Wednesday 20 June 2018

साखळी

त्या दिवशी माझा मूड अगदी छान होता. काही विशेष कारण होतं असं नाही पण कधी कधी उगीचच छान वाटत असतं ना, तसा. आणि मग अचानक कुणाशीतरी बोलताना त्यांनी काहीतरी शेरा मारला, दुखावणारा, अगदीच अनावश्यक, झालं .... माझ्या छान मूडच्या फुग्याची सारी हवा गेली. त्यानंतर कामानिमित्त (professionally) मी ज्या कोणाला भेटले त्यांच्याबरोबर मी वेळ मारून नेली. पण घरी आल्यावर मात्र माझ्या मुलाच्या लहानश्या चुकीवर मी उखडले. इतर दिवशी कदाचित त्या लहानश्या गोष्टीवरून मी एवढी ओरडले नसते. मग त्या दिवशी का ओरडले? मी स्वतःशी विचार केला, माझी सबब तयार होती, “मी रागावले कारण दुसर्या कोणीतरी आधीच मला चिडवून ठेवलं होतं. भलेही माझ्या मुलाचा त्या सार्याशी संबंध नाही पण माझ्याकडेसुद्धा एक ठराविकच एनर्जी आहे ना. ती एकीकडे जास्त खर्च झाली तर दुसरीकडे त्याचा परिणाम होणारच.” तार्किक दृष्ट्या हे बरोबरसुद्धा आहे. आपल्या सर्वांचा एकमेकांबरोबरचा संवाद (किंवा Interaction) हा पासिंग द पार्सल खेळासारखाच असतो ना! आपल्याशी कोणी चिडून बोललं की आपण सुद्धा बहुतेकदा तिथल्या तिथे त्या व्यक्तीशी आणि त्या व्यक्तीशी शक्य नसेल तर शक्य असेल त्या पुढच्या व्यक्तीशी तसेच चिडून बोलतो. जेव्हा आपण ऑफिसमध्ये काहीतरी बिनसल्यावर त्याच तिरमिरीत घरी जातो आणि घरी जाऊन तो राग आपल्या घरातल्या व्यक्तींवर काढतो, तेव्हा आपण ऑफिसमधला कचर्याचा डब्बा स्वतः उचलून घरी नेऊन घरच्या लोकांच्या डोक्यावर ओतत असतो. हेच उलट सुद्धा लागू होतं, कामवाली आली नाही म्हणून किंवा मुलांनी उपद्व्याप केले म्हणून, सासूबाई बोलल्या म्हणून जेव्हा बाहेरून घरात नुकत्याच आलेल्या नवर्यावर आगपाखड केली जाते तेव्हाही स्थिती तीच. याची गरज आहे का? नाही .... हे तर आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. ही साखळी तोडायला तर हवी. पण जमणार कसं? कळतं पण वळत नाही. तर उत्तर आहे Mindfulness. चार पायर्यांच्या रूपात विचार करायचा झाला तर असा करता येईल.

  1.  कोणतीही गोष्ट बदलायची, सुधारायची असेल तर पहिल्या प्रथम गोष्ट समजून घ्यायला हवी. सध्या चालू आहे ते चुकीचं आहे हे किमान स्वतःच्या मनाशी तरी कबूल करायला हवं. 

  2. जे चुकतंय ते बदलायचं असेल तर तात्काळ भावनेच्या आवेगात (impulsively) प्रतिक्रिया देण्याच्या स्वभावाला हळू हळू मुरड घालायला हवी. जितकं आपलं वागणं हे impulsive कमी आणि विचारपूर्वक अधिक असेल तितकी आपल्याला माफी मागायची, पश्चात्ताप करण्याची वेळ कमी येईल. सत्याचे प्रयोगमध्ये महात्मा गांधीनी सांगितलंय की ते अतिशय लाजाळू होते, त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नसत. पण त्याचा एक मोठा फायदाही ते सांगतात की त्यांना कधी अविचारीपणे काही बोलल्याचा पश्चात्ताप करावा लागला नाही. अगदी तोंडातून शब्दच फुटत नाही एवढं नाही, तरी किंचित थांबून विचार करून बोलल्याने चुका टाळल्या जातात हे नक्कीच. मानसशास्त्रसुद्धा सांगतं की तात्काळ उत्तर देणार्यांपेक्षा किंचित थांबून उत्तर देणार्यांची अचूक उत्तरांची सरासरी (average) अधिक असते. 

  3. पुढची गोष्ट बोलण्याआधी, करण्याआधी आधीच्या चुकीच्या विचारांची साखळी तोडायची आहे हे एकदा लक्षात घेतलं की ही साखळी तोडण्यासाठी काय उपाय करायचा हे ज्याचं तो ठरवू शकतो. मी मनात रामरक्षा म्हणते किंवा ऐकते. कोणासाठी मोकळ्या हवेत एक छोटासा walk, एक कप चहा किंवा अगदी पाण्याचा घोटही ते काम करेल. आणि यापैकी काहीही शक्य नसेल तर फक्त एक दीर्घ श्वाससुद्धा मेंदूला अधिक ऑक्सिजन पुरवून खूप बदल घडवू शकतो. 

  4. शेवटची आणि तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे तपासणी. सिंह ज्याप्रमाणे चार पावलं पुढे गेल्यावर एक पाऊल मागे वळून पाहतो त्याप्रमाणे स्वतःमधील बदलांकडे वेळोवेळी लक्षपूर्वक पाहणारा मनुष्य स्वतःमध्ये अधिकाधिक उचित बदल घडवून आणू शकतो. 

क्रोध, लोभ, मद अशा कोणत्या षड्रिपूच्या साखळीत आपण अडकत नाही ना याचा विचार अवश्य करा. आणि एक संवाद (interaction) संपवून दुसरा सुरू करताना आधीच्या ठिकाणची केराची टोपली तर आपण पुढे नेत नाही ना ही काळजी घ्या. जर आधी आनंदाचा पुष्पगुच्छ मिळाला असेल तर तो पुढे न्यायला काहीच हरकत नाही 😊

 © डॉ. माधुरी ठाकुर


2 comments:

  1. छान माधुरी,
    तू पुन्हा लिहायला सुरुवात केलीस हे बघून आनंद झाला

    ReplyDelete
  2. Wonderful....Really helpful to ALL

    ReplyDelete