सुखाची किल्ली (कविता)
इतक्या दिवसांनी आज पुन्हा आले घरी
संसाराने हैराण झाले
माहेरीच मी बरी
सोन्यासारखा नवरा तुझा, मुलं मोत्यासारखी
ऐकते तेव्हा कधी कधी मीच होते परकी
आपल्याच पसंतीचा नवरा
आणि मुलंसुद्धा आपली
भरला संसार असताना
ही तळमळ तरी कसली
संसार काही थांबत नाही
आणि तळमळ काही संपत नाही
शेवटी म्हटलं देवा आता तूच सोक्षमोक्ष कर
लेक तुझी व्याकुळ इथे
तू बरा बसलायस वर
ह्याची बायको, त्याची आई
याच्याशिवाय मला माझं
वेगळं अस्तित्व आहे की नाही !!
मुलगा मुलगी समान असतात,
शाळेत सांगितलं जायचं
पण हेच करायचंय तर मुलींना डोकं कशाला द्यायचं !!
देव हसला आणि म्हणाला
तुला नेमकं काय हवय
स्वतःची वेगळी ओळख हवीये
की तुला समाधान हवय
स्वतःची वेगळी ओळख असणारा
प्रत्येक जण काही सुखी नसतो
माझ्या लाडक्या बाळा तुला
सुखाची किल्ली मी आज देतो
ज्या लक्ष्मीला पुजता तुम्ही, ती विष्णूचे पाय चेपते
सीतासुद्धा रामाबरोबर आनंदाने वनवास घेते
'मिळवण्यातच' सुख आहे, हा तर एक भ्रम आहे
सुखाचा खरा ठेवा तर, फक्त 'समर्पण' आहे
फुलबाजीसारखी तडतडू नको
ज्योतीसारखी तेवत रहा
चंदनासारखी झिजशील तेव्हा
सुगंधाला दिशा दहा
आपली कर्म चोख कर
प्रेमाने कर, आनंदाने कर
तुला सुख समाधानाचा
मनःशांतीचा मी देईन वर
संसाराचा जेव्हा वाटेल भार
तेव्हा वृद्धाश्रमात फेरी मार
इतरांची दुःख जेव्हा बघशील
तुझ्या ठेव्याची किंमत जाणशील
लोकांना जेव्हा आनंद देशील
तेव्हा मीही वरून हसत असेन
माझ्या हातांनी तुझ्यावर
आशीर्वाद बरसत असेन
तू हिशोब ठेऊ नकोस
तू फक्त विश्वास ठेव
'कर्म' आणि 'समर्पणालाच'
सुख, समाधान देतो देव
डॉ. माधुरी ठाकुर
Beautiful poem
ReplyDeleteSukhachi killi aahe tumcha blog hi...
ReplyDeletehttp://mehfil.blogspot.com