"हो बोल. सगळं आटपलंय . रात्र झालीये इथे. तू घरी चाललीयेस का?" अंजली
"हो" मनस्वी म्हणाली. दोघीनाही घरी जाताना ऑन द वे एकमेकींना फोन करायची सवय होती.
"ब्लूटूथ वर बोलतेयस ना, ड्राईव्ह करताना हातात नको घेऊ हं फोन !" अंजली.
"हो ग. ब्लूटूथवरच बोलतेय. ऐक ना. स्वप्नीलचा मेसेज आलाय व्हॉट्स अँपवर." मनस्वीला पाल्हाळ लावायची सवयच नव्हती. डायरेक्ट मुद्द्यावर! "स्वप्नील आठवतो ना? माझ्याबरोबर इंजिनीरिंगला होता" तिने थोडं बिचकत विचारलं.
"हो आठवतो.... इतक्या वर्षांत कधी बोलणं नाही झालं त्याच्याबद्दल. कुठे असतो तो?आणि मेसेज का केला होता?" अंजलीने विचारलं.
" बँगलोरला असतो तो. आम्ही अजिबात टचमधे नव्हतो. दोनचार वर्षांपूर्वी कधीतरी त्याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तीसुद्धा मी डिक्लाईन केली होती. पण आजकाल सगळे रियुनियनचे वारे वाहातायत ना त्यामुळे इथून तिथून कॉन्टॅक्ट डीटेल्स मिळाले असतील." .....मनस्वी
"हं ....काय म्हणतोय तो?" अंजली.
"मोठ्ठा मेसेज आहे. त्याचंही लग्न वगैरे झालंय. मुलं आहेत. आणि तरी म्हणतोय की मी तुला आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही. लाईफ पार्टनर होण्याचा आपला चान्स तर गेला. आता किमान गुड फ्रेंड्स म्हणून तरी राहूया. फोनवर टचमधे राहूया असं म्हटलंय त्याने" मनस्वी.
"मग तू काय करणार आहेस? आणि ऋषिकेशची काय रिएक्शन?" मनस्वीच्या बाबतीत ऋषीला सांगितलंस का हा प्रश्न व्हॅलिडच नव्हता हे अंजलीला चांगलच ठाऊक होतं.
"तो तर काय नावाप्रमाणे ऋषीच आहे. त्याला या सगळ्याचं काही वाटतं असं वाटतच नाही. My love should not tie you down. It should liberate you.... असं काय काय बडबडत होता" मनस्वीने थोडंसं वैतागून म्हटलं.
"तुला आनंद व्हायला पाहिजे तुझा नवरा टीपीकल ऑर्थोडॉक्स नाहीये म्हणून!" अंजलीने हसून म्हटलं.
"आनंद आहेच गं. आमच्या लग्नाला आता पंधरा वर्ष झाली. सुरुवातीची कितीतरी वर्ष माझा ऋषीवर विश्वासच नव्हता. अगदी लव्ह मॅरेज असूनसुद्धा. अधून मधून त्याचा खिसा चेक कर, फोन चेक कर, झालंच तर इमेलसुद्धा चेक कर, असं सगळं मी करत असे. बर्याच उशिरा मला कळलं की मी त्याला सारखं तपासतेय कारण 'त्याचं काही आहे' असं नाही तर मीच माझ्या मनात इन्सिक्युअर आहे. मग प्रयत्नपूर्वक सगळं बंद केलं आणि माझंच मला इतकं पीसफुल वाटायला लागलं!"... मनस्वी.
"मग स्वपनीलला सांगून टाक की ऋषीसारखा नवरा असताना आणखी वेगळ्या मित्रांची गरजच नाहीये मला म्हणून!" ...अंजली.
"अगदी खरं आहे. ऋषी लग्ना आधी माझा मित्र होता. आणि लग्नानंतरसुद्धा नवरा बायकोच्या नात्याबरोबर आमच्यात मैत्री आहेच. पण समजा ऋषीच्या जागी एखादा खडूस नवरा असता तरीही मी लगेच जुन्या मित्राकडे गेले असते का? जुन्या नात्यामध्ये तेवढं बळ असतं तर तेव्हाच ते नातं तुटलं नसतं ना? मग जे टिकू शकत नाही म्हणून तोडलं ते धरून ठेवण्याचा अट्टाहास कशाला? तुटलं... तुटलं.... आता सोडून दिलं पाहिजे ना?" ....मनस्वी.
"बरोबर आहे. मला वाटतं बायका बहुतेक वेळा त्यांच्या संसारात साखरेसारख्या विरघळून जातात. नवरा, मुलं, घर, संसार आणि सगळं सांभाळून झालंच तर स्वतःचं करिअर हेच त्यांच्यासाठी विश्व बनून जातं . त्यामुळे या असल्या जुन्या गोष्टी उगाळण्याची गरजच रहात नाही त्यांना. स्वप्नील सारखे पुरुष मात्र भरल्या संसारात असूनही नर्मदेतले गोटेच रहातात ..... मग आता तू नो थँक्यू चा रिप्लाय करणार की रिप्लाय करणारच नाही?" ....अंजली
"तेच कन्फ्युज होतंय. खरं सांगू, जर कोणी मला आधी सांगितलं असतं की चाळीशी येऊ घातली असताना मला असा "तुला विसरू शकत नाही" वाला मेसेज येईल तर मला वाटलं असतं की मला छान थोडं फ्लॅटर्ड वाटेल, अजूनही आपले चाहते आहेत म्हणून! पण इथे तर उलट मला का कोण जाणे गिल्टीच वाटतंय." ....मनस्वी.
"मनू, तू तिथे लंडनला रहा, जीन्स घाल नि काहीही कर. मनातून तू तीच सरळ साधी मनस्वी आहेस. हे गिल्टबिल्ट सोडून दे. सीता काही रावणाला टेम्प्ट करायला गेली नव्हती तरीही सीताहरण झालंच ना? पुरुषांच्या ढिल्या कॅरॅक्टरसाठी स्वतःला गिल्टी का वाटून घ्यायचं आपण? नात्यांमध्ये ऑनेस्ट राहणं महत्वाचं आहे. ते तर तू आणि ऋषी आहेत ना! मग गिल्ट कशाला !" ...... अंजली
"बरोबर आहे तुझं ! थँक्स फॉर टॉकिंग! बरं वाटलं बोलून. चल मी घरी पोहोचतेय . आता मुलं येऊन चिकटतील. नंतर बोलूया?"... मनस्वी
"हो शुअर " अंजलीने फोन ठेवला.
मनस्वी घरी शिरली. ऋषी ऑफिस मधून येताना मुलांना घेऊनच आला होता. एकदा घरात शिरल्यावर स्वप्नीलच्या मेसेजची आठवणही तिच्या मनातून हद्दपार झाली.
बँगलोरच्या ऑफिसमध्ये ओव्हर टाइम करत बसलेल्या स्वप्नीलने निघण्यापूर्वी पुन्हा एकदा आपला मोबाईल चेक केला. आधीच्या शेकडो वेळांप्रमाणे आता सुद्धा रिप्लाय आला नव्हता.
डाॅ. माधुरी ठाकुर