Tuesday, 14 February 2017

दुसरी बाजू (कथा)



"मनस्वीचा फोन आला होता आज" आई अंजलीला  म्हणाली, "तिचे फोटो बघितले का विचारत होती. मलासुद्धा म्हणाली की काकू तू फेसबुक , इंस्टाग्राम जॉईन कर" 
"मग करायचा का अकाउंट ओपन?"अंजलीने सिरियसली विचारलं. "वेडी आहेस की काय! मला काय गरज? मला कोणाशी बोलायचं असलं, की मी सरळ जाऊन भेटते, किंवा फोन करते. इंटरनेट वगैरेची गरजच नाही लागली आमच्या पिढीला."
"पण तुझ्या अगदी लहानपणच्या शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या फेसबुकवर तर छान नाही वाटणार तुला?" अंजलीने विचारलं.
"कुणास ठाऊक कसं वाटेल....... फुलपाखरं क्षणभर दिसतात नि उडून जातात म्हणून छान वाटतात. त्यांना तसं उडूनच जाऊ दिलं पाहिजे. पकडून काचेच्या डब्यात ठेऊन बघण्यात ती मजा नाही. माझ्या जुन्या मैत्रिणींच्या आठवणीसुद्धा तश्याच वाटतात मला. त्या नेहेमीच्या झाल्या तर त्या आता वाटतात तशा प्रेशस वाटणार नाहीत"
"मनस्वीने फोनमधून तुझ्या डोक्यावर हात ठेवला की काय!" अंजलीने डोळे मिचकावून विचारलं आणि मायलेकी हसू लागल्या.

मनस्वी अंजलीची चुलत बहीण पण हीही एकुलती एक आणि तीही. त्यात वयाचं अंतर कमी. त्यामुळे दोघी एकमेकींसाठी सख्ख्याच झाल्या होत्या. मनस्वी इंजिनीरिंग करून मल्टिनॅशनल कंपनीकडून लंडनला गेली होती. आणि तिथेच सेटल झाली होती. नवरा, एक मुलगा आणि एक मुलगी असं चौकोनी कुटुंब. मोकळ्या स्वभावाची मनस्वी, नावाप्रमाणे 'मनस्वी'च होती.

म्हटल्याप्रमाणे रात्री तिचा पुन्हा फोन आला. अंजलीने अजूनही फोटो पाहिले नव्हतेच.
"कसले फोटो टाकलेयस तू? सॉरी मी नाही पाहिले अजून" अंजलीला टेकनॉलॉजीची  विशेष आवड नव्हती."वाटलंच मला. अगं संडेला आम्ही लग्नाला गेलो होतो. तुम्ही नाही का लग्नाला गेलात की पैठणी नेसून, खांद्यावर हात ठेऊन ओळ करून फोटो काढता, तसं इथे आम्ही इवनिंग गाऊन घालून मिरवत होतो.".... मनस्वी.

 "कोणाचं लग्न  होतं?" अंजलीने विचारलं.
"अगं, स्वयमचा क्लासमेट आहे जेम्स , त्याची आई माझी मैत्रीण आहे. तिचं लग्नं होतं."....मनस्वी.
"सेकंड मॅरेज?"...अंजली
"नाही गं. ती आणि तिचा पार्टनर, म्हणजे जेम्सचा बाबा, गेली आठ एक वर्ष एकत्र आहेत पण या ना त्या कारणाने लग्न नव्हतं केलं. आता केलं! जेम्ससुद्धा त्याच्या आईवडिलांच्या लग्नाला आला होता" मनस्वी हसून म्हणाली.
"सोसायटी एक्सेप्ट करते का गं असं? कोणी काही म्हणत नाही?" अंजलीने प्रश्न केला.
"नाही....फारसं कोणी या सगळ्या गोष्टींची दखलच घेत नाही. ब्रिजेट जोन्स जनरेशन आहे हे. अर्ध्याहून अधिक लोकांचे पार्टनर्स असतात, नवरा बायको नाहीत! असली लग्न चर्चमध्ये करता येत नाहीत एवढच!"....मनस्वी.
"छान, तिथे ही तर्हा आणि इथे...." अंजली सांगू लागली, " आमच्या हॉस्पिटलमधे एकोणीस वर्षांची एक प्रेग्नन्ट मुलगी आहे जनरल वॉर्डला. अनमॅरिड! नर्स, बाकीचे पेशंट्स, त्यांचे नातेवाईक सगळे इतके वाईट वागतायत तिच्याशी. तुसडेपणाने बोलणं , टोमणे.... कायद्याप्रमाणे कोणी तिला बापाचं नाव सांगायला फोर्स करू शकत नाही. नाहीतर भांडावूनच  सोडलं असतं तिला."
"रेपची  वगैरे केस नाही ना" मनस्वीने प्रश्न केला.
"वाटत तर नाही. छोटी आहे गं. Some wrong decisions . पण मला सगळ्यात जास्त काय खटकलं माहितीये... त्याच वॉर्डमध्ये अजून एक पेशंट आहे. खूप दिवस अॅडमिट आहे. तशी मनमिळाऊ आहे. स्टाफ, बाकी पेशंट सगळ्यांशी गप्पा मारते. पण या बाईची मोठी मुलगी या प्रेग्नन्ट पेशंटबरोबर बोलत होती. हिने ते बघितलं मात्र, तरातरा जाऊन तिने मुलीला खेचून आणलं, एक धपाटा दिला आणि ओरडली की खबरदार परत कधी तिच्याशी बोलशील तर, 'असल्या' लोकांच्या नादी नाही लागायचं जरापण! आणि हा सगळा प्रकार माझ्या वॉर्ड राऊंडच्या वेळी. मग मी मधे पडले. त्या बाईला दम दिला आणि सांगितलं की पुन्हा त्या अनमॅरिड मुलीला  काही वेडंवाकडं बोललीस तर तुझाच बेड बाहेर कॉरिडॉरमधे टाकायला सांगेन. होपफुली तेवढी वोरनिंग थोडे दिवस पुरेल. पण खरं सांगू जर माझी रिया अशा एखाद्या मुलीच्या जास्त कॉन्टॅक्टमधे असेल तर मलासुद्धा काळजी वाटेल. मी त्या बाईसारखा सीन नाही करणार पण मनातून मात्र मलासुद्धा रियाने त्या दिशेने जाऊ नये असं वाटेलच. मग त्या बाईचं वागणं चूक ठरवणारी मी कोण? काय चूक आहे आणि काय बरोबर हेच मला कधीकधी कळेनासं होतं. " अंजलीने एक निश्वास टाकला.

 "अगं चूक आणि बरोबर असं काही नाहीच आहे खरंतर. अगदी रिलेटिव्ह टर्म्स असतात या. ज्याचा त्याचा चॉईस असतो कशाला चूक आणि कशाला बरोबर म्हणायचं हा. एकाला जे पूर्ण चूक वाटतं तेच दुसर्याला पूर्ण बरोबर. इथे आमच्याकडे प्रेग्नन्सीमधे  बाळ मुलगा आहे की मुलगी हे सोनोग्राफी करून बघण्यात कायद्याने काही गैर नाही . तेच तिकडे गुन्हा आहे. धर्माचंही तसंच. आपल्याकडे धार्मिक कार्य असताना दारू पूर्ण निषिद्ध, आणि इथे लास्ट सपरमधे  सुद्धा वाईन आहे. मग बरोबर कोण आणि चूक कोण?".....मनस्वी.

"असं कसं म्हणतेस? त्या मुलीबद्दल, तिच्या सिचुएशनबद्दल माझ्याही मनात सहानुभूती आहे. पण शेवटी लग्नाआधी मूल हे चूकच आहे ना!" अंजलीमधली रियाची आई बोलत होती.

"मग सुश्मिता सेन......तिची मुलं?" मनस्वीही मुद्दा सोडत नव्हती.

"अगं पण ती अडॉप्टेड आहेत"....अंजली

"ब्रॅड पिट अँजेलिना जोली .... त्यांचा तर लग्नाआधीसुद्धा मोठा कबिला होता. त्यात  अडॉप्टेड बरोबर त्यांची  स्वतःची मुलं सुद्धा. किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमधले हजारो सेलेब्रिटी..... खरं तर जगासाठी एखादी गोष्ट 'चूक आहे की नाही ' यापेक्षा 'ती गोष्ट कोणी केलीये' हे जास्त मॅटर करतं. शाळेतसुद्धा क्लास चालू असताना एखादा ढब्बू मुलगा बोलत असेल तर टीचर एक पट्टी द्यायच्या पण तेच जर बडबडणारा क्लासचा टॉपर असेल तर मात्र हलकीशी वॉर्निंग. तुझी ही प्रेग्नन्ट पेशंट नक्कीच गरीब किंवा मिडलक्लास असणार नाहीतर एकटीने मूल वाढवण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल तिच्यावर स्तुतिसुमनं उधळली असती." मनस्वी उपहासाने म्हणाली.

"तू म्हणत्येस ते थोडंफार पटतं मला. पण तूसुद्धा एका मुलीची आई आहेस. आपल्या मुलीनी असं केलं तर चालणार आहे का आपल्याला?" अंजलीचा प्रश्नही वाजवी होता.

"आपण कोंबडं झाकलं म्हणून काही सूर्य उगवायचा राहाणार नाहीये. त्यांचा मूळचा स्वभाव हे बीज, ज्या समाजात त्या वाढतायत तो समाज म्हणजे जमीन आणि आपण कळत नकळत त्यांच्यावर करत असलेले संस्कार म्हणजे खतपाणी, या तिन्हीच्या कॉम्बिनेशनमधून जे उगवायचं ते उगवणार. आणि त्यांनी काहीही केलं तरी आपण त्यांना टाकणार आहोत का कधी? पण आपल्या मुलांसाठी आपल्या मनात जेवढी क्षमा असते, तशी ती इतरांसाठी वाटत नाही. इतरांच्या केसमधे आपण झटकन डोळ्यांवर पट्टी बांधून हातात तराजू घेतो. जजमेंटल होणं जर आपण कमी केलं तर आपले आणि लोकांचे केवढे त्रास कमी होतील ना? तू रियाची आई म्हणून विचार करत्येस, ती एकोणीस वर्षांची मुलगीसुद्धा तिच्या आईची 'रिया'च आहे ना? त्या आईचा विचार कर बरं..... तिलासुद्धा माहितीये तिच्या मुलीकडून झाली चूक, तरीही लोकांनी तिच्याशी जसं वागावं असं तिला वाटत असेल ना तशी तू वाग, म्हणजे मग असं कन्फ्युजन होणार नाही तुला आणि रात्री शांत झोप लागेल." ....मनस्वी कळकळीने सांगत होती.

"बरोबर बोलत्येस तू, मोकळं वाटलं तुझ्याशी बोलून" मग बाकीच्या नेहेमीच्या गप्पा मारून दोघीनी फोन ठेवला.

दुसर्या दिवशी मनस्वीच्या फेसबुक वर फोटोखाली कमेंट होता "Looking gorgeous in the purple dress but what I love the most about you is your beautiful heart "



1 comment: