मागे पडेल."
"पण ती कशी करणार, मम्मी? मला तू हेल्प केलीस. गार्गीने मला सांगितलं की तिचे मम्मी पप्पा सारखे खूप भांडतात. तिची मम्मी तिला घेऊन लांब जाणार आहे. गार्गी रडत होती .
तिचा होमवर्क तर कोणीच घेत नाही....." रिया पुढे सांगत होती. अंजली स्तब्ध झाली. आईवडलांच्या भांडणात होरपळणाऱ्या त्या एवढ्याश्या पिल्लासाठी तिचं मन कळवळलं .
"टीचरला नाही का सांगितलं गार्गीने?" तिने काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.
"ती कशी सांगेल मम्मी? आपल्याला वाईट वाटतं तेव्हा आपण कोणाला सांगतो का?"
अंजलीने रियाला मिठीत कवटाळलं. तिचा पापा घेऊन ती म्हणाली ,"बरोबर आहे. बरं झालं तू गार्गीला पोस्टर दिलंस . आपण दुसरं बनवू. आणि मी तुझ्या टीचरशी बोलून ठेवेन गार्गीबद्दल. त्यांना कल्पना असेल तर त्यांना तिला मदत करता येईल ना!". पुन्हा एकदा पोस्टर पूर्ण झालं. 

 

अंजली खिडकीत उभी होती. मनात विचारांची वावटळ. एवढीशी रिया, मैत्रिणीचं दुःख समजून घेत होती. मदतीच्या हाकेची वाट न बघता तिच्यासाठी जमेल ते सगळं करत होती. तिथे ती पेशंट राधा, बाळ झाल्याच्या आंनदात हरवून न जाता दुसर्या अनोळखी बाईचं दुःख समजून त्यावर फुंकर घालत होती. अंजलीला डॉक्टर दीक्षितांचं (सायकियाट्रिस्ट) बोलणं आठवलं, "कित्येकदा स्वतःच्या आनंदात मश्गूल असताना आपल्याला इतरांची दखलच नसते, किंवा कधी स्वतःच्या दुःखातच आपण इतके चूर असतो की आपल्यासारखंच, कधी त्याहूनही अधिक दुःख भोगणारे लोक आपल्या आजूबाजूलाच असूनही  आपल्याला ते दिसतंच नाहीत. फक्त आपली सुखं आणि आपली दुःख यांच्यापलीकडे, इतरांकडे आपली नजर गेली आणि त्यांच्यासाठी लहानशीही गोष्ट आपण केली तर ती आपल्याला शतपटीने सुख देऊन जाईल." किती बरोबर सांगितलं डॉक्टर दीक्षितांनी.
तिची नजर खिडकीच्या बाहेर गेली. सूर्य मावळत होता पण लुकलुकणार्या दिव्यांनी अंधार उजळून गेला होता.



 डॉ. माधुरी ठाकुर


Wednesday, 29 March 2017

अंजलीची गोष्ट - आनंदयात्री

 

"हाय" त्या ओळखीच्या आवाजाने चमकून तिने दरवाज्याकडे पाहिलं. अपूर्वाला पाहून ती चकितच झाली. "अपूर्वा, तू इथे? सगळं ठीक आहे ना?" तिने काळजीने विचारलं.
"खरं म्हणजे ठीक नाहीये. ठीक असताना कोणी डॉक्टरकडे कशाला येईल?" अपूर्वाने हसत हसत म्हटलं.
"ते ही खरंच. अगं पण घरी यायचस, बोल काय म्हणतेस?" अंजलीने विचारलं. 

"आमची न्यूज तुझ्या कानावर आली की नाही?"क्षणभर विचार करून अंजली म्हणाली, "हो, आई म्हणाली की तुझं आणि तुषारचं पटत नाहीये म्हणून" 

"हो त्याचबद्दल बोलायचं होतं" अपूर्वाने समोरचा पाण्याचा ग्लास उचलला, एक घोट पाणी पिऊन मग तिने सांगायला सुरुवात केली, "आमच्या लग्नाला आता नऊ वर्ष झाली. सुरुवातीपासूनच आमचं पटत नव्हतं, पण आधी आई वडलांना काय वाटेल आणि मग मुलांचं कसं होईल या कात्रीत सापडून निर्णय घेता येत नव्हता. पण शेवटी असं वाटतं की आईवडील, मुलं वगैरे सगळं ठीक आहे पण शेवटी माझं स्वतःचं सुद्धा आयुष्य आहेच ना? मग मी किती कॉम्प्रमाइज करू आणि का? ज्या माणसावर माझं प्रेमचं नाही त्याच्याशी हा खोटा खोटा संसार किती करायचा....."
"प्रेमचं नाही म्हणजे?" अंजलीच्या तोंडून आपसूकच प्रश्न आला. 

"आमचं लग्न अरेन्ज मॅरेज होतं. मी मुंबईची, तुझी मावशी , तुषार सगळे सुरतचे. पण खूप मोठा बिझनेस, चागलं स्थळ म्हणून माझ्या आईबाबांनी घाई केली. दोनचार भेटींत स्वभाव काय कळतो! मी इथे मुंबईत मित्रमैत्रिणींच्या ग्रूपमधे वाढलेय. तुषार नुसता एकलकोंडा! पैसे आहेत पण कसल्या आवडी निवडीच नाहीत. शनिवार रविवार जरा मजा करावी , बाहेर पिक्चरला जावं तर तेव्हा तर शोरूम आणखीनच बिझी असतं. हा घरीच नसतो. फिरायला काय जाणार! शिवाय ही ..... एवढी मोठी फॅमिली. प्रत्येकाला वेगवेगळा फ्लॅट आहे पण जेवण सगळ्यांचं एकत्र. त्यामुळे सासू सासऱयांचा सतत वाॅच. बाहेर जाताना सुद्धा सांगून जावं लागतं का तर म्हणे त्याप्रमाणे जेवण करायला."

"तूसुद्धा जॉब करतेस ना?" अंजलीने विचारलं.
"हो, नशीब! आठवडाभर सतत सकाळ संध्याकाळ मला यांना बघावं नाही लागत. म्हणून मी अजून वेडी नाही झालेय"
"पण मग मुलं?"
"मुलं तर काय दिवसभर आजी आजोबांकडे असतात. झोपण्यापुरती येतात. आमची मुलं, दीराची मुलं, सगळी तिकडेच असतात. त्यामुळे त्यांची मजा चालते" 

"आणि एकत्र जेवण म्हणजे तुम्ही दोघी सुना आळीपाळीने करता का?"
"नाही ग! सगळा स्वयंपाक सासू सासर्यांच्या कॉमन किचनमधे होतो. स्वयंपाकाला बायका आहेत. पण मला वाटतं कशाला रोज सगळ्यांनी खाली एकत्र जाऊन जेवायला पाहिजे? जेवण म्हटलं की एकत्र, हॉलिडे म्हटला की एकत्र! गेल्या नऊ वर्षांत नऊ वेळीसुद्धा आम्ही दोघेच असे बाहेर गेलो नाहीये. जिथे जातो तिथे अक्ख्या खानदानाबरोबर जावं लागतं."

"पण तुषारचा स्वभाव शांत आहे ना गं ?" तुषार जरी अन्जलीचा मावसभाऊ असला तरी अंजलीची मावशी सुरतला राहात असल्याने त्यांच्या गाठीभेटी फार कमी होत्या.
"असल्या शांतपणाचा काय उपयोग!" अपूर्वा वैतागून सांगू लागली, "याने ठणकावून सांगायला काय हरकत आहे की आम्हाला सगळं एकत्र नाही आवडत म्हणून. मी सांगायला म्हटलं तर मलाच म्हणतो की मी का सांगू, मला तर एकत्र आवडतं!"

"सासरचे लोक सासुरवास करतात का तुला?" अंजलीने विचारलं. "सासुरवास असा नाही पण त्यांच्या सतत जवळ असण्याने मला घुसमटायला होतं"

"पण तुझी मुलंसुद्धा सांभाळतात ना ते?"
"हो ते एक आहे. खरं सांगायचं तर त्यांचा असा विशेष त्रास नाहीये. प्रॉब्लेम तुषारचाच आहे. या सगळ्या लोकांच्या गराड्यात आमच्या दोघान्मधलं प्रेम कधी उमललच नाही. प्रेमात जसं क्लिक होतं ना तसं कधी झालंच नाही आमच्यात. लग्ना आधी मी किती रोमँटिक होते. काय काय कल्पना होत्या माझ्या ! पण प्रत्यक्षात फक्त या मोठ्ठ्या फॅमिलीशी आणि बँक बॅलन्स शी लग्न लागल्यासारखं वाटतं मला. वरवर पैसा छान दिसतो. पण आत माझ्या मनाला समाधान जराही नाही. गेली नऊ वर्ष आम्ही असेच ढकलतोय. संसार टिकायला मुळात प्रेम असायला नको का?"

"आणि तुला तुषारबद्दल प्रेम वाटतच नाही?"
"सॉरी टू से पण मला वाटतच नाही. त्याच्या प्रत्येक गोष्टीची चीड येते मला. सारखं सारखं घरच्यांचच ऐकणं, दिवसरात्र बिझनेस, ना हौसमौज, ना आवडीनिवडी..... अगदी विरुद्ध आहोत आम्ही एकमेकांच्या"

"खरंतर तुला काय सांगावं ते मला कळतच नाहीये. हे असं आहे ह्याची कल्पना तुला लग्नाआधीच होती. लग्नाच्या वेळी मोठा बिझनेस, मोठं घर हे जे तुषारचे प्लस पॉईंट्स होते तेच आता निगेटिव्ह पॉईंट्स वाटतायत. आणि प्रेम वाटत नाही हे तर माझ्या समजण्या पलीकडे आहे. लग्नाला नऊ वर्ष झाली. दोन मुलं आहेत. प्रेम नाही हे कळायला इतका वेळ
लागला? त्या दोन मुलांचं आयुष्य आता खराब होणार ते? तुझी बाजू मला समजते पण पूर्ण पटत नाही. सासू सासर्यांच्या सतत सोबतीचा तुला त्रास वाटतो, कबूल आहे पण त्यांच्याच कडे मुलं ठेऊन तू नोकरी करतेस हेसुद्धा तेवढंच खरंय. आणि तुषारचीही काहीतरी बाजू असेलच. कदाचित त्याचं चुकतही असेल पण त्याच्याकडून काही न ऐकता मी जर या गोष्टीबद्दल माझं मत बनवलं तर ते चुकीचं असण्याची शक्यताच अधिक नाही का!"
अपूर्वाला अंजलीचं बोलणं जराही आवडलं नाही. तिची नाराजी तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. "तू बोल त्याच्याशी. माझी काही हरकत नाहीये" तिने म्हटलं.
"पण तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे? नेमकं काय ठरवून तू माझ्याशी बोलायला आली होतीस?" अंजलीने रोखठोक प्रश्न केला.

क्षणभर घुटमळून अपूर्वाने विचारलं, "तू त्याला मुंबईला बोलावून घेशील का? मी गेला महिनाभर मुंबईला आलेय आईबाबांकडे. पण तो काही येत नाही. आला तर आम्ही मॅरेज काउन्सेलिंग किंवा डिवोर्स काहीतरी प्रोसिजर सुरु करू शकतो."

"तू एक महिना मुंबईत आहेस तर मग मुलं कुठे आहेत?" अंजलीने जरा आश्चर्याने विचारलं.
"मुलं तिकडेच. त्यांना सुरतलाच आवडतं" अपूर्वाने नाईलाजाने उत्तर दिलं, "मी मुंबईला हेड ऑफिसला ट्रान्स्फर घेतेय. ती एकदा झाली की मुलांना इकडेच बोलवून घेईन"
"मी फोन करते तुषारला. बोलते मी त्याच्याशी." अंजलीने अपूर्वाला म्हटलं. 

अपूर्वा निघाली. पुढे चार पाच पेशंट्स येऊन गेले. दुपारी मधल्या वेळात अंजली घरी आली. पण तिच्या डोक्यातून हे जात नव्हतं. सगळ्या दुःखाची सुरुवात अपेक्षाभंगात आहे ना, ती विचार करत होती. प्रेमाबद्दल, जोडीदाराबद्दल प्रत्येकाने मनात एक चित्र रंगवलेलं असतं. कधी आयुष्यात येणारी व्यक्ती तशी असते तर कधी अपेक्षेच्या अगदी विपरीत. मग अश्या वेळी अपेक्षाभंगाचं दुःख पचवावं, तडजोड करावी की सगळं सोडून पुन्हा नवी सुरुवात.... आणि पुन्हा तेच झालं तर.... पर्फेक्शनच्या शोधात किती धावणार? आणि अशी परफेक्ट व्यक्ती सापडलीही तरी जर त्यांचासुद्धा असाच पर्फेक्शनचा शोध चालला असेल तर आपण त्यात फिट होणार का? शिवाय आपल्या निर्णयांमुळे आणखी लहानग्यानचं आयुष्य बदलणार असेल तर किती काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवा. केवढी ही गुंतागुंत नात्यांची....

"अंजू , सुशीलाच्या हाताला बरीच सूज आलीये. बघतेस का तिला जरा?" आईच्या प्रश्नाने अंजलीची तंद्री भंगली. "हो चल ना" म्हणत ती उठली आणि स्वयंपाकघरात गेली. सुशीला अंजलीच्या घरी धुणीभांडी करायला येत असे. "बघू" म्हणत अंजलीने सुशीलाचा हात तपासला. चाफेकळीला बरीच सूज आली होती. "बराच सुजलाय की हात! कसं काय लागलं ?" अंजलीने विचारलं. "काल रातच्याला शिडीवरून पडली मी". "दुखतंय का खूप? गोळी देते ती घे दुखलं तर"
"दुखतंय तर खरं"
"कुठची शिडी चढत होतीस रात्री?" अंजलीने विचारलं. बायकांच्या इजा होण्याच्या केसमध्ये छळ होत नाहीये ना याची खात्री करण्यासाठी ती नेहमी बरेच प्रश्न विचारीत असे.
"आम्ही पोटमाळ्यावर झोपतो ना, शिडीवरून चढावं लागतंय"
"मी क्लिनिकला निघतेच आहे. चल माझ्याबरोबर. एक्सरे काढून घेऊया. फ्रॅक्चर वगैरे नाहीना बोटाचं ते बघून घेऊ." सुशीलाला घेऊन अंजली निघाली. सुशीला गाडीत अंग चोरून बसली होती. तिला मोकळं वाटावं म्हणून अंजलीने गप्पा मारायला सुरुवात केली. "कोण कोण आहे तुझ्या घरी?" "माझा नवरा, दोन मुली, एक मुलगा, सासू, सासरे, दीर, भावजय, दिराची पोर आणि मी. सगळे मावत न्हाईत म्हणून तर आमी माळ्यावर झोपतोय"
"तू तर नेहेमी छान खूष दिसतेस, मला वाटलं तुमचं आपलं आपलं घर आहे." अंजलीने म्हटलं.
"न्हाई ताई, सगळे हायेत म्हणून तर खुशी. ते पोरान्ला बगतात तवा तर मी कामाला जाते, चार पैसं मिळतात. हां थोडी गर्दी हुते. अधनं मधनं भाण्डनबी हुतं पन कोन दोन लोक भांडत न्हाईत सांगा!"
"भांडण कोणाशी? नवर्याशी?"
"न्हाई बा... त्याच्या तर तोंडातून शबुद्च येत न्हाई. कामाशिवाय जराबी बोलत न्हाई त्यो. इचारलं की हो न्हाई एवढंच. त्याच्यापुढं काई न्हाई" सुशीलाने म्हटलं.
"हो? तू तर बडबडी आहेस.... तुला आवडतं असं शांत शांत?" अंजलीने न राहावून विचारलं. सुशीला थोडीशी लाजली आणि हसून म्हणाली, "आवडतं मला. त्यानला मी आवडते की न्हाई ते न्हाई ठावं पन मला आवडतं. माझं लगीन व्हायच्या वख्ताला माज्या मायने मला सांगितलेलं मी पक्कं ध्यानात ठेवलं , माय बोलली 'जे हाये ते बघत जा नि जे न्हाई ते सोडून दे, हाये ते बगशील तर हसत र्हाशील, न्हाई ते  शोधशील तर रडत बसशील.' मी पक्की गाठ बांधून टाकली की जे मिळंल तेच ग्वाड मानून घिईन आनी हळूहळू खरंच तसंच आवडायलाबी लागलं...."

अंजलीने  सुशीलाकडे हसून बघितलं, तिला पाडगावकरांचं गाणं आठवलं

'प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री'

तिच्या विचारांचा सगळा गुंता एका क्षणात सुटला. कोण म्हणतं हवं असलेलं मिळ्वण्यातच फक्त आनंद आहे? मिळालेलं गोड मानून घेण्यात सुद्धा सुख आहे.


डॉ. माधुरी ठाकुर