स्पोर्ट्स डे म्हटलं की माझं मन भूतकाळात जातं. मला माझ्या पार्ल्याच्या शाळेतले स्पोर्ट्स डे आठवतात.... रनिंग रेस, चमचागोटी, रिले अशा शर्यती आणि त्यानंतर विजेत्यांना लाकडी पोडियमवर उभं राहून मेडल.... अजूनही सगळं माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं.
माझा मुलगा जेव्हा पहिलीत गेला तेव्हा बर्याच वर्षांनी पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात स्पोर्ट्स डे आला. युकेमधल्या अॅबरडीनमधे आम्ही रहातो. चकचकीत उन्हाचा उबदार दिवस म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असते. तर असा छानसा दिवस होता. शाळेबाहेरच्या मोठ्या ग्राउंडवर उत्साहाने भरलेली, बागडणारी, फुलपाखरांसारखी मुलं आणि आपल्या पिल्लाना बघायला अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन आलेले बहुसंख्य पालक....
भरपूर मोठी जागा असल्याने एकाच वेळी वेगवेगळ्या वर्गांच्या वेगवेगळ्या रेसेस चालू होत्या. माझ्या मुलाच्या वर्गाची रेस जिथे चालू होती तिथे इतर पालकांसोबत मी उभी होते. धावणं, डोक्यावर पुस्तक घेऊन धावणं, सॅक रेस अशा वेगवेगळ्या शर्यती झाल्या पण गम्मत म्हणजे कुठेच विनर्सचं विशेष कौतुक नव्हतं. प्रत्येकालाच रेस पूर्ण झाली की टीचर शाबासकी देऊन स्टिकर देत होत्या. पहिलं, दुसरं आणि तिसरं येणार्याला अजून एक स्टिकर मिळत होता एवढंच! पालकही टाळ्या वाजवून मुलांना प्रोत्साहन देत होते पण ज्या चुरस, चढाओढीची मला अपेक्षा होती, तशी काही नव्हती. हार जीत काही नाहीच.... नुसता उत्साह आणि आनंद.... पेप्पा पिगच्या एपिसोडमधलं "व्हॉट'स इम्पॉर्टन्ट इज टेकिंग पार्ट" (हारजीत नाही, तर भाग घेणं , प्रयत्न करणं महत्वाचं आहे) हे, हे लोक खर्या अर्थाने आयुष्यात उतरवतात.मग एक गम्मत झाली. मोठ्या भावाला बघायला आलेला एक छोटासा तीनेक वर्षांचा मुलगा प्रत्येक रेसमधे जाऊन पळायला बघत होता. तो अजून शाळेतही जात नव्हता पण आता सगळ्यांना बघून त्यालासुद्धा भाग घ्यायची फार हौस वाटत होती. त्याची आई त्याला "अजून तू लहान आहेस, ही शाळेतल्या मुलांची रेस आहे" वगैरे समजावत होती पण तो ते काही फारसं मनावर घेत नव्हता. तेव्हा टीचरने एका बाजूला त्या छोट्या मुलाला, त्याच्या भावाला आणि अजून दोनतीन मुलांना घेऊन एक इन्फॉर्मल रेस घेतली आणि अजून शाळेतही नसलेल्या या मुलाला त्या रेसमधे पळू दिलं. बरोबरीची ती दोनतीन मुलं फास्ट पळाली पण त्या छोट्याचा पाच वर्षांचा दादा मात्र मुद्दाम स्लो मोशन मधे पळत होता. कारण त्याला त्याच्या छोट्या भावाने शेवटी एकटं मागे रहायला नको होतं! रेसमधे भाग घेता आला , स्टिकरही मिळाला. ते पिल्लू एवढं खूष झालं की बघायला नको...
माझ्या मुलाच्या पहिलीच्या वर्गात एक मुलगी आहे. तिचे दोन्ही पाय गुढग्याखाली अधू आहेत. ती क्रचेस (कुबड्या) किंवा व्हीलचेअर वापरते. तिला वर्गात मदत करायला एक हेल्पर असते. अशा मुलांच्या मदतीसाठी गव्हर्नमेंट कडून शाळेला असे हेल्पर्स मिळतात. तर ही मुलगीसुद्धा क्रचेस घेऊन रेससाठी उभी होती. रेस सुरु झाली. तिची हेल्पर आधारासाठी तिच्यासोबत होती. बाकी मुली पुढे धावल्या. ही अजून अर्ध्यावरच पोहोचली होती. तिचा चेहरा पडला. उत्सफूर्तपणे आम्ही पालकांनी टाळ्या वाजवून "फ्लोरा.... फ्लोरा.... " असं जोरजोरात तिला चीअर करायला सुरुवात केली. तिच्या चेहर्यावर पुन्हा हसू पसरलं. ती नेटाने पुढे जात राहिली. टाळ्या आणि घोषणांनी सारं ग्राउंड दुमदुमलं. फ्लोराने अख्खी रेस पूर्ण केली. टीचरने तिला शाबासकी देऊन स्टिकर दिला. तिचा चेहरा आनंदाने फुलला. तिला तसं बघून तिच्या आईचे डोळे भरून आले. माझ्यासारख्या अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. स्पर्धेचा 'सोहळा' झाला होता. पोडियम नव्हतं , मेडल्स नव्हती तरीही आम्ही सगळेच जिंकलो होतो......
डॉ. माधुरी ठाकुर
सुंदर!! आजच माझ्या मुलाच्या शाळेत स्पोर्ट्स डे ला जाऊन आले. थोड्या फरकाने असाच अनुभव घेतला. खरंच ती निखळ स्पर्धा जिंकण्याचा आनंद देऊन गेली.
ReplyDeleteअप्रतिम लिहिलंयस माधुरी! माझ्याही डोळ्यांसमोर शाळेचे दिवस उभे राहिले. आणि हार-जीत ला मागे टाकणारा तुझा अनुभव वाचून डोळे पाणावले. मला वाटतं, आता बऱ्याच शाळांनी असे बदल करायला सुरुवात केलीये. आपण पालक म्हणूनही त्याकडे तसं पहायला शिकायला हवं! 👍
ReplyDeleteसुंदर, अतिशय सुंदर
ReplyDeleteअतिशय सुंदर... मुलांना निखळ आनंद देणारा अनुभव
ReplyDeleteKharach kiti chan aanubhav!!
ReplyDeleteMe sudha vachatana flora cha perfomance imagine karat hote.
ya chotya gosti khup kahi shikun jatat.
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार .
ReplyDelete